

स्वच्छतेत ‘अर्थ’ नाही!
वाडे-वास्को येथील तळ्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण झाली असून परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. चतुर्थी काळात तळ्याच्या स्वच्छता अन् देखभालीकडे संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याने नाईलाजाने गणरायांचे विसर्जन दूषित पाण्यात करावे लागले. काही वर्षांपूर्वी सुमारे १५ कोटी रुपये खर्चून या तळ्याचे सौंदर्यीकरण झाले होते. १५ कोटींच्या खर्चानंतर मात्र, तळ्याच्या देखभालीकडे लक्ष द्यायला कुणाकडेच वेळ नाही. कारण आता त्यात ‘अर्थ’ नाही, अशीच चर्चा गणपती विसर्जनासाठी आलेल्या भाविकांत रंगली होती.
बुडत्याचा पाय खोलात
कुंभारजुवेतील मतदारांचा विश्वासघात करून काँग्रेसमधून भाजपमध्ये उडी मारलेले आमदार राजेश फळदेसाई यांचे राजकीय भवितव्य अधांतरी बनले आहे. कुंभारजुव्यातून सिद्धेश नाईक यांनी उमेदवारीवर दावा केला असून, मागील खेपेस त्यांना भाजपने ‘थोडे थांबा, पुढील निवडणुकीत विचार करू,’ असे म्हटले होते. त्यामुळे सिद्धेश यांना उमेदवारी मिळाल्यास फळदेसाईंचे काय, हा प्रश्न आहे. वाढदिवसानिमित्त जाहिराती व इतर मोठा खर्च त्यांनी केला. हा खर्च वाया जाणार असल्याची चर्चा आहे. फळदेसाई यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यास इतर पक्षांचीही उमेदवारी मिळणे कठीण होईल. काँग्रेसला म्हणून भरभरून मतदान केलेले कुंभारजुवेतील मतदार नाराज झाले असून, ते फळदेसाई यांना धडा शिकवण्यासाठी निवडणुकीची वाट पाहत असल्याची चर्चा आहे.
ताळगावात कोण?
निवडणूक अजून दूर असली तरी ताळगावात आमदारकीची स्वप्नं आतापासूनच रंगू लागली आहेत. चतुर्थीची संधी साधून इच्छुकांनी जनसंपर्काचा ‘श्रीगणेशा’ केला. काँग्रेसकडून ताळगावात कोण, याची चर्चा सुरू असतानाच ज्ञानेश्वर गोवेकर यांनी चतुर्थीनिमित्त घराघरांत जाऊन लोकांशी संवाद साधण्याचा धडाका सुरू केला आहे. एवढेच नव्हे, तर गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या पिशव्याही पोहोचवल्या गेल्या. काँग्रेसने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नसला तरी ज्ञानेश्वरराव मात्र ‘तिकीट आपलेच’ या विश्वासाने कामाला लागले आहेत! दुसरीकडे दत्तप्रसाद नाईक आणि त्यांच्या पत्नीनेही तयारी सुरू केली असल्याची चर्चा आहे, त्यांची गिरीश चोडणकरांशी जवळीक आहे. त्यामुळे ताळगावात काँग्रेसची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता वाढत आहे.
मनोज परब ‘कम बॅक’ करणार!
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विरोधी पक्षांची राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. ‘रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी’चे (आरजीपी) माजी अध्यक्ष मनोज परब यांची सध्या सोशल मीडियामधील पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टमुळे त्यांच्या सक्रिय राजकारणातील पुनरागमन होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गुरुवारी रात्री उशिरा, परब यांनी आपल्या मूळ गावी पीर्ण येथे समर्थकांच्या वेढ्यात असलेले स्वतःचे एक छायाचित्र समाजमाध्यमांत पोस्ट केले आणि त्यावर ‘माझे घर, माझा गणपती आणि माझे रिव्होल्युशनरी कुटुंब,’ अशी फोटोओळ दिली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. परब यांच्या एका समर्थकाने फेसबुकवर एक सूचक संदेश पोस्ट करून, परब यांच्यासाठी पुढील पाऊल उचलण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सूचित केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घडामोड समोर आली. त्यामुळे आता परब नक्की कधी राजकारणात परतणार, याकडे त्यांच्या समर्थकांसह इतर राजकीय पक्षांचे लक्ष असणार हे निश्चित.
डीजेवर पोलिसांचा लगाम
विसर्जन मिरवणुकीत ‘भक्ती’च्या नावाखाली कानठळ्या बसविणाऱ्या डीजेचा दणदणाट अखेर पोलिसांनी थांबविला. मुरगावचे उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी मांगूर येथे ट्रकवर बसविलेली डीजे यंत्रणा उतरवली. विशेष म्हणजे, डीजेला आळा घालण्यासाठी पोलिस आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या तीन बैठका झाल्या होत्या. तरी मागील दीड दिवसांच्या विसर्जनात डीजे वाजत राहिला; कारण पोलिसांची संख्या कमी होती! आता मात्र पूर्ण फौज तैनात झाली आहे. म्हणजे यंत्रणा कमी नव्हे, तर पोलिसच कमी पडले होते, हे मान्य झाले म्हणायचे!
समुद्रकिनारा की ‘बाईक ट्रॅक’?
मोरजी येथील विठ्ठलदास वाडो समुद्रकिनाऱ्यावर सध्या पर्यटकांची बाईक सफारी आणि आईस्क्रीमवाल्यांच्या गाड्यांची वर्दळ चांगलीच वाढली आहे. समुद्रकिनारा म्हणजे निवांत फिरण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठीची जागा; पण येथे चक्क वाळूतून बाईक धावताना दिसतात. तसा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे. नियम आहेत की नाहीत, असतील तर त्यांची अंमलबजावणी कोण करणार, अशी चर्चा या व्हिडिओनंतर सुरू झाली आहे. पर्यटकांच्या मौजेला लगाम नसला तरी समुद्रकिनाऱ्यालाही काही नियम असतात, याची आठवण कोण करून देणार? हा सर्वात मोठा प्रश्न.
विजय-वेंझी कंबाइन
गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पार्टी एकत्र आल्यावर काहींना जरूर धक्का बसला असेल; पण त्याहीपेक्षा लोकांना जास्त धक्का बसला तो विजय सरदेसाइ आणि वेंझी व्हिएगस एकत्र आल्यामुळे. वास्तविक, मागची काही वर्षे विजय आणि वेंझी व्हिएगस यांच्यामध्ये फारसा ‘याराना’ नव्हता. ते एकमेकांवर संधी मिळेल तेव्हा टीका करायचे. पण विजय आणि वेंझी हे दोघेही काम करणारे ‘डायनॅमिक’ नेते असल्याने ते जर दोघे एकत्र आल्यास राजकीय चित्र बदलू शकते, अशी ‘आप’मध्ये पूर्वीपासून चर्चा होती. आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल हे सुद्धा त्याच मताचे होते. या दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्याची कामगिरी म्हणे त्यामुळे आपचे स्थानिक नेते प्रशांत नाईक आणि जर्सन गोम्स यांच्यावर सोपवली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळेच कार्निवलच्या कार्यक्रमाला वेंझी पहिल्यांदा विजयच्या व्यासपीठावर चढले. एकमेकाचे तोंड पाहण्यास टाळाटाळ करणारे हे दोन्ही नेते आज मांडीला मांडी लावून बसत आहेत. यालाच खरे ‘डायनॅमिक पॉलिटिक्स’ म्हटले तर त्यात काही शंका आहे का?
बाणावलीत काँग्रेसची परीक्षा!
बाणावली मतदारसंघात ‘गोवा फर्स्ट’ या आघाडीचा उमेदवार निश्चितच झाला आहे. कारण, आम आदमी पक्षाचे सध्याचे वेन्झी व्हिएगस हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत आणि तेच येथील या आघाडीचे उमेदवार असणार, हे स्पष्ट आहे. खरी परीक्षा आहे ती याठिकाणी काँग्रेसची. कारण, या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची व्यूहरचना युवा नेते वॉरेन आलेमाव आणि केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी सुरू केली. ते दोघेही काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत; परंतु उमेदवारी दिली तरच काँग्रेसमध्ये जाऊ, असा त्यांचा सध्याचा व्होरा आहे. दुसरीकडे मात्र बाणावली काँग्रेस गट समितीने ‘आयात उमेदवार नको’ म्हणून भूमिका जाहीर केली आहे आणि या समितीने बाणावली जिल्हा पंचायत सदस्य लुईझा रॉड्रिग्स यांचे नाव आधीच उमेदवार म्हणून जाहीर केले. यावरून काँग्रेसचे नेते याठिकाणी नक्की काय भूमिका घेणार की माघार घेणार, हे कळेलच. पण भाजपलाही याठिकाणी उमेदवार शोधताना जागा जिंकण्यासाठी नाही तर निवडणूक लढल्याचा आनंद घेण्यासाठी तरी उमेदवार द्यावा लागेल, असेच दिसते.
ओंकारही आला आरती ऐकायला !
कधी महाराष्ट्रात, तर कधी गोव्यात... ओंकारला नेमके कुठे राहायचे आहे, हे वनखात्यालाही अजून उमगलेले नाही. त्यामुळे वनखाते त्याच्यावर बारीक नजर ठेवून आहे. गोव्यात चतुर्थीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच ओंकारनेही आपली ‘हजेरी’ लावली. तांबोसे गावातील ग्रामस्थ गणरायाच्या आरतीत तल्लीन असतानाच ओंकार चक्क गावातील रस्त्यावर अवतरला. आरतीचा आवाज ऐकून की काय, काही क्षण तोही थांबला आणि ग्रामस्थांचे लक्ष आपल्याकडे वळवले. आरती सुरू... आणि ओंकारची ‘एंट्री’! मग काय, उपस्थितांमध्ये या अनोख्या योगाचीच चर्चा सुरू झाली. काहींनी आरती म्हणत म्हणत ओंकारचे दुरून दर्शन घेतले. आता ओंकारला आरती आवडली की गावची ‘हवा’, हे मात्र त्यालाच माहीत!
गणिताची किमान लेवल
शालांत मंडळाने दहावीच्या गणित विषयासाठी लेवल १ व लेवल २ असे पेपर काढायला सुरवात केली होती. सध्याची स्थिती अशी आहे, की लेवल १ पेपर निवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा आंकडा दर वर्षी कमी होत आहे. हे प्रमाण शहरी शाळांपेक्षा ग्रामीण शाळांत अधिक आहे, हे आंकडेवारी सांगते. गंमत म्हणजे दोन्ही लेवलसाठी अभ्यासक्रम आणि शिक्षक एकच असतो. दोन लेवलचे पेपर असणारे कदाचित गोवा हे एकमेव राज्य असावे. त्यातून काय साध्य करायचेय, हे गणितीय गूढ उकलत नाही.
राजकीय समीकरणांचे संकेत
गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे विश्वजीत कृ. राणे यांचे फलक मये मतदारसंघात झळकले आणि दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राणे यांच्या घरी गणपती दर्शनाच्या निमित्ताने भेट दिली. त्यानंतर विजय सरदेसाई हे सुद्धा तेथे जाउन आले. हा निव्वळ योगायोग निश्चितपणे नाही. सालेली येथे राणे यांच्या मूळ निवासस्थानी चोडणकर यांच्यासह राजेश कळंगुटकर, यशवंत देसाई व अन्य मान्यवरांनी गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी गोवा आणि गोमंतकीय जनतेच्या शांतता, समृद्धी व सर्वांगीण कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध राजकीय नेत्यांची एकाच ठिकाणी होणारी उपस्थितीही लक्षवेधी ठरली. गणरायाच्या चरणी प्रार्थना; राजकीय समीकरणांनाही नवा संकेत? याविषयी आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘सर’चे रहस्य
काँग्रेसच्या गोवा प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी शुक्रवारी आपल्या अधिकृत समाजमाध्यम हँडलवरून गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यावर तोंडसुख घेतले व लगेच गोव्यातील डिजिटल वृत्तवाल्यांनी ब्रेकिंग न्यूज केली. यावर राजकारण तापू लागले व हवा जास्तच गरम होते, याची जाणीव झाल्याने कदाचित अंजलीताईंनी ती पोस्ट डिलीट करून टाकली. परंतु, काँग्रेसचे निष्ठावान समर्थक म्हणणारे राजकीय विश्लेषक विशाल पै काकोडे यांनी मात्र या पोस्टवर ‘जीसीं’ना ‘सर’ म्हटले नाही म्हणून डॉ. निंबाळकरांना ही पोस्ट काढून टाकण्याचा आदेश देण्यात आला, अशी मार्मिक टिप्पणी केली आहे. आता हे ‘जीसी’ कोण, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
खेळ सर्वेक्षणाचा...
म्हापसा मतदारसंघ सध्या वाढत्या राजकीय हालचालींमुळे आणि सत्ताधारी पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणामुळे चर्चेत आला आहे. आगामी निवडणुकीत म्हापशाची उमेदवारी कोणाला द्यावी, यासाठी पक्षातर्फे चाचपणी सुरू आहे. यात विद्यमान आमदार जोशुआ डिसोझा, मयूर सावकार आणि गुरुप्रसाद पावसकर ही नावे आघाडीवर असली, तरी प्राथमिक कल पाहता तिघांनाही मतदारांकडून अपेक्षेप्रमाणे सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. निवडणुकीला वेळ असल्याने पक्षपातळीवर चौथ्या पर्यायाचाही विचार होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, सुरू असलेल्या गणेशोत्सवाचे निमित्त साधून हे तिन्ही इच्छुक जनसंपर्क वाढवून आपली दावेदारी भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहेत. अखेर पक्षाची उमेदवारी कोणाला मिळते आणि म्हापशावर कोण वर्चस्व राखते, हे काळच ठरवेल; पण सत्ताधाऱ्यांसाठी ही लढत सोपी नसून, हे राजकीय अग्निदिव्यच ठरणार आहे.
उरक, चवथीनंतरचा...
काही गोष्टी घडतात ज्याचा गृहिणींना ताप आणि ताण असतो. कामवाली बाई चतुर्थीनिमित्त गावाकडे जाते. ती कधी उगवेल, याचा काही नेम नसतो. ती घरातच राहणारी व मदत करणारी असेल तर गावी महाराष्ट्रात वा कर्नाटकात गेल्यावर विविध कारणांस्तव यायला विलंब करते वा येतच नाही. चवथ झाली तरी ताण गृहिणींच्या डोक्यावरून विसर्जित होत नाही. सुरू होतो. मनधरण्या, फोन, प्रत्यक्ष जाणं, ‘अगं, पगार वाढवते’ हे नाना सायास सुरू होतात. एकदाची ती आली की खरा सुस्कारा सोडला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे हॉटेल-रेस्टॉरंटातल्या वेटरना एरवी एक दिवसाचीसुद्धा रजा मिळत नाही. त्याची भरपाई व वचपा ते चवथीला घरी गेल्यावर न सांगता रजा वाढवून सहज काढतात. मतं मागणाऱ्या नेत्यासारखा हॉटेलमालक हात जोडून त्यांच्या मागे लागतो. सध्या हे दोन्ही भवताप सुरू आहेत.
नुवेतील राजकीय खिचडी
गोव्यातील एसटींना राजकीय आरक्षण मिळणे हे जवळजवळ अशक्य असे चित्र आता तयार झालेले असताना, नुवे मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी कित्येकजण तयार आहेत. सुरुवातीला या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये लिंडन मोंतेरो, पाऊसिलिप दोरादो, मिकी पाशेको आणि बाबाशान यांची नावे घेतली जायची. नंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ॲलेक्स सिक्वेरा हेही निवडणूक लढवणार, असे जाहीर केले. आता या इच्छुकांच्या मांदियाळीत दिनेश बांदोडकर, ॲलेक्स परेरा आणि राजू काब्राल या नावांची भर पडली आहे. एकूणच नुवेत राजकीय खिचडी तयार झाली असल्यामुळे कुणाची खिचडी चांगली शिजणार, ते पाहावे लागेल.
कवित्व आणि फलित
ब्रिक्स परिषद संपली. कवित्व राहिलं, जगभर व्हायरल झालं. दोन अधिकारी, उच्चपदस्थ नेते भाषण करताना सुका मेवा म्हणजे ड्राय फ्रूट्स खात होते, ते फिल्मिंग जगभर पोहोचलं. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. थोडी ऊर्जा मिळावी म्हणून हा सुका मेवा ठेवतात, असे समर्थन काही जण करतात. राष्ट्राध्यक्षपदाचे नेते जेव्हा महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलतात, त्यांना एकाग्रतेने ऐकणं हा आदर असतो, अशीही मते आहेत. गोष्टी वाटतात साध्या, पण त्याचा बाऊ केल्यावर तो ताप कसा केवढा होतो, याचं हे द्योतक. भारतीय मॅनर्सवर ऊहापोह सुरू झालाय. भांडवल करायला विरोधकांना आयतं निमित्त मिळतं. तथापि, आपल्याकडे पुस्तक प्रकाशन सोहळे वा इतर कार्यक्रमांत भाषणं चालताना चहा-बटाटवडे वाटणे चालू असतं. हे शिस्तीचं उल्लंघन आहे की काय, यावर विचार व्हायला हवा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.