Goa Weather: घाटमाथा चिंब भिजला, पणजीसह किनारपट्टी कोरडीच; गोव्यात पावसाची तूट 31.6 टक्क्यांवर, शेती-बागायतींची चिंता वाढली

Goa Weather: गोव्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याबरोबरच त्याचे वितरणही कमालीचे असमान राहिले आहे.
Goa Weather
Goa WeatherDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याबरोबरच त्याचे वितरणही कमालीचे असमान राहिले आहे. १७ सप्टेंबरपर्यंत राज्यात ७७.९५ इंच पावसाची नोंद झाली असून, हंगामी सरासरी ११३.९७ इंच आहे. त्यामुळे राज्यात पावसाची ३१.६ टक्के तूट कायम आहे.

विशेष म्हणजे, राज्यातील अंतर्गत भागांमध्ये काही ठिकाणी २,७०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला असताना पणजीसह अनेक किनारी भागांत पावसाचे प्रमाण तुलनेने अत्यल्प राहिले आहे. पावसाच्या या असमान वितरणाचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जून आणि जुलै महिन्यात पावसाचे अनेक दिवस कोरडे गेल्याने हंगामाच्या सुरुवातीलाच मोठी तूट निर्माण झाली. ऑगस्टमध्ये दोन कमी दाबाच्या प्रणालींमुळे पावसाला काही प्रमाणात चालना मिळाली. त्यामुळे तूट काहीशी कमी झाली असली तरी ती भरून निघालेली नाही.

Goa Weather
Goa Medical College: गोमेकॉत रुग्णांच्या जेवणात मोठा बदल; स्टील प्लेटऐवजी आता 'कॅम्ब्रो प्लेट', स्वच्छता आणि पोषणावर विशेष भर

माजी राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ आणि हवामानतज्ज्ञ डॉ. एम. आर. रमेश कुमार यांच्या मते, यंदाचा पावसाळा तुटीचा असून गेल्या काही दशकांतील कमी पावसाच्या हंगामांपैकी तो एक ठरू शकतो. जून-जुलैतील दीर्घ कोरडे कालखंड हे त्यामागील प्रमुख कारणांपैकी एक असल्याचे त्यांनी नमूद केले. ऑगस्टमध्ये मात्र परिस्थितीत काही सुधारणा झाली. या महिन्यात दोन कमी दाबाच्या प्रणालींमुळे राज्याला चांगला पाऊस मिळाला.

राज्यातील विविध केंद्रांवरील नोंदी पाहिल्यास पावसातील असमानता स्पष्टपणे दिसून येते. वाळपई, धारबांदोडा, सांगे आणि केपे या अंतर्गत भागांत पावसाचे प्रमाण अधिक राहिले. वाळपई येथे २७१४.७ मिमी, धारबांदोडा येथे २७३३.३ मिमी, सांगे येथे २५८४.१ मिमी, तर केपे येथे २३९२.१ मिमी पाऊस नोंदविला. काणकोण येथे २०५६.६, साखळी येथे २००५.६, फोंडा येथे १८९४.२ आणि मडगाव येथे १८७२.३ मिमी पाऊस झाला.

याउलट पणजी, म्हापसा, दाबोळी आणि मुरगाव या भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिले. पणजीत केवळ १,२६३ मिमी पावसाची नोंद झाली. म्हापसा येथे १५२३.५, दाबोळी येथे १३५६.३, तर मुरगाव येथे १३५४.४ मिमी पाऊस झाला. त्यामुळे राजधानी पणजी हे राज्यातील कमी पाऊस झालेल्या केंद्रांपैकी एक ठरले आहे. माजी विभागीय कृषी अधिकारी आणि शेतकरी जोआकिम डिसोझा यांच्या मते, सुरुवातीला पावसाची कमतरता होती; परंतु त्यानंतर झालेल्या पावसामुळे परिस्थितीत सुधारणा झाली असून भातपिकाबाबत सध्या विशेष चिंता करण्याचे कारण नाही.

Goa Weather
Goa Road Accident: अपघाताने उद्ध्वस्त केले लग्नाचे स्वप्न; केरये येथे कंटेनरला बुलेटची भीषण धडक, पंढरपूरच्या तरुणाचा जागीच मृत्यू

पुढील दोन महिने महत्त्वाचे

पावसाचे प्रमाण कमी असण्याइतकेच त्याचे असमान वितरण हे यंदाच्या हंगामाचे वैशिष्ट्य ठरले आहे. काही दिवसांत मुसळधार पाऊस होऊनही तो मर्यादित भागात पडल्यास त्यातील मोठा हिस्सा वाहून जातो. त्याच्या तुलनेत सातत्याने आणि विस्तृत क्षेत्रात होणारा पाऊस भूजलसाठा, जलाशय, शेती आणि एकूण जलसंतुलनासाठी अधिक उपयुक्त ठरतो.

सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये गोव्यात चांगला पाऊस होण्याची उदाहरणे यापूर्वी आहेत. त्यामुळे हंगामाची अंतिम आकडेवारी अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र, उर्वरित काळात सर्वदूर आणि सातत्यपूर्ण पाऊस झाला तरच सध्याची मोठी तूट लक्षणीयरीत्या भरून निघण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी होणाऱ्या मुसळधार सरींनी मात्र हंगामातील संपूर्ण तूट भरून निघणे कठीण आहे.

‘उत्पादन निम्म्याने घटण्याची शक्यता’

पावसाच्या तुटीमुळे भातशेतीवर परिणाम होण्याची भीती काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. साल्वादोर-द-मुंद येथील शेतकरी विंदो पटेकर यांनी यंदा भात उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली. त्यांच्या मते, पावसाच्या कमतरतेमुळे उत्पादन निम्म्याने घटू शकते. मजुरी, यंत्रसामग्री आणि कापणीचा वाढता खर्च लक्षात घेता उत्पादनातून लागवडीचा खर्चही वसूल होईल की नाही, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

कृषी विभाग म्हणतो, मोठा परिणाम नाही

कृषी संचालक चंद्रहास नाईक देसाई यांनीही राज्यात पावसाची तूट असली तरी भातपिकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे. काही प्रमाणात उत्पादन घटू शकते. मात्र, राज्यातील संपूर्ण भातपिकावर त्याचा मोठा परिणाम होणार नाही, असे त्यांनी सांगितले. राज्यात आतापर्यंत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Goa Weather
Goa Economy: गोव्याच्या अर्थकारणाचे दिल्लीत 'मंथन'; महसूलवाढ आणि खर्च नियंत्रणावर भर, सरकारने घेतले 100 कोटींचे कर्ज

पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे पेरणीच्या कामावर परिणाम झाला आहे. सध्या भात पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत असून या काळात नियमित पाऊस उपयुक्त ठरतो. त्यामुळे पुढील काही दिवस पाऊस पडावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

- राजेंद्र केरकर, शेतकरी, सांगोल्डा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com