खरी कुजबुज: राणे म्हणतात, मुख्यमंत्री मास्टरस्ट्रोक खेळणार!

Khari Kujbuj Political Satire: विरोधकांकडून सातत्याने भाजपवर, विशेषतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यावर टीका सुरू आहे.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Dainik Gomantak
Published on
Updated on

राणे म्हणतात, मुख्यमंत्री मास्टरस्ट्रोक खेळणार!

विरोधकांकडून सातत्याने भाजपवर, विशेषतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यावर टीका सुरू आहे. परंतु जनता सुजाण असून पुन्हा भाजपलाच कौल देईल, असा ठाम विश्वास आरोग्यमंत्री विश्‍वजित राणेंनी व्यक्त केला आहे. त्यांची सध्याची आक्रमक देहबोली पाहता, अंगावर येणाऱ्या विरोधकांना शिंगावर घेण्याची त्यांनी पूर्ण तयारी केल्याचे दिसते. येत्या नवरात्रीनंतर मुख्यमंत्री सावंत काही महत्त्वपूर्ण आणि मोठ्या घोषणा करणार आहेत. या ‘मास्टरस्ट्रोक’मुळे राज्यातील युवा आणि महिलावर्ग भक्कमपणे भाजपच्या पाठीशी उभा राहील. त्यानंतर विरोधकांच्या राजकीय यात्रांचा सर्व जोर ओसरेल आणि त्यांना काहीच अर्थ उरणार नाही, त्यांच्या या विधानामुळे अनेक राजकीय विश्‍लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुलगा मुलगी भेद नको!

मुलगा असो वा मुलगी, दोघांनाही समान प्रेम, संधी आणि सन्मान मिळायला हवा. मुलगा म्हणजे कर्ता आणि मुलगी म्हणजे परकी, ही जुनी मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी आपल्याला मुलगी झाली तेव्हा जिलेबी नव्हे तर पेढे वाटले होते, अशी आठवण सांगत मुलगा- मुलगी भेद करू नका असे आवाहन केले आहे. मुलगीही कुटुंबाचा आधार बनू शकते, स्वप्ने पूर्ण करू शकते आणि समाजाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देऊ शकते. मुलांच्या संगोपनात भेदभाव न करता शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि निर्णयस्वातंत्र्याची समान संधी देणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. मुलगी घरातील ‘लक्ष्मी’ म्हणूनच नव्हे, तर सक्षम व्यक्ती म्हणून घडवूया. समानतेची सुरुवात आपल्या घरापासूनच होऊ द्या असे मुख्यमंत्र्यांना सुचवायचे आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Rakshan Yatra: काँग्रेस कार्यकर्त्यांना 'ऊर्जा'; शेकडोंच्या उपस्थितीत 'गोवा रक्षण यात्रे'ला प्रारंभ, 40 मतदारसंघांत 27 दिवसांचा दौरा

अपूर्व दळवी पुन्हा चर्चेत

चतुर्थीच्या काळात फोंडा मतदारसंघातील २५० - ३०० घरांना भेट देऊन आगळा वेगळा गणेश दर्शन दर्शन सोहळा घडवून आणून एकदम चर्चेत आलेले अपूर्व दळवी हे रविवारी पुन्हा एकदा चर्चेत आले ते पंचमी खांडेपार येथील रहिवाश्यांना त्यांनी स्वतःच्या खर्चाने बांधून दिलेल्या पदपुलामुळे. या भागातील रहिवाशांना पाणवठा ओलांडण्यासाठी त्रास होत होते. स्थानिकांनी ही अडचड दळवी यांच्या ध्यानात आणून दिल्यानंतर त्यांनी चक्क आपल्या खर्चाने त्यांना हा पदपुल बांधून दिला. रविवारी त्याचे उद्घाटनही करण्यात आले. कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपला लोकसंपर्क वाढवण्यावर भर देणारे दळवी हे सध्या त्यामुळे फोंड्यात चर्चेचा विषय बनला नसते तरच नवल म्हणायचे.

उमेदवारीसाठी कोटींची पैज

काँग्रेस पक्षाने अजून आपली उमेदवारी देण्याची प्रक्रिया सुरू केलीही नसताना कित्येकांनी आपली काँग्रेस उमेदवारी निश्चित असे सांगण्यास सुरुवात केली आहे. काल त्यावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनीही आश्चर्य व्यक्त केले होते. असे म्हणतात काँग्रेसची उमेदवारी आपल्यालाच मिळणार यावर काही जण पैज लावायलाही तयार आहेत. नावेली मतदारसंघात तर एकाने यासाठी आपण एक कोटी रुपयांची पैज लावायला तयार आहे, असे सांगण्यास सुरवात केली आहे. कशाच्या जोरावर त्यांना हा असा विश्वास वाटत असेल हो?

उमेदवारीसाठी चुरस, तिकीट कोणाला?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने तयारीला वेग दिला असून जुन्या गट समित्या बरखास्त करून नवीन समित्यांची निवड सुरू केली आहे. म्हापसा काँग्रेस गट समितीही बरखास्त करण्यात आली आहे. यापूर्वीच्या समितीत स्थानिक इच्छुकांच्या मर्जीतील सदस्यांचे वर्चस्व होते; त्यामुळे नव्या कार्यकारिणीत कोणाचे समर्थक बाजी मारतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या म्हापसा मतदारसंघातून उमेदवारीसाठी विजय भिके, डॉ. प्रतीक्षा खलप, सुधीर कांदोळकर आणि राहुल म्हाबरे यांच्या नावांची चर्चा आहे. तसेच, ॲड. शशांक नार्वेकर दावेदार असले तरी ते थिवीमधून लढण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. दरम्यान, नव्या गट समितीच्या स्थापनेनंतरच उमेदवारीच्या शर्यतीत नेमका कोणाचे पारडे जड ठरेल, याचे स्पष्ट संकेत मिळतील, अशी चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

आम्ही वाळपईला येणार; तेव्हा बोला!

‘सुरवात चांगली झाली तर अर्धे काम फत्ते झाले’ अशा आशयाचे इंग्रजीत एक बोध वाक्य आहे. काँग्रेस पक्षाच्या ‘गोंय राखण यात्रे’ला काल मंगळवारपासून धडाक्यात सुरवात झाली. सत्ताधारी भाजपवाले काहीही म्हणोत, उपस्थितांचा जोश पाहून युरी आलेमाव निश्चितच खुश झाले असणार व भाजप नेत्यांच्या मनात निश्चितच धडकी भरली असणार. भाजपचे मीडिया इन्फ्ल्यूएनसर यात्रेतील लहान सहान चुका सोशल मीडियावर व्हायरल करून खुश होण्याचा प्रयत्न करीत असणार. यावेळी सगळ्यात जास्त उत्साह विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांच्यात पहायला मिळाला. एका पत्रकाराने आरोग्य मंत्र्यांनी गोंय राखण यात्रेवर टीका केल्या बद्दल युरीची प्रतिक्रिया विचारली असता युरीने समर्पक उत्तर दिले. आमची यात्रा लवकरच वाळपई जाणार आहे, तेव्हा विश्वजीतना त्यांचा जनाधार समजणार. आता बघू यात्रेला येणारे निवडणुकीत काँग्रेसला साथ देतात, की केवळ मनोरंजनासाठी यात्रेत सहभागी होतात.

Khari Kujbuj Political Satire
Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

तेंडुलकरांची ‘गणेश भक्ती’

माजी खासदार विनय तेंडुलकर हे सावर्डे मतदारसंघाचे भाजपचे इच्छुक उमेदवार. त्यामुळे ते सध्या फोंड्यात विशेष दिसत नाहीत. पण परवा मात्र ते फोंड्याच्या बुधवार पेठ मंडळाच्या गणेशाचे दर्शन घेताना दिसले. या मंडळाच्या गणेश देवस्थानाच्या गणेश जयंतीला केलेले यजमानपद आपल्या बऱ्याच ‘मनोकामना’ सफल करून केल्या, असे ते नंतर बोलूनही गेले. त्यानंतर केलेल्या त्यांच्या सांगण्याला ‘फुलाचा प्रसाद’ मिळाल्यामुळे तर बाजी जिंकल्याचा अविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागला.आता हा प्रसाद म्हणजे योगायोग का तेंडुलकरांच्या मनाच्या भावना, यावर नंतर मंडपात बराच वेळ चर्चा सुरू होती. पण निवडणुकीमुळे बाप्पांच्या सेवेला जरा जास्तच ऊत येऊ लागला आहे, एवढे मात्र खरे. नाही का?

खर्गेंचे मराठीतून आवाहन

गोवा प्रदेश काँग्रेसच्या ‘गोवा रक्षण यात्रे’ला गोमंतकीयांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा द्यावा, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मराठी भाषेतून गोमंतकीयांना समाजमाध्यमांद्वारे केले आहे. गोव्यात सध्या मराठीला राजभाषा करावी म्हणून आंदोलन छेडले गेले आहे. त्यासाठी मराठीप्रेमी रस्त्यावरही उतरले आहेत. खर्गे यांनी मराठी भाषेतून केलेले आवाहन कार्यकर्त्यांना आणि मराठीप्रेमींसाठी नक्कीच दिलासा देणारी आहे. ही बाब कदाचित कोकणीप्रेमींना खटकली असेलही. त्याचबरोबर दुसरीकडे समाजमाध्यमांतून खर्गे यांच्या या मराठीतील आवाहनावर उलटसुलट प्रश्नही उपस्थित केले आहेत. मात्र, जर कोकणी भाषा येत नसल्यामुळे त्यांना हिंदीत बोलता आले असते. पण मराठीत बोलून त्यांनी गोव्यात काँग्रेसवाल्यांची पंचाईत केली असल्याचेही काहींनी समाजमाध्यमातून मत व्यक्त केले आहे.

हिंदी साहित्याचा आवाका

हल्लीच हिंदी दिवस १४ तारखेला देशभर साजरा झाला. या भाषेतील साहित्य मोठ्या आवाक्याचे आहे. टिव्ही व हिंदी चित्रपटांमुळे आज देश जोडला गेलेला आहे. आपापल्या भाषेत मुलं हे ऐकलेले शब्द सहज वापरतात. मुलं रील्स हिंदी भाषेतील बघतात. हिंदी भाषेत शेकडो मासिके येतात. आलोचना हे मासिक समीक्षेला वाहिलेलं आहे. ज्ञानपीठ संस्थेचं नया ज्ञानोदय यात इतर ललित कला व कलाउन्मेषांवर अप्रतिम लेख असतात. साहित्य अकादेमीचं हिंदी मासिक देशातील साहित्याचे अनुवाद देतं व त्याचा दर्जा उत्तम आहे. डिजिटल विश्वात हिंदी पुढे जात आहे. लेखकांनी अभ्यासकांनी हिंदी साहित्य वाचावं. कक्षा विस्तारत जातील. ज्ञानपीठकार विनोदकुमार शुक्ल यांच्या कादंबऱ्यांत नवप्रयोगांचे शैलीचे धुमारे दिसून येतात. समजणारा, वाचणारा व वाढणारा पाहिजे.

‘उज्ज्वला’चे पैसे मिळाले?

राज्यातील जनतेने चतुर्थीच्या लगबगीत, रखरखीत उन्हात ताटकळत उभं राहून ‘गोवा उज्ज्वला योजने’चे अर्ज भरले. सगळ्यांना वाटलं होतं की सणासुदीला म्हणजे चतुर्थीला खात्यावर ३ हजार रूपये जमा होतील. पण कुठे काय! अजून तर सरकारी पातळीवर अर्जांची छाननीच सुरू आहे, त्यामुळे हजारो कुटुंबे पैशांची वाट पाहत आहेत. आता गल्लीबोळात भलत्याच चर्चा रंगल्यात. कोणी म्हणतंय, ‘अगं, आपण दोघांनी एकत्रच अर्ज भरलेला, मग तुझ्या खात्यात पैसे आले आणि मला का नाही?’ तर कोणी सरकारच्या दिरंगाईवर तोंडसुख घेतंय. ‘उज्ज्वला’चे पैसे कधी जमा होणार, या एकाच प्रश्नाने सध्या राजकारण आणि समाजकारण दोन्ही चांगलंच तापलंय!

...तरीही एल्विस काँग्रेस पक्षात कसे ?

‘अवघड जागेचं दुखणं’ असा एक वाक्प्रचार आहे. एल्विस गोम्स हे काँग्रेससाठी व काँग्रेस एल्विस गोम्स यांच्या साठी अवघड जागेचे दुखणे बनले आहे का? असा प्रश्न कुंकळ्ळीतील जनतेला पडला आहे. काँग्रेस पक्षात राहून एल्विस काँग्रेस पक्षावर आरोप करतात. ते स्वतःच आपली उमेदवारी घोषित करतात. पक्षाच्या विरोधी पक्ष नेत्यावर कठोर टीका करतात. काँग्रेसने काढलेल्या ‘गोंय राखण यात्रे’वर व्यंग करतात. तरी काँग्रेसजन एल्विस गोम्स याच्यावर कारवाई करण्यात कचरतात. काँग्रेसने एल्विस गोम्स यांना दुर्लक्षित केले तरी एल्विस स्वतःहून पक्षाचा त्याग करीत नाहीत. काँग्रेस एल्विसना पक्षातून तडीपार करीत नाही, याचे नेमके कारण काय बुवा?

Khari Kujbuj Political Satire
Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

योजना आली, पण नियोजन कुठे?

सरकारच्या नव्या योजना सुरू होतात, यात आता काहीच नाविन्य राहिलेले नाही. निवडणुकीचे वारे वाहू लागले, की योजनांचा पाऊस पडणार, हे जनतेलाही आता चांगलेच कळले आहे! पण योजना जाहीर करण्याबरोबरच त्याचे नियोजनही तितक्याच जोरात झाले तर जनतेला रांगेत उभे राहण्याची वेळ येणार नाही, अशी चर्चा आहे. नुकत्याच सुरू झालेल्या ‘उज्ज्वला’ योजनेच्या बाबतीतही जनतेत अर्ज कुणी करावा, यावरून संभ्रम दिसून येतोय.

बाबूला गणपती पावणार?

कोणाचे तारे कधी चमकतील हे सांगता येत नाही. तेरा वर्षे आमदारकी केल्यावर मंत्री बनल्यावर लगेच दोन वर्षांनी बाबू कवळेकर यांच्यावर मंत्रिपद आणि आमदारकी गमावण्याची पाळी आली होती. दोन वर्षाच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत कवळेकर यांनी अनेक विकासकामे करूनही जनतेने त्यांना घरी पाठवले होते. गेली चार वर्षे आमदार नसतानाही बाबू जनतेची सेवा करतात. मात्र केपे मतदारसंघ एसटी आरक्षित होणार असल्यामुळे बाबूंचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे, अशी चर्चा आहे. बाबू आता राजकारणातून संपले, असे आम्ही नव्हे बाबूचे समर्थकच सांगत होते. मात्र, काल गणपतीच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी बाबू सक्रिय राजकारणात येणार, असे सांगून सगळ्यांनाच अचंबित केले. बाबूला पुन्हा आमच्या सरकारात स्थान मिळणार असे सांगितल्यावर एसटीचे आरक्षण काय? असा आवाज प्रेक्षकांतून ऐकायला येऊ लागला.

गर्दी जमली की जमवली?

काँग्रेसची ‘राखण यात्रा’ सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी हजारोंची गर्दी पाहायला मिळाली. गर्दी पाहून कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला; पण लगेचच काही ‘बिगर गोमंतकीय’ चेहरेही कॅमेऱ्याच्या नजरेत आले आणि मग सुरू झाली खरी कुजबूज! ही गर्दी उत्स्फूर्तपणे जमली की नियोजन करून जमवली, असा सवाल विरोधक विचारणार हे आता जवळपास ठरलेलेच. त्यात हे बाहेरचे पाहुणे नेमके कोणाच्या निमंत्रणावर आले, हा प्रश्न आणखी रंगत आणतोय. पक्ष म्हणतो कार्यकर्ते, विरोधक म्हणतात गर्दी जमवली... आणि जनता मात्र शांतपणे म्हणतेय; ‘राखण यात्रा कोणाची, पण पाहुणे कोणाचे?’ आता या गर्दीचीच चर्चा काँग्रेसची राखण करते की अडचण वाढवते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार!

पर्यटनाचं आरोग्य

हॉटेल्स आणि ट्रॅव्हल एजंट्सना ३० सप्टेंबरपर्यंत परवाने नूतनीकरण करणे अनिवार्य केले आहे. राज्यात पुढील महिन्यात पर्यटन हंगाम सुरू होणार. अर्थव्यवस्थेचा हा कणा. पर्यटन विभागाने सर्व हॉटेल्स, ट्रॅव्हल एजंट्स, विक्रेते आणि पर्यटनाशी संबंधित इतर आस्थापनांना ३० सप्टेंबरपूर्वी त्यांचे परवाने नूतनीकरण करण्यास सांगितले आहे. ''गोवा रजिस्ट्रेशन ऑफ टुरिस्ट ट्रेड'' कायद्यांतर्गत हे व्यावसायिक परवाने नूतनीकरण करणे अनिवार्य आहे. विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या परवाना नूतनीकरणाच्या अर्जांकडे नियमांचे उल्लंघन म्हणून पाहिले जाईल आणि त्यासाठी दंड वा विलंब शुल्क आकारले जाईल. ही शिस्त स्वागतार्ह आहे. नियमांचा बडगा नसल्यावर बेशिस्त वाढते. थकबाकी वाढते. जखम वाढल्यावर उपचार कठीण होतात. पर्यटनाच्या स्वास्थ्यासाठी नंतरच्या उपचारापेक्षा अशी प्रतिबंधात्मक काळजी बरी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com