खरी कुजबुज: साहेबांची राजकीय उंबरठ्यावर धाव!

Khari Kujbuj Political Satire: गोवा पोलिस खात्यात नुकत्याच झालेल्या पोलिस अधीक्षक, निरीक्षकांच्या घाऊक बदल्यांनी संपूर्ण खात्यात एकच खळबळ उडवून दिली आहे.
Khari Kujbuj Political Satire
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

साहेबांची राजकीय उंबरठ्यावर धाव!

गोवा पोलिस खात्यात नुकत्याच झालेल्या पोलिस अधीक्षक, निरीक्षकांच्या घाऊक बदल्यांनी संपूर्ण खात्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. बदल्यांचे आदेश जारी होताच काहींना हवी तशी पोस्टिंग मिळाली, तर अनेकांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत आहे. यात सर्वात जास्त चर्चा रंगलीये ती उत्तर गोव्यातील एका अधिकाऱ्याची. नुकताच उत्तर गोव्यातील एका अत्यंत गजबजलेल्या आणि महत्त्वाच्या पोलिस ठाण्याचा कारभार सांभाळणाऱ्या या साहेबांना अचानक मिळालेल्या बदलीच्या आदेशाने चांगलाच धक्का दिला! हातातून प्राईम ठाणे निसटल्याचे दुःख पचवणे कठीण झाल्याने, या साहेबांनी तातडीने राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली. बदली थांबवण्यासाठी एका राजकीय नेत्याची भेट घेऊन फिल्डिंग लावण्याचे प्रयत्नही झाले, पण अद्याप वरिष्ठांकडून कोणताही दिलासा किंवा समाधान मिळालेले नाही. त्यामुळे खात्यात आता कुजबूज सुरू आहे, राजकीय ताकद कामाला येणार की साहेबांना नव्या ठाण्यावर रुजू व्हावेच लागणार?

सिद्धेशरावांचा बर्थडे...

नावेली मतदारसंघाचे फायरब्रॅन्ड राजकारणी सिद्धेश भगत यांचा आज मंगळवारी वाढदिवस आहे. वयाची चौवतीशी त्यांनी गाठली आहे. आके बायश पंचायतीचे सरपंचपद ही त्यांनी यापूर्वी भूषविले आहे. काही काळ ते ‘आप’मध्येही होते. मात्र तेथे ते फारकाळ रमले नाहीत. सध्या ते कुठल्याही राजकीय पक्षांत नाहीत. खरे तर त्यांचा पिंड हा राजकारणी आहे, हेही काही लपून राहिलेले नाही. पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. भगतबाब आपला वाढदिवस घरीच साजरा करणार असले तरी त्यांनी सोशल मीडियातून त्याची जाहिरातबाजी ही सुरू केली आहे. आता राजकारणी असल्याने ते बर्थडेच्या दिवशी आपल्या आगामी राजकीय वाटचालीबाबत काय भाष्य करणार याची उत्सुकता त्यांचे समर्थक तसेच विरोधकांनाही लागून राहिलीय हेही तेवढेच खरे आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa House Regularization: गोव्यात 2014 पूर्वीच्या घरांच्या नियमितीकरणाला मोठी मुदतवाढ; अर्जासाठी 6 महिन्यांऐवजी आता मिळणार 18 महिने

भय रस्त्यावरील संपत नाही!

दररोज घडणारे भीषण रस्ते अपघात गंभीर सामाजिक संकट बनले आहे. तरुणांचे व वयस्कांचे प्राण या अपघातांत जात आहेत. प्रत्येक दिवसाला एखाद्या कुटुंबाचा आधार हरवणे यामुळे दुःखाची छाया पसरते. वाहतुकीचे नियम पाळणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नाही, तर जीवनरक्षणाची हमी आहे. शाळा, महाविद्यालये आणि स्थानिक संस्थांनी युवकांत सुरक्षित वाहनचालनाबाबत जनजागृती करणे अत्यावश्यक आहे. सरकारकडून रस्ते सुधारणा, कठोर दंड आणि जागृती मोहिमा राबवणे गरज ठरली आहे. नागरिकांनीही जबाबदारपणे वाहन चालवून अपघात टाळण्याचा संकल्प करावा. मद्यपान करून वाहन हाकणे, अती वेगाने चालवणे हे योग्य नव्हे. वॉकला जाणाऱ्या पादचाऱ्यांनी आपले प्राण गाडी निष्काळजीपणे चालवणाऱ्यांच्या चुकीमुळे गमावले आहेत. जीवन अमूल्य आहे; सुरक्षितपणे घरी परतणे हे भयप्रद आव्हान ठरू नये.

रस्ता खुला करा पण...

अखेर पर्वरवासीयांना थोडा तरी दिलासा मिळाला म्हणायचा! उड्डाणपूल झाला, जोडरस्ते झाले; पण रस्ता बंद असल्याने वाहनचालकांची अवस्था पूल असूनही रस्ता कुठेय? अशी झाली होती. अटल सेतूवरून पर्वरी शहरात यायचे असेल तर आधी एक प्रदक्षिणा घालावी लागत होती. या प्रश्नावर बैठका झाल्या, चर्चा झाली आणि अखेर मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांत मार्ग खुला करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आता पर्वरीतून राजधानी पणजीत जाणाऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडे समाधान दिसू लागले आहे. आता नागरिकांची एकच अपेक्षा; रस्ता खुला करा पण वाहतूकही सुरळीत ठेवा!

माझे जीवन गाणे

एक संगीत गुरु होता. गायन शिकायला विद्यार्थी होते. गर्दी वाढली. प्रतिभावान गुरुचा रियाज खुंटला. त्याला सूर दिसायचे पण कंठातून मण्यांची माळ झरझर येते तसे सूरमणी येत नव्हते. ही समस्या वाढली. तो मुलांना रागाचे बारकावे दाखवू शकत नव्हता. कारकिर्द संपली. रियाज हा संगीताचा आत्मा. तिथं निमित्त, खेळ मस्ती चालत नाही. गोव्यात अनेक होतकरू युवा गायक गातात. पण कधीकधी सूर हलायला लागले, घसरू लागले की श्रोत्यांच्या कानांना ते खटकतात. गोव्यातच नव्हे, टीव्हीवर सारेगमप कार्यक्रमात जी मुलं चमकली त्यांचं गाणं सुरेल असलं तरी रस, भाव नसल्याने शुष्क लागतं. वृध्दी साठी तपश्चर्येला पर्याय नसतो. गिमिक्स केल्या, सरगम नोटेशन आळवलं म्हणून सुबुध्द रसिक चकवला जात नाही. आवाज घोटवला गेला नाही तर धोका असतो. भावपूर्ण गोडवा हे गाण्याचं अर्क आहे.

संकेतच्या गणपतीला विनय

गोव्यातील चतुर्थीचा सण हा धार्मिक सण तर आहेच पण त्याहीपेक्षा हा सण म्हणजे एकमेकांच्या घरी जाऊन एकमेकांची ख्याली खुशाली जाणून घेण्याची ती एक पर्वणी. सावर्डेचे युवा नेते संकेत आर्सेकर यांना रविवारी हाच अनुभव आला. आर्सेकर यांच्याकडे यंदा सात दिवसांचा गणपती बसविला. रविवारी विसर्जनाच्या दिवशी अनेकांनी त्यांच्या घरी येऊन गणेशाचे दर्शन घेतले. त्यात माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांचाही समावेश होता. सावर्डे मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीवर या दोघांनीही दावा केला आहे. म्हणजे एका अर्थी ते एकमेकाचे प्रतिस्पर्धी. पण चतुर्थी हा सण राजकीय चढाओढ करण्याचा नव्हे हेच विनयभाईंनी आपल्या कृतीतून दाखवून दिले, असे म्हटले तर त्यात अतिशयोक्ती होणार का?

Khari Kujbuj Political Satire
Goa Crime: चिठ्ठी, अंत्यसंस्कारासाठी पैसे अन् शांत निरोप; मोखर्डमध्ये 2 बहिणींचा हृदयद्रावक अंत, आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट

सावर्डेच्या इच्छुकांचे संयुक्त गणेशदर्शन

निवडणूक जवळ आली की इच्छुकांकडून लोकांच्या गाठीभेटी घेण्याचे प्रकार वाढतात आणि त्यात चतुर्थी वगैरे सण आले तर अशा गाठीभेटीना अगदी ऊत येतो. प्रत्येक इच्छुक त्या निमित्ताने सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याची धडपड करीत असतो. पण सगळेच इच्छूक एकाच बरोबर जाणे हे घडणे अशक्यच. मात्र सावर्डे मतदारसंघात ही अशक्य कोटीतील गोष्ट शक्य करून दाखवली आहे. सात दिवसांच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी सावर्डे मतदारसंघातून येणारी निवडणूक लढविण्याची इच्छा असलेले दीपक पाऊसकर, बालाजी गावस, रमाकांत गावकर, विलास गावस देसाई हे रविवारी केपे आणि काणकोणात एकत्र फिरताना दिसले. निवडणुकीत कोण कुणाबरोबर असेल ते नंतर पाहू पण सध्या आम्ही सगळे एकच, हे दाखवण्याचा त्यांचा हा प्रयत्न तर नसेल ना?

जीत आरोलकरांचा ‘मगो’

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी अखेर जाहीरपणे आपण आगामी निवडणूक मगो पक्षाकडूनच लढवणार असल्याचे जाहीर केले. आपण ‘मगो’ पक्षात असून पक्षाकडे पुन्हा उमेदवारी मागणे हा आपला अधिकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे भाजपमध्ये असलेले दयानंद सोपटे आणि भाजपमध्ये नसलेले लक्ष्मीकांत पार्सेकर एकत्र आले आहेत. ते भाजपची उमेदवारी दोघांपैकी कोणाला एकाला द्या, असे म्हणत आहेत. त्याचमुळे आरोलकर यांनी ‘मगो’चे कार्ड बाहेर काढल्याची चर्चा सुरू झाली आहे. ‘उदरगत’ या आपल्या संस्थेच्या माध्यमातून कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या आरोलकर यांनी ‘मगो’चा राग आळवण्यामागे पार्सेकर- सोपटे युती असल्याचा या चर्चेचा सूर आहे.

मेरशी वाहतूक कोंडीकडे लक्ष

पणजीतील कदंब बसस्थानक सर्कल आणि दिवजा सर्कल परिसरात सोमवारी संध्याकाळी वाहनांची अशी काही गर्दी झाली की, वाहनचालकांना वाटले; आपण रस्त्यावर आहोत की पार्किंगमध्ये? वाहतूक कोंडीचे कारण शोधताना आता मेरशीच्या सर्कलकडे आणि पर्वरी उड्डाणपुलाच्या वाहतूक नियोजनाकडे अंगुलीनिर्देश होऊ लागला आहे. नियोजनात थोडीशी चूक झाली की, त्याचा फटका मात्र कितीतरी किलोमीटर दूरपर्यंत बसतो, याचा अनुभव सध्या वाहनचालक घेत आहेत. आता ही वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी मेरशी येथे नेमका कोणता ठोस उपाय केला जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

बोल ना भोलानाथ!

यंदा गोव्यात पावसाची तूट आहे. या महिन्यात पावसाने लपंडावच केलाय. शेतपीकाचं नुकसान होऊ लागलं आहे. पाऊस पडला नाही तर शेती बागायतीची हानी होण्याची चिंता भेडसावू लागली आहे. पावसाची तूट 32 टक्के आहे. या महिन्यातील प्रमाण अल्प आहे. पाऊस हा कुणाच्याच नियंत्रणात नसतो. शेतीत सुलभता आणण्यासाठी आपण अद्ययावत ड्रोन व इतर तंत्रज्ञान उपकरणं वापरू शकतो. परंतु शेवटी निसर्ग हा राजा. उन्ह सुरू झालं आहे. रखरखीत. रोपे, मुळं करपू लागली आहेत. या महिन्यात पाऊस झोडपून पडला तर ठीक. तप्त भूमी तृप्त होईल. दिलासा मिळेल. चिंतातूर शेतकरी आभाळाला डोळे लावून बसलाय. हवामान बदलांच्या दुष्परिणामांचे चाललेत ते संकेतक आहेत.

पणजीकरांची अपेक्षा

काँग्रेसची ‘गोवा रक्षण यात्रा’ आज राजधानी पणजीत सुरू होत आहे. या यात्रेची भरपूर प्रसिद्धी कॉंग्रेस पक्षाने केली आहे. यात्रा यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे विधिमंडळ गट नेते युरी आलेमाव यांनी कंबर कसली आहे. आता पणजीत यात्रेचा शुभारंभ करताना युरी आलेमाव यांचे भाषण होणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पणजीच्या स्मार्ट सिटी घोटाळ्यावर विरोधी पक्षनेतेपद भूषविणाऱ्या युरी आलेमाव यांनी मागच्या साडेचार वर्षात किती खोलवर अभ्यास करून मुद्दे मांडले आहेत, हे पणजीकरांना जाणून घेण्यात निश्चित रस असणार आहे. कारण त्या विषयावर एक पोस्टरही गेली दोन दिवस समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहे. त्यामुळे युरीबाब ‘स्मार्ट सिटी’ घोटाळ्यावर काय बोलतात, याकडे पणजीकरांची नजर आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Rakshan Yatra: सोनिया, प्रियांका, राहुल गांधींसह खर्गेंना निमंत्रण; 40 मतदारसंघांतून 27 दिवस फिरणार काँग्रेसची 'गोवा रक्षण यात्रा'

गोवा फॉरवर्डचे चहाच्या पेल्यातील वादळ

गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक यांनी लोकभावनेची कदर करून काँग्रेस बरोबर प्रियराधन करण्यास हरकत नाही अशी भूमिका घेतल्यावर काहीसे राजकीय वादळ उठले. मात्र विजय सरदेसाई यांनी अशी वक्तव्ये करण्याचे आम्ही कुणालाच अधिकार दिलेले नाहीत. आणि आम्ही आमची भूमिका बदललेली नाही असे सांगत हे वादळ फक्त पेल्यातील असल्याचे स्पष्ट केले. मात्र या वादळामागे मडगाव येथील बहुचर्चित सटर्डे क्लबचा काही संबंध नाही ना अशी चर्चा मडगावात चालू आहे. ही चर्चा होण्यामागचे कारण म्हणजे या क्लबशी संबंधित असलेल्या एका सदस्याने सोशल मीडियावर दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून एक पोस्ट टाकली आणि त्यानंतर प्रशांत नाईक यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आणि हे सर्व घडले ते नेमके रविवारी. त्यामुळेच काहीजण या कथित संबंधाची चर्चा करत आहेत.

केपे चर्चेत

गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोमवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक केपेत पोहचले. त्यांनी गणेश दर्शनाच्या निमित्ताने भेटीगाठी सुरु ठेवल्या असतानाच समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई केपेत दाखल झाले. काही वेळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत केपे येथे पोहचले. भाजपचे तिन्ही नेते एकाचवेळी केप्यात एकवटल्याने कोणती मोठी मोहीम असा प्रश्न राजकीय वर्तुळात साहजिकपणे चर्चेत आला होता.

काब्राल यांचा डाव

पर्वरी येथील उन्नत मार्गावरून सरकार कोंडीत सापडले आहे. अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी मार्गाचे पर्वरीतील प्रवेश बंद करण्यात आले आणि सरकारवरील टीका वाढली आहे. यामुळे वाहतूक कोंडी वाढल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. या चर्चेत सहभागी होताना मूळ आराखड्यात पर्वरीवासीयांना उन्नत मार्गाचा वापर करण्यासाठीची तरतूद होती, असे म्हणणे काब्राल यांनी मांडले आहे. त्याशिवाय दुचाकींना प्रवेश वर्ज्य होता, असेही ते म्हणाले आहेत. यामुळे दुचाकींना परवानगी देण्याचा निर्णय कोणाचा आणि आराखड्यात कोणी व का बदल केला याचे उत्तर देण्याची जबाबदारी सरकारवर ढकलून काब्राल यांनी आपले उपद्रवमूल्य दाखवून दिले आहे.

प्रभवला मिळालेले ‘फूल’

गोव्यात देवाने दिलेल्या फुलाचे संकेत भक्तिभावाने मानून घेतात. देवाच्या वेगवेगळ्या भागातून मिळणारी फुले हे वेगवेगळ्या प्रकारचे संकेत असे मानले जातात. देवाच्या डोक्यावरील फूल पडले तर तो अगदी अत्युच्च असा शुभसंकेत मानला जातो. हे सर्व सांगायचे कारण म्हणजे काल पिंपळकट्ट्यावरील श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गेलेले मडगाव येथील युवा नेते प्रभव नाईक यांनी पिंपळकट्ट्यावर जाऊन गाऱ्हाणे घालून घेतले तेव्हा म्हणे त्यांना चक्क देवाच्या डोक्यावरील फूल मिळाले. त्यामुळे प्रभव सध्या आनंदात वावरत आहेत. कशाचा बरा हा शुभसंकेत असावा. प्रभवचे समर्थक त्यावर तर्कवितर्क लढवित आहेत.

Khari Kujbuj Political Satire
Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा आरोप; 90 लाखांचे दागिने-रोकड घेतल्याप्रकरणी खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग

अमित पाटकरांचा बाण

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सोमवारी ‘गोमन्तक टीव्ही’वर मुलाखत दिली. त्यात त्यांनी तिसऱ्यांदा काँग्रेस फुटीचा दावा केला. आमदार नीलेश काब्राल या संभाव्य फुटीचे नेतृत्व करतील, असे भाकित वर्तविले. परंतु आपल्या काळजात काँग्रेस आहे आणि आपण अजूनही काँग्रेसमध्ये आहोत हे सांगताना उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचीही त्यांनी तयारी केल्याचे सांगितले आहे. याशिवाय पक्षाचे राष्ट्रीय सचिव के. सी. वेणुगोपाल गोव्यात येत आहेत, त्यांनी त्यांनी गोवा फॉरवर्डने यापूर्वी काँग्रेसकडे दिलेल्या प्रस्तावांविषयी स्पष्टीकरण द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे पाटकरांनी जो काही बाण सोडलेला आहे, तो भाजपलाही आणि काँग्रेस नेतृत्वालाही अडचणीचा ठरू शकतो, हे मात्र नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com