

मडगाव: विवाहाचे वचन देऊन बलात्कार व ९० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड घेऊन फसवणूक केल्याप्रकरणातील संशयित मेल्सन कुतिन्हो (वय ३३) याच्याविरुद्धचा खटला मडगाव येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दक्षिण गोवा सत्र न्यायालयाकडे वर्ग केला आहे.
न्यायदंडाधिकारी अक्षता काळे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. कुंकळ्ळी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत संशयिताची सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडित तरुणीशी ओळख झाली. त्याने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्न तसेच स्वतःच्या आजारपणाचे कारण सांगून त्याने तिचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे.
पीडितेने दागिने आणि रोकड परत मागितल्यानंतर संशयिताने ते परत देण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. तसेच पीडितेची नग्न छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारानंतर पीडितेने कुंकळ्ळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक रियांका नाईक यांनी तपास करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.
या प्रकरणात बलात्कार, गुन्हेगारी धमकी देणे आणि फसवणूक या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांखालील आरोपांचे अधिकारक्षेत्र सत्र न्यायालयाकडे असल्याने हा खटला दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला. न्यायालयाने संशयित मेल्सन कुतिन्हो याला २९ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता सत्र न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
दागिन्यांसह संशयिताने लाटले ९० लाख!
संशयितावर विश्वास ठेवून पीडितेने स्वतःचे तसेच आई आणि बहिणीचे सोन्याचे दागिने संशयित मेल्सन कुतिन्हो याला दिले. यामध्ये सोन्याच्या बांगड्या, हार, साखळ्या, अंगठ्या, ब्रेसलेट आणि १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बिस्किटाचा समावेश होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.