खरी कुजबुज: 'भिवपाची गरज ना'

Khari Kujbuj Political Satire: ‘भिवपाची गरज ना’ हे मुख्यमंत्र्यांचे गाजणारे वाक्य मंगळवारी सभापती गणेश गावकर यांच्या तोंडी होते.
Khari Kujbuj Political Satire
Khari KujbujDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

‘भिवपाची गरज ना’

‘भिवपाची गरज ना’ हे मुख्यमंत्र्यांचे गाजणारे वाक्य मंगळवारी सभापती गणेश गावकर यांच्या तोंडी होते. सावर्डेतील राजकारणावरून त्यांना विचारले असता मुख्यमंत्रिपदी डॉ. प्रमोद सावंत असेपर्यंत आपणास ‘भिवपाची गरज ना’ असे त्यांनी सांगितले. दिवाळीच्या दरम्यान थंडी जास्त वाढल्याने मतदारसंघात शेकोट्याही जास्त पेटू लागल्याची कोपरखळी मारण्यास ते विसरले नाहीत. भाजपच्या उमेदवारीसाठी सहाजण एकत्र आल्याकडे त्यांचे लक्ष वेधल्यावर उमेदवारी तर एकच आहे असे सांगून त्यांनी तो विषय गुंडाळत आपण त्यांना फारसे काही महत्त्व देत नाही असे दाखवून दिले.

गिरीशचा नक्की मतदारसंघ?

काँग्रेसचे प्रमुख गिरीश चोडणकर यांनी आता आपल्या मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा लपवून ठेवलेली नाही. त्यांनी आधी म्हटले होते की, मी ‘पक्षासाठी’ निवडणूक लढवली, म्हणजे पक्षाने आदेश दिल्यानंतर ‘हरू’ शकणाऱ्या मतदारसंघातही निवडणूक लढवली. आता ते म्हणतात, मला स्वतःला लढायचे आहे व ते स्वतः आपला मतदारसंघ निवडणार आहेत. गिरीश यांचे वास्तव्य फातोर्डा मतदारसंघात आहे, परंतु गोवा फॉरवर्डबरोबर युती झाल्यास ते फातोर्ड्यातून निवडणूक लढवू शकणार नाहीत म्हटल्यावर त्यांच्यासाठी कोणते मतदारसंघ खुले राहतात? कुंभारजुवे, शिरोडा व मडगाव! या तीनपैकी मडगाव त्यांना जवळचा, शिवाय त्यांनी हल्ली मडगावच्या ‘बाबां’विरोधात जोरदार रणशिंग फुंकले आहे ते पाहिल्यास त्यांना मडगावमध्ये रुची असू शकते. तसे घडल्यास त्यांना निवडणूक एजंट म्हणून लेखक दत्ता नायक मिळू शकतील का? एकेकाळी उदय भेंब्रे व दिगंबर कामत यांना जिंकून आणण्यात दत्ता नायक यांनी मोलाचा हातभार लावला होता, त्यांची भाषणेही त्यावेळी गाजली! परंतु मडगावमध्ये चोडणकर लढले, तर मात्र चिराग नायक यांना मागे हटावे लागणार आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: सासष्टीत काँग्रेससमोर बंडखोरांचे आव्हान! आघाडीशिवाय पर्याय नाही; नावेली, बाणावली, नुवेत आव्हान अधिक कठीण

हा तर वैयक्तिक शिगमोत्सव

‘रिव्होल्युशनरी’ म्हणून ते राजकारणात उतरले. त्यांचा म्हणून एक मतदार होता, युवकांना त्यांनी आकर्षित केले होते. ज्या तरुणांकडे काँग्रेस पोहोचला नाही, भाजपाची हाक ज्यांना ऐकू गेली नाही, असा तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाला. इतका की, ज्यावेळी प्रस्थापित राजकीय पक्ष सभांवर लाखो रुपये खर्च करीत, तेथे पैसे न घेता खेड्यापाड्यातील युवक त्यांच्याकडे आकृष्ट झाला व भाषणे चालू असताना तो गर्जत राहिला. युवकांमध्ये हल्ली हल्लीपर्यंत चैतन्य निर्माण केलेला हा पक्ष सध्या कुठे चाललाय? पक्षाची दोन शकले निर्माण झाली यात तथ्य आहेच, परंतु विभक्त होण्यासाठी म्हणून काही वादाचे विषय असतात, ते येथे कुठे दिसतात का? नेत्यांची रविवारच्या सभेतील भाषणे पाहता हा आता ‘राजकीय पक्ष’ राहिलाय का असा प्रश्‍न पडावा़! वैयक्तिक उखाळ्या पाखाळ्या, एकमेकांची निंदानालस्ती व शिवीगाळही! दुश्‍मनी तर इतक्या थराला पोहोचलीय की त्यांना आता जिंकायचे नाहीच, एकमेकांना ‘संपवायचेच’ असल्याचे सामोरे आले. हे आता निवडणुकीचे, लोकशाहीतील नितळ राजकारण राहिलेले नाही, हे या पक्षाच्या समर्थकांनाही एव्हाना लक्षात आले असेल!

युरीचा खरा शत्रू कोण?

गिरीश चोडणकर यांना मुख्यमंत्री बनायचे असल्याने विरोधी नेता युरी आलेमाव यांचे काय होणार असा सवाल राजकीय चिकित्सक राधाराव ग्रासियस यांनी टाकला आहे. राधाराव हे युरी आलेमाव यांचे एक पाठिराखे आहेत हे लपून राहात नाही. युरी अधूनमधून राधाराव यांच्या पायाकडे बसून त्यांचा आशीर्वाद घेत असतात. राधाराव यांच्या मते या निवडणुकीत कसेतरी निवडून येऊन गिरीशना मुख्यमंत्री बनायचे आहे हे लपून राहिलेले नाही व आपल्या समर्थकांनाच ते तिकीट देऊन आपला गट बलवान बनवणार आहेत. युरी आलेमाव यांनी लक्षात घ्यावे की त्यांचा खरा शत्रू गिरीश असून विजय नाही! आता हळूहळू चित्र स्पष्ट होऊ लागले असून हा सत्तासंघर्ष एवढ्या थराला पोहोचणार की भाजपाला चौथ्यांदा सत्तेवर येण्याची तो वाट मोकळी करून देणार आहे, असे राधाराव यांनी म्हटले आहे.

विरोधी एकीचे तीनतेरा

काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ गटनेते युरी आलेमाव यांनी सोमवारी विरोधी आमदारांची बैठक आपल्या पर्वरी येथील दालनात बोलावली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे यावर गोव्यात चर्चा सुरू असताना, सात विरोधी आमदारांच्या या बैठकीवर गोमंतकीयांचे बारीक लक्ष होते, परंतु बैठकीला केवळ काँग्रेसचे तीन आणि गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाईच उपस्थित राहिले. बैठक संपताच विजय सरदेसाई एकटेच बाहेर आले व त्यांनी बैठकीचा वृत्तांत युरी आलेमाव सांगतील असे पत्रकारांना सांगून काढता पाय घेतला. विजय निघत असतानाच, आरजीचे वीरेश बोरकर विधानसभा संकुलात आपल्या गाडीतून उतरले. याचा अर्थ वीरेश बोरकरही बैठकीला उपस्थित नव्हते. आपचे दोन्ही आमदार बैठकीला गैरहजर राहिले. एकंदर प्रकार म्हणजे विरोधी आमदारांच्या एकीचे तीनतेरा वाजलेत म्हणायचे.

रोजचेच अपघात, नागरिक संतप्त!

पर्वरी उड्डाण पुलाच्या गिरी येथील प्रवेशद्वाराजवळ सुरू असलेला वाहनांचा गोंधळ आणि जीवघेणा निष्काळजीपणा प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहू लागला आहे. सोमवारी पुन्हा एकदा तेथे एकाचवेळी अनेक वाहनांचा अपघात झाला; अचानक वळण घेणाऱ्या एका कारमुळे मागून येणारी बस आणि तीन चारचाकी गाड्या एकमेकांवर आदळल्या. एका क्षणात गाड्यांचे तुकडे उडाले आणि संपूर्ण मार्गावर काहीकाळ वाहतूक खोळंबून प्रवाशांची दाणादाण उडाली. या अपघातानंतर स्थानिक लोकांमध्ये आणि रोज प्रवास करणाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की, उड्डाणपुलाच्या या चुकीच्या नियोजनाकडे आणि अचानक होणाऱ्या यु-टर्नकडे प्रशासन सोयीस्कर डोळेझाक का करत आहे? रोज सकाळी आणि संध्याकाळी जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत असूनही सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना किंवा योग्य फलक अजून का लावले गेले नाहीत? केवळ कागदी आश्वासन देण्याऐवजी एखादा मोठा अनर्थ घडण्यापूर्वी संबंधित अधिकारी आणि यंत्रणा जागे होऊन यावर कायमस्वरूपी नियंत्रण आणणार की नाही? असा संतप्त सवाल आता प्रत्येक प्रवासी विचारत आहे.

धनगरी वेशात सुभाष!

समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई हे तसे हरहुन्नरी व्यक्तिमत्व. जरी त्यांचे खाते समाजकल्याण असले तरी त्यांना खरा रस कला आणि संस्कृतीतच अधिक आहे. त्यामुळे कित्येकवेळा अशा सोहळ्यात ते स्वतः सामील होतात. दोन दिवसांपूर्वी चिऱ्याबांध - सांगे येथे झालेल्या धनगरांच्या गजनृत्यात सुभाष फळदेसाई हे चक्क धनगरी वेशात सामील झाले आणि मनसोक्त नाचले देखील. एवढेच नव्हे, या नृत्यामागील खरी संकल्पना काय हेही त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. गोव्यातील धनगरांना एसटीचा दर्जा मिळणे आवश्यक आहे यावरही त्यांनी भर दिला. यावेळी ते अगदी मनापासून बोलले!

Khari Kujbuj Political Satire
Goa Economic Growth: "गोव्याला सिंगापूर बनवायचे नाही, तर गोवाच ठेवून चमकवायचे आहे"; ‘सागर मंथन 5.0’मध्ये मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्यं

अर्चित यांना विश्वास!

प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून या विभागाला सतत सक्रिय करण्याचे काम अर्चित नाईक करीत आले आहेत. गोव्यातील युवकांना काँग्रेसकडे वळवण्यासाठी किंवा त्यांना त्यांची अपेक्षा जाणून घेण्यासाठी युवक काँग्रेसने दारोदारी जाण्याचे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु याच अनुषंगाने येत्या विधानसभा निवडणुकीत युवकांना अधिकाधिक उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांचा आग्रह आहे. शिवाय ज्या ठिकाणी काँग्रेस कमकुवत आहे, त्या ठिकाणी तरी युवकांना उमेदवारी दिली जावी असे त्यांना वाटते, जेणेकरून संघटना मजबूत होईल अशी त्यांची इच्छा आहे. सध्या तरी काँग्रेस पक्ष त्यांच्या मागणीला न्याय देईल, असा विश्वास त्यांच्या बोलण्यातून तरी दिसत आहे. मात्र, स्वतः उमेदवार म्हणून या निवडणुकीत तरी असणार नाही, हे त्यांनी स्पष्ट करीत इतरांची धाकधूक नक्कीच कमी केली आहे.

अखेर तोच आला शरण...

अजित शंखवाळकर यांना अखेर अटक झाली, पण या अटकेमागची कहाणीही तितकीच चर्चेत आहे. पोलिसांच्या शोध मोहिमेला हुलकावणी देत संशयित फरार होता आणि अखेर पोलिसांच्या हाती लागण्याऐवजी स्वतःहून शरण आला. त्यामुळे आता चर्चेचा सूर असा आहे की, संशयिताने पोलिसांना शोधण्याची संधी दिली की पोलिस संशयिताला शोधण्यात अपयशी ठरले? स्वतःहून शरण येण्याची वेळ आली नसती, तर अटक आणखी किती दिवस लांबली असती, यावरही सवाल उपस्थित होत आहेत. आता संशयिताच्या अटकेने प्रकरण पुढे सरकले असले, तरी पोलिसांच्या शोध मोहिमेच्या कार्यक्षमतेवर मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे. संशयिताने पोलिसांना गुंगारा दिला की पोलिसच गुंग झाले, याची चर्चा आता रंगू लागली आहे!

आता शिक्षक बनणार ऑप्थोलोमोजिस्ट!

आजचा शिक्षक ‘अडला नारायण...’ बनला आहे का? असा प्रश्न शिक्षकच विचारायला लागले आहेत. याला कारण मायबाप सरकार. शिक्षकांना शाळेत शिकविण्याबरोबर सगळी कामे करावी लागतात. शिक्षकांना मतदाता यादी सुधारणा (एसआयआर), जनगणना एवढेच काय रेशन वाटण्याचे काम व गरज पडल्यास जनावरांची संख्या मोजण्याचे कामही करावे लागते. आता शिक्षकांना शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करावी लागणार आहे. सगळ्यांना दृष्टी या अभियानांतर्गत शिक्षकांना आता डोळ्यांचे डॉक्टर बनण्याची संधी मिळणार आहे, सौजन्य मायबाप सरकार.

असेही धन्यवाद

हरवळे येथील श्री देव रुद्रेश्वर देवस्थानच्या निवडणुकीत यशवंत माडकर यांच्या पॅनेलने बाजी मारली. देवस्थानची ही निवडणूक होऊ नये यासाठी कायदेशीर मार्गाने प्रयत्न करणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कायदेशीर मदत उपलब्ध केली होती. त्यासाठी माडकर व त्यांचे सहकारी मंगळवारी चोडणकर यांचे आभार मानण्यासाठी काँग्रेस हाऊसमध्ये पोचले. भंडारी समाजाचे नेते उपेंद्र गावकर यांनी भंडारी मतांची फाटाफूट होऊ नये यासह आपणासह १० जणांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यासाठी त्यांचेही आभार मानण्यासाठी ते शिवसेनेच्या राज्य मध्यवर्ती कार्यालयात पोचले. त्यानंतर ते आमदार वीरेश बोरकर यांच्याकडे जाण्यास निघाले. दोन्ही ठिकाणी त्यांचे स्वागतच झाले. एका राजकीय शक्तीला रोखण्यासाठी मदत केलेल्यांचे आभार मानण्यासाठी हा दौरा होता मग ती राजकीय शक्ती कोण असावी याची एक चर्चा समाज वर्तुळात रंगली होती.

म्हणे पोलिस निरीक्षकाला इशारा

मांद्रे पोलिस स्थानकात नेमके चाललेय तरी काय? असा प्रश्न आता परिसरातील लोकांना पडू लागला आहे. पोलिसांबद्दलचा जनतेचा संताप हळूहळू वाढत असून तक्रारी ऐकून घेण्याऐवजी लोकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या नाराजीचे पडसाद आता थेट रस्त्यावर उमटू लागल्याने एका पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली. त्यामुळे आता पोलिस स्थानकाच्या हद्दीत चर्चेला नवा विषय मिळाला आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार, तक्रारी घेऊन येणाऱ्यांनाच जर न्याय मिळत नसेल, तर नाराजी आणखी वाढणारच. पोलिस निरीक्षक महाशयांनी लोकांचे अर्ज आणि तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या नाहीत, तर त्यांच्या विरोधातील रोषही वाढू शकतो, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता मांद्रेत प्रश्न एकच - पोलिस जनतेचा आवाज ऐकणार की जनतेचा आवाजच पोलिसांच्या कानावर पडणार?

गिरीशनी जोडले हात!

गिरीश यांना ‘नो कमेंट्स’ म्हणता आले असते, पण त्यांनी एखाद्या विषयाला उत्तरच द्यायचे नाही किंवा त्यावर एकही चकार शब्द काढायचा नाही, असे दाखवण्यासाठीच आज पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर चक्क हात जोडले. कारणही तसेच आहे, रविवारी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे संस्थापक मनोज परब हे परत राजकारणात आले. त्यांनी सुमारे सव्वा ते दीड तास आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांच्यावरही टीका केली. याच टीकेवरून चोडणकर यांना पत्रकारांनी काँग्रेस भवनात प्रश्न विचारले किंवा त्याविषयी त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु चोडणकरांनी हात जोडून जो काही संदेश घ्यायचा तो घ्यावा, असेच सूचित केले. त्यामुळे परब यांना उत्तर देऊन त्यांचे महत्त्व वाढवायचे नाही, हाच यामागील उद्देश होता हे स्पष्ट आहे.

उपजिल्हाधिकारी असुरक्षित?

रक्षणकर्ताच जर कमजोर झाला, तर त्याला काय म्हणावे? ज्याच्यावर तालुक्यातील जनतेचे रक्षण करण्याची व जनतेच्या सुविधांची दखल घेण्याची जबाबदारी आहे त्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर असुरक्षित वातावरणात काम करण्याची वेळ आली तर दोष कोणाला देणार? केपे तालुक्याचे हेडक्वार्टर असलेल्या व आता जिल्हा मुख्यालयाचा दर्जा प्राप्त झालेल्या कुशावती जिल्ह्यातील केपे तालुक्याचे उपजिल्हाधिकारी कार्यालय जर्जर झाले असून कार्यालयाचा स्लॅब कोसळला आहे. कार्यालयात सिमेंटचे तुकडे पडायला लागले आहेत. अशा जर्जर झालेल्या कार्यालयात उपजिल्हाधिकारी व कार्यालयात असलेले कर्मचारी जीव मुठीत धरून काम करीत आहेत. जर उपजिल्हाधिकाऱ्यांनाच सरकारच्या लाल फितीचा अनुभव यायला लागला, तर आम जनतेचे तर विचारूच नका.

...तर रस्ता कामाचे श्रेय कुणाला?

कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल हे भाजपचे आमदार असले तरी भाजपात ते फारसे खूष नाहीत. त्यांच्या वक्तव्यातून ते अनेकदा जाणवले आहे. मध्यंतरी त्यानी प्रमोद सावंत सरकारवर आपली नाखुशी प्रकट करताना कुडचडे मतदारसंघातील विकासकामे ज्या गतीने व्हायला पाहिजे होती ती झालेली नाहीत अशी खंत व्यक्त करत येणारी विधानसभा निवडणूक भाजप उमेदवारीवर लढायची की नाही याचा विचार करावा लागेल असे म्हटले होते. या सर्व पार्श्वभूमीवर सध्या कुडचडे मतदारसंघात रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण सुरू करण्यात आलेले आहे. या कामाचे श्रेय कुणाला? भाजपला की काब्राल यांना? असा प्रश्न आता कुडचडे येथील काही नागरिक करू लागले आहेत!

Khari Kujbuj Political Satire
Goa Assembly Election 2027: डिचोलीतून विधानसभा निवडणूक लढवणारच, तेही राजकीय पक्षाच्या चिन्हावर; सनी मानकर यांची मोठी घोषणा

काँग्रेसचा शोक

मनोज परब व आमदार वीरेश बोरकर यांच्यात सुरू असलेली चिखलफेक काही राजकीय घटकांसाठी मनोरंजनाचा विषय ठरली आहे. निवडणुकीला अवघे महिने उरले असताना आरजीतील वाक्युद्धाने टोक गाठले आहे. ‘वीरेशला राजकारणातून संपवून टाकेन,’ अशी उघड धमकी देत मनोजने आपला इरादा स्पष्ट केला आहे. या भांडणाचा खरा आनंद काँग्रेसला व्‍हायला हवा. मागील निवडणुकीत आरजीने काँग्रेसची मते फोडली होती. आता आरजीतीलच दुफळी काँग्रेससाठी संधी ठरू शकते. मात्र काँग्रेसमध्ये शोककळाच अधिक दिसते. कारण आरजीतील संघर्षाचा फायदा कसा घ्यायचा, याचे उत्तर काँग्रेसकडे नाही. दुसरीकडे भाजपचे नेते मात्र ममनमुराद आनंद घेत आहेत. विरोधकांनी एकमेकांचे राजकीय खच्चीकरण करावे, यापेक्षा सत्ताधाऱ्यांना आणखी काय हवे?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.