

मुख्यमंत्री अन् गोमंतकीय वारसा
इफ्फीच्या झगमगाटात यंदा गोमंतकीय लोकसंस्कृतीचा रंगही छान बहरला आहे. देश-विदेशातील सिनेचाहत्यांसाठी आयोजित केलेल्या लोकनृत्य आणि चित्ररथ मिरवणुकीने सर्वांचीच मने जिंकली. या सोहळ्यात एक खास चित्र पाहायला मिळाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत चक्क एका उत्साही गोमंतकीयाच्या भूमिकेत शिरले होते. समोर ''घोडेमोडणी'' आणि ''देखणी'' सादर होत असताना तसेच आकर्षक चित्ररथ पुढे सरकत असतानाच मुख्यमंत्री ‘एनएफडीसी’चे अध्यक्ष जी. कृष्णकुमार यांना प्रत्येक कलेचे महत्त्व अगदी मनापासून समजावून सांगत होते. आपल्या मातीतील समृद्ध वारसा जगासमोर अभिमानाने मांडण्याची त्यांची ही तळमळ पाहून उपस्थित गोमंतकीयांना त्यांच्या या कृतीचे कौतुक वाटत होते.
‘मन में लड्डू फुटा!’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार राज्यातील मंत्री-आमदार निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. लोकांशी संवाद साधून त्यांच्यापर्यंत सरकारच्या योजना आणि झालेल्या विकासकामांची माहिती पोहोचवण्यास नेत्यांना सांगितले आहे. त्यानुसार आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनीही कंबर कसली आहे. त्यांनी काल सांत आंद्रे आणि आज सांताक्रूझ मतदारसंघातील महिला व मतदारांशी संवाद साधला. त्यांनी सांताक्रूझ मतदारसंघात भाजपने केलेल्या विकासकामांबद्दल मत व्यक्त केलेच, शिवाय येथील मतदारांना आमदार रूडॉल्फ फर्नांडिस यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन तर केले. एवढेच नव्हे, तर रूडॉल्फ हेच पुढीलवेळी आमदार होतील’, असे भाकीतही वर्तविले. त्यामुळे बाजूला बसलेल्या आमदार रूडॉल्फ यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्याची लकेर उमटली होती. यावरून नक्कीच त्यांच्या मनात लड्डू फुटलेले असावेत, अशी प्रतिक्रिया तेथील अनेकांनी व्यक्त केली.
राणेंचे मिशन जबरदस्त
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सध्या विविध मतदारसंघांना भेटी देण्याचा धडाका लावला आहे. त्यांनी गेल्या आठवड्यात कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या; परंतु २०२७ ची निवडणूक ज्यांना जड जाऊ शकते, अशाही आमदारांच्या मतदारसंघांत जाऊन भाजपची पताका फडकावली आहे. त्यांची ही मोठीच कामगिरी मानली जाते. इतकी की, भाजपच्या एकाही नेत्याला जे जमले नाही, भाजपची राजकीय चौकट आणखी रूंद करून दाखवण्याची ही राजकीय मोहीम मानली जाते. पक्षश्रेष्ठींनीच त्यांना ही कामगिरी बहाल केली आहे का हे कळायला मार्ग नाही; परंतु राणेंची ही मोहीम सध्या राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. सांत आंद्रे, सांताक्रूझ, कुडतरी अशा मतदारसंघांमध्ये त्यांनी हे मिशन राबविले, हा विषय चर्चेचा आहे. हे सर्व उमेदवार जिंकून आले तर त्यांच्या विजयाचे श्रेय राणेंना मिळणार आहेच...
सरकारी अधिकारी रडारवर
सरकारी अधिकारी काम करतात की केवळ खुर्च्या उबवतात, हा प्रश्न आतापर्यंत सामान्य नागरिक विचारत होते. पण आता उच्च न्यायालयाच्या निरीक्षणांमुळे याच चर्चेला जणू न्यायालयीन शिक्कामोर्तब मिळू लागल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, न्यायालयाचे मूळ आदेशच नव्हे, तर अवमान याचिकांमध्ये दिलेल्या निर्देशांचेही सरकारी अधिकारी पालन करत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास येत आहे म्हणे. त्यामुळे आता न्यायालयानेही कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. वर्षानुवर्षे सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवणाऱ्या नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी अखेर न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतात आणि तिथेही आदेशांची अंमलबजावणी होत नसेल तर मग सरकारी यंत्रणेच्या कार्यक्षमतेचे कौतुक तरी कशासाठी करायचे? आता उच्च न्यायालयाच्या या निरीक्षणांवरून विरोधक सरकारला घेरणार की नेहमीप्रमाणे मौनव्रत धारण करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बाहेरील समाजाचे काय काम?
भंडारी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या हरवळे येथील श्री देव रूद्रेश्वर देवस्थान समितीच्या निवडणुकीत अन्य समाजाच्या लोकांनी फारच रस घेतल्याची चर्चा भंडारी समाजात सुरू झाली आहे. निवडणुकीत अर्ज सादर करण्यापासून ते माघार घेईपर्यंत एका महिलेचा त्या परिसरातील वावर या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. भंडारी समाज बांधव महाजन असलेल्या या देवस्थानच्या निवडणुकीत अन्य समाजाच्या प्रभावशाली व्यक्तीला एवढा रस का, याची चर्चा भंडारी समाजातील लोक आता करू लागले आहेत. कोण कळसुत्री बाहुल्यांप्रमाणे भंडारी नेत्यांना वागवू पाहत आहे, अशी विचारणा ते आपापसांत बोलताना करू लागले आहेत.
कळंगुटमध्ये फलकावर शाई!
कळंगुट परिसरात दिवंगत अर्जुन आप्पा शिरोडकर यांच्या नावाच्या फलकावर काळी शाई फासल्याची घटना गुरुवारी समोर आल्याने स्थानिक पातळीवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे युवा नेते प्रसाद शिरोडकर यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ या रस्त्याला नाव देण्यात आले होते. मात्र, अज्ञात व्यक्तींनी केलेल्या या कृत्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे. वरवर पाहता ही केवळ समाजकंटकांची खोडसाळपणाची कृती भासत असली, तरी यामागे स्थानिक राजकीय हेतू असल्याची चर्चा सुरू आहे. प्रसाद शिरोडकर यांच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठीच विरोधकांनी हे पाऊल उचलले असावे, असा संशय त्यांच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष काढलेला नसला, तरी रस्त्याच्या फलकावर पडलेली ही काळी शाई आता कळंगुटच्या राजकारणात चांगलाच रंग भरताना दिसत आहे.
मांद्रेची खुर्ची पुन्हा मिळवणार?
मांद्रेत सध्या पोलिस निरीक्षकांच्या खुर्चीपेक्षा त्यांच्या रिपोर्टिंगच्या ठिकाणाचीच अधिक चर्चा रंगली आहे. निरीक्षक गिरेंद्र नाईक यांना पर्वरी येथे रिपोर्ट करण्याचे निर्देश दिले असले, तरी अद्याप बदलीचा अधिकृत आदेश निघालेला नाही. त्यामुळे ही केवळ तात्पुरती व्यवस्था की बदलीपूर्वीची औपचारिकता, असा प्रश्न मांद्रेकरांना पडला आहे. काही दिवसांनी पुन्हा मूळ पोलिस स्थानकात पाठविण्याची पद्धत असेल तर नाईक यांच्याबाबतही तसाच प्रयोग होणार का, यावर सध्या गावात तर्क-वितर्क सुरू आहेत. मात्र, एक गोष्ट स्पष्ट आहे की, त्यांना पुन्हा मांद्रे पोलिस स्थानकाचा ताबा दिल्यास भविष्यात उदभवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी सरकार आणि संबंधित निरीक्षकांनाच घ्यावी लागेल, असा अप्रत्यक्ष इशारा स्थानिकांकडून दिला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मांद्रेकरांचे लक्ष आता एका गोष्टीकडेच लागले आहे... पर्वरीचे रिपोर्टिंग कायम राहणार की मांद्रेची खुर्ची पुन्हा मिळवणार?
प्रकाश भाजपचे उमेदवार?
ज्येष्ठ एसटी नेते प्रकाश वेळीप यांनी हल्लीच आपण शेवटची निवडणूक लढवून आमदार म्हणूनच राजकारणातून निवृत्ती घेऊ, असे सांगितले आहे. याचा अर्थ प्रकाशसर २०२७ ची निवडणूक लढविणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मात्र, कोणत्या पक्षाच्या उमेदवारीवर ते निवडणूक लढविणार, हे काही त्यांनी अद्याप जाहीर केलेले नाही. सध्या प्रकाश वेळीप हे भाजपमध्ये असून भाजपचे एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना ओळखले जाते. भाजपकडूनही यावेळी केपेत एसटी उमेदवार उभा करावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशा स्थितीत प्रकाशसर केपेतून भाजप उमेदवारीवर निवडणूक लढविणार का, असा प्रश्न लाेक विचारू लागले आहेत. याचे कारण म्हणजे, एका बाजूने वेळीपसर भाजपने एसटींवर अन्याय केला आहे हे उघडपणे सांगत आहेत. त्यामुळे ज्या पक्षाने अन्याय केला त्याच पक्षाच्या उमेदवारीवर ते निवडणूक लढवतील का? आणि तसे झाल्यास अन्याय करणाऱ्यांना साथ दिल्यासारखे होणार नाही का?
इतर तीन पक्ष कोणते?
येत्या विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी सनी मानकर हे गेल्या अनेक महिन्यांपासून डिचोली मतदारसंघात कार्यरत आहेत. डिचोलीतील घराघरांत पोहोचून जनसंपर्क वाढवण्यावर त्यांनी भर दिला असून, डिचोलीत विविध कार्यक्रमांचेही आयोजनही धडाक्याने केले जात आहे. मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवारीवर निवडणूक लढवणार होते. त्यासाठी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गोव्यात येऊन त्यांना पाठिंबाही जाहीर केला होता. परंतु, आपल्याला चार पक्षांच्या ऑफर असून त्यापैकी कोणत्या पक्षाकडून लढायचे याचा निर्णय डिसेंबर अखेरीस घेणार असल्याचे वक्तव्य मानकर यांनी केल्याने राष्ट्रवादी वगळून इतर तीन पक्ष कोणते? याचा शोध डिचोलीतील मतदार घेत आहेत.
फुकट्या प्रवाशांना बसली चपराक
रेल्वेतून अनेकजण विनातिकीट प्रवास करतात. रेल्वे प्रशासनाने आता अशा फुकट्या प्रवाशांवर कठोर कारवाईचे सत्र सुरू केले आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने गेल्या सात महिन्यांत एका कारवाईत एकूण २,६२,९३७ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून त्यांना दणका दिला आहे. यापुढेही ही कारवाई सुरूच राहील. आता तरी जे लोक रेल्वेतून फुकटात प्रवास करतात, त्यांनी या कारवाईतून धडा घ्यावा, अशी आशा रेल्वे प्रशासन बाळगून आहे.
बाबूश यांच्या भूमिकेकडे लक्ष!
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज मेरशीत जाहीरपणे पुढील निवडणुकीत आमदार रूडॉल्फ फर्नांडिस हेच आमदार होतील, असे सांगितले. त्यामुळे या मतदारसंघातून भाजपकडून रूडॉल्फ यांनाच उमेदवारी मिळणार याची खात्री सध्या तरी मंत्री राणे यांच्या वक्तव्यावरून देता येईल. पण याच मतदारसंघात महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी उघडलेले संपर्क कार्यालय आणि दिवाळीच्या शुभेच्छा देणारे लावलेले फलक पाहिल्यानंतर मोन्सेरात नक्की कोणाच्या पाठीशी राहणार, की आपल्या मर्जीतील उमेदवाराचे नाव पुढे रेटणार, हे काही आठवड्यांतच कळेल. पण आता राणे यांच्या भाकितामुळे बाबूश हे कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
तोच कित्ता गिरवणार
हरवळे येथील श्री रूद्रेश्वर देवस्थान समितीच्या निवडणुकीत मतभेद बाजूला ठेवून अनेक भंडारी नेते एकत्र आले. समाजाच्या समितीवर गेले नऊ महिने सरकारने प्रशासक नेमला आहे. त्याचे वेतनही समाजाला द्यावे लागत आहे. यामुळे अशीच एकी समाज संघटनेत दाखवून तीही निवडणूक अनुकूल करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पुढील आठवड्यात राज्यभरातील भंडारी नेत्यांची एक बैठक पर्वरी येथे होणार आहे. त्या बैठकीत समाज संस्थेवरील प्रशासक हटविण्यासाठी काय करावे आणि समाजातील ऐक्य कसे टिकवावे, या विषयावर चर्चा होणार आहे. रूद्रेश्वर निवडणुकीआधीही पर्वरीतच बैठक झाली होती, हे विशेष!
आदिवासींचा राजकीय पक्ष
विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने बाकी आहेत आणि एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळेल की नाही, हा प्रश्न अधांतरीच आहे. जर राजकीय आरक्षण मिळाले नाही तर आदिवासी समाजातर्फे निवडणूक लढविण्याची तयारी एसटी समाजातील संघटनांनी केली आहे. त्यामुळे समाजाचे अपक्ष उमेदवार द्यायचे की पक्ष म्हणून लढायचे, यावर निर्णय घेतला जाणार आहे. असा पक्ष निर्माण झाल्यास ‘किंगमेकर’ची भूमिका निभावेल एवढे नक्की, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. एसटी आरक्षणाचा निकाल सकारात्मक लागतो, की नकारात्मक यावरही अनेक समीकरणे अवलंबून आहेत. कालाय तस्मै नम:
केपेत भाजपकडून एसटी उमेदवार?
२०२७ च्या निवडणुकीत गोव्यात एसटींना राजकीय आरक्षण मिळणार नाही, हे आता जवळपास सिद्ध झाले आहे. त्यामुळे एसटी समाजातील कार्यकर्ते सरकारवर प्रचंड नाराज झाले आहेत. अशा परिस्थितीत एसटींची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून काही मतदारसंघांत एसटी उमेदवार उभे करण्याची खेळी खेळली जाण्याचे डावपेच आखले गेले आहेत. त्यात केपे मतदारसंघाचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. केपे मतदारसंघाचा ताबा क्रीडामंत्री रमेश तवडकर यांच्याकडे देण्यात आला असून केपेत चांगला एसटी उमेदवार निवडावा, असे त्यांना सांगितले आहे. असे झाल्यास बाबू कवळेकर यांच्यासाठी ही धाेक्याची घंटा ठरणार, एवढे निश्चित.
पोलिसच विसरले अधिकार!
बड्डे येथे कार्यरत असलेल्या एका वाहतूक पोलिसाने अल्कोहोल चाचणी करताना एका वाहनचालकाच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. वाहन चालवत असताना चालकाने मद्यप्राशन केल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना आहे. हे माहीत असतानाही वाहतूक पोलिसाने एका चालकाच्या कानशिलात लगावल्याने पोलिसांनाच कायदा-सुव्यवस्था अबाधित राखायची नाही का? असा प्रश्न नागरिक एकमेकांना विचारत आहेत.
बालेकिल्ल्यातच अनिश्चिततेचे सावट
राज्याच्या राजकारणात तब्बल ३० वर्षे म्हापसा मतदारसंघावर एकछत्री हुकूमत गाजवणारे डिसोझा घराणे आगामी विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर स्वतःच्याच घरात राजकीय चक्रव्युहात अडकल्याचे चित्र आहे. दिवंगत नेते बाबूश डिसोझांनंतर आमदारकी भूषवणाऱ्या जोशुआ डिसोझा यांना पक्ष पुन्हा संधी देईल का, या चिंतेने पछाडले आहे. या राजकीय संधीचा लाभ घेण्यासाठी गुरुप्रसाद पावसकर यांनी दावेदारी केल्याने डिसोझांच्या सुरक्षित बालेकिल्ल्यावर अनिश्चिततेचे सावट आहे. या वादात नवा चेहरा म्हणून मैदानात उतरणारे मयूर सावकार यांनीही उमेदवारीवर डोळा ठेवून रणनीती आखल्याने उमेदवारीसाठीची रस्सीखेच टोकाला पोहोचली आहे. अखेर तिकिटाचा कौल कोणाला मिळतो, यावर भाजपचे स्थानिक नेतृत्व अवलंबून असले, तरी घराण्याच्या वर्चस्वाला लागणारे सुरुंग आणि उमेदवारांमधील अस्वस्थता म्हापशातील जागरूक मतदारांसाठी सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.