

काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री चेहरा
काँग्रेस पक्षात सध्या विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा आहे. युरी आलेमाव यांनी ज्या पद्धतीने स्वतःची छबी झळकावणे चालविले आहे, त्यावरून त्यांची महत्त्वाकांक्षा लपत नाही. गिरीश चोडणकर यांचा तर दावा आहे, की त्यांना पक्षश्रेष्ठींनीच गोव्यात पाठविले आहे, परंतु त्यांना स्वतः निवडणूक लढविण्याची जबरदस्त इच्छा आहे. त्यांनी निवडणूक लढवली, तर ते मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनणे निश्चित पसंत करतील; परंतु त्यासाठी निवडून यायला पाहिजे. काहीजण बोलतात, की ते ‘जायंट किलर’ बनू पाहतात व साखळी मतदारसंघात ते लढू शकतात. परंतु निश्चित निवडून येणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे नाव आहे. त्यामुळे पराभूत व्हायला गिरीश साखळीत जातील काय? दुसरी गोष्ट म्हणजे, काँग्रेस युतीच्या गोष्टी करीत बसली आहे. दुसऱ्या काही उमेदवारांनी घरोघरी भेट द्यायलाही सुरवात केली आहे. काँग्रेसचा उमेदवार अजून प्रचारात उतरलेला नाही. लोक आपल्याला मत द्यायलाच वाट पाहात आहेत, या भ्रमात तर काँग्रेस नाहीय ना?
पाटकरसाहेब, भूमिका व्यक्त करा
आतापर्यंत काँग्रेसकडून ४० मतदारसंघांसाठी ४०० हून अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. मात्र, आता प्रश्न उपस्थित होत आहे, तो अमित पाटकर यांच्या भूमिकेबाबत. मग त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज घेतला आहे का? आगामी निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढविण्यास ते इच्छुक आहेत का? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित पाटकर यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज घेतला आहे. मात्र, त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. निवडणूक लढवायची की नाही, याबाबत त्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर असल्याने अमित पाटकर यांना तोपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.
मांद्रेवर लक्ष केंद्रित
मांद्रे मतदारसंघात राजकीय चर्चा सध्या वेगात आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर विनाअट भाजपमध्ये आले आहेत. त्यांना २०२७ च्या निवडणुकीत उमेदवारी मिळणार नाही, असे निक्षून सांगूनच पक्षात प्रवेश दिला आहे. त्यामुळे सोपटे यांना जादा संधी असली तरी शेवटी मनोमनी ती जागा आहे व जीत आरोलकर यांनी यापूर्वीच तेथे कोपरा बैठकांचा धडाका लावला आहे. उद्या जर मगोपने मांद्रेच्या बदल्यात फोंडा किंवा अन्य जागी पर्याय मागितला तर मात्र मांद्रेत दयानंद सोपटे यांचे भाग्य खुलू शकते, परंतु शेवटी तेथे कोणाला संधी द्यायची, याचा निर्णय दिल्लीत ठरणार आहे. काहीजण जीत यांच्याबाबतही भाजप नेते अनुकूल असल्याचे सांगतात. जीत मात्र स्वतः मगोपकडूनच निवडणूक लढणार असल्याचे जाहीरपणे सांगत असले तरी सध्या जे मतदारसंघ सतत चर्चेत आहेत, त्यात मांद्रे एक आहे.
दिगंबर कामत आहेत स्पर्धेत!
डॉ. प्रमोद सावंत व विश्वजीत राणे यांच्या पाठोपाठ दिगंबर कामत यांना मुख्यमंत्रिपदाची संधी लोक देऊ पाहतात, हे एका सर्वेक्षणातून पुढे आले आणि अनेक राजकीय निरीक्षकांनी कान टवकारले. सध्याच्या राजकीय वातावरणात विरोधी पक्षांकडे योग्य व्यूहरचनेचा अभाव असल्याने जनभावना तीव्र असल्या तरी भाजपच सत्तेवर येऊ शकतो, असे काहीसे मतप्रदर्शन आता लोकांमधूनच करण्यात येऊ लागले आहे. त्याचवेळी भाजपला संपूर्णपणे स्वबळावर बहुमत प्राप्त करता येईल काय, याचीही चर्चा सुरू झाली असून त्यातूनच कामत यांचा क्रमांक लागलेला असू शकतो. म्हणजे भाजपला कमी संख्या लाभली तर इतर पक्षांशी युती किंवा बाहेरून पाठिंबा मिळविण्याचे कसब कामत यांच्याकडे आहे. तसे पाहायला गेले तर पक्षभेद बाजूला ठेवून आमदारांशी जवळीक असलेला महत्त्वाचा नेता प्रमोद सावंत यांच्या भाजपकडे आहेच. तेव्हा निवडणुकीनंतर भाजपमध्ये नेतृत्वासाठी हालचाली तीव्र होऊ शकतात, अशी चर्चा चालते.
एक मेश्यू पोलिसांना भारी
गोवा फॉरवर्डचे युवा आघाडीचे अध्यक्ष आणि सांगेचे माजी नगरसेवक मेश्यू डिकॉस्टा यांनी मेलेला कुत्रा सांगे नगरपालिकेत आणून फेकल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी मेश्यू यांना अटकपूर्व जामीन नाकारल्यावर ते सध्या फरार झाले असून पोलिसांना काही केल्या ते सापडत नाहीत. असे म्हणतात, एक दोनवेळा पोलिसांना मेश्यू यांचे फोनवर लोकेशन मिळाले, पण तिथे गेल्यावर ते सापडले नाहीत. आता काहीजण म्हणू लागलेत, की राजकीय दबाव आल्यामुळेच पोलिस त्यांना शोधून काढू शकत नाहीत. काही का असेना सध्या मेश्यू पोलिसांना लईभारी झाले आहेत.
बाणावलीत काँग्रेसचा नवा डाव!
बाणावलीत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी लुईझा रॉड्रिगीस यांचे नाव पुढे येऊ लागले आहे म्हणे! जिल्हा पंचायत निवडणुकीत आपच्या उमेदवाराला धूळ चारल्यानंतर लुईझाबायंच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काँग्रेसमधील एका गटाचाही त्यांना पाठिंबा असल्याची चर्चा आहे. स्वच्छ राजकीय प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू; पण पंचवीस वर्षे काँग्रेसला विजयाने हुलकावणी दिलेल्या बाणावलीत यंदा संधी मिळणार का? त्यात वॉरन आलेमावही उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे लुईझाबायंच्या नावाला हिरवा कंदील मिळतो की उमेदवारीच्या शर्यतीत आणखी काही नवे चेहरे येतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या तरी दावेदारीची चर्चा जोरात आहे, पण तिकीट कोणाच्या खिशात जाणार, हे काँग्रेसचे नेतेच जाणोत!
६७ टक्क्यांना कसे एकत्र आणणार?
सर्वेक्षण जरी भाजपबाबत लोकांमध्ये अस्वस्थता असल्याचे सांगत असले तरी भाजपची ३३ टक्के मते अजून स्थिर आहेत, याबाबत भाजप नेते समाधानी आहेत; परंतु भाजप विरोधकांकडे मात्र ६७ टक्के मते आहेत. भाजपपेक्षाही ही मते दुप्पट असून तेच भाजपबद्दल वातावरण पसरवतात, असे भाजप सांगते. गेली तीन कारकीर्द सत्तेवर असूनही भाजपच्या ३७ टक्के मतांमध्ये फरक पडलेला नाही, ही गोष्ट महत्त्वाची आहे. परंतु असे असूनही भाजपमध्ये समाधान आहे, की विरोधकांमध्ये जनतेत आस्था असलेला नेता नाही. २०१२ मध्ये लोकप्रिय दिगंबर कामत सरकार अधिकारावर असतानाही मनोहर पर्रीकरांनी एकहाती किल्ला लढवला. आज ते विरोधी नेता असते, तर एका कला अकादमी विषयावर त्यांनी प्रचार उभारला असता. विरोधी पक्षांमध्ये हा लढवय्येपणा नाही. जमीन रूपांतरे हा विषय काँग्रेस हाताळू पाहते, परंतु भाजप त्याला अनुरूप आपली प्रचार मोहीम उभारू शकतो, ज्यात काँग्रेस पक्षानेच रूपांतरे सुरू केली. संपूर्ण किनारपट्टी पंचतारांकित हॉटेलांना आंदण दिली. डोंगर छाटले. काँग्रेस नवे काय घेऊन येते, हाच आता मुद्दा आहे.
भिसेंचा अनोखा सर्व्हे!
‘अदमास पंचे दाहोदसे’ हा शब्द प्रयोग आपण ऐकलेला असणार. आपण अंदाज बांधण्यात पटाईत असतो. पूर्वी पिंजऱ्यातील पोपट घेऊन फिरणारे ज्या प्रमाणे भविष्य सांगायचे तसे अनेक भविष्यकार आता निर्माण झाले आहेत. निवडणुकीच्या काळात जे सर्व्हे व ओपिनियन पोल येतात, ते अंदाज पंच दाहोदसे याच प्रकाराचे असतात. आता काही इच्छुक उमेदवार स्वतःचाच सर्व्हे करायला लागले असल्याची खबर आहे. कुंकळ्ळी मतदार संघात भाजपाच्या उमेदवारीवर दावा सांगितलेले एक इच्छुक उमेदवार भिसे यांनी मतदारांशी फोनवर सर्व्हे सुरू केल्याची खबर आहे. कुंकळ्ळी मतदार संघाची उमेदवारी आपल्याला ( भिसे) यांना मिळणार की माजी आमदार क्लाफास डायस यांना मिळणार? असा प्रश्न मतदारांना विचारला जातो. मात्र भाजपाच्या उमेदवारीचे प्रमुख दावेदार असलेल्या विशाल देसाई यांना मात्र सर्व्हेत स्थान न दिल्यामुळे भिसे यांच्या सर्व्हेवर भाजपचेच कार्यकर्ते प्रश्न चिन्ह निर्माण करीत आहेत.
मडगावातून इच्छुक
गोव्यात निवडणूक जवळ आल्यामुशळे काँग्रेस पक्षाला अकस्मात अच्छे दिन आले असून ४० मतदारसंघात काँग्रेस उमेदवारी मिळवण्यासाठी सुमारे ४०० जणांनी अर्ज नेले आहेत. मडगाव मतदारसंघातून म्हणे तीन इच्छुकांनी हे अर्ज नेले असून त्यात चिराग नायक यांच्या बरोबर प्रभव नायक आणि सावियो कुतिन्हो यांचा त्यात समावेश आहे. सध्या निवडणूक लढवण्यास रस दाखवणारे हे इच्छूक जेव्हा निवडणूक होईल, त्यावेळी नेमके कुठे असतील, ते पाहावे लागणार आहे. कारण दिगंबर कामत हे छुप्या काँग्रेस उमेदवारांकडे बारीक लक्ष ठेवून आहेत.
संगीताबायचे राजकीय कमबॅक!
मडगावच्या राजकारणातून काहीशा दूर गेलेल्या माजी नगरसेविका संगीता अवदी यांची थेट मडगाव महिला काँग्रेस अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. म्हणजे संगीताबायचे राजकीय कमबॅक झाले म्हणायचे! पदाची सूत्रे हाती घेताच मडगावात काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला. आता प्रश्न एवढाच की, गतवैभव परत आणायचे म्हणजे नेमके किती जुने दिवस आठवायचे? कारण समोर आहेत मडगावचे दिग्गज दिगंबर कामत! त्यांच्याशी राजकीय मुकाबला करणे म्हणजे केवळ घोषणा देण्याइतके सोपे नाही, याची जाणीव संगीता यांना असेलच. आता काँग्रेसचे महिला संघटन किती जोमाने कामाला लागते आणि संगीता यांची ही नवी इनिंग किती रंगते, याकडे मडगावकरांचे लक्ष लागले आहे!
डांबराचा वास, निवडणुकीचा भास!
राज्यभर सध्या वस्ती-वस्तीतील रस्त्यांचे डांबरीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्य रस्त्यांबरोबरच आतल्या गल्ल्यांनाही हॉटमिक्सचा मुलामा चढवला जात आहे. त्यामुळे अनेक वर्षे खड्ड्यांतून प्रवास करणाऱ्या नागरिकांना सरकारला अचानक रस्ते आठवू लागल्याचे आश्चर्य वाटत आहे. लोकांमध्ये तर आता डांबराचा वास आला की निवडणूक जवळ आली समजायची, अशी चर्चा रंगू लागली आहे. पाच वर्षे खड्ड्यांनी स्वागत करणारे रस्ते अचानक गुळगुळीत होऊ लागले की मतदारांनीही सावध व्हावे. कारण हा विकासाचा सुगंध आहे की निवडणुकीचा धूर, हे ओळखणे महत्त्वाचे!
मडगावात आवाज एकच!
मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. प्रकल्पांचे उद्घाटन आणि शुभारंभ सुरू असतानाच विरोधकांवर टीकेचे बाणही सोडले जात आहेत. नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांनी मोटरसायकल पायलट, रिक्षा आणि टॅक्सीचालक हे आपले समर्थक असल्याचे सांगितले. प्रवाशाने ‘मडगाव में आवाज क्या है?’ असे विचारल्यास ‘मडगाव में आवाज एक ही है, दिगंबर कामत का!’ असे उत्तर मिळाले पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा. ‘दिगंबर का आवाज था, है और रहेगा,’ असा दावाही त्यांनी केला. आता कामतांचा हा आत्मविश्वास पाहून इतर इच्छुक उमेदवार काय म्हणत असतील? कारण प्रत्येकालाच मडगावात आपलाच आवाज घुमत असल्याचा विश्वास आहे. पण मडगावात खरा आवाज कोणाचा, हे निवडणुकीत प्रचाराच्या वेळी नव्हे, तर मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होईल!
इच्छुकांची भाऊगर्दी!
काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांना अर्ज वाटप सुरू केले आणि बघता-बघता सहा दिवसांत ४० मतदारसंघांतून ४०० च्यावर अर्ज इच्छुक घेऊन गेले. म्हणजेच सरासरी एका मतदारसंघातून दहाजणांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली की काय? असा प्रश्न सहज पडल्याशिवाय राहणार नाही. असो काँग्रेसने ही निवडणूक भलतीच मनावर घेतलेली दिसतेय, टप्प्याटप्प्याने सावध पावले टाकत त्यांनी वातावरण निर्मिती तरी केली आहे, हे नक्की. अर्ज मोफत दिले जातात म्हणून काहीजणांनी ते नेले तरी नसावेत ना, अशी चर्चा काँग्रेस भवनाच्या खाली सुरू होती. अर्जाला काही हजार रुपये शुल्क आकारले असते, तर कितीजण घेऊन गेले असते हा ही प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
भाजप-मगोप युतीचेही भिजत घोंगडे
काँग्रेसच्या युतीचे घोडे अडले आहे, तसेच काहीसे भाजप-मगोपबाबत घडत असून अजून त्याबाबत पाऊल पुढे पडलेले नाही. एसटी आरक्षणाबाबत निर्णय झाल्यानंतर ही चर्चा पूर्णत्वास जाईल असे ठरले होते, परंतु आता हे आरक्षण काही होत नाही. त्यामुळे भाजपने पुढाकार घेऊन मगोपच्या हिश्श्याच्या जागा देऊन त्यांना प्रचारात मोकळीक द्यायला हरकत नव्हती. फोंडा व शिरोडा या मतदारसंघांबाबत मगोपची चर्चा अडखळली आहे. भाजपला ‘आपले’ दोन्ही मतदारसंघ सोडायचे नाहीत, परंतु मगोपची त्यांना निकडही आहे. ‘धरले तर चावते अन् सोडले तर पळते’, अशी भाजपची स्थिती आहे. मगोप मात्र गुपचूपपणे काही मतदारसंघांत आपले उमेदवार चाचपून पाहू लागला आहे.
मडकईकर पुन्हा आखाड्यात?
कुंभारजुव्यात विधानसभेचे मैदान अजून दूर असले, तरी उमेदवारीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झालेली दिसते. भाजपचे जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक, विद्यमान आमदार राजेश फळदेसाई आणि आता माजी मंत्री पांडुरंग मडकईकरही आखाड्यात उतरण्याच्या तयारीत! मडकईकरांच्या बंगल्यावर वाढणारी समर्थकांची गर्दी पाहता निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागल्याचे दिसते. राजेश यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, पण मतदारसंघात विकासकामे कुठे झाली, असा सवाल विरोधक विचारत आहेत. त्यावर मडकईकरांनी पुन्हा मैदान गाठले आहे. आता भाजपमध्ये तिकीट एक आणि दावेदार तीन, अशी परिस्थिती निर्माण झाली तर पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार हे नक्की!
ॲपवर बस, रस्त्यावर प्रश्नचिन्ह!
कदंब महामंडळाच्या ६०० बस आता ‘माझे’ ॲपद्वारे प्रवाशांना थेट दिसणार असून तिकीट आरक्षणाची सुविधाही मिळणार आहे. बस कुठे आहे, किती वेळात येणार आहे, हे प्रवाशांना कळेल. मात्र, बस वेळेवर सुटेल का? हा खरा प्रश्न आहे. ॲपवर बसचे थेट स्थान दिसले तरी ती आगारातून वेळेवर बाहेर पडेल याची हमी कोण देणार? वाटेत बंद पडणाऱ्या बस, तांत्रिक बिघाड आणि अनियमित वेळापत्रकाचे काय? बसचे लोकेशन कळण्यापेक्षा ती इच्छित स्थळी सुखरूप पोहोचेल, याची खात्री प्रवाशांना हवी आहे. डिजिटल प्रगती स्वागतार्ह; पण आधी बस रस्त्यावर धावू द्या!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.