

फातोर्ड्यात नक्की कोण?
निवडणुका जवळ आल्या की नेतेमंडळी, इच्छुक आपल्या वाढदिनी गावात, शहरात मोठे फलक लावतात. भाजपची एक शिस्त असते, ती म्हणजे फलक लावला की त्यावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचे फोटो असले पाहिजेत. आज प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा वाढदिवस असल्याने दोन दिवस अगोदरच फातोर्ड्यात अनेक ठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे फलक झळकत आहेत. काही ठिकाणी फलकांवर दामू नाईक यांच्या फोटोसोबत मनोहर बोरकर व श्रीपाद नाईक यांचेही फोटो आहेत. दामूनी तर आपण यावेळी फातोर्ड्यातून निवडणूक लढणार नाही, असाच सूर लावला होता. त्यानंतर जर पक्षाने उमेदवारी दिली तर लढणार, अशीही पुस्तीही त्यांनी जोडली. आता त्यांच्या सोबतीला मनोहर बोरकर व श्रीपाद नाईक यांच्या फोटोमुळे लोकांना प्रश्न पडला आहे की, आगामी निवडणुकीत फातोर्ड्यातून भाजपतर्फे दामू नसतील तर मनोहर किंवा श्रीपाद भाजपचे उमेदवार तर नसतील ना?
उशिराचे शहाणपण!
म्हापसा बाजारपेठेतील दुकाने चोरट्यांनी फोडल्यानंतर आमदार जोशुआ डिसोझा यांनी आता ‘सीसीटीव्ही’ आणि सुरक्षा उपाययोजनांची प्रक्रिया जलदगतीने राबविण्याची मागणी केली आहे. मागणी अर्थातच स्वागतार्ह; मात्र चोरट्यांनी कुलूप तोडल्यानंतर सुरक्षेची आठवण होणे, हे काहीसे उशिरा सुचलेले शहाणपण ठरत नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. गेली चार वर्षे आमदार म्हणून काम करण्याची संधी असताना बाजारपेठेच्या सुरक्षेसाठी ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा आणि प्रभावी पोलिस गस्त याबाबत ठोस पावले उचलण्यासाठी नेमकी कोणाची वाट पाहिली जात होती, हा प्रश्न आता विचारला जात आहे. दुकाने फुटल्यानंतर निवेदन देणे आणि ‘प्रक्रिया जलद करा’ अशी मागणी करणे सोपे; पण चोरी होण्यापूर्वीच ही प्रक्रिया जलद करण्याची जबाबदारी कोणाची होती, याचे उत्तरही आमदारांनीच द्यावे, अशी बोचरी चर्चा म्हापशात सुरू झाली आहे.
दिगंबर कामत यांचे पंचखाद्य
उज्ज्वला योजनेखाली वितरित करणाऱ्या तीन मोफत गॅस सिलिंडरचे पैसे खात्यात जमा होणार, या आशेने काल मडगाव पालिकेत लोकांनी गर्दी केली होती. हे लोक काही हजारोंच्या संख्येत होते आणि लाभार्थ्यांना देण्यासाठी अवघे ५०० अर्ज उपलब्ध होते. त्यामुळे लवकरात लवकर योजनेचा फॉर्म मिळावा यासाठी सर्वांचीच धडपड सुरू होती. त्यामुळे गोंगाटही वाढला. हा गोंगाट ऐकून खुद्द दिगंबर कामत हे कंटाळले असावेत. त्यांनी लोकांना सरळ सांगितले. येथे ‘फॉर्म्स’ वाटले जात नाहीत. हे ‘फॉर्म्स’ म्हणजे देवळात प्रसाद म्हणून वाटले जाणारे पंचखाद्य नव्हे. ‘फॉर्म्स’ घेण्यासाठी असे लोकांना नगरपालिकेत बोलावून घेतल्यास त्यांना हे ‘फॉर्म्स’ म्हणजे पंचखाद्य वाटले तर त्यांना दोष देता येईल का?
कॅसिनो फलक का झाकले?
रस्त्यालगत कॅसिनोंचे अनेक फलक आहेत. ते लक्षवेधी आहेत. शाळकरी मुलेही ते फलक पाहत असतात. अतिमहनीय व्यक्तींचा दौरा असला की हे फलक झाकले जातात. आताही शनिवारी फळक झाकलेले दृष्टीस पडले. गोव्यातील कॅसिनोंची माहिती त्या अतिमहनीय व्यक्तींना नसावी की संबंधित त्यांच्यापासून काय दडवू पाहत आहेत, याची एक वेगळीच चर्चा यानिमित्ताने ऐकू येत आहे. त्यामुळे अशा व्यक्ती वारंवार येवोत आणि फलक झाकलेलेच राहोत असाही या चर्चेचा सूर होता.
विद्यार्थ्यांनी घंटा वाजवली
सरकार कोणतेही असो, विद्यार्थ्यांना आपल्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरावे लागणे म्हणजे सरकारला त्यांच्या कारभाराचे मिळालेले एकप्रकारचे प्रमाणपत्रच म्हणावे लागेल. सध्या गोव्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची चर्चा सुरू असतानाच अखेर मुख्यमंत्र्यांना शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न मार्गी लावावा लागला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आधीच प्रश्न मार्गी लावला असता तर विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असती का? सरकारच्या कारभारातील विलंबामुळे शिक्षकांना बढती उशिरा मिळाली आणि त्याचा फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसला. शेवटी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आणि सरकारला जाग आली. म्हणजे ‘विद्यार्थ्यांनी घंटा वाजवली, तेव्हा सरकारला सुट्टी संपल्यासारखी वाटली!’ अशी चर्चा आता सुरू आहे.
सारे प्रवासी घडीचे
गोवा उज्ज्वला योजनेअंतर्गत प्रत्येक गॅस ग्राहकाला वर्षाला तीन हजार रुपये देण्याची सरकारची घोषणा होताच शनिवारी अर्ज मिळवण्यासाठी रांगा लागल्या. विशेष म्हणजे, या रांगेत महागड्या गाड्यांमधून येणारे ग्राहकही मोठ्या उत्साहाने उभे असल्याचे चित्र दिसले. गॅसचा सिलिंडर घेण्यासाठी गाडी किती महाग आहे, यापेक्षा सरकारकडून तीन हजार रुपये मिळणार आहेत, हेच महत्त्वाचे ठरल्याचे दिसून आले. ‘सरकार मोफत देत असेल तर आपण सोडायचे कशाला?’ या तत्त्वज्ञानाचा जणू प्रत्ययच या रांगांमधून आला. त्यामुळे उज्ज्वला योजनेने गरजूंच्या चुली पेटवण्यापूर्वीच काही सुखवस्तूंच्या आशा मात्र चांगल्याच उजळल्या आहेत!
सुपर कारची क्रेझ
पणजीच्या रस्त्यांवर शनिवारी अचानक सुपर कारचा ताफा दिसताच एरव्ही या गाड्या मोबाईलच्या पडद्यावर पाहणाऱ्या अनेकांनी आपापली वाहने चक्क रस्त्याच्या कडेला थांबवून या ‘राजेशाही स्वाऱ्यां’चे दर्शन घेतले. या कार नेमक्या कोणत्या कारणासाठी शहरात आल्या होत्या, याचा उलगडा झाला नसला तरी त्यांचे नोंदणी क्रमांक स्थानिक असल्याने एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली, की गोव्यात आता केवळ समुद्रकिनारे, कॅसिनो आणि पर्यटनाचीच क्रेझ नाही, तर सुपर कारची हौसही चांगलीच वाढू लागली आहे. त्यामुळे शनिवारी पणजीकरांना काही काळासाठी वाहतूक कोंडीची नव्हे, तर ‘कार कोंडी’चीच उत्सुकता लागली होती, असे म्हणायला हरकत नाही.
सुस्त कारभाराची चर्चा!
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर म्हापशात एकाच रात्री आठ दुकाने आणि फ्लॅट फोडून चोरांनी घातलेल्या धुमाकुळामुळे खाकीच्या रात्रगस्तीची लक्तरे वेशीवर टांगली गेली असून, शहरात पोलिसांच्या ढिसाळ कारभाराचीच चर्चा रंगली आहे. इतर ठाणी झाल्याने कार्यक्षेत्र आक्रसले, जबाबदारी हलकी झाली, तरीही साहेबांचा दरारा बाजारात का दिसत नाही, असा खोचक सवाल नाक्या-नाक्यावर विचारला जातोय. भर बाजारात भुरटे एकामागून एक कुलपे तोडत गल्ले रिकामे करतात आणि संकुलात सुरक्षारक्षक असतानाही घरातून दागिने पळविले जातात, यावरून पोलिसांची रात्रीची गस्त रस्त्यावर चालते की पोलिस गाडीच्या काचा बंद करून शांत झोप काढतात, अशी उपरोधिक चर्चा व्यापाऱ्यांमध्ये सुरू आहे. खुद्द आमदारांनाच पोलिसांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवून अतिरिक्त कुमक मागण्याची वेळ यावी, यातच सर्व आले. चोरटे मोकाट आणि व्यापारी मात्र भीतीच्या छायेत, त्यामुळे कागदावर मिरवणारी ही रात्रगस्त सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी आहे की चोरांना मोकळे रान देण्यासाठी, असे संतप्त सवाल म्हापसावासीय करत आहेत.
पोलिस खात्यात शिस्तभंग झाल्यास...
हॉटेलच्या बिलावरून एका पोलिस उपनिरीक्षकाने केलेल्या कथित गैरवर्तनाची चर्चा सध्या संपूर्ण गोव्यात रंगली आहे. विधानसभेत विरोधकांनीही हा मुद्दा उपस्थित केला. हॉटेलमध्ये लहान मुले असल्याचे सांगूनही पोलिस अधिकारी शिवीगाळ करत राहिल्याचा आरोप आहे. एवढे सगळे घडूनही पोलिस खात्याकडून अद्याप निलंबनसारखी कारवाई झालेली नाही, हेच अनेकांच्या चर्चेचा विषय बनले आहे. ‘पोलिस खात्यात शिस्तभंग झाला तर कारवाई होते,’ असे आपण नेहमी ऐकतो. मग या प्रकरणात कारवाईची गाडी नेमकी कुठे अडकली, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. कारवाई होत नसल्याने संबंधित अधिकाऱ्याच्या पाठीशी कोणाचा आशीर्वाद आहे का, अशीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सत्य काय, हे सरकार आणि पोलिस विभागानेच स्पष्ट करायचे आहे!
खांडेकरांचे साहित्य!
‘वि’ या आद्याक्षराने सुरू होणारी नावे असलेल्या तीन मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. वि.स. खांडेकर, वि.वा. शिरवाडकर व विं.दा. करंदीकर. खांडेकरांचे हे ५०वे स्मृतिवर्ष. त्यांच्या हयातीत १०० पुस्तके आली. मृत्यूनंतर सुनीलकुमार लवटे यांनी संपादित केलेली ४० पुस्तके आली. युवा पिढी आजही खांडेकरांचे साहित्य वाचते. ‘ययाती’ ही त्यांची कादंबरी गाजली; परंतु ‘अश्रू’ ही कादंबरीही बरीच ताकदी आहे. हृदयाला हात घालणारी. ‘अमृतवेल’ही वाचली जाते. होतकरू लेखकांनी, मीडियातील पत्रकारांनी, प्राध्यापक, शिक्षकांनी खांडेकरांची पुस्तके वाचायला हवी. भाषेचे तेजोमय सौंदर्य कसे असते ते समजण्यासाठी. त्यांचे प्रासादीक शैलीतील लघुनिबंध, आत्मपर लेखन यांचे मनन करायला हवे. काव्यमय व रूपकयुक्त लेखन समजायला वि.स. खांडेकर वाचले पाहिजेत. लेखन अभिव्यक्तीला धार येईल.
म्हणजे नुवे मतदारसंघ राखीव नसणार?
दोन-तीन दिवसांपूर्वी नुवे मतदारसंघात ‘माजे घर’ योजनेच्या लाभार्थ्यांना सनदा वाटण्याचा कार्यक्रम झाला, त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आलेक्स सिक्वेरा पुन्हा नुवेतून निवडणूक लढवणार, अशी घोषणा केली. नुवे हा मतदारसंघ ‘एसटी’साठी राखीव असणार, असे आधी सांगितले जात होते; पण आता सिक्वेरा जर या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असतील तर हा मतदारसंघ नक्कीच राखीव नसणार. याचा अर्थ कसा लावायचा बुवा? नुवे हा मतदारसंघ राखीव नसणार की या निवडणुकीत ‘एसटी’ना आरक्षणच दिले जाणार नाही?
छान किती दिसते फुलपाखरू...
‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’ इंडियाच्या नेतृत्वाखालील एका उपक्रमांतर्गत, राज्यातील शास्त्रज्ञ, छायाचित्रकार आणि फुलपाखरूप्रेमी फुलपाखरांचे दस्तऐवजीकरण करण्याची तयारी करत आहेत. ‘बिग बटरफ्लाय मंथ’ या राष्ट्रीय चळवळीअंतर्गत, गोव्यातील सहा महाविद्यालये या महिनाभर चालणाऱ्या फुलपाखरू निरीक्षण मोहिमेत सहभागी होणार आहेत. चळवळीचा उद्देश महाविद्यालयांच्या परिसरातील आणि आजूबाजूच्या फुलपाखरांच्या विविधतेचे दस्तऐवजीकरण करणे हा होय. हा महिनाभर ही मोहीम चालेल. सप्टेंबर महिन्यात फुलपाखरे सर्वाधिक सक्रिय असतात, असे तज्ज्ञांनी सांगितले. वाढत्या शहरीकरणाच्या काळात फुलपाखरांना टिकून राहण्यास मदत करणाऱ्या अधिवासांचे संरक्षण करणे हा मोहिमेचा उद्देश आहे. या सामान्यांसाठी फुलपाखरू सफरींचे आयोजन करण्यात आले आहे. ‘बिरमुट्यो’ म्हणजे ‘ड्रॅगन फ्लाय’ही विविध कारणांमुळे हल्ली अंगणात येत नाहीत, दिसत नाहीत. त्यावरही उपाय व्हावेत, अशी लोकांमध्ये चर्चा आहे.
संकेतचा गोविंदा!
सावर्डे येथील भाजपचे युवा नेते हे खरे तर एक युवा कार्यकर्ते म्हणून राजकारणात आले आणि त्यांनी नंतर पक्षात स्वतःचे स्थान निर्माण केले. एकेकाळी जन्माष्टमीचा सण आला की सावर्डे परिसरातील युवकांना हमखास आठवण व्हायची ती संकेतचीच; कारण दहीहंडी स्पर्धेत गोविंदा होऊन अगदी वरच्या टप्प्यात जाऊन दहीहंडी संकेतच फोडायचे. अजूनही ते या दहीहंडीपासून दूर गेलेले नाहीत. कालही त्यांचा सहभाग असलेल्याश्री सिद्धारूढ जिमखाना, धडे-सावर्डे संघाने कुडचडे येथील दहीहंडीचे विजेतेपद पटकावले आहे. या विजेत्या संघाचे सदस्य असलेले संकेत आर्सेकर हे आपल्या इतर सहकारी खेळाडू आणि समर्थकांसह या विजयाचा जल्लोष करताना दिसत होते. दुसऱ्या बाजूने कुडचडे येथे या उत्सवात दुसरे भाजप नेते रोहन गावस देसाई हेही दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात मग्न झालेले दिसत होते.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त
रस्त्यावर कुत्रे, गुरे मोकाट फिरत असतात त्यामुळे रहदारीला अडचण होऊन अपघातही होत असतात. मुलांनाही त्रास होतो. फोंडा नगरपालिकेकडून मोकाट जनावरांच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. इतर पालिकांना हे एक उदाहरण आहे. फोंडा नगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, सार्वजनिक रस्त्यांवर विशेषतः रात्रीच्या वेळी मोकाट फिरणाऱ्या किंवा ठाण मांडून बसलेल्या जनावरांबाबतची माहिती हेल्पलाईन क्रमांकावर कळवावी. जनावरांच्या व्यवस्थापनासाठी नगरपालिकेने ‘ऑर्गनायझेशन फॉर पीपल अँड ॲनिमल वेल्फेअर’ या संस्थेशी १० वर्षांचा करार केला आहे. या संस्थेच्या मोकाट जनावरे पकडणाऱ्या वाहनाचा नोंदणी क्रमांकही दिला गेला आहे. तसेच, नागरिक प्रभारी ‘पाउंड कीपर’ (जनावरे ठेवण्याच्या केंद्राचे प्रमुख) यांच्याशी संपर्क साधू शकतात, असे नगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. इतरांनी असेच पाऊल उचलून रस्ते मोकाट प्राणीमुक्त करावे हीच इच्छा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.