

पणजी: गोवा प्रादेशिक आराखडा २०२१ अंतर्गत सासष्टी तालुक्यातील सेर्नाभाटी आणि कोलवा येथील एकूण १२.७४ लाख चौरस मीटर जमिनीचा अविकासयोग्य विभागात समावेश करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.
नगरनियोजन खात्याच्या अधिसूचनेनुसार, सेर्नाभाटीतील ६.२२ लाख, तर कोलवा येथील ६.५२ लाख चौरस मीटर क्षेत्राच्या विभागात बदल करण्यात आला आहे. कोलवा क्रीडा मैदान आणि वसाहती विभागातील क्षेत्र कायम ठेवण्यात आले आहे.
गोवा नगरनियोजन मंडळाच्या २२ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीत जनतेच्या सूचना विचारात घेऊन या बदलांची शिफारस करण्यात आली होती. सरकारने त्यानुसार मंजुरी दिली आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात प्रलंबित असलेल्या जनहित याचिका क्रमांक ५३/२०२४ आणि ५४/२०२४ यांच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल.
दरम्यान, सासष्टी, डिचोली, बार्देश, केपे आणि पेडणे तालुक्यांतील अन्य सहा जमीन विभाग बदलांनाही सरकारने मंजुरी दिली आहे. सां जुझे द आरियाल, लाटंबार्से, हळदोणे, आंबावली, मांद्रे आणि आंबेली येथील जमिनींचा यात समावेश आहे. या ठिकाणी बागायती, नैसर्गिक आच्छादन किंवा अन्य विभागांतील काही क्षेत्रांचे वसाहती विभागात रूपांतर मंजूर करण्यात आले आहे. काही प्रस्तावांसाठी जलसंपदा आणि वन खात्यांचे ना-हरकत दाखले घेण्याची अट घालण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.