

युरींची आज सत्त्वपरीक्षा?
‘ज्याच्याकडे जनता, त्याच्याकडे सत्ता’ हे राजकारणातील महत्त्वाचे समीकरण. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली येणारी विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्ष जिंकणार का? काँग्रेस पक्षाकडे तेवढी ताकद व जनाधार आहे का? भाजपविरोधी पक्षांशी काँग्रेस युती करणार का? याची उत्तरे सोमवारी होणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात मिळणार आहेत. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे हे काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या मेळाव्याला गर्दी व्हावी म्हणून युरी आलेमाव यांनी आकाश-पाताळ एक केले. कार्यकर्त्यांना या मेळाव्यास मोठ्या संख्येने आणण्याचे काम युरींच्या हाती आहे. युरी आलेमाव यांनी मेळाव्यास ‘रेकॉर्ड’ गर्दी खेचण्याचे आव्हान घेतले आहे. आता युरी हे आव्हान पेलतात की नाही, हे पाहावे लागेल.
गाडी एक, गरजा अनेक!
म्हापसा पोलिस स्थानकाच्या दारात शनिवारी अखेर एक चकचकीत, नवीकोरी जीप दाखल झाली; पण खाकी वर्दीत मात्र ‘उंटाच्या तोंडात जिरे’ अशीच कुजबुज दबक्या आवाजात सुरू आहे. इतके दिवस एकाच वाहनावर संपूर्ण शहराचा गाडा ओढणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या स्थानकाला रात्रंदिवस गस्त घालण्यासाठी किमान तीन ते चार वाहनांची आणि एका शववाहिकेची नितांत गरज आहे. मात्र, वरिष्ठ पोलिस प्रशासनाने एकच गाडी पदरात टाकून तूर्तास वेळ मारून नेली. काहीच नसण्यापेक्षा निदान एक तरी नवी गाडी मिळाली, असा सुस्कारा कर्मचारी वरवर सोडत असले, तरी एकाच वाहनाच्या भरवशावर इतक्या मोठ्या परिसराचा वाढता ताण आणि गुन्हेगारीचा भार नेमका कसा पेलायचा, हा मोठा पेच आहे. आता हक्काच्या उर्वरित तीन गाड्या आणि शववाहिकेसाठी म्हापसा पोलिसांना लालफितीच्या कारभारात अजून किती काळ प्रतीक्षा करावी लागणार, की केवळ कागदी आश्वासनांवरच गस्त घालावी लागणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
दामूंची ३० गाण्यांची सीडी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे कवी, कलाकार आहेत. त्यांनी आजपर्यंत ६५० गाणी लिहिली हे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा नक्कीच धक्का बसला असेलच. रविवारी ‘गीत चित्रांगी’ कार्यक्रमातसुद्धा दामूंनी आपल्या गाण्यांबद्दल सांगितले. या कार्यक्रमातून त्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजताना दिसून आले. दामूंनी तर आपल्या भाषणाचा शेवट २०२७ मध्ये ३० गाण्यांची सीडी काढणार असून, त्यासाठी सर्वांच्या आशीर्वादाची याचनाही केली. उपस्थित राजकीय नेत्यांनी तर आपले सहकार्य असेल, हे स्पष्ट केलेच. उपस्थित असलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीसुद्धा दामूंना याकामी आपले सहकार्य असेल व ते निश्चितच यात यशस्वी होतील, असा आशीर्वाद दिला. २०२७ मध्ये तीस गाण्यांची सीडी म्हणजेच २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत ३० मतदारसंघ जिंकणार, हेच दामूंना म्हणायचे होते, हे लोकांच्या लक्षात आले असेलच.
‘एल्टन’च्या तयारीमुळे सावियोंची गोची
एसटी राजकीय आरक्षणामुळे केपे मतदारसंघ आरक्षित होणार असल्याने या मतदारसंघाचे विद्यमान आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी वेळ्ळी मतदारसंघात पुढील विधानसभा निवडणुकीत आपले लक्ष केंद्रित केले असून, ते एव्हाना या मतदारसंघात सक्रियही झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून मागच्या खेपेला काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविलेल्या सावियो डिसिल्वा यांची बरीच गोची झाली. मागच्या खेपेला त्यांचा केवळ १६९ मतांनी पराभव झाल्याने आमदार होण्याचे स्वप्न हुकले होते. पराभूत झाल्यानंतरही त्यांनी वेळ्ळीत आपले काम सुरूच ठेवले होते. आता एल्टनबाब या मतदारसंघात सक्रिय झाल्याने सावियोबाबांचे आमदारकीचे स्वप्न पुन्हा एकदा भंगणार की ते वेगळी वाट पकडणार, हे पाहावे लागेल. तशी दाट शक्यता आहेच म्हणा. मात्र, सध्याच्या घडीस काही सांगता येत नाही. तूर्तास ‘वेट अॅण्ड वॉच’.
गटारी पार्टीत शिजले राजकारण?
‘जिसकी लाठी, उसकी भैस’ याप्रमाणे ज्याची सत्ता, त्याचा हुकूम, असेच म्हणावे लागेल. सरकारमधील एका बड्या नेत्याच्या ‘ब्रदर इन लॉ’ने म्हणे श्रावणाच्या पूर्वसंध्येला आपल्या जवळच्या मित्रांना व राजकीय नेत्यांना भव्य अशी गटारी पार्टी दिली. तसा हा सरकारी भावोजी प्रत्येक वर्षी गटारी अमावस्येला मदिरापान आयोजित करीत आला आहे, असे सांगतात. मात्र, या गटारी पार्टीत म्हणे स्वतःला जनतेचा उमेदवार म्हणून घोषित केलेले ‘स्वाभिमानी’ उपस्थित होते. त्या भावी उमेदवाराला म्हणे सरकारकडून सर्व ती मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. आता पाहूया, सासष्टीतील महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघात या भाजपा मित्राला कितपत आधार प्राप्त होतो.
काँग्रेस नेत्यांबाबत तरुणाईत नाराजी!
नीट पेपरफुटीनंतर दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वाखाली ‘जेन झी, जेन अल्फां’नी माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात छेडलेले आंदोलन आणि या आंदोलनाला मिळालेल्या यशामुळे गेल्या काही वर्षांपासून झोपी गेलेली काँग्रेस खडबडून जागी झाली आहे. देशातील तरुणाई मोदी सरकारला हटवू शकते, हा विश्वास पटल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी तरुणाईलाच हाताशी धरून २०२९ च्या लोकसभा निवडणुकीचे डावपेच आखण्याचे निश्चित केले असून, त्याची तयारीही सुरू केली आहे. गोव्याची विधानसभा निवडणूक अवघ्या सात महिन्यांवर येऊन ठेपल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांनाही त्यांनी तरुणाईशी संपर्क वाढवण्याचा सल्ला दिला आहे. तरीही प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र त्याकडे अजूनही म्हणावे तसे लक्ष दिलेले नाही. ‘‘आता आम्ही जिंकलोच’’ या अविर्भावात ते असल्याने या नेत्यांबाबत तरुणाईत नाराजी पसल्याची चर्चा सुरू आहे.
‘डीआरएस’ला ‘लॉक’
डिपॉझिट रिफंड स्कीम म्हणजेच ‘डीआरएस’. योजना चांगली, उपक्रम कौतुकास्पद; पण सध्या ही योजना लांबणीवर पडल्याने तिच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही ठिकाणी या योजनेच्या मशिनही बसविण्यात आल्या आहेत. नेरुल येथे नुकताच ‘मॅन्ग्रोव्ह वॉक’ तयार करण्यात आला. धुमधडाक्यात उद्घाटन झालेला हा प्रकल्प पर्यटकांना आकर्षित करणारा ठरत आहे. प्रकल्पाचे कौतुकही होताना दिसते. मात्र, येथे बसविण्यात आलेली डीआरएस मशिन सध्या पर्यटकांच्या कुतूहलाचा विषय बनली आहे. या मशिनला चक्क काचेच्या एका खोलीत बंद करून त्याला कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे ‘ही मशिन नेमकी कशासाठी?’ असा प्रश्न पर्यटकांना पडतोय. विशेष म्हणजे, मशिनला कुलूप का लावले आहे किंवा योजना सध्या कार्यान्वित का नाही, याची साधी सूचनाही तेथे लावण्यात आलेली नाही. त्यामुळे पर्यटक येतात, मशिन पाहतात आणि पुढे निघून जातात. आता कुजबुज एवढीच, ‘डीआरएस’ला योजना लांबणीवर पडण्याचे कारण समजले; पण मशिनला ‘लॉक’ करण्याचे कारण कोण सांगणार?
अभिनेत्याची अरेरावी... अन् माफीही!
‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधील अभिनेता अश्विन मुशरन यांना अरेरावी नडली आणि त्यांना स्थानिकांची माफीही मागावी लागली. एका राष्ट्रीय वृत्तपत्राने या घटनेला जोरदार प्रसिद्धी दिली. दक्षिण गोव्यातील केपे येथे ही घटना घडली असून, त्यांच्या गाडीचा अपघात झाला. अपघात झाला, त्यामुळे दुचाकीवरील पिता-पुत्र खाली पडले. त्यावेळी अश्विन हे चुकीच्या मार्गावरून वाहन चालवत होते, असे आढळून आले. अपघात घडल्यानंतर दुचाकीवरून पडलेल्या गृहस्थाने त्यांची गाडी अडवली. त्यानंतर लोक जमा झाले. मुशरन हे आपली चूक मान्य करीत नव्हते. शाब्दिक वाद वाढला. त्यावेळी त्यांची पत्नी या वादात पडली. अखेर स्थानिकांनी अश्विन यांनी माफी मागावी, अन्यथा गाडी न सोडण्याचा पवित्रा घेतला. ‘नाक दाबल्यावर तोंड उघडते’, ते उगाच म्हणत नाहीत. स्थानिकांची भूमिका पाहून अश्विन यांनी येऊन माफी मागितली. पण, स्थानिकांना अजूनही ती माफी मनापासून मागितलेली नाही, असे वाटतेय.
भाजपा आणि सरकारी नोकऱ्या!
जो आमदार जास्त मतदारांना नोकरीला लावण्यात यशस्वी झाला, तो पुन्हा निवडून येतो. म्हणून आमदार व मंत्री आपल्या समर्थकांना नोकरीची आशा दाखवितात. आता ‘स्टाफ सिलेक्शन’ आल्यामुळे आमदारांचे महत्त्व कमी झाले, ती बाब वेगळी. भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार; मात्र, ज्या नेत्याला रोजगार देण्यास अपयश आले, त्याला सत्तेवर राहण्याचा हक्क नाही, असे जाहीर भाष्य करण्याचे धाडस भाजपचे मंत्री विश्वजित राणे यांनी करून भाजपालाच आव्हान दिले. त्यावर सहा महिन्यांत दोन हजार नोकऱ्या तयार होणार, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर आली. याचा अर्थ विश्वजितांचा बाण मुख्यमंत्र्यांना लागला, असे म्हटल्यास चूक होणार?
बापाविरोधात तक्रार!
‘नातू आज्याक शिकयता’ अशी कोकणीत म्हण आहे. सध्या देशात ‘जेन झी’ व ‘जेन अल्फा’ यांना मोठी मागणी आहे. मोहन भागवतांपासून नरेंद्र मोदींपर्यंत व राहुल गांधींपासून केजरीवालांपर्यंत सगळेच ‘जेन झी’च्या प्रेमात पडले आहेत. मात्र, ‘जेन झी’ची आफत जंतरमंतरवरून घरांत घुसली आहे. काणकोण येथील एका भाजप नेत्याला आपल्या ‘जेन झी’ मुलाची आफत सहन करावी लागली. स्थानिक भाजप नेत्याने आपल्या मुलाच्या माफ न करता येणाऱ्या वागण्याला धारेवर धरले म्हणून रागाने मुलाने आपल्या नेता असलेल्या बापालाच पोलिसांकडे नेले. आपला बाप आपल्यावर अत्याचार करीत असल्याची तक्रार स्वतःच्याच मुलाने बापाविरुद्ध केली. बिचारा बाप! कधी चुकूनही पोलिस चौकीच्या पायऱ्या चढला नव्हता; त्याला स्वतःच्याच मुलाचा अपराधी म्हणून पोलिस ठाण्यावर जावे लागले. कधी कधी आपण नेतेगिरीच्या ‘बिझी शेड्यूल’मध्ये कुटुंबाकडे लक्ष द्यायला कमी तर पडत नाही ना? याचा विचार आता नेत्यांनी करायला नको का?
आवाहनाला प्रतिसाद
मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सतत स्वयंपूर्ण गोव्याचा नारा सत्यात उतरवण्यासाठी जनतेला आवाहन करीत आहेत. विविध स्थानिक नैसर्गिक उत्पादनांचे प्रमाण वाढावे यासाठी त्यांनी आता खेकड्यांची पैदास वाढली पाहिजे, असे आवाहन केले. ते करताना त्यांनी मादी खेकड्यांना मारू नये, त्यांना पाण्यात सोडावे. पावसाळ्यात मादी खेकडे लाखो अंडी देतात. त्यातील काहीच पिल्ले वाचतात. त्यामुळे अशा मादी खेकड्यांना जीवनदान द्यावे, असे आवाहन केले. त्याच आवाहनाला प्रतिसाद म्हणून काकरा येथील संजय परेरा या मच्छिमारास १.६ किलो वजनाचा मादी खेकडा सापडला. या घटनेचा व्हिडिओ त्याने बनविला आणि व्हायरल केला. त्या खेकड्याच्या अंगावर अंडी असल्याचे लक्षात आल्यावर परेरा यांनी त्याला पुन्हा नदीत सोडून दिले. श्रावण असल्यामुळे मासे व खेकडे खाण्यावर निर्बंध आले आहेत, अन्यथा परेराप्रमाणे अनेकांचे व्हिडिओ पुढे आले असते.
स्वच्छतेचा पायंडा ‘साखळी’तून
मुख्यमंत्री स्वच्छतेबाबत बोलतात, हे काही नवीन नाही. पण, आपल्या साखळीची स्वच्छता मात्र ते जातीने तपासतात, हे विशेष! राज्यातील लहान शहरांमध्ये अव्वल स्थान मिळवलेल्या साखळी शहराचा स्वच्छतेचा ‘फॉर्म्युला’ आता इतरांसाठीही आदर्श ठरतोय. मग नगरपालिका तरी मागे कशी राहणार? मुख्यमंत्र्यांची प्रतिमा आणखी उजळावी म्हणून पालिका मंडळही नवनवीन उपक्रम राबवण्यात आघाडीवर आहे. आता तर ‘फोर-वे सेग्रिगेशन’ कचरा उचल पद्धत सुरू करण्यात आली आहे. म्हणजे, कचरा वेगळा करण्यापासून ते उचलण्यापर्यंत सगळेच ‘फोर-वे’! गेल्याच वर्षी साखळी नगरपालिकेने केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणात पुरस्कार पटकावला होता. यंदाची कामगिरी पाहता पुन्हा पुरस्कार पदरात पडेल, असा पालिकेला विश्वास आहे. अर्थात, पुरस्कार मिळविणे चांगलेच; पण साखळी स्वच्छ ठेवण्याची खरी कसोटी पुरस्काराच्या पलीकडे आहे, नाही का? शेवटी शहर असो वा गाव, स्वच्छतेची जबाबदारी फक्त पालिकेची नाही; प्रत्येकाची आहे. त्यामुळे साखळी नगरपालिकेच्या या उपक्रमाकडे इतर पालिकांचेही लक्ष असेलच.
बाबूंचे दोन होड्यांवर पाय
गोव्यात बाबू बरेच आहेत, पण प्रत्येक बाबूचा आपला असा एक आवडीचा विषय असतो. या बाबूंचा आवडता विषय म्हणजे मडगावचे गांधी मार्केट आणि रस्त्याच्या कडेला बसून फळभाजी, फुले विकणारे विक्रेते. हे बाबू दुसरे-तिसरे कोणी नसून बाबू आजगावकर! पेडणे त्यांची जन्मभूमी तर मडगाव ही कर्मभूमी, असे ते सांगतात. गांधी मार्केटमधील विक्रेत्यांच्या समस्या मांडता मांडता आणि त्यांच्यासाठी लढता लढता बाबूंना मडगावच्या राजकारणात कधी महत्त्व मिळाले, हे कदाचित बाबूंनाही कळले नसावे! एरवी सगळे दोस्तच म्हणायचे. पण अधूनमधून मडगावचे आमदार दिगंबरबाब कामत यांच्यावर शाब्दिक बाण सोडण्याची संधीही ते सोडत नाहीत. आता काणकोणमधील महिला विक्रेत्यांना मडगावात जागा देण्याबाबत कामतबाबांनी केलेल्या विधानावरून बाबूंनी पुन्हा टोला लगावला. ‘एवढी वर्षे कामतबाब काय करीत होते? त्यांना हे आताच कसे सुचले?’ असा सवाल बाबूंनी उपस्थित केला. पण काहीही म्हणा, बाबूंची कमालच! मडगाव असो की पेडणे, दोन्हीकडच्या समस्या मांडायला बाबू हजर. त्यामुळेच की काय, ‘बाबूंचे दोन होड्यांवर पाय... असे नागरिक सहज बोलतात.
तरीही आश्वासने कशाला?
राज्यातील आदिवासी समाजाचे वनहक्क दावे निकाली काढण्याची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ही प्रक्रिया गतिमान करीत २,५०० जणांना सनदींचे वितरण केले. परंतु, हीच प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी गेली तीन ते चार वर्षे लागली. वनहक्क दाव्यांबाबत अजूनही सरकारकडे १० हजार अर्ज प्रलंबित आहेत. असे असतानाही मुख्यमंत्री येत्या १९ डिसेंबरपर्यंत हे सर्व अर्ज निकाली काढण्याची हमी देत आहेत. शनिवारच्या प्रजासत्ताकदिनाच्या भाषणातही त्यांनी पुन्हा या विषयाला हात घातला. आता मुख्यमंत्र्यांची ही हमी कितपत खरी ठरते, याकडे आदिवासी समाजाचे लक्ष लागले आहे.
म्हणे, कलमी मानकुराद आंबा...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणजे बहुरंगी व्यक्तिमत्त्व. आपल्या कलेची छाप पाडणारे दामू हे राजकारणालाही वेगळे वळण देऊ शकतात, असे रविवारी मडगावातील कार्यक्रमात वक्त्यांनी त्यांचे गुणगान करताना सांगितले. यात दिगंबर कामत, रमेश तवडकर आणि नंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतसुद्धा सामील झाले. पण खरी गंमत झाली ती सूत्रसंचालन करणारे डॉ. गोविंद भगत यांच्या वक्तव्याने. त्यांनी चक्क दामूबाबांची तुलना ‘कलमी मानकुराद आंब्या’शी केली. आंबे अनेक प्रकारचे असतात; पण कलमी मानकुरादची गोडी काही औरच! दामूबाबासुद्धा या आंब्याप्रमाणे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असल्याचे भगत यांनी सांगितले. आता दामूबाबांची तुलना आंब्याशी झाली म्हटल्यावर समर्थक तरी मागे कसे राहणार? कार्यक्रमाला दामूंचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होतेच. त्यामुळे ‘कलमी मानकुराद’ची उपमा मिळताच टाळ्यांचा कडकडाट झाला नाही, तरच नवल!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.