

पणजी: अनधिकृत क्रिकेट स्पर्धांत खेळण्याबाबत गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) सर्व नोंदणीकृत क्रिकेटपटूंना कडक शब्दांत इशारा असून अशा स्पर्धांत न खेळण्याची सूचना केली आहे. नियमभंग करणाऱ्या खेळाडूंवर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले.
संघटनेच्या निर्णयाविषयी जीसीए सचिव तुळशीदास शेट्ये यांनी सांगितले, की ‘‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) नोंदणीकृत सर्व क्रिकेटपटूंना अनधिकृत किंवा मान्यता नसलेल्या क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार नाही. अशा कोणत्याही स्पर्धेत खेळाडूंना सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार नाही.
बीसीसीआय आणि जीसीएच्या नियमांचे व नियमावलीचे सर्व खेळाडूंना काटेकोरपणे पालन लागेल. मान्यता नसलेल्या किंवा अनधिकृत क्रिकेट स्पर्धेत कोणताही खेळाडू सहभागी झाल्याचे आढळल्यास संबंधित खेळाडूविरुद्ध संघटनेतर्फे कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.’’
बीसीसीआयशी नोंदणीकृत सर्व खेळाडूंनी या सूचनेची गांभीर्याने नोंद घेऊन नियमांचे काटेकोर पालन करावे, तसेच अनधिकृत स्पर्धांपासून दूर राहून संघटनेच्या तसेच बीसीसीआयच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन शेट्ये यांनी केले आहे.
गतमोसमात, तसेच त्यापूर्वीही राज्यातील नोंदणीकृत क्रिकेटपटू जीसीएची मान्यता नसलेल्या अनधिकृत स्पर्धांत खेळत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. अशा स्पर्धांत खेळल्यामुळे खेळाडूंच्या कारकिर्दीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. विशेषतः अयोग्य मैदानावर खेळल्याने क्रिकेटपटूंना दुखापतींचा धोका असतो, या कारणास्तव जीसीएने शिस्तभंगाची कारवाई करण्याचे ठरविले असून फक्त अधिकृत स्पर्धांतच राज्यातील नोंदणीकृत खेळाडू खेळू शकतील, असे जीसीए सचिव शेट्ये यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.