खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

Khari Kujbuj Political Satire: बाबू आजगावकर पुन्हा एकदा मडगावच्या गांधी मार्केटच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. मार्केटलगतच्या परिसरात रात्री आठ वाजल्यानंतर काही जण बेकायदेशीरपणे भाजीविक्री करतात.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

बाबू पुन्हा आक्रमक...

बाबू आजगावकर पुन्हा एकदा मडगावच्या गांधी मार्केटच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. मार्केटलगतच्या परिसरात रात्री आठ वाजल्यानंतर काही जण बेकायदेशीरपणे भाजीविक्री करतात. त्यामुळे मार्केटमधील विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा बाबूंचा आरोप आहे. त्यांच्या आरोपात तथ्यही असल्याचे बोलले जाते. या बेकायदा विक्रेत्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या इशाऱ्यानंतरही पालिकेने संबंधित विक्रेत्यांवर अद्याप कारवाई केलेली नाही. कारवाई तरी कशी होणार म्हणा! हे विक्रेतेही सत्ताधारी पक्षातील मातब्बर राजकारण्यांचे खंदे समर्थक असल्याची चर्चा आहे. आता बाबू कधी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार, याची प्रतीक्षा मडगावकरांना लागून राहिली आहे. ∙∙∙

राहुलचा दौरा, युरींची गोची!

गोव्यातील काँग्रेसला राहुल गांधींच्या भेटीचे मोठे अप्रूप; पण प्रत्यक्षात राहुल गांधींनी कुंकळ्ळीच्या ‘गोय राखण यात्रे’कडे पाठ फिरवल्याने भाजपला आयतेच कोलीत मिळाले. मग काय, भाजपच्या गोवा शाखेने समाजमाध्यमांवरून काँग्रेस नेते युरी आलेमाव यांची खिल्ली उडवण्याची संधी साधली! राहुल गांधींच्या भेटीचा आभास निर्माण करून काँग्रेसला गुंतवून ठेवल्याचा टोमणाही भाजपने मारला. आता प्रश्न असा की, राहुल गांधींच्या अनुपस्थितीने युरींची राजकीय कोंडी झाली की भाजपच्या या चिमट्यामुळे काँग्रेसची अधिक पंचाईत झाली? राजकारणात दौऱ्यापेक्षा चर्चाच मोठी ठरते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला म्हणायचा! ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: मुख्यमंत्री देणार 'नवरात्री गिफ्ट'?

चर्चिलची राजकीय डिप्लोमसी...

आपली लाडकी कन्या वालंका यांना कुठल्याही स्थितीत यावेळी नावेली मतदारसंघातील काँग्रेसची उमेदवारी मिळावी, यासाठी चर्चिल आलेमाव प्रयत्नशील आहेत. सध्या काँग्रेसची ‘गोय राखण यात्रा’ सुरू आहे. चर्चिल व वालंका हे दोघेही अजूनपर्यंत या यात्रेत सहभागी झालेले नाहीत. चर्चिल सांगतात की, वालंकाला अजूनही काँग्रेसने पक्षात घेतले नाही. मग आम्ही या यात्रेत कसे सहभागी होणार? एकीकडे हे सांगताना, वालंकाला काँग्रेस पक्षात घेऊन तिला नावेलीत उमेदवारी दिली नाही, तर आपण स्वतः बाणावलीत व वालंका नावेलीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार, असेही ते खुलेआम सांगतात. एका परीने चर्चिलबाब काँग्रेसवर दबावतंत्र आणीत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत ही बाप-लेकीची जोडी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारीवरून बाणावली व नावेली येथून उभी होती व पराभूत झाली होती. या दोन्ही मतदारसंघांत त्यामुळे काँग्रेसचाही पराभव झाला होता. नावेलीत तर पहिल्यांदाच कमळ फुलले होते. काँग्रेस पक्ष चर्चिलची राजकीय डिप्लोमसी पुरेपूर जाणून आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. बघूया, पुढे काय होते ते.∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: तोतया मंत्र्याची पुन्हा चर्चा!

‘बेटर म्हापसा’ चे पोस्टर

म्हापशात सध्या ‘बेटर म्हापसा’ या पोस्टरची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी ‘आप’ आणि गोवा फॉरवर्डच्या युतीने ‘गोवा फर्स्ट’ नावाने पोस्टरबाजी केली होती. मात्र, ती पोस्टर्स हटवण्यात आली. आता ‘बेटर म्हापसा’चे पोस्टर झळकू लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. व्हॉट्सॲप ग्रुपवरही हे पोस्टर फिरत आहे. पण गंमत अशी की, पोस्टर लावले कुणी, हेच अजून गुलदस्त्यात आहे! कुणी राजकीय खेळी खेळतंय की म्हापशासाठी काही नवी मोहीम आखली जातेय? सध्या तरी चर्चांना उधाण आले आहे. पोस्टर झळकले, चर्चा रंगली; आता पोस्टरमागचा ‘खेळाडू’ कोण, हे कळण्याची प्रतीक्षा! ∙∙∙

‘जेन झी’ला जिंकणारे गोविंद!

आंदोलन म्हटले की, गोविंद शिरोडकर यांची उपस्थिती ठरलेली असते. रविवारी आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनातही ते होते. ज्येष्ठ नागरिकांसोबत ‘जेन झी’ही मोठ्या संख्येने उतरली होती. मात्र, तरुणाईचा आवाज वाढला आणि वातावरण तापू लागले, तेव्हा गोविंदराव पुढे सरसावले. आपल्या खास शैलीत मोठ्या आवाजात विषय मांडला आणि जेन झीलाही शांत करीत मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे, तरुणाईला समजावून सांगण्यात ते यशस्वी ठरले. आता आंदोलनात केवळ सहभागच नव्हे, तर तरुणाईलाही आपलेसे करण्याची गोविंदरावांची ही हातोटी चर्चेचा विषय ठरली आहे! ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: 'ते' नेते विजयना स्‍वीकारणार?

दळवींचा गरबा घुमो...

आजच्या राजकारणात जनतेत सतत वावर असेल, तरच राजकीय गाडीला वेग येतो, हे फोंड्याचे विश्वनाथ उर्फ अपूर्व दळवी चांगलेच जाणतात. चतुर्थीच्या काळात पाच दिवसांत तब्बल ४०० ते ५०० घरांना भेटी देत त्यांनी गणेशदर्शनाचा जणू धडाकाच लावला. आता नवरात्रोत्सवात महिलांसाठी गरबा कार्यशाळा आयोजित करून शेकडो महिला आणि युवतींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यात आरोग्य तपासणी शिबिराचीही भर! म्हणजे सण कोणताही असो, दळवींचा जनसंपर्क सुरूच. या सगळ्या उपक्रमांतून स्वतःची राजकीय प्रतिमा उजळवण्याची संधी ते सोडत नाहीत, अशी फोंड्यात चर्चा आहे. आता या गरब्याचा राजकीय ‘ताल’ मतपेटीपर्यंत पोहोचतो का, हे येणारा काळच सांगेल! ∙∙∙

गोव्याची राखण

गोवा राखायचा आहे! सर्वांनाच घोर पुळका लागलाय. प्रश्न एवढाच की, नेमका कुणापासून राखायचा आणि कसा राखायचा? पाच वर्षांनंतर परत हा शब्द कानठळ्या बसाव्यात इतक्या जोरात ऐकू येत आहे. डोंगर, नारळ-सुपारीच्या बागा, खाड्या, समुद्रकिनारे आणि गावांतील शांत जीवन यांच्यावर विकासाच्या नावाने बुलडोझर फिरत असताना त्या निसर्गाचा आक्रोश कुणालाच ऐकू येत नाही. प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या फिती, भाषणे, घोषणा हे पदार्थ गोड असतात. नंतर साइड इफेक्ट्स होतात. जमिनीचे व्यवहार, डोंगरकापणी, झाडांची कत्तल, खाजन जमिनींचे संरक्षण आणि स्थानिकांच्या हक्कांबाबत ठोस भूमिका ही खरी राखण. इथेच खरी कसोटी असते! चार महिन्यांत ‘राखण’ हा शब्द लुप्त होईल. असो. राखणदार कुणी का असेना, गोव्याचा आत्मा हरवता कामा नये. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबूज: गेले नगरसेवक कुणीकडे?

गोव्यात राष्ट्रीय नेत्यांची मांदियाळी!

गोवा पर्यटकांबरोबरच राष्ट्रीय राजकीय नेत्यांसाठीही आकर्षणाचे केंद्र बनले आहे. निवडणुकाजवळ येताच नेत्यांच्या गोवा वाऱ्या वाढू लागल्या आहेत. ‘आप’च्या नेत्या गोव्यात ठाण मांडून आहेत, तर केजरीवाल दर दोन दिवसांनी गोव्यात येतात आणि आढावा घेतात. काँग्रेस नेत्यांच्याही फेऱ्या वाढल्या आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन पक्षवाढीची भाषा बोलून गेले. शरद पवारांनीही गोव्यात येऊन दिगंबर कामत यांची भेट घेतली. पण भाजपचेही नेते अधूनमधून गोव्यात येऊ लागल्याने चर्चेला उधाण आले आहे. भाजपने ३० जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला असताना, या वाढत्या राजकीय वाऱ्यांचे नेमके संकेत काय? विरोधकांची तयारी की सत्ताधाऱ्यांचीही सावध मोर्चेबांधणी? गोव्याच्या राजकारणात सध्या हीच चर्चा सुरू आहे! ∙∙∙

युरी गिरीशनाच विसरले

‘गोंय राखण यात्रे’त एक एक नवीन गोष्ट ऐकू येत आहे, बुवा! राहुल गांधी येणार म्हणून दोन वेळा या यात्रेचे वेळापत्रक बदलले आणि पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल करीत त्यांची सभा कुंकळ्ळीला ठेवण्यात आली; पण, शेवटी राहुल गांधी न आल्यामुळे तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत ही सभा घ्यावी लागली. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यासपीठावर बसलेल्या सर्व नेत्यांची नावे घेतली. पण प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे व्यासपीठावर बसलेले असताना त्यांचे नाव घेण्यास ते विसरले. आता ही चूक अनावधानाने झाली की मुद्दामहून, हे देवच (आणि स्वतः युरी) जाणे! ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबूज: काँग्रेस विचार बदलणार?

...तरीही विजय सरदेसाई ‘आप’ला का भूलले?

‘आम आदमी पक्षासोबत (आप) केलेली युती तोडून आपण कोणतीही चूक केली नाही’, असा खुलासा करीत आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी रविवारी ‘आप’ चुकत असल्‍याची भूमिका घेतली. ‘‘विधानसभा निवडणुकीच्‍या तोंडावर सत्ताधारी भाजपला सोडून आपने काँग्रेसवर टीका करण्‍यास सुरुवात केली, हे चुकीचे आहे. सध्‍याच्‍या परिस्‍थितीत त्‍यांच्‍याकडून भाजपवर टीका होणे गरजेचे आहे. अखेरच्‍या टप्‍प्‍यात काँग्रेसने चुका केल्‍या, तर त्‍यांच्‍यावर टीका करणे योग्‍य ठरले असते’, असे म्‍हणत याच कारणासाठी ‘आप’शी केलेली युती तोडल्‍याचे विजय यांनी अप्रत्‍यक्षरीत्‍या सांगितले. पण, आपने आताच नव्‍हे, तर अनेक महिन्‍यांपासून काँग्रेसला निशाण्‍यावर घेतल्‍याचे त्‍यांना माहिती होते. तरीही त्‍यांनी ‘आप’ला जवळ का केले? असा प्रश्‍‍न विचारत या माध्‍यमातून काँग्रेसवर दबाव आणण्‍यासाठीच त्‍यांनी हा पर्याय निवडला होता, अशी चर्चा मतदारांत सुरू आहे. ∙∙∙

यापूर्वी शपथ, आता वचन!

२०१७ मध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी आमदार होण्यापूर्वी विविध देवस्थानांत जाऊन शपथा घेतल्या होत्या. एकत्र राहण्याच्या या शपथा आणि गाऱ्हाणी लोक विसरलेले नाहीत. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांपैकी आठ जण भाजपच्या गोटात दाखल झाले. त्यामुळे शपथांची आठवण करून देण्याची वेळच आली नाही! आता काँग्रेसनेही शपथेऐवजी ‘वचन’ देण्याचा मार्ग स्वीकारल्याचे दिसते. भाजपचा जाहीरनामा ‘वचननामा’ म्हणून ओळखला जातो; आता काँग्रेसचे नेतेही वचन देऊ लागले आहेत. कुंकळ्ळीत युरी आलेमाव यांनी पवित्र भूमीवरून २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस २७ जागा जिंकेल, असे वचन दिले. आता प्रश्न एवढाच की, हे वचन किती टिकणार आणि प्रत्यक्षात किती उतरवले जाणार? घोडेमैदान फार दूर नाही, हे मात्र खरे! ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबूज: काँग्रेस विचार बदलणार?

तिथं घडवणं, इथं बि-घडवणं

पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी आणि त्याच्या वापराचे नियमन करण्यासाठी राज्य सरकार ‘जल निरीक्षक’ (वॉटर इन्स्पेक्टर्स) नियुक्त करणार म्हणे. सरकारचे हे उत्तम पाऊल. यंदा पावसाची तूट आहे. पाणी मुबलक आहे, भिवपाची गरज ना, हे ठीक. पण पाण्याची नासाडी कोणत्याही कारणाने होणे हे ग्राह्य व वैध नाहीच. वाहने धू धू धुणे, परिसर धू धू धुणे हे करताना थोडासा पाण्याच्या काटकसरीचा विचार करायला हवा. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करायला हवा. सरकार, खासगी जलतरण तलावांवर निर्बंध घालण्याबाबत विचार करत आहे. खाणकामाच्या खड्ड्यांमधील पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी तांत्रिक उपाययोजनांचीही पडताळणी करत आहे. परंतु, एका बाजूने घडवणे व दुसऱ्या बाजूने अपव्ययाने बिघडवणे हे योग्य नव्हे. सुजनहो, पाण्याच्या थेंबांसाठी युद्ध होऊ शकते, असा शास्त्रज्ञांचा इशारा आहे. ज्योतिषांचा नव्हे. ∙∙∙

भाजप आमदारांमधील वाढली धास्‍ती!

मतचोरीप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्‍य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत कॉक्रोच जनता पार्टीच्‍या (सीजेपी) गोवा शाखेच्‍या तरुण–तरुणींनीही रविवारी पणजीतील आझाद मैदानावर आंदोलन छेडण्‍याचा प्रयत्‍न केला. हे आंदोलन पोलिस हाणून पाडणार, हे स्‍पष्‍ट असतानाही अमरीन शेख आणि तिच्‍या सहकाऱ्यांनी मागे न हटता याबाबत राज्‍यभरातील तरुणाईत जागृती करण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यामुळे सत्ताधारी भाजपच्‍या अनेक आमदारांमधील धास्‍ती वाढली आहे. विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर सीजेपीच्‍या गोवा शाखेने हे आंदोलन पुढील काळात आणखी ताणले तर तरुणाईची मते फिरू शकतील, या भीतीने अनेकांची झोप उडाल्‍याचे त्‍यांचे कार्यकर्ते खासगीत सांगत आहेत. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: खरी कुजबुज; तवडकरांनी घाई ‘त्‍या’साठी केली?

संयमी जोशुआ...

म्हापशाच्या बोडगेश्वराच्या साक्षीने मंत्री रोहन खंवटे यांनी आमदार ज्योशुआ डिसोझा यांच्यावर उधळलेली स्तुतीसुमने सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. रविवारी मंदिराच्या सुशोभीकरण आणि रोषणाईच्या कामाच्या पायाभरणी कार्यक्रमात खंवटेंनी ज्योशुआंना थेट ''परिपक्व राजकारणी’ ठरवून टाकले. ‘लोक काहीही बोलत राहिले तरी ज्योशुआ शांत राहून समाजासाठी काम करतात; हा संयम त्यांना वडील स्व. बाबूश यांच्याकडूनच वारशाने मिळाला आहे, असा दाखला खंवटेंनी दिला. एका बाजूला म्हापशात कामे ठप्प असल्याचा विरोधकांचा आरोप, तर दुसऱ्या बाजूला खंवटेंनी जाहीरपणे दिलेली ही भक्कम ढाल! विरोधकांच्या टीकेला थेट न भिडता खंवटेंनी ज्योशुआंच्या पाठीवर ठेवलेला हा विश्वासाचा हात म्हणजे म्हापशाच्या राजकारणातील अंतर्गत समीकरणांना मिळालेली नवी कलाटणी मानली जातेय; त्यामुळे येत्या दिवसांत ही राजकीय मैत्री विरोधकांची बोलती बंद करणार की पक्षांतर्गत नव्या हालचालींना खतपाणी घालणार, याचीच चर्चा रंगत आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: खरी कुजबुज; तवडकरांनी घाई ‘त्‍या’साठी केली?

बातमी लीक होतेच कशी?

काँग्रेसची ‘गोवा राखण यात्रा’ सुरू आहे; पण स्थानिक नेत्यांमधील वाद काही संपत नाहीत. त्यात राहुल गांधींच्या गोवा भेटीवरूनही बरेच राजकीय मनोरंजन झाले. यात्रेत परप्रांतीयांचा भरणा जास्त असल्याचे ‘गोमन्तक’ने उजेडात आणताच काँग्रेस नेत्यांचे पित्त भलतेच खवळले. पक्षाच्या मीडिया यादीतून ‘गोमन्तक’च्या वार्ताहरांची नावेच काढून टाकण्यात आली. एवढे करूनही पक्षातील अंतर्गत घडामोडींच्या ब्रेकिंग बातम्या ‘गोमन्तक’मध्येच झळकू लागल्याने वरिष्ठ नेत्यांना आता कोडे पडले आहे. बातम्या फुटतात तरी कुठून? हे प्रकरण गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे आणि डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या कानावर घालण्यात आल्याचे समजते. लवकरच चौकशी समिती नेमली जाणार असल्याचीही चर्चा आहे. आता खरोखरच समिती नेमली, तर तिच्या सदस्यांची नावेही ‘गोमन्तक’च्या ब्रेकिंगमध्ये आधीच झळकली नाहीत, तरच नवल! अशी चर्चा रविवारी कुंकळ्ळीत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये रंगली. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com