Goa Politics: खरी कुजबुज; तवडकरांनी घाई ‘त्‍या’साठी केली?

Khari Kujbuj Political Satire: मंत्रिमंडळातून वगळले जाणे आणि उटा तसेच गोमंतक गौड मराठा समाज संघटनेवर झालेली कारवाई याचा संबंध जोडण्याचा गोविंद गावडे यांनी जोरदार प्रयत्न मंगळवारी केला.
Goa Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

तवडकरांनी घाई ‘त्‍या’साठी केली?

‘एसटी’ समाजाचा विषय विधानसभा सभागृहात आला की, प्रत्‍येकाच्‍या नजरेसमोर दोन नावे झळकतात ती म्हणजे, सभापती रमेश तवडकर आणि आमदार गोविंद गावडे या दोघांची. एसटी समाजाला राज्‍याच्‍या विधानसभेत आरक्षण मिळावे, अशी मागणी या दोन्‍ही नेत्‍यांची होती. हा विषय केंद्राकडे नेण्‍यातही या दोन्‍ही नेत्‍यांनी भूमिका बजावली होती. अखेर गोव्‍यातील एसटी समाजाला विधानसभेत राखीवता मिळण्‍यासंदर्भातील विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर होताच, सभापती तवडकरांनी आपल्‍या कार्यकर्त्यांसह मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांचे पुष्‍पगुच्‍छ देऊन अभिनंदन करीत आभारही मानले. अधिवेशन संपताच मंत्रिमंडळात फेरबदल होतील, असे वक्तव्‍य सोमवारीच दामूंनी केले होते. त्‍यामुळे तर सभापतींनी लगेचच त्‍यांचे अभिनंदन केले नसावे? ∙∙∙

जेव्हा काब्राल बोलतात!

गोव्याच्या राजकीय वर्तुळात सध्या माजी मंत्री आणि विद्यमान आमदार नीलेश काब्राल यांच्या ‘मन की बात’ची चर्चा सुरू आहे. जेव्हा ते मंत्री होते, तेव्हा त्यांचे मौन हे त्यांच्या ‘कार्यक्षम’ मंत्रिपदाची खूण होती. पण मंत्रिपद गेल्यानंतर आणि तेही आता त्यांनी विधानसभेत जे ‘प्रश्न’ विचारले, ते पाहून अनेकांना धक्काच बसला. ‘काब्राल हे आता जनतेच्या प्रश्नांवर बोलतात,’ असे ऐकून लोकांमध्ये वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. नीलेश काब्राल यांना समजले आहे की, पुढील निवडणुकीत त्यांना ‘नारळ’ मिळणार आहे. त्यामुळेच त्यांनी आता ‘जनतेचे नेते’ म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची मोहीम सुरू केली आहे, असेही लोक बोलताहेत. आता ही ‘नाराजी’ खरी आहे की ‘राजकीय खेळी’ आहे, हे तर पुढील निवडणूकच ठरवेल. पण सध्या तरी राज्यात गल्ली-बोळात ‘काब्राल यांची नाराजी’ ही सर्वात ‘मजेशीर’ चर्चेची बाब बनली आहे! ∙∙∙

राजकारणातील ‘पॉवरमॅन’

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांच्याकडे वीज (पॉवर) खाते आहे, परंतु गोव्याची पॉवर (सत्ता) नेमकी कुणाच्या हाती द्यावी, कुणाची ''फ्युज’ कशी उडवायची आणि स्वतः कायम सत्तेत कसे राहायचे याची कला त्यांना अवगत असल्याने गोव्याच्या राजकारणातील ‘पॉवरमॅन’ अशी उपाधी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी त्यांना दिली आहे. कॉंग्रेस असो किंवा भाजप दोन्ही पक्षांशी युती करत ते सत्तेत राहत आले आहेत. कोणत्या पक्षाशी केव्हा युती करायची याचे नेमके ज्ञान त्यांना आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. राज्यातील अनेक प्रादेशिक पक्ष आले आणि गेले परंतु ‘मगो’ला सत्तेत ठेवण्यात ढवळीकरांचा ‘सिंहा’चा वाटा आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही, एवढे नक्की... ∙∙∙

गावडे यांचा त्रागा

मंत्रिमंडळातून वगळले जाणे आणि उटा तसेच गोमंतक गौड मराठा समाज संघटनेवर झालेली कारवाई याचा संबंध जोडण्याचा गोविंद गावडे यांनी जोरदार प्रयत्न मंगळवारी केला. आपल्या शैलीदार संवादात त्यांनी सभागृह दणाणून सोडले. मुख्यमंत्री शांतपणे ते ऐकत होते. गावडे यांना रोखण्याचा प्रयत्न न करून मुख्यमंत्र्यांनी परिपक्वतेचे दर्शन घडवले. गावडे बोलून बसले आणि विरोधकांनी गावडे यांच्या सुरात सूर मिसळला. त्यावेळी आदिवासींसाठी काय केले पाहिजे हे युरी आलेमाव यांनी सांगण्याची गरज नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी लेकी बोले सूने लागे या पद्धतीने उत्तर दिले. कायद्याची लढाई कायद्यानेच लढा, विधानसभेत ती आणू नका असे सांगून मुख्यमंत्र्यांनी कसला इशारा दिला हे विचार करायला लावणारे आहे. ∙∙∙

विजय यांचे शब्द

फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर प्रहार करण्यासाठी आमदार गोविंद गावडे यांच्या लक्षवेधीची शिडी वापरलीच. त्यांनी सरकारची भूमिका ही आदिवासींत फूट पाडणारी नसावी, असे सरदेसाई यांनी सांगताच कोण सुखावले असेल हे सांगण्याची गरज नाही. ‘कामापुरता मामा’ असा शब्दप्रयोग करत भाजपने आदिवासी समाजाला वापरून घेतले या गावडे यांच्या हो मध्ये हो मिळवत सरदेसाई यांनी त्यांना चुचकारले. ‘उटा’ ही संघटना भाजपचा आदिवासी विभाग असल्यासारखी वागत होती, असे सरदेसाई यांनी सांगत कोणाला चिमटा काढला हे मात्र अनेकांना समजलेच नाही. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; तिसरा ‘लाॅटरी जिल्‍हा’ केला तर...?

युरींचा बेरकीपणा

गोविंद गावडे त्वेषाने मंगळवारी भाजप आणि सरकारवर तोंडसुख घेताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव त्यांना मिश्कील नजरेने पाहत होते. युरी बोलण्यास उठले आणि त्यांनी गावडे हे आपण २०१२ साली सांगे मतदारसंघातून निवडणूक लढवत असताना असेच त्वेषाने बोलत होते, याची आठवण करून दिली. त्यामुळे आदिवासींच्या परिस्थितीत फरक न पडल्याचे युरी यांना दाखवून द्यायचे होते हे लपून राहिले नाही. युरींच्या शब्दांमुळे गावडे काहीसे सुखावले असले तरी मुख्यमंत्र्यांच्या रोखठोक भूमिकेमुळे त्यांचा आनंद फारकाळ टिकलेला नसणार हे उघड आहे. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; युरी, विजय गप्‍प बसणार?

चिरेखाणीत गुंतलेल्यांना धास्ती!

धारबांदोडा भागातील बेकायदा चिरे खाण प्रकरण सध्या गाजत आहे. सरकारला अन् नियम, कायदे धाब्यावर बसवून सरकारी अर्थात सार्वजनिक मालमत्तेची लुटमार सुरू असल्याने त्यात कोण कोण गुंतले आहेत याबद्दल उलटसुलट चर्चा होत आहे. अर्थातच यासंबंधी ‘खरी कुजबूज’ याच स्तंभात प्रसिद्ध झाल्याने बऱ्याच जणांचे धाबे दणाणले आहेत. पाहुया काय होते ते अशाच प्रतिक्रिया सध्या उमटत आहेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com