Goa BJP: भाजपची खेळी चालणार का? 'खरी कुजबूज'

Goa BJP: भाजपला सध्या सत्तेची चटक लागलेली असून, राज्यात अन् केंद्रात भाजपची सत्ता आहे.
Goa BJP
Goa BJPDainik Gomantak
Published on
Updated on

Goa BJP: एकदा कोणत्याही वस्तूची व सवयीची चटक लागली, की ती सुटत नाही असे म्हणतात. त्यात सत्तेची चटक तर भयानक असते. सध्या भाजपला सत्तेची सवय लागलेली असून राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आहे. बहुतांश स्वायत्त संस्थांवरही भाजपचीच सत्ता आहे.

असे असतानाही प्रत्येक पंचायतीवर व नगरपालिकेवर भाजप समर्थकांचीच सत्ता असायला हवी अशी भाजपाची चटक. आता कुंकळ्ळी नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविण्याचे प्रयत्न भाजपाने चालविले आहेत. भाजप समर्थकांनी नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे.

Goa BJP
Goa Municipality: कचरा संकलन कंत्राटदारास 2 महिन्यांची मुदतवाढ

भाजपचे पाचच नगरसेवक निवडून आले होते. दोन नगरसेवकांना आपल्या बाजूने ओढण्यात भाजपला यश आले आहे. आता भाजप आपल्या प्रयत्नात यशस्वी होतो की युरी आलेमाव विदेशात गेलेला आपला हुकमाचा एक्का असलेल्या नगरसेवकाला परत आणून आपला दम दाखवितात हे पाहावे लागणार आहे. तूर्त लक्ष्मणचे प्रेशर वाढविण्यास भाजप समर्थक नगरसेवक यशस्वी ठरले आहेत हे मात्र नक्की.

प्रशासकीय मंजुरी म्हणजे काय हो भाऊ?

राज्यात परतीचा पाऊस सुरू झाला आहे. वेळी अवेळी तो पडत आहे, त्याच्याच जोडीला कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचाही पाऊस सुरू झाला आहे. ही सर्वच कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याच्या आदेशाची पत्रे समाज माध्यमांवर फिरत आहेत.

कॅसिनोतील चक्राप्रमाणे हे कोटी रुपयांची विकासकामे फिरू लागली. हे चक्र ज्या ठिकाणी थांबेल ते विकासकाम विजयी होईल. मात्र, सामान्य नागरिकाला अद्याप विकासकामांना प्रशासकीय मंजुरी म्हणजे काय हे कोडे पडले आहे. त्यामुळे राजकीय बुजूर्गांना तो विचारत सुटला आहे.

Goa BJP
Goa kala Academy: कला अकादमी नूतनीकरणाचे काम डिसेंबरपर्यंत होणार पूर्ण

प्रशासकीय मंजुरी म्हणजे काय हो भाऊ? कारण त्याच्या गाठीला मागील काही वर्षांचा अनुभव आहे. प्रशासकीय मंजुरी मिळून शेवटपर्यंत विकासकामे झालीच नाहीत याची धास्ती त्याला आहे. औट घटकेचा आनंद त्याला नको आहे असेच त्याचे मनोगत आहे.

पंचायतमंत्र्यांची हुलकावणी, वीजमंत्र्यांचा शॉक

पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी तीनवेळा ‘मंत्री तुमच्या दारी’ योजनेंतर्गत आज येणार उद्या येणार म्हणून हुलकावणी दिली. आता वीजमंत्री सुदिन ढवळीकर शनिवारी काणकोणचा दौरा करणार असल्याचे जाहीर झाले आहे. ते आले तर काणकोणवासीयांना शॉक आणि नाही आले तरी शॉक. त्याला कारणही तसेच आहे.

मंत्री ढवळीकर यांनी अंत्रुज महालातून नरकासुरांना देणग्या देऊ नका असा फतवा काढल्यापासून राज्यभरातील नरकासुर तयार करणारी मंडळे त्यांच्यापासून दबकूनच वागत आहेत. आता शनिवारी ते काणकोणात येत असल्याने काणकोणमधील नरकासुर करणाऱ्यांनी धसका घेतला आहे, देणगी नको पण यांना आवरा असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

Goa BJP
Goa Government: नियमांची अंमलबजावणी मंत्र्यांपासूनच सुरु व्हावी!

मंत्र्यांचा 'मेलजोल'

बेतोडा येथील एका कार्यक्रमात वीजमंत्री सुदिन ढवळीकर आणि जलस्त्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर एकाच व्यासपीठावर दिसले. सहसा असे चित्र कधी दिसत नाही, पण दोघांतही कार्यक्रमादरम्यान छान ‘मेलजोल’ दिसला.

राज्याच्या विकासासाठी दोन्ही मंत्र्यांनी ग्वाहीही दिली. त्यामुळे सुदिनराव आणि सुभाषराव यांच्यातील एकसंधतेमुळे फोंड्याबरोबरच गोव्याचाही सर्वांगीण विकास शक्य असल्याच्या प्रतिक्रिया बेतोड्यातील या कार्यक्रमादरम्यान मात्र उमटल्या.

ढवळीकरांचे लॉजिक काय?

अंत्रुज महालातील नेते विविध वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. मागे कृषिमंत्री रवी नाईक यांनी गोव्यात छोटे छोटे बंधारे उभारून त्याचे पाणी परदेशात पाठवता येईल असा तर्क बांधला होता. आता वीजमंत्री ढवळीकरांनी खाणीच्या खंदकांमधील पाण्यावर वीज निर्मिती करण्याचा गजब प्रस्ताव आणला आहे.

Goa BJP
Indian Super League: एफसी गोवाच्या विजयाचा शिल्पकार ठरला नोह सादौई!

खरंतर वीज निर्मितीसाठी उंचावरील पाणीसाठे अपेक्षित असतात. गोव्यातील खाणी या शेकडो मीटर खोल आहेत आणि त्यातून वीजनिर्मिती करणे हे व्यावहारिक आणि आर्थिकदृष्ट्या अवघड आहे, पण ढवळीकर ते करणार आहेत. यामागे त्यांचे नक्की लॉजिक काय आहे? हे त्यांनाच माहिती. तज्ज्ञ मात्र हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही असे म्हणतात. बघूया आता ढवळीकरांच्या विजेचा प्रकाश किती पडतोय ते.

अखेर त्याच्या हाती नारळ!

‘धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय, माली सीचे सौ घडा, ऋतू आये फल होय’ असे संत कबीरदासांचे एक सत्य वचन आहे. मात्र, काही लोकांना घाई घाईने पुढे पळण्याची सवय. परिणामी पळणारे घसरतात. कुंकळ्ळी नगरपालिकेचे एक नगरसेवक युरी आलेमाव यांच्या पाठिंब्यावर निवडून आले होते. काही दिवसातच या युवा नगरसेवकाने युरींना सोडले व विजय यांच्या गोवा फॉरवर्डचा नारळ हातात धरला.

विजयनी या युवा नगरसेवकाला विद्यार्थी शाखेचा अध्यक्षही बनविले. मात्र, या नगरसेवकाने आपली ‘मन की बात’ ऐकली नाही म्हणून त्याला गोवा फॉरवर्डमधून काढून टाकले व त्या युवा नगरसेवकाच्या हातात नारळ दिला. जो जितक्या वेगाने वर जातो तितक्याच गतीने खाली येतो हा शास्त्राचा सिद्धांत त्या युवा नगरसेवकाला माहीत असायला हवा होता अशीच लोक आता चर्चा करत आहेत.

Goa BJP
Goa Taxi: दाबोळी विमानतळावर टॅक्सी चालकांची काउंटरची मागणी अमान्य; राज्य सरकारची भूमिका

मंत्र्यांच्या अफलातून युक्त्या!

राज्यात पाऊस पडत असताना अनेक भागात पाण्यासाठी लोक आंदोलन करत आहेत. पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठीही पाणी मिळणे मुश्कील होत आहे, अशावेळी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी खाणपट्ट्यातील खंदकातील पाण्यावर वीज निर्मिती करण्याची युक्ती शोधून काढली आहे.

राज्याला वीजपुरवठा कमी होत असल्याने त्यांनी ही युक्ती मांडली असावी. त्यांच्या या युक्तीवर राज्यभरात चर्चा होऊ लागली आहे. यापूर्वी चतुरस्र मंत्री रवी नाईक यांनीही गोव्यात असलेले पाणी आखाती देशात विकून त्याच्या बदल्यात इंधन गोव्यात आयात करण्याची युक्ती बोलून दाखविली होती.

भाजपमध्ये आयात केलेले हे राजकारणी खूपच तज्ज्ञ असल्याचे त्यांनी तोडलेल्या अकलेच्या तारेवरून दिसून येत आहे अशी चर्चा गोव्यातही सुरू आहे. हे मंत्री राज्याच्या हिताचा विचार करतात की ते स्वार्थ साधण्याचा यातून प्रयत्न करतात हा एक प्रश्‍नच आहे. भाजप सरकारमधील मंत्र्यांकडून अनेक अफलातून योजना पुढे येत आहेत. मात्र, त्यांना सरकारकडून हिरवा कंदील मिळत नाही हे त्या मंत्र्यांचे दुर्दैव.

Goa BJP
Intercollegiate Men's Football Tournament: फादर आग्नेल, झेवियर्स, रोझरी उपांत्यपूर्व फेरीत

यंदा नाही पोहे, नाही पोटल्या!

दिवाळी सण सुरू झाला, पण अद्याप कोणीही समाज कार्यकर्ते, राजकीय पुढारी पुढे येऊन गूळ पोहे वाटल्याचे ऐकीवात नाही. चतुर्थी सणही तसाच गेला. केवळ निवडणूक जवळ आली की जो तो आपण समाज कार्यकर्ता असल्याचे बिरुद लावून सणाला गूळ पोहे आणि मिठाईच्या पोटल्या आपल्या कार्यकर्त्यांकरवी वितरण करीत होते, पण यंदा निवडणूक जवळ नसल्याने कोणीही पुढे आले नाही.

लोकांनाही अशी फुकटची सवय झाली आहे. निवडणूक जवळ असल्याचे पाहून गरिबांची दया आल्याचे भासवून दान देणाऱ्यांनी निवडणुकीपुरती समाजसेवा न करता प्रामाणिकपणे समाजसेवा केली, तर जनता कधीच विसरत नाही, पण बेगडी समाजसेवा केली तर जनता मुळीच थारा देत नाही हेही तितकेच खरे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com