

काँग्रेसला जडला ‘एसएमएस’ रोग!
युरी आलेमाव यांनी विजय सरदेसाई यांना ‘व्हॉट्स ॲप’वरून ‘एसएमएस’ पाठविल्यामुळे झालेल्या वादानंतर दोन्ही पक्षांची युतीची बोलणीही स्थगित झालेली असताना पुन्हा एकदा नवे ‘एसएमएस’ कांड झाले असून त्यामुळे आता गिरीश चोडणकर आणि अमित पाटकर यांच्यात वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल काँग्रेस पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीची कासावली येथे बैठक झाली. त्या बैठकीचे आमंत्रण आपल्याला पाठविलेच नाही, असा दावा पाटकर यांनी केला आहे. त्यावर उत्तर देताना चोडणकर यांनी पाटकर यांना एम.के. शेख यांनी ‘एसएमएस’ पाठविला होता, असे उत्तर दिले आहे; पण हा सगळा घोळ पाहता काँग्रेस पक्षाला ‘एसएमएस’ रोग तर जडला नाही, असा प्रश्न पडतो. मुळात काँग्रेसमध्ये आहेत मूठभर पदाधिकारी. त्यांच्याकडे संपर्क साधण्यासाठी ‘एसएमएस’ करण्याची गरज आहे का?
फोंड्यावर नजरा!
येणारे वर्ष हे निवडणुकीचे आहे. त्यामुळे जनतेच्या अधिकाधिक जवळ जाण्याची तयारी प्रत्येक लोकप्रतिनिधीने ठेवली आहे. फोंडा तालुक्यावर तर अनेकांच्या नजरा आहेत, त्यामुळे विद्यमान आमदारांकडून अनेक योजना आणि क्लृप्त्या आखल्या जात आहेत. सुदिन ढवळीकर यांनी आपले चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यालय फोंड्यात सुरू केल्यानंतर आता सुभाष शिरोडकर यांनी दर मंगळवारी फोंड्यात जनता दरबार भरण्याचे जाहीर केले आणि पहिलाच जनता दरबार यशस्वी झाला. फोंड्याला सध्या आमदार नाही, त्यामुळे फोंड्यावर अनेकांनी दावा केला आहे आणि सामाजिक कार्येही सुरू केली आहेत. या भाऊगर्दीत आता आमदारांचे हे उपक्रम म्हणजे फोंडेकरांना ‘सोने पे सुहागा’ नाही का? निवडणूक होईल तेव्हा होईल; पण आपली कामे मात्र साध्य करून घ्या, असाच संदेश राजकारण्यांचे निकटवर्तीय फोंडेकरांना देऊ लागले आहेत.
बोलक्या शुभेच्छा!
सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर हे सध्या पेडणे मतदारसंघात आमदार होण्यासाठी काम करत आहेत. ते सध्या कोणत्याही पक्षात नाहीत. ते विधानसभा निवडणूक लढवणार हे ठरून गेलेले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी बी.एल. संतोष यांची नियुक्ती आणि केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा त्यांनी दिल्या. तसे व्हॉट्सॲप स्टेटस त्यांनी मंगळवारी ठेवल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. पेडण्यात भाजपसाठी आणखीन एक उमेदवार सापडल्याचे त्यामुळे बोलले जाऊ लागले आहे. आमदार प्रवीण आर्लेकर यांना भाजप उमेदवारी देणार नाही, असे काल-परवापर्यंत खात्रिपूर्वक सांगणाऱ्यांना चघळण्यासाठी आणखीन एक विषय मात्र मिळाला आहे.
सावईकरांना ‘राग’ येतो तेव्हा..!
माजी खासदार तथा विद्यमान अनिवासी भारतीय आयुक्त ॲड. नरेंद्र सावईकर यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य तसे वाखाणण्यासारखे आहे. आपले काम बरे की आपण बरे, ही त्यांची वृत्ती. नरेंद्ररावांनी कुणाशी नाहक कधी पंगा घेतल्याचे ऐकिवात नाही. मात्र, ज्याच्याशी घेतला त्याला सोडले नसल्याचेही अनेकांना ठाऊक आहे. अलीकडचेच उदाहरण घ्या, पणजीतील आझाद मैदानावर एका सामाजिक कार्यकर्त्याने त्यांच्यावर नाहक आरोप केले. आता हे आरोप म्हणजे बाळ्ळीतील आंदोलनाला नरेंद्र सावईकरांनी फूस लावली असे. मग सावईकर गप्प कसे बसतील? त्यांनी थेट पोलिसांतच ‘त्या’ सामाजिक कार्यकर्त्याविरोधात तक्रार नोंदवली. लोकांची दिशाभूल करणारा हा आरोप असून आपण कशी काय फूस लावली, असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला. दोन दिवसांपूर्वी ‘वंदे मातरम्’च्या वेळेला काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत जो घोळ घातला त्याचीही तक्रार सावईकर यांनी पोलिसांत केली आहे. पुढे काय होईल ते होऊ दे; पण आता ‘वंदे मातरम्’च्या वेळची ही आगळीक मात्र चर्चेचा विषय बनला आहे, हे मात्र खरे.
कारागृहात घडते काय?
तुरुंग म्हणजे कडक सुरक्षा, सततचा बंदोबस्त आणि प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणारी यंत्रणा, अशी सर्वसामान्यांची धारणा असते. मात्र, ज्या ठिकाणी बाहेरील व्यक्तीला सहज प्रवेश मिळत नाही, त्याच ठिकाणी एखाद्या सुरक्षा कर्मचाऱ्याकडेच अमलीपदार्थ आढळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर काहीजण मिश्कीलपणे म्हणू लागले आहेत की, कारागृहात नेमके घडते काय? इतक्या कडक सुरक्षेतही अमलीपदार्थ आतपर्यंत पोहोचतातच कसे? काहींनी तर थेट पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे सध्या राज्यात कारागृहातील सुरक्षा भक्कम आहे की कुणाच्या तरी कृपेवर चालते? अशी चर्चा रंगू लागली आहे.
त्या शिक्षकांवर अन्याय करू नका!
‘तोंडात आलेला घास हिरावून घेणे’ याचा अर्थ सरकारी प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळता मिळता हुकलेल्या काही शिक्षकांना चांगलाच कळाला असणार. राज्य सरकारने सरकारी प्राथमिक शिक्षकांची भरती करण्यासाठी गोवा कर्मचारी आयोगामार्फत परीक्षा घेतली होती. यातील बऱ्याच शिक्षकांना सरकारने नियुक्ती पत्रे बहाल केली. मात्र, काही शिक्षक गुणवत्ता यादीत असूनही त्यांना नोकरीचे नियुक्ती पत्र दिलेले नाही. कारण काय तर यातील काही शिक्षकांना दोन वर्षांचा अनुभव नाही. सरकारी नोकरीपासून वंचित राहिलेल्या या प्राथमिक शिक्षकांपैकी बऱ्याच शिक्षकांकडे महाराष्ट्रातील शाळेचा अनुभव आहे. मात्र, शिक्षण खात्याला गोव्यातील शाळेचाच अनुभव हवा आहे. आता महाराष्ट्र राज्याच्या शाळेत शिकविलेला अनुभव का स्वीकारण्यात येत नाही? आपल्या विद्यापीठात जर बाहेरील राज्यात शिकलेल्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळते, तर या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनी काय घोडे मारले आहे. त्यांना नोकरी का दिली जात नाही? अशी चर्चा सुरू आहे.
खोटे कोण बोलतात?
गोव्यातील कॉंग्रेस नेत्यांना नेमके काय हवे? एका बाजूने भाजपला पराभूत करण्याची भाषा बोलतात, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांकडील युतीबद्दल काहीही बोलण्यात त्यांना रस नसल्याचे दिसून येते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोव्यात दाखल झाले. आता कदाचित युतीच्या बोलणीला गती मिळू शकते; पण त्याचबरोबर पक्षातील नेत्यांमधील संपर्क योग्यप्रकारे होताना दिसत नाही. नेमके व्हॉट्स ॲप संदेश, फोन कॉल्स त्यांना दगा देतात, असे दिसून येते. संदेश मिळत नसल्याच्या तक्रारी होत आहेत; पण खरे-खोटे कोण? संदेश पाठवणारे का ज्यांना संदेश पाठवला ते? हेच कळेनासे झाले आहे. युरी आलेमाव-विजय सरदेसाईंमधील प्रकरण संपले, तोच गिरीश चोडणकर व अमित पाटकर यांच्यामधील संपर्कातील त्रुटीबद्दल चर्चा सुरू झाली. गिरीशबाब म्हणतात, बैठकीला आमंत्रण पाठविले. अमितबाब म्हणतात आमंत्रण मिळालेले नाही. आता खरे कोण बोलतात, याबद्दल कार्यकर्ते व जनतेमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
आत्मविश्वास जिंकेल की बंडखोरी?
शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी माध्यमांसमोर विकासाचा पाढा वाचत, गेल्या साडेचार वर्षांत आपण केलेली कामे पाहून भाजपच्या तिकिटावर माझाच हक्क असून रिंगणात दुसरा कुणी दावेदार असण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगितले. नंतर भाजप ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ असल्याचा दाखला देत शेवटी निर्णय पक्षाचाच, अशी मखलाशीही त्यांनी केली; पण खरा राजकीय ट्विस्ट पुढे आहे. तिकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी थेट बंडाचा नारळ फोडण्याची तयारी दाखवत इशारा दिला आहे की, पक्षाने तिकीट दिले नाही, तर मी अपक्ष म्हणूनच शड्डू ठोकणार. त्यानंतर मी कुठेही जाण्यास मोकळा. सध्या आमदार मॅडमना वाटते रस्ता पूर्ण मोकळा आहे; पण मांद्रेकरांनी वाटेतच अपक्षाचा मोठा गतिरोधक उभा केला आहे. आता पक्षाची शिस्त चालणार की मांद्रेकरांचे बंड, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल; कारण शिवोलीच्या राजकीय आखाड्यात कोण कोणाला धोबीपछाड देणार, याचा फैसला आता थेट मतदारांच्याच दरबारात होणार असेच दिसते!
काँग्रेसचा प्रवास!
काहीही करून सत्ता हासील करण्याची काँग्रेसची धडपड आहे. मात्र, पक्षातील आंतरिक मतभेद आणि मनभेद पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचू देणार की नाहीत? हा खरा प्रश्न आहे. वर्षभरापूर्वी काँग्रेसने ‘आप’ सोडून सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांचा हातात हात धरून ग्रॅण्ड ओपोजिशन अलायन्स (गोवा)ची घोषणा केली होती. युरी आलेमाव, विजय सरदेसाई, मनोज परब यांनी हातात हात धरून भाजपला पराभूत करण्याची शपथ घेतली होती. त्यानंतर कुठे माशी शिंकली माहीत नाही. ‘आरजी’ने युद्धापूर्वीच नांगी टाकली. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षात मानापमानाचे नाटक रंगले. आता काँग्रेसने ग्रॅण्ड ओपोजिशन अलायन्स खुंटीला टांगून ‘एकवट’चे कार्ड बाहेर काढले. आता ‘एकवट’ याचा अर्थ ‘एकी’ की ‘एक वोट’ म्हणजे ‘एक मत काँग्रेस’ला असा होतो, हे मात्र माहीत नाही. आता बघूया हा ‘एकवट’ किती दिवस टिकतो.
न्यायालयानेच कान उपटल्यावर...
मंगळवारी तर चक्क न्यायालयानेदेखील पोलिसांच्या एकंदरीत वृत्तीवर आणि कामाच्या पद्धतीवर ताशेरे ओढले. तक्रार दाखल झाल्यानंतरही अपेक्षित कारवाई होत नसल्याची नोंद न्यायालयाने घेतली आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. मग काय, गावाच्या चौकात चर्चांना उधाण आले. लोक म्हणू लागले, न्यायालयालाच जर पोलिसांना जागे करण्याची वेळ आली असेल, तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे पाहायचे? काहींच्या मते, काही प्रकरणांच्या फाईल्सचा वेग कासवापेक्षाही कमी झाला आहे. तर काहीजण मिश्कीलपणे म्हणू लागले, पोलिसांवर कोणाचा तरी अदृश्य हात आहे की काय? त्यामुळे कार्यक्षम यंत्रणेलाही ब्रेक लागल्याची चर्चा सध्या कानोकानी ऐकू येत आहे.
पुन्हा जनता दरबार
राज्यभरातील जनतेचे विविध प्रश्न, समस्या ऐकून घेऊन त्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही वर्षांपूर्वी प्रत्येक मंत्र्याला तालुके वाटून दिलेले होते. आठवड्यातून एकदा संबंधित मंत्र्याने दिलेल्या तालुक्यात जाऊन जनता दरबार आयोजित करावा. त्यात लोकांचे प्रश्न समजून घ्यावे आणि ते सोडवण्याचे प्रयत्न करावेत, असा यामागे हेतू होता. परंतु ‘नव्याचे नऊ दिवस’ म्हणतात त्याप्रमाणे मंत्र्यांनी काहीच दिवस असे दरबार आयोजित केले आणि त्यानंतर त्यांनी त्याकडे पाठ फिरविली. काहीजणांना तर आपल्याला कुठला तालुका मिळाला होता, हेच माहीत नसेल. आता काही मंत्र्यांनी पुन्हा एकदा अशा जनता दरबारांचे आयोजन करण्यास सुरवात केली आहे; पण हे दरबार लोकांच्या प्रश्नांसाठी नसून, केवळ विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठीच घेतले जात आहेत, हे कळायला गोमंतकीय जनता नक्कीच अशिक्षित नाही.
दिल्लीशिवाय निर्णय नाही!
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले. मंगळवारी त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस आघाडीविषयी त्यांनी जे विधान केले, त्यावरून प्रदेश काँग्रेस समितीचे काम फक्त चर्चा आणि बैठका करण्याचेच आहे, असे दिसते. कोणत्या पक्षाशी युती करायची किंवा युती करायची नाही, हा निर्णय अंतिमतः दिल्लीतील हायकमांडच घेणार आहे. स्थानिक पातळीवर काँग्रेसने राज्यासाठी प्रभारी-सहप्रभारी दिले आहेत. त्याशिवाय कार्याध्यक्ष, प्रचारप्रमुख वगैरेंची नियुक्ती केलेली असताना युतीचा निर्णय जर दिल्लीत होणार असेल तर येत्या काळात येथील नेत्यांनी ‘उठाबशा’च काढायच्या, हे आता या नेत्यांच्या पक्के लक्षात आले असेलच. त्यामुळे आमदार विजय सरदेसाई जे सांगतात की, दिल्लीत निर्णय घेणारे नकोत, स्थानिक पातळीवर निर्णय घेणारे हवेत, ते उगाच नाही, अशी म्हणायची वेळ काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांवर आली आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
होर्डिंग्सचा धंदा, सुरक्षेचा वांदा!
शहराच्या सौंदर्याला जाहिरातींचा मुलामा देताना नागरिकांच्या सुरक्षेचा मात्र बळी दिला जातोय. जिथे साधे बांधकामही नियमांच्या कचाट्यात अडकते, तिथे भलेमोठे होर्डिंग्स मात्र दिमाखात उभे राहतात. मंगळवारी वास्कोत एक होर्डिंग्स कोसळले. उद्या कुणाच्या डोक्यावर पडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? जाहिरातींचा महसूल ऑनलाइन माध्यमांकडे वळवण्याऐवजी धोकादायक फलकांवरच का उधळला जातो? सार्वजनिक सुरक्षिततेला किंमत नसते, हे किमान होर्डिंग्सवाल्यांनी आणि त्यांना परवानगी देणाऱ्यांनी तरी लक्षात ठेवावे. धंदा करा; पण जीवाशी खेळून नव्हे!
राहुल गोव्यात येणार?
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची सभा सोमवारी वेर्णा येथे पार पडली. या सभेला अपेक्षेपेक्षा अधिक गोमंतकीयांनी उपस्थिती लावली. परंतु, त्यात तरुणाईची संख्या कमी दिसत होती. कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील जंतर-मंतरवरील यशस्वी आंदोलनानंतर गोव्यासह देशभरातील तरुणाई भाजपविरोधात गेल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्याचाच फायदा येत्या विधानसभा निवडणुकीत करून घेण्याचे नियोजन प्रदेश काँग्रेसने आखले आहे. अशा स्थितीत ज्येष्ठ नेते राहुल गांधीच तरुणाईची मने जिंकू शकतात, याची खात्री असल्याने प्रदेश काँग्रेसने राहुल गांधींना लवकरात लवकर गोव्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा कार्यकर्त्यांत आहे.
केल्याने होत आहे रे...
प्रचंड आर्थिक प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सत्तरी तालुक्यातील भुईपाल येथील मयुरी लक्ष्मीकांत नाईक हिने राज्यातील मुलींना एक प्रेरणा दिली आहे. गोवा लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन मयुरी मामलेदार झाली आहे. पालकांचे पाठबळ, मित्रांचे सहकार्य, अभ्यासातील सातत्य, जिद्द, चिकाटी यासह मयुरीने बाजी मारली. स्पर्धा-परीक्षांचा अभ्यास मयुरीने स्वबळावर, विना कोचिंग केला, यासाठी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मामलेदार म्हणून सेवारत असताना गरीबांची सेवा करायला आपणाला आवडेल, असे ती सांगते. मयुरी ही युवतींसाठी रोल मॉडेल ठरावी. गोव्यातील विद्यार्थी मेहनत घेऊन स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत नाहीत, असा कंठशोष एका बाजूने सुरू आहे. इतक्यात दुर्गम गावातील मयुरीने सर्व अडथळे ओलांडून विजय मिळवला. राजवाडेंचे वाक्य आहे - मनुष्य कष्टाने मरत नाही, आळसाने मरतो.
रुद्रेश्वरचरणी काँग्रेसची पूजा
भंडारी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री देव रुद्रेश्वराच्या श्रावणी सोमवार सोहळ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यजमानपद स्वीकारणार असल्याने या धार्मिक कार्यक्रमाला राजकीय चर्चेची फोडणी मिळाली आहे. विशेषतः २०२७ची विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून विविध समाजघटकांशी संपर्क वाढविण्याचे राजकीय प्रयत्न सुरू असताना चोडणकरांची रुद्रेश्वराच्या चरणी उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. हा निव्वळ श्रद्धेचा भाग की समाजाशी नव्याने जवळीक साधण्याचा राजकीय संकेत, याची चर्चा आता रंगू लागली आहे. देवाच्या दरबारात राजकारण नसते, असे म्हटले जाते. मात्र, राजकारणाच्या मैदानात देवस्थानांच्या निमित्ताने होणाऱ्या हालचालींकडे राजकीय चष्म्यातून पाहिले जाणे साहजिकच आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.