मडगाव: गोवा (Goa) कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांना पुढे चाल मिळाल्यामुळे भाजपाच्या विरोधात कॉंग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि गोवा फॉरवर्ड (Goa Forward) या पक्षांची युती (Alliance) होण्याची शक्यता पुन्हा एकदा धुसर बनली आहे. चोडणकर यांनी नेहमीच गोवा फॉरवर्डला दूर ठेवण्याचेच राजकारण केले असल्यामुळे आता युती होण्याची संभावना केवळ कॉंग्रेसच्या निरिक्षकांच्या अनुकुलतेवर अवलंबून असेल. तिन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची तयारी चालवली असून गोवा फॉरवर्डने उत्तर गोव्यातील अनेक मतदारसंघात चाचपणीला आरंभही केला आहे.
कॉंग्रेस पक्षातील ताज्या फेररचनेचा युतीच्या शक्यतेवर प्रभाव पडेल का, असा प्रश्न गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना विचारल्यावर ते म्हणाले, कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण असावे, हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. भाजपाविरोधात समविचारींची युती हवी की नको याचा निर्णय मात्र त्यांना लवकरच घ्यावा लागेल. मतांचे विभाजन होऊन त्याचा लाभ भाजपाला मिळू नये, अशी गोवा फॉरवर्डची इच्छा असून त्यासाठीच आम्ही कॉंग्रेसकडे युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. कॉंग्रेसला युतींत स्वरस्य नसेल तर आमच्यापुरता निर्णय घेण्याची मोकळिक आम्हाला असेल.
गिरीश चोडणकर यांनी गोवा फॉरवर्डला असलेला आपला विरोध नेहमीच स्पष्टपणे व्यक्त केला आहे. हल्लीच एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यानी सांत आंद्रे या कॉंग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघावर दावा करण्याच्या गोवा फॉरवर्डच्या प्रयत्नांची निंदा केली व त्या पक्षाच्या विस्ताराला आपला आक्षेप असल्याचेच स्पष्ट केले. कॉंग्रेसचे उमेदवार विजयी होत असलेल्या मतदारसंघांवर दावा करण्याच्या गोवा फॉरवर्डच्या राजकारणाचा हेतू वेगळाच असल्याचे ते म्हणाले. गोवा फॉरवर्डचे अन्य मतदारसंघावरले दावेही चोडणकर यांच्या पचनी पडणारे नसल्याचे दिसते.
दरम्यान, काँग्रेस पक्षाशी युती न झाल्यास किमान १५ ते २० ठिकाणी गोवा फॉरवर्ड आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसही तेवढ्याच जागा लढवू शकते, असे संकेत याआधी पक्षाचे चर्चिल आलेमाव यांनी दिले होते. आम आदमी पक्ष चाळीसही मतदारसंघांत आपले उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भाजपविरोधी मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे.
पल्लम राजू आज गोव्याच्या दौऱ्यावर...
कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींद्वारे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी गोव्यातील कॉंग्रेसची जबाबदारी दाक्षिणात्य नेत्यांवर सोपविण्यात येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. कारण गोवा कॉंग्रेसचे निवडणूक निरीक्षक म्हणून पी. चिदंबरम तसेच गोवा प्रभारी म्हणून दिनेश गुंडू राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मानव संसाधन मंत्री व कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते पल्लम राजू हे हेसुद्धा दक्षिणात्य नेते आहेत. ते उद्या गोव्यात दोन दिवसांच्या भेटीवर येत आहेत. गोव्यात पोचल्यानंतर ते वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांसोबत येत्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करतील. त्यानंतर संध्याकाळी पत्रकार परिषद घेतील. १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पणजी येथील गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात गोवा प्रदेश समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे गोव्यात येऊन जाताच कॉंग्रेसनेही आपल्या वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांना गोव्यात पाठवणे सुरू केले आहे. दोन दिवसांपूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम हे गोव्यात आले होते.
निर्णय घेण्यास मोकळे
मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा भाजपला मिळू नये ही आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही काँग्रेससमोर युतीचा प्रस्ताव ठेवला होता. युती होत नसल्यास आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे आहोत.
- विजय सरदेसाई,
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष
आमचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी ४० मतदारसंघात लढण्यासाठी सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे. त्याची पूर्वतयारी आम्ही सुरु केली आहे. त्यांच्या या आदेशाचा अर्थ आम्ही स्वतंत्रपणे लढण्याची तयारी ठेवावी असाच निघतो.
- गिरीश चोडणकर, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष
भाजपाचेही अस्पष्ट; आजवर विषय टाळला
कॉंंग्रेस व समविचारी पक्षांची आघाडी होण्याची शक्यता धुसर बनली असतानाच भाजप व मगोच्या युतीविषयीही स्पष्ट काहीच समजून येत नाही. भाजपनेही युतीची चर्चा करण्याची वेळ अद्याप आलेली नाही, असे सांगत हा विषय आजवर टाळला आहे. आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निमंत्रणावरून मगोचे नेते दिल्लीला जाणार होते तोही दौरा होताना दिसत नाही. त्यामुळे सध्या राजकीय तंबू अनिश्चितेच्या फेऱ्यात आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.