
पणजी: क्राईम ब्रँचने काल (१४ एप्रिल) रात्री चिकोळणा - मुरगाव येथे केलेल्या मोठ्या कारवाईत तब्बल ४.३२५ किलोग्रॅम कोकेन जप्त करत एका दाम्पत्यासह तिघा स्थानिकांना अटक केली. जप्त केलेल्या कोकेनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ४३.२० कोटी आहे. या प्रकरणातील संशयित रेश्मा वाडेकर ही मुख्य सूत्रधार असून ती थायलंडला जाऊन आली आहे.
अमली पदार्थांविरोधात ही राज्यातील आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे. रेश्मा वाडेकर हिचे आंतरराज्य ड्रग्स माफियाच्या रॅकेटशी कनेक्शन असल्याचा संशय आहे. गोव्यातील (Goa) संगीत नृत्यरजनी, मोठ्या पार्ट्यां तसेच हॉटेलमध्ये अमली पदार्थ पुरवण्यामध्ये तिचा हात असल्याचा पोलिसांचा कयास आहे. क्राईम ब्रँच पोलिसांनी केलेल्या कारवाईवेळी अटक केलेल्यांमध्ये निबू विन्सेंट ऊर्फ विल्सन (४५, बायणा - वास्को) तसेच रेश्मा मंगेश वाडेकर आणि मंगेश जयवंत वाडेकर (सडा - वास्को) या दाम्पत्याचा समावेश आहे.
जप्त केलेले कोकेन रेश्मा हिला गोव्याबाहेरून आणून देण्यात आले होते, असे प्रथमदर्शनी चौकशीत आढळून आले आहे. निबू आणि मंगेश हे ग्राहकांच्या मागणीनुसार ड्रग्सची विक्री करत होते.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, निबू हा काल रात्री चिकोळणा येथे ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्या परिसरात साध्या वेशात पोलिसांनी सापळा रचला होता. रात्री दीडच्या सुमारास एक इसम संशयास्पदरित्या घुटमळत असल्याचे दिसताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडील पिशवीची झडती घेतली असता पांढऱ्या रंगाची पावडर सापडली. हे कोकेन चॉकलेट्स तसेच कॉफीच्या ३२ पॅकेट्समध्ये सील केले होते. त्याची चाचणी केली असता ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. त्याची अधिक चौकशी केली असता या प्रकरणामध्ये सडा - वास्को येथील एक जोडपे गुंतल्याचे समोर आले. पोलिसांनी अत्याधुनिक यंत्रणेच्या मदतीने पहाटे वाडेकर जोडप्याला अटक केली. न्यायालयाने (Court) या तिघांनाही ६ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
संशयितांकडे सापडलेले कोकेन कोठून आणले, संशयित रेश्मा हिला ते गोव्यात कोणी आणून दिले, की ती गोव्याबाहेर आणण्यासाठी गेली होती, याचा शोध घेणे सध्या सुरू आहे. हे ड्रग्स कोणाला विक्री करण्यासाठी संशयित आला होता, याचीही माहिती शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रशल देसाई, निरीक्षक लक्षी आमोणकर, उपनिरीक्षक प्रगती नाईक तसेच इतर पोलिसांचा समावेश असलेल्या पथकाने ही शिताफीने कारवाई केली.
गेल्या महिन्यात क्राईम ब्रँचने आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांचा पर्दाफाश करताना ११ किलो हायड्रोपोनिक वीड (गांजा) जप्त केला, तसेच बंगळुरूच्या एका २३ वर्षीय तरुणाला अटक केली होती. या ड्रग्सची किंमत सुमारे ११.६ कोटी होती. त्याने हा गांजा नेपाळमधून भारतात आणला होता. कालच्या कारवाईपूर्वी गोव्यात सापडलेले हे सर्वाधिक ड्रग्स होते.
या ड्रग्स प्रकरणात रेश्मा वाडेकर ही मुख्य सूत्रधार आहे. तत्पूर्वी तिला वेश्या व्यवसायप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती व ती काही काळ कोलवाळ तुरुंगात होती. ती एकदा थायलंडला जाऊन आली आहे. त्यामुळे ती ड्रग्स माफियांच्या संपर्कात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिघाही संशयितांच्या घराची झडती घेतली जाणार आहे, अशी माहिती अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
गेल्या वर्षी गोव्यात विविध प्रकारचे मिळून सुमारे १० कोटींचे ड्रग्स जप्त केले होते. यावर्षी क्राईम ब्रँचने केलेल्या ८ कारवायांत १२ जणांना अटक करून आतापर्यंत ५५ कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात यश मिळविले आहे. ४ किलोपेक्षा अधिक कोकेन एकाचवेळी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. पोलिसांना गांजाव्यतिरिक्त आणखी कोणतेच ड्रग्स हाती लागत नसल्याची टीका केली जात होती. मात्र, या कारवाईने पोलिस खात्याचे मनोधैर्य उंचावले आहे.
कोकेनप्रकरणी अटक केलेली संशयित रेश्मा ही थायलंडला जाऊन आली आहे. थायलंड येथून मोठ्या प्रमाणात ड्रग्सची भारतात तस्करी केल्याप्रकरणी यापूर्वीही कारवाया झाल्या आहेत. रेश्मा यापूर्वी कितीवेळा थायलंडसह इतर देशांमध्ये गेली होती तसेच तिच्यासोबत कोण गेले होते, याची माहिती मिळवण्यासाठी क्राईम ब्रँच ब्युरो ऑफ इमिग्रेशनला (बीओआय) पत्र पाठवून माहिती मिळवणार आहे. त्यामुळे रेश्माच्या संपर्कात असलेल्या स्थानिक तसेच आंतरराज्य साथीदारांचा पर्दाफाश होईल, अशी पोलिसांना अपेक्षा आहे.
क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांचे कौतुक आहेच. पण कोकेनसारखे ड्रग्स मोठ्या प्रमाणात राज्यात येत असेल तर ते भयावह आहे. कदाचित दररोज असे ड्रग्स येत असल्यास त्याविरुद्धच्या कारवाईसाठी अद्याप व्यापक धोरण किंवा अंमलबजावणी झालेली नाही. गोव्याचा वापर ड्रग्स हब म्हणून करण्यापूर्वी विचार करावा लागेल. गुन्हेगारांना गोव्यात ड्रग्स व्यवसाय करणे सोपे झाले आहे, हे गेल्या काही वर्षांपासून मी सांगत आलो आहे, असे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.
संशयित निबू विन्सेंट याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची नसली तरी तो झटपट पैसे मिळवण्याच्या आशेने ड्रग्स विक्री व्यवसायात गुंतला होता. वाडेकर कुटुंबीय हे सडा येथील स्मशानभूमीच्या ठिकाणी राहते. मंगेश वाडेकर हा स्मशानभूमीत मृतदेहांना अग्नी देण्यास आलेल्यांना मदत करण्याचे काम करतो. त्याला बलात्काराच्या प्रकरणात अटकही झाली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.