

Ajit Pawar Funeral: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली. गुरुवारी (29 जानेवारी) बारामती येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद प्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बारामतीत उपस्थित राहून गोमंतकीय जनतेच्या वतीने अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते, तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी बारामतीत गर्दी केली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पार्थिवाचे दर्शन घेऊन पवार कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि कुटुंबातील इतर सदस्यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.
"अजितदादा हे केवळ महाराष्ट्राचे नेते नव्हते, तर संपूर्ण पश्चिम भारताच्या विकासासाठी तळमळीने काम करणारे एक प्रशासक होते. त्यांच्या कामाची पद्धत, शिस्त आणि विकासाची दृष्टी नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे. गोव्याशी त्यांचे नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध राहिले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे."
बारामती येथे अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने त्यांना हवेत फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. डॉ. प्रमोद सावंत यांनी अंत्यविधीच्या शेवटच्या क्षणापर्यंत उपस्थित राहून अजित पवारांना अखेरचा निरोप दिला. अजित पवार यांच्या जाण्याने केवळ एक राजकीय नेता हरपला नाही, तर सर्वसामान्यांचे प्रश्न तडीस लावणारा एक 'लोकनेता' काळाच्या पडद्याआड गेला, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.