

दिवाळीनंतर लक्ष्मीपूजन व गुरांचा पाडवा झाला. गोव्यात यंदा सगळीकडे या पाडव्याला गोपूजा करण्यात राजकारण्यांमध्ये अहमहमिका लागली होती. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री व राजकीय नेत्यांचे पूजा करतानाचे फोटो व्हायरल झाले. दोतोर मुख्यमंत्र्यांची गोष्ट वेगळी, कारण त्यांनी आमदार होण्यापूर्वी कुडणे-साखळी येथे गोशाला सुरू केली होती. तेथे दरवर्षी ते पाडव्याला आवर्जून उपस्थित राहतात. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या कारकिर्दीत गुरांप्रति विशेषतः भटक्या गुरांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. पण इतरांचे काय? त्यांना गुरांप्रति अचानक इतका कळवळा का निर्माण झाला? आणि एवढाच मोठा कळवळा या लोकांमध्ये असेल तर रस्त्यांवर मोठ्या संख्येने भटकी गुरे का आढळतात?, का अपघातात बळी पडतात? जवळ येऊन ठेपलेल्या निवडणुका तर हे त्यामागील कारण नव्हे ना? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ∙∙∙
‘पात्रांव’ गेल्यानंतर फोंड्याचे काय, हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. कारण फोंडा आणि रवी नाईक यांचे समीकरणच वेगळे होते. आमदार असतानाच ते गेल्यामुळे आता फोंड्यावर दावा कुणाचा हाच तो प्रश्न. काहींच्या मते या पोटनिवडणुकीत फोंड्याचे माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक आणि रवींचे पुत्र रितेश नाईक यांना बिनविरोध निवडून द्यायला हवे तर काहींच्या मते ही निवडणूक असल्याने भावनेला किंमत शून्य. त्यामुळेच मगो पक्ष सोडला तर काँग्रेस आणि आम आदमी पक्ष निवडणुकीच्या मूडमध्ये आहे. आता काँग्रेसचे उमेदवार राजेश वेरेकर हे ठरलेले आहेत. मग ‘आप’चे काय? आणि पोटनिवडणूक तर दीड महिन्यात शक्य आहे. त्यामुळे उमेदवारासाठी धावपळ होणार नाही का? ∙∙∙
सध्या गोव्यातील भाजपमध्ये बाहेरच्यांची मोठ्या प्रमाणावर भरती झालेली आहे. या खोगीर भरतीच्या वजनामुळेच भविष्यात एक दिवस भाजप कोसळेल असा तर्क व्यक्त केला जातोय. कदाचित २०२७च्या निवडणुकीत भाजपला त्याचा प्रत्यय येऊ शकतो. असे म्हणतात, गोव्यात भाजप पडेल तर तो आपल्याच वजनाने. काल दवर्ली-दिकरपाल पंचायतीत याचा प्रत्यय आला. या पंचायतीत ११ सदस्य असून भाजपकडे ६ सदस्य आहेत. असे असतानाही काल झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत विरोधी गटाचे उमेदवार मिनीन कुलासो यांना ७ मते मिळाली आणि भाजपचे विद्याधर आर्लेकर यांना ४. भाजपकडे ६ मते असताना विद्याधरला चारच मते कशी? हा प्रश्न सध्या चर्चेचा बनला आहे. असे समजते की, भाजपच्या एका सदस्याला स्वत: सरपंच व्हायचे होते. आपली इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून त्याने आणि त्याच्या साथीदाराने क्रॉस वोटिंग केले. आता बोला! ∙∙∙
विरोधी आमदारांसह आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी फातोर्ड्यातील कार्यक्रमात नरकासुराचा आधार घेत सत्ताधाऱ्यांवर केलेल्या टीकेमुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक मंत्री, आमदारांचा जळफळाट झालाय. बुधवारी सुदिन ढवळीकर यांनी साधलेल्या निशाण्यानंतर गुरुवारी मंत्री दिगंबर कामत यांनीही विरोधकांची आपल्या शैलीत खिल्ली उडवली. विरोधकांनी आरशासमोर उभे रहावे म्हणजे त्यांना नरकासुर कोण हे कळेल, असा टोला त्यांनी लगावला. परंतु विजय सरदेसाईंनी नुकत्याच एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपने २०११ मध्ये कोणा-कोणाला नरकासुर ठरवले होते तेच जाहीर केले आहे. त्यामुळे कामतांनी विजयसह इतर विरोधकांना दिलेला सल्ला त्यांच्याच पक्षातील नेत्यांवर उलटला तर नाही ना? ∙∙∙
‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ असे म्हटले जाते. आपल्या गोव्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुर नाचविण्याची परंपरा आहे. नाताळ सणाला ख्रिस्ती बांधव येशू जन्मावर आधारित गोठा बनवतात. अशीच दिवाळीला किल्ले बनविण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. गोव्यातही ही नवी परंपरा शिवप्रेमींनी सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या किल्ल्यांना युनेस्कोची मान्यता मिळालीय. याच निमित्ताने गोव्यात यंदापासून छत्रपतींच्या इतिहासाची परंपरा आम जनतेपर्यंत पोचविण्याचा उद्देशाने शिवप्रेमींनी सुरू केलेल्या किल्ले बनवा स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेत व्यक्तिगत पातळीवर ९४ स्पर्धकांनी तर सामूहिक स्तरावर ५८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. आयोजकांनी चांगली बक्षिसेही ठेवली आहेत. राज्यात नरकासुर स्पर्धा वादात सापडल्या असताना किल्ले बनवा स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळतोय, ही खरोखरच चांगली गोष्ट. ∙∙∙
कळंगुट येथे रेंट अ कारवाल्यांची मजल कुठवर गेली आहे याचे उदाहरण समोर आले आहे. तेथे एकाच प्रकारच्या दोन वाहनांना समान क्रमांक असल्याचे काहींच्या लक्षात आले. त्यातील जागृत नागरिकाने याची खबर पोलिसांना दिली. पोलिसांनी केलेल्या पाहणीत एकसारख्याच दिसणाऱ्या दोन वाहनांना समान क्रमांक असल्याचे दिसून आले. यामुळे सरकारचा महसूल चुकवण्यासाठी आणि वाहतूक खात्याची दिशाभूल करण्यासाठी कोणत्या क्लुप्ती लढवण्यापर्यंत तयारी झाली आहे हे सर्वांना समजले. आता या वाहनांचे मालक कोण, याविषयी निश्चितच सर्वांना कुतूहल आहे. ∙∙∙
पर्वरीतील उड्डाणपुलाच्या कामामुळे त्रासलेल्या वाहनचालक, प्रवाशांचा मन:स्ताप कमी करण्यासाठी मंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे आता स्वत: मैदानात उतरले आहेत. बुधवारी त्यांनी या कामाची आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची उपसभापती जोशुआ डिसोझा व उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्यासमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. शिवाय काम सुरू असलेल्या ठिकाणच्या दोन्ही रस्त्यांवरील फूटपाथ काढून रस्त्यांची लांबी वाढवण्याच्या सूचनाही केल्या. आता यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही लवकरच बैठक घेणार असल्याचे समजते. त्यामुळे इतके दिवस वाहनचालकांना त्रास पाहूनही गप्प बसलेले मंत्री आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आत्ताच आपला त्रास, संकटे कशी काय दिसली असतील? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.