Mohan Bhagwat Vijayadashami Speech: मोहन भागवतांचा 'विश्वगुरू भारताचा' मंत्र; विविधतेचा स्वीकार, समतोल विकास आणि संस्कारांवर भर

RSS Vijayadashami Rally: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी मेळावा दरवर्षीच होतो. पण यंदाच्या मेळाव्याला आणि सरसंघचालकांच्या भाषणाला तीन कारणांमुळे वेगळे महत्त्व आणि औचित्य होते.
RSS Vijayadashami Rally
Mohan Bhagwat Vijayadashami SpeechDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी मेळावा दरवर्षीच होतो. पण यंदाच्या मेळाव्याला आणि सरसंघचालकांच्या भाषणाला तीन कारणांमुळे वेगळे महत्त्व आणि औचित्य होते. एकतर जागतिक परिस्थिती कमालीची अनिश्चित झालेली असून जगभरातील अस्वस्थता आणि उद्रेक यांमुळे मने चिंतीत आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकताच युरोप व अमेरिकेचा दौरा केला. शताब्दी पूर्ण केलेल्या एका राष्ट्रव्यापी, वर्धिष्णु संघटनेचे प्रमुख या सगळ्याकडे कसे पाहतात, यादृष्टीने भागवत यांच्या भाषणाविषयी उत्सुकता होती. म्हणूनच त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि त्यातून मिळणाऱ्या कृतीच्या दिशा, याविषयी एक चर्चा.

आपल्या ‘स्व’बोधाचा पाया

भारताच्या राज्यघटनेतील उद्देशिकेमध्ये ‘आम्ही भारताचे लोक’ हा उल्लेख आहे. विविधता असूनही भावनिकदृष्ट्या एकात्म असलेल्या समाजाचे हे प्रतीक. हे बंध दृढ कसे करावेत, याचे मार्गदर्शन घटनेतील ‘मार्गदर्शक तत्त्वां’मधून मिळते. या भावनिक एकात्मतेची प्रत्यक्ष अनुभूती ज्या तत्त्वामुळे होते, ते तत्त्वज्ञान आपल्याकडे असतानाही आपले आचरण वेगळे झाले. परिणामी, विश्वगुरूच्या स्थानावरून आपली घसरण होत गेली आणि अनेक शतके पारतंत्र्य भोगावे लागले.

RSS Vijayadashami Rally
Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

पुन्हा उभारी घेण्यासाठी...

आता विस्मृतीत गेलेल्या त्या तत्त्वांचे आकलन करून जीवनाच्या सर्व अंगांमध्ये त्यानुसार गुणांचा विकास करावा लागेल. स्वातंत्र्यासाठी जितकी तपश्चर्या आणि समर्पण करावे लागले, त्यापेक्षाही अधिक प्रयत्नांची गरज आहे.

एकात्मतेचा आधार

सर्व विविधतांचा स्वीकार करणारा, त्यांचा सन्मान करणारा आणि सर्वांकडे आपलेपणाने पाहणारा विचारच एकात्मतेचा आधार. विश्वाला जोडण्याची क्षमता आणि सर्वांना जोडून घेण्याची स्वाभाविक प्रेरणा असलेल्या ‘हिंदुभावा’चे स्मरण, जागरण आणि संवर्धन. सर्व पंथांविषयी आदरभाव.

भारताने जगाला देण्यासारखे...

जगभरामध्ये भारताविषयी कुतूहल दिसते. जडवाद, व्यक्तिकेंद्रित विचार आणि अनिर्बंध उपभोगावर आधारित अपुऱ्या जीवनदृष्टीमुळे भौतिक संपन्नता असूनही हे देश चिंताग्रस्त आहेत. विविधतेचे व्यवस्थापन कसे करावे, विकास आणि पर्यावरण यांचा समतोल कसा साधावा, वेगळ्या लोकांशी आपलेपणाने कसे वागावे, कौटुंबिक जीवनातील आणि नव्या पिढीतील संस्कारांचा ऱ्हास कसा रोखावा, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत. यामुळेच भू-राजकीय तणाव, आर्थिक अनिश्चितता, पर्यावरणीय संकटे आणि वर्चस्वाच्या संघर्षातून उद्भवणारा विनाश यांचे संकट गडद झाले आहे. भारताकडे यांवरील उपाय आहेत, याची जाणीव जगाला होत आहे. त्यामुळे तेथील समाजात आपल्या कार्यकर्त्यांचे विचार लक्षपूर्वक ऐकले जात असून त्यावर चर्चादेखील सुरू झाल्या आहेत.

भारताची संतुलित जीवनदृष्टी

भारताची सनातन जीवनदृष्टी ही तिच्या समग्रतेतून आणि एकात्मतेच्या भावनेतून विकसित झाली आहे. त्यामुळे समन्वय आणि संयमाचे संस्कार करणारी संस्कृती विश्वात विकसित व्हावी, अशी या जीवनदृष्टीची अपेक्षा आहे. पूर्वजांनी या संस्कृतीला ‘सा प्रथमा संस्कृतिः विश्ववारा’ असे संबोधले. त्‍या आधारे समग्र आणि एकात्म विकासाचा नवा आदर्श भारताने जगासमोर उभा केला पाहिजे.

शासन आणि प्रशासनासाठी

संस्कारांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. समाजमाध्यमांद्वारे सर्व प्रकारची माहिती आणि बातम्या सर्वांपर्यंत पोहोचत आहेत. नव्या पिढीतील मुले आणि युवक या माध्यमांतून मिळणारी माहिती योग्य-अयोग्यतेचा विवेक न करता स्वीकारतात. त्याचे दुष्परिणाम अनुभवल्यानंतर काही देशांनी या माध्यमांवर विशिष्ट नियम आणि निर्बंध लागू केले आहेत. आपल्या देशातही, विशेषतः ओटीटी (OTT) मंचांच्या संदर्भात, अशा उपाययोजनांची आवश्यकता समाजातून व्यक्त होत आहे. याचा विचार करायला हवा. विवेकाच्या अभावामुळेच जगभरातील तरुण पिढी अमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी जात आहे. व्यसन ही एक गंभीर राष्ट्रीय समस्या आहे. तिचे निवारण करण्यासाठी शासन, प्रशासन आणि समाजाने वेळीच प्रयत्न सुरू केले पाहिजेत.

RSS Vijayadashami Rally
FC Goa vs Fortis FC: एफसी गोवाचा अखेर विजय! फॉर्टिस एफसीला 2-1 ने नमवत एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये गुणांचे खाते उघडले

पालकांसाठी

समाजातील आजच्या पालक पिढीने नव्या पिढीला विवेकपूर्ण विचारांची आणि योग्य-अयोग्य ओळखण्याची दृष्टी द्यावी.

स्वयंसेवक काय करणार?

देशभरात व्यसनांविरुद्ध व्यापक जनजागृती आणि प्रतिबंधात्मक अभियान उभे करण्यासाठी स्वयंसेवक प्रयत्न करतील.

युवकांसाठी

परमवैभवसंपन्न, विश्वगुरू भारताच्या निर्मितीची मोठी जबाबदारी नव्या पिढीच्या खांद्यावर येणार आहे. युवकांनी सर्व दृष्टींनी त्यासाठी सज्ज झाले पाहिजे.

एकांगी विकास नको

उपभोगवादी किंवा जडवादी दृष्टिकोनातून विकास साधण्याचा प्रयत्न केल्याने सुखसोयी मिळत असल्या तरी त्याची मोठी किंमतही मोजावी लागू शकते. नवे ज्ञान, विज्ञान,तंत्रज्ञान यांचे स्वागत करून त्यांचा स्वीकार केला पाहिजे. मात्र, तंत्रज्ञान हे केवळ एक साधन. नेपाळमध्ये आलेल्या भीषण आपत्तीमध्ये हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. भारत, तिबेट, भूतान आणि चीन अशा अनेक देशांच्या प्रदेशांतून विस्तारलेल्या संपूर्ण हिमालयीन क्षेत्रात झालेल्या एकांगी विकासाचे परिणाम या आपत्तीच्या मुळाशी काही प्रमाणात असू शकतात. ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी आवश्यक विवेक, तसेच त्यांच्या वापरासंबंधीचे नैतिक आणि व्यावहारिक अनुशासनही शिकले पाहिजे आणि आचरणात आणले पाहिजे.

‘शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे, शास्त्रचिंता प्रवर्तते’

रा.स्व. संघाचा यंदाचा नागपूरमधील संचलन सोहळा वैशिष्ट्यपूर्ण ठरला. या सोहळ्याच्या व्यासपीठावरील दर्शनीभागामध्ये उपरोक्त संस्कृत सुभाषित झळकत होते. ‘राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी शस्त्र तर प्रगतीसाठी शास्त्र आवश्यक आहे. ‘शस्त्र’ आणि ‘शास्त्र’ या दोन्हींचा समतोल राष्ट्राचे संरक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा ठरतो,’ असा सूचक संदेश यातून देण्यात आला.

समावेशकता स्वागतार्ह; अधिक स्पष्टता हवी

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणात केवळ भारतच नव्हे तर जगभरातील सध्याच्या काही ज्वलंत प्रश्नांचा परामर्श घेण्यात आला. हे योग्यच झाले, याचे कारण जागतिकीकरणानंतर कोणताही प्रश्न त्या त्या प्रदेशापुरता मर्यादित राहात नाही. युद्धे असोत, व्यापार संघर्ष असोत, वा तरुणांमधील खदखद आणि हिंसक आंदोलने असोत, त्यांचे परिणाम जगाला भोगावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदू जीवनदृष्टीतील संतुलित, समग्र विचारच जगाला तारू शकतो, असे त्यांनी सांगितले. वैविध्याचा मनःपूर्वक स्वीकार हा भारताच्या मातीचाच गुण कसा आहे, हे विशद करून भारतातील एकात्मतेचा आणि ‘वसुधैव कुटुंबकम’चा विचारही त्यांनी मांडला.

या समावेशक जीवनदृष्टीच्या तत्त्वज्ञानावर त्यांनी केलेले विवेचन स्वागतार्हच आहे. पण ज्या प्रश्नांचा त्यांनी उल्लेख केला, त्यांच्या सोडवणुकीसाठी आणि आव्हानांवर मात करण्यासाठी या उदात्त विचारांमागे सामर्थ्य कसे उभा करायचे? हा प्रश्न आहे. शिवाय ज्या अंतर्विरोधांतून हे प्रश्न जन्माला आले आहेत, त्याबाबत काय भूमिका घ्यायची? आजच्या जगातील आणि भारतातील ठळक अंतर्विरोध म्हणजे पर्यावरण जतन की विकासाला प्राधान्य? सरधोपट विकासमार्गातील धोके आता स्पष्ट होऊ लागले आहेत. त्यामुळे सृष्टीचाही विचार करणाऱ्या व्यापक तत्त्वज्ञानाची प्रस्तुतता जाणवते, हा भागवतांचा मुद्दा महत्त्वाचा आहे, यात शंका नाही.

परंतु जगभरातील उद्रेकांचे आणि अस्वस्थ आंदोलनांचे मूळ रोजगारसंधींच्या अभावात आहे. या संधी निर्माण करायच्या आणि त्याचवेळी पर्यावरण सांभाळायचे ही कसरत सोपी नाही. ती करावी लागेल, पण त्यासाठीची धोरणात्मक स्पष्टता आवश्यक आहे. त्यामुळेच हे मार्गदर्शन अधिक तपशीलात व्हायला हवे. वाढत्या विषमतेचे परिणाम काय होणार, हाही अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे. मार्गदर्शनाची अपेक्षा संघाकडून व्यक्त होते, याचे कारण विचार कृतीत परावर्तित करण्याची या संघटनेची शक्ती. भागवतांच्या भाषणाची म्हणूनच दखल घ्यावी लागते.

RSS Vijayadashami Rally
Goa Ranji Trophy: कसवणकर-सुयशची मेहनत वाया; गोव्याला उत्तर प्रदेशने 68 धावांनी हरविले, पराभवाची मालिका कायम

विजयादशमी उत्सवादरम्यान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलेले भाषण अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी राष्ट्रीय प्रगती, सामाजिक ऐक्य, आत्मनिर्भरतेची आवश्यकता आणि समाजाचे चारित्र्य यासह अनेक मुद्यांवर विस्ताराने मत व्यक्त केले.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा केवळ पुरुषांचा एक राज्यघटनाविरोधी पंथ आहे. जो महिलांना पुरुषांची संपत्ती समजतो. मी शिवशक्तीमध्ये विश्वास ठेवतो. त्यामुळेच संघाशी लढण्याचा मला अतिशय आनंद मिळतो.

राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते

भागवत साहेब, जे तुमच्या मनात आहे, तेच आम्ही करीत आहोत. तुम्हालाही देशात सत्ता परिवर्तन हवे आहे. मोदी-शहांसारखे लोक सत्तेतून बाहेर जावे, असे तुम्हालाही वाटत आहे. कारण त्यांनी देशाचे भरपूर नुकसान केले आहे. त्यामुळे आम्ही जे आंदोलन चालविले आहे ते देश आणि समाजहिताचे आहे.

संजय राऊत, खासदार, (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे)

भागवत जी, तुम्ही समजून घ्या. हा भारत आहे. येथे मत देण्याचा अधिकार आहे. लोकशाही पद्धतीने विरोधाचा अधिकार आहे. निषेध करण्याचा अधिकार आहे. तुमच्या शाखेत कोणी महिला शिरू शकत नाही. आम्हाला जनवादाच्या बाबतीत समजवू नका.

वृंदा करात, माजी खासदार, माकप

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com