Goa Ranji Trophy: कसवणकर-सुयशची मेहनत वाया; गोव्याला उत्तर प्रदेशने 68 धावांनी हरविले, पराभवाची मालिका कायम

Goa vs Uttar Pradesh Ranji Trophy Match Result: सामन्यात दहा गडी बाद केलेला ऑफस्पिनर यश कसवणकर, तसेच दुसऱ्या डावात झुंझार ७२ धावा नोंदविलेला सुयश प्रभुदेसाई यांच्या मेहनतीवर पाणी फेरण्याचे काम गोव्याच्या इतर फलंदाजांनी केले.
Goa vs Uttar Pradesh Ranji Trophy
Ranji TrophyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: सामन्यात दहा गडी बाद केलेला ऑफस्पिनर यश कसवणकर, तसेच दुसऱ्या डावात झुंझार ७२ धावा नोंदविलेला सुयश प्रभुदेसाई यांच्या मेहनतीवर पाणी फेरण्याचे काम गोव्याच्या इतर फलंदाजांनी केले. परिणामी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ‘अ’ गटात त्यांना उत्तर प्रदेशकडून ६८ धावांनी पराभव पत्करावा लागला. कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवरील चार दिवसीय सामना मंगळवारी तिसऱ्याच दिवशी संपला.

कारकिर्दीतील दुसराच रणजी करंडक क्रिकेट सामना खेळणाऱ्या यश कसवणकर याने दुसऱ्या डावातही ६९ धावांत ५ गडी बाद केले. पहिल्या डावात त्याने ८६ धावांत निम्मा संघ गारद केला होता. अशाप्रकारे या ऑफस्पिनरने दोन्ही डावांत मिळून १५५ धावांत १० गडी बाद करण्याचा पराक्रम साधला. यश याच्या प्रभावी फिरकीमुळे गोव्याने उत्तर प्रदेशचा दुसरा डाव ४ बाद १०२ वरून १९७ धावांत गुंडाळला. उत्तर प्रदेशची एकवेळ ९ बाद १५१ अशी स्थिती होती. मात्र, अकराव्या क्रमांकावरील फलंदाज यश दयाळ याने प्रतिहल्ला चढविताना १४ चेंडूत तीन चौकार व तीन षटकारांसह ३६ धावा केल्यामुळे यजमान संघाचा डाव लांबला. त्यांनी पहिल्या डावातील ३८ धावांच्या आघाडीसह गोव्यासमोर विजयासाठी २३६ धावांचे लक्ष्य ठेवले. उत्तर प्रदेशतर्फे कर्णधार आर्यन जुयाल याने सर्वाधिक ७४ धावा केल्या.

Goa vs Uttar Pradesh Ranji Trophy
Goa Pharma Export Hub: गोवा बनणार औषध निर्यातीचे नवे केंद्र? मोपा-दाबोळी विमानतळांवर मोठी तयारी!

फिरकी गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर आव्हान कठीण होते; पण गोव्याचे इतर फलंदाज सुयश प्रभुदेसाई याच्याकडून धडा शिकले नाहीत. गोव्याचा दुसरा डाव १६७ धावांत संपुष्टात आला. आठव्या गड्याच्या रूपात बाद झालेल्या सुयशने १०६ चेंडूंचा सामना करताना सहा चौकार व एका षटकारासह ७२ धावा केल्या. स्नेहल कवठणकर (७) व ललित यादव (१) या हुकमी फलंदाजांना सलग दुसऱ्या डावात दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. गोव्याची स्थिती ५ बाद १०० अशी असताना सुयश व दर्शन मिसाळ (२८) यांनी सहाव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली; पण ऑफस्पिनर वंश चौधरी याने दर्शनला बाद केल्यानंतर गोव्याने फक्त एका धावेत चार विकेट गमावल्या. पाहुण्या संघाची ९ बाद १५४ अशी दाणदाण उडाल्यानंतर उत्तर प्रदेशचा विजय निश्चित झाला. त्यांचा १९ वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज कार्तिक यादव याने ३७ धावांत ५ गडी बाद केले. पाचव्या प्रथम श्रेणी सामन्यात त्याने दुसऱ्यांदा डावात पाच गडी टिपून वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदविली.

गोव्याची पराभूत मालिका

गोव्याचा हा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव ठरला. अगोदरच्या लढतीत त्यांना बडोद्याने डाव व १३५ धावांनी हरविले होते. गोव्याचा स्पर्धेतील तिसरा सामना २६ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत नागपूर येथे विदर्भाविरुद्ध होईल. एकंदरीत २०२५-२६ पासून गोव्याने रणजी करंडक स्पर्धेत सलग सहा सामने गमावले आहेत. उत्तर प्रदेशने सलग दुसरा विजय नोंदविताना गुणसंख्या १३ वर नेली आहे. पहिल्या लढतीत त्यांनी बिहारला डावाच्या फरकाने नमविले होते.

सामन्यात दहा बळी घेणारा कसवणकर गोव्याचा सातवा गोलंदाज

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सामन्यातील दोन्ही डावांत मिळून दहा गडी टिपणारा यश कसवणकर हा एकंदरीत गोव्याचा सातवा गोलंदाज ठरला. डावखुरा फिरकी गोलंदाज शदाब जकाती याने अशी कामगिरी तीन वेळा केली आहे.

जे. गोकुळकृष्णन : ११-११४ (७-७४ व ४-६०) विरुद्ध कर्नाटक (पणजी जिमखाना, १९९६-९७)

फैझल शेख : ११-१३६ (९-२९ व २-१०७) विरुद्ध सेनादल (दिल्ली, २००२-०३)

अमित दाणी : १०-११८ (५-७३ व ५-४५) विरुद्ध हिमाचल प्रदेश (धरमशाला, २००३-०४)

शदाब जकाती : १०-१४६ (६-५२ व ४-९४) विरुद्ध हरियाना (मडगाव, २००७-०८)

शदाब जकाती : १०-१३२ (४-७७ व ६-५५) विरुद्ध झारखंड (पर्वरी, २०१०-११)

शदाब जकाती : ११-१२३ (८-५३ व ३-७०) विरुद्ध आंध्र (धनबाद, २०१६-१७)

कृष्णा दास : ११-११६ (६-७५ व ५-४१) विरुद्ध हरियाना (लाहली, २०१८-१९)

फेलिक्स आलेमाव : ११-१४५ (६-७३ व ५-७२) विरुद्ध पुदुचेरी (पुदुचेरी, २०१९-२०)

यश कसवणकर : १०-१५५ (५-८६ व ५-६९) विरुद्ध उत्तर प्रदेश (कानपूर, २०२६-२७)

Goa vs Uttar Pradesh Ranji Trophy
Goa Assembly Election: 'पक्ष सांगेल त्या मतदारसंघातून लढणार'; दामू नाईकांच्या उमेदवारीबाबत चर्चांना पूर्णविराम

संक्षिप्त धावफलक

उत्तर प्रदेश, पहिला डाव : २०२

गोवा, पहिला डाव : १६४

उत्तर प्रदेश, दुसरा डाव (४ बाद १०२ वरून) : ५८.४ षटकांत सर्वबाद १९७ (आर्यन जुयाल ७४, करण शर्मा ३१, रिंकू सिंग २४, आराध्य यादव नाबाद १३, यश दयाळ ३६, यश कसवणकर १७.४-२-६९-५, दर्शन मिसाळ १८-३-४६-१, ललित यादव १४-२-३६-२, अमूल्य पांड्रेकर ५-०-१४-०, अभिनव तेजराणा ४-०-२६-१).

गोवा, दुसरा डाव : ४६ षटकांत सर्वबाद १६७ (सुयश प्रभुदेसाई ७२, शिवेंद्र भुजबळ १२, अभिनव तेजराणा १४, स्नेहल कवठणकर ७, ललित यादव १, यश कसवणकर १, दर्शन मिसाळ २८, अमूल्य पांड्रेकर ०, ऋत्विक नाईक ०, वासुकी कौशिक ५, शुभम तारी नाबाद ९, कार्तिक यादव १५-२-३७-५, झीशान अन्सारी २-५४, वंश चौधरी ३-३३).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com