

अजित पवार यांचे आकस्मिक अपघाती निधन हा संपूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला बसलेला खूप मोठा धक्का आहे. महाराष्ट्राच्या गेल्या २५-३० वर्षांच्या राजकारणामध्ये सातत्याने उपमुख्यमंत्री म्हणून सहा वेळा त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. प्रशासनावर पकड ठेवणारा, त्वरित निर्णय घेणारा आणि स्पष्ट बोलणारा असा त्यांचा लौकिक होता. जे काम होत असेल ते त्याला हो आणि जे होत नसेल त्याला नाही, असे स्पष्ट शब्दांमध्ये सांगण्याची हिंमत त्यांच्यात होती.
तब्बल चाळीस वर्षे अजितदादा राजकारणात, सार्वजनिक जीवनात कार्यरत होते. विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. ते अथक कार्यरत होते. महाराष्ट्राच्या विकासाचा त्यांना ध्यास होता. राजकीय नेत्यांना लोकांना, कार्यकर्त्यांना सांभाळावे लागते. त्यामुळे सातत्याने गोड बोलावे लागते. किंबहुना आपण स्पष्ट बोललो तर चुकीचा संदेश जाईल, असे अनेकांना वाटते. अजित पवार मात्र या रीतीला अपवाद होते. ते उत्तम प्रशासक होते, तसे ते स्पष्टवक्तेही महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नाबद्दल आस्था ठेवणारा आणि जनतेवर प्रेम करुन त्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारा हा सिंह होता.
अजित पवार (Ajit Pawar) महाराष्ट्राच्या विधिमंडळात पहिल्यांदा आले आणि ऊर्जा राज्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली तेव्हापासून त्यांचा आणि माझा परिचय वाढला. त्यांची आणि माझी मैत्री ही राजकीय मतभेदांच्या पलीकडची होती. आम्ही अनेक वर्षे विधिमंडळात काम केले. एकमेकांवर राजकीय टीका-टिप्पणी केली. परंतु, मैत्रभावात अंतर आले नाही. जनहिताच्या मुद्यावर मी काही आग्रह केला आणि ते त्यांनी मान्य केले नाही, असे घडले नाही. आणि दादांनी एखादा असा लोकहिताचा विषय माझ्यासमोर ठेवला तर तो मी सकारात्मक पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला नाही, असेही घडले नाही.
अजित पवार हे माझे राजकारणातले आणि राजकारणाच्या पलीकडले उत्तम मित्र होते. राजकारणात कधी जमते, कधी जमत नाही. कधी पार्टी सोबत असते, कधी नसते. ते बघून आम्ही मैत्री केली नाही. त्यामुळे सत्तेत असो वा नसो; त्यांचे व माझे संबंध पूर्वी होते, तसेच ते आज अखेरच्या क्षणापर्यंत होते. राजकीय पदे आणि भूमिका बाजूला ठेवून वैयक्तिक स्तरावरील मैत्रभाव आम्ही जोपासला हे मला अधिक महत्त्वाचे वाटते.
मी त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम करीत होतो. मला अनेकवेळा राष्ट्रीय महामार्गांचे, विशेषतः पुणे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील रस्त्यांच्या बाबतीत सूक्ष्म अभ्यास करुन त्यांचा पाठपुरावा करण्याचे काम ते सातत्याने करीत असत. केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री म्हणून महाराष्ट्रात ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’च्या वतीने कामे करीत असताना मला त्यांच्या कार्यशैलीचा अनुभव आला. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्हा, सातारा जिल्हा आणि अन्य संबंधित भागात पालखीमार्ग किंवा अन्य कामे करताना भूसंपादनासह अनेक प्रकारच्या अडचणी आल्या. परंतु, महाराष्ट्राचा विकास होत आहे हे लक्षात ठेवून या सगळ्या कामांना त्यांनी स्वतः संपूर्ण ताकदीने पाठबळ दिले.
काळाच्या ओघात त्यांना अनेक अडचणींचा सामनाही करावा लागला. त्यातही एक कौटुंबिक मित्र म्हणून मुंबईत, दिल्लीत आणि नागपूरमध्ये भेटून ते सर्व प्रश्नांवर माझ्याशी चर्चा करायचे. मी पण राजकारणाच्या भिंती न ठेवता वैयक्तिकरित्या नेहमी मला जे योग्य वाटायचे तेच त्यांना सांगत होतो. माझ्या दोन्ही मुलांना कधीही वाटले तर त्यांना थेट भेटू शकत होते. त्यांचा स्वभाव परखड होता. एखाद्याला आश्वासन देऊन झुलवत ठेवण्याचा भाग नव्हता. विशेषतः शरद पवारांमध्ये असलेला विकासाचा ध्यास, हा पैलूही त्यांच्यामध्ये होता. पण दुसरीकडे एखादा निर्णय होत नसेल तर स्पष्ट बोलण्याची हिंमतही होती. ज्या कामाबद्दल त्यांचे मत सकारात्मक असेल, त्याबद्दल ते तसे सांगत.
जे काम होऊ शकत नसेल, त्याबद्दल स्पष्टपणे सांगून मोकळे होणे हा त्यांचा स्वभाव होता. एखाद्या कामाला होकार दिला असेल तर त्याचा पाठपुरावा करून ते शेवटाला नेण्याची जबाबदारी अजित पवार घेत, हे मी कित्येकदा अनुभवले आहे. त्यांच्या या नेतृत्वगुणामुळे त्यांच्याबद्दल शासन-प्रशासनात एक विश्वास निर्माण झाला. प्रशासनावर चांगली पकड ठेवून जनतेच्या हिताचे नेमके निर्णय करून घेत असताना त्यांची निर्णयक्षमता वेळोवेळी सिद्ध झाली. शिवाय त्यांची लोकाभिमुखताही अधोरेखित झाली. या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचा प्रभाव सतत वाढत गेला.
भल्या पहाटे तयार होऊन ते कामाला सुरुवात करायचे. सर्व फाईलींचा अभ्यास करायचे. त्यावर निर्णय घ्यायचे आणि एखादा विषय नाही समजला तर त्याबाबतीत योग्य व्यक्तीकडून सल्लाही घ्यायचे. सर्व पैलूंचा अभ्यास करुन त्यावर निर्णय घेणे हा त्यांचा स्वभाव होता. एक उत्तम आणि मोठे नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यात होती. त्यामुळे त्यांचे नेतृत्व महाराष्ट्रात लोकप्रिय होत गेले.
मधल्या काळात पवार कुटुंबात राजकारणावरुन मतभेद निर्माण झाले. दोन्ही कुटुंबांशी उत्तम संबंध असलेल्या लोकांमध्ये माझा पण समावेश होता. त्या कालखंडात मी त्यांना एवढेच म्हटले की, कुटुंबातील कटुता वाढू देऊ नका. राजकारण बाजूला ठेवा. त्या गोष्टीचे त्यांनी अतिशय आनंदाने पालन केले. मी ‘वसंतदादा शुगर इन्स्ट्यिट्यूट’ला गेलो त्यावेळी अजित पवारही त्या कार्यक्रमाला होते. पवारसाहेबही होते. पण त्यांच्यातील राजकारण वेगळे होते. राजकारणामुळे कामे अडायला नकोत, अशी त्यांची भूमिका होती. वसंतदादा इन्स्ट्यिट्यूटची शाखा नागपुरात सुरु करण्यासाठी पवारसाहेबांनी पुढाकार घेतला. या इन्स्ट्यिट्यूटच्या कामासाठी स्वतः अजित पवार दोन-तीनदा नागपुरात आले. त्यांनी इन्स्ट्यिट्यूटचे काम बघितले आणि त्यात जातीने लक्ष घालून सर्व कामाचा आढावा घेऊन ते वाढविण्याचा प्रयत्न केला.
इथेनॉलनिर्मिती, साखर उत्पादनातील अडचणी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा त्यांनी पाठपुरावा केला. प्रश्नांची जाण असलेला, प्रशासनावर पकड असलेला, महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांचे अंतःकरण उदार होते. बोलताना कधी कधी ते कठोर बोलायचे, पण मनाने मात्र कठोर नव्हते. अनेक वेळा प्रेमाने समजविल्यानंतर ते अनेक गोष्टींच्या बाबतीत मागे पण यायचे. त्यामुळे त्यांचा मृत्यू हा महाराष्ट्रावरच आघात आहे.
माझ्यासाठी कौटुंबिक संबंधातला, घरातला माणूस गेला, अशी स्थिती आहे. अजित पवार यांच्या जाण्याने आम्ही सारे खूप अस्वस्थ आहोत. राजकारणात तर त्यांच्यामुळे पोकळी निर्माण झालीच आहे. पण एक दिलदार आणि राजकारणापलीकडे मैत्रभाव जोपासणारा मित्र म्हणून त्यांचे स्थान निश्चितपणे माझ्या मनात आणि ह्रदयात आहे. खरे तर काळाच्या ओघात ज्याचा जन्म होतो, त्याचा मृत्यु अटळ असतो. पण अजित पवारांचा अशाप्रकारचा अपघाती मृत्यु व्हावा ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आणि कल्पनेपलीकडची आहे. या घटनेने त्यांच्या पत्नी, मुले आणि पवार कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मला हे पूर्णपणे ठाऊक आहे की राजकारणात जरी आपसात पटत नव्हते, तरी एका विशिष्ट मर्यादेपलीकडे कौटुंबिक आणि व्यक्तिगत संबंधात कुठल्याही प्रकारचे मतभेद किंवा मतभिन्नता नव्हती. अजितदादांच्या मनात शरद पवार यांच्याविषयी तेवढाच आदर होता. शरद पवार यांचा वारसा त्यांनी चांगला चालवला. शेवटी काळाच्या ओघात अनेक गोष्टी होत असतात. आज घडलेली घटना ही महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक स्तंभ कोसळून पडलेला आहे. भाजप म्हणून त्याचे दुःख आहेच. पण एक व्यक्तिगत आणि पारिवारिक मित्र म्हणूनही त्याचे दुःख आहे. अजित पवार आमच्यात नाहीत, याची मी कल्पनाच करु शकत नाही.त्यांचे कार्य, कर्तृत्व आणि त्यांच्या नेतृत्वाची राज्याच्या राजकारणावर चिरकाल छाप पडलेली राहील. एका दमदार, दिलखुलास आणि कमालीची निर्णयक्षमता असलेल्या नेत्याला आपण सारे मुकलो आहोत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.