

पावसाचा हा विरह केवळ हवामानाचा
नव्हे, तर संपूर्ण समाजजीवनाला
अस्वस्थ करणारा ठरत आहे.
बच्चे कंपनी’ला कागदी होड्या करायला शिकवून ठेवलेले असावे, जसे चतुर्थीच्या आगमनापूर्वी आपण त्यांना आरत्या शिकवतो, अगदी तसे. झालेच तर त्यांच्यासाठी छोटेखानी छत्र्या हौसेने घ्याव्यात. आकाशात एकत्र येऊ पाहणारे काळे ढग मुलांना दाखवावेत. ‘पड रे पावसा पड...’ ‘ये रे ये रे पावसा...’ ‘रेन रेन गो अवे’ अशी पावसाला आपण पडावे की नको म्हणून बुचकळ्यात पाडणारी बालगीते त्यांना शिकवावीत.
आपणही उत्साहाने घरच्या बगीच्यात माळी बनावे. नवीन रोपे लावावीत. पुनर्रोपण करावे. फुलवण्यासाठी काटछाट करावी. माती-खत- फव्वारे वापरावेत. अन् मग आपण केलेल्या कष्टाकडे कृतार्थ भावनेने पाहात पावसाच्या आगमनाला आतूर व्हावे.
जास्तीच्या घरगुती कपड्यांचा जोड खरेदी करावा. घरात, विशेषतः घराच्या माळ्यावर सफाईचा हात फिरवावा. नारळ, फणसांना झाडांवरून घरात उतरून आणावेत. नळे-खळे परतणे-साफ करणे पार पाडावे.
बाकीचा पुरूमेंत मागच्या महिन्यात झालेला असावा... मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावून आपला परतीचा प्रवास कधीचाच सुरू केलेला असावा! अशी सगळी चोख व्यवस्था झाल्यावर आता पर्जन्यराजाची वाट पाहात आकाशाकडे नजर लावून बसण्यावाचून दुसरे काम ते कुठले?
कधी येणार हा? कोकीळही नाही ऐकू येत... मान्सूनपूर्व पावसाने आलेला ओला शिडकावा नाहीसा होऊन पुन्हा हवेतील उष्मा वाढलेला. आता तर पावसापूर्वीची कामेही संपलेली. मग मात्र सारखी मनाची हुरहूर सुरू.
जरा पान हलले की पावसाच्या आगमनाचा भास व्हावा. आवाज करीत रस्त्यावरून बुलेट गेली की, ढगांचा गडगडाट वाटावा. कुठे वाढदिवसाचे फटाके फुटावेत अन् आपल्याला विजेचा चकचकाट आठवावा. एकंदर काय घामाच्या पावळ्या असह्य होऊन नळ्यांमधून गळणाऱ्या पावसाच्या अनंत, थंडगार, निरंतर पावळ्या कधी एकदा पाहीन असे आपल्या सर्वांना वाटत राहते. आपली ही अवस्था, तर विचार करा, दिवस-रात्र काबाडकष्ट केलेल्या बळीराजाच्या कुटुंबाची काय अवस्था झाली असावी?
गेला महिनाभर पावसाच्या भरवशावर शेतात उतरावे, नांगर वा ट्रॅक्टर हाती धरून कठीण माती उकरून ठेवावी अन् पावसाने अशी पाठच फिरवावी, ही कसली जिवघेणी मस्करी?
कवी भूषण धनगर यांनी दुष्काळावर
लिहिलेल्या कवितेत ते म्हणतात,
तळपत्या उन्हाने धरती तापली
आभाळातून फक्त आग बरसली
पाण्याच्या थेंबासाठी तहानली माती
भेगाळल्या ओठांनी पहात आहे आकाशी
आपल्या आगमनाने सर्वांना अचंबित करणाऱ्या वरुणराजाने दडी मारणे म्हणजे सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळवण्यासारखे आहे. खासकरून जव्हा कुणी ‘भिवपाची गरज ना’ म्हणते तेव्हा जास्तच भीती वाटते. लढाईमुळे समाजजीवन विस्कळीत व्हावे तसे काहीसे पावसाच्या गैरहजेरीमुळे व्हायला लागले आहे. गोव्याने कधीही न पाहिलेले सर्व आता पाहावे लागत आहे.
उदाहरणार्थ खून, मारामारीसारख्या गुन्ह्यांची मालिका, व्यसनांचा बाजार, अपघातांचा क्रम, पाण्यात बुडून मृत्यू, आत्महत्येच्या घटना, भ्रष्टाचाराची परिसीमा, राज्यकर्त्यांचा निलाजरेपणा. कष्ट न करता मिळणाऱ्या सवलती, मते मिळावीत म्हणून दिलेली प्रलोभने, होऊ घातलेले अधांतरी उपहारगृह, अच्छे दिनांची खैरात आधी कधीच गोव्याने पाहिली नाही. तसाच न पाहिलेला दुष्काळ आपल्याला पाहायला न लागो, ही मनोमन तीव्र इच्छा!
कधी एकदा पावसाची गाणी ऐकेन असे सगळ्यांना वाटते आहे... पाऊस रेंगाळल्यास पाण्याची उणीव अपरिहार्य आहे. मी तर आता ठरवलेय, पाण्याचा वापर निगुतीने करायचा. बागेतील रोपांचा वाढता पसारा आवरता घ्यायचा. त्यांना कमी पाणी घालायचे. कमी वेळा पाणी घालणे यावर भर द्यायचा, गाड्या कमी घ्यायच्या. कमी वेळा धुवायच्या, कमी वेळा फिरवायच्या. घरचा नेहमीचा धोबीघाट कमी करायचा. ‘कमी कपडे’ वापरायचे. साफसफाई करताना ड्रायर वापरायचा. पावसाचे पाणी वापरायचे व जिरवायचे. गाड्या धुताना, आंघोळीसाठी बादलीत पाणी घ्यायचे. बघुया जमतेय का...
पावसासाठी आपण आपली नेहमीची कविता म्हणुया....
पावसाच्या धारा येती झरझरा
झाकोळले नभ सोसाट्याचा वारा...
रस्त्याने ओहळ जाती सळसळ
जागोजागी शेतामध्ये तुडुंबले जळ..
झोंबे अंगा वारा..!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.