

गोवा हा सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि ऐतिहासिक अशा समृद्ध वारशाचा खजिना आहे. अनेक संस्कृतींचा प्रभाव घेऊन तो काळानुसार अधिक रंगतदार झाला आहे. या अनोख्या वारशाचे जतन आणि प्रसार करण्यासाठी’ हेरिटेज फर्स्ट गोवा’ (एचएफजी) १४ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२५ या काळात ‘हेरिटेज फर्स्ट फेस्टिव्हल’ चे आयोजन पुन्हा करत आहे.
३ आठवड्यांच्या या कालावधीत राज्याच्या विविध भागांत होणाऱ्या या उत्सवात गोव्यातील वारशाबद्दल जनजागृती करणार्या आणि माहिती देणार्या विविध भ्रमंती (वॉक) आणि कार्यशाळा आयोजित होणार आहेत.
सुबोध केरकर यांच्यासोबत साळगावमधील गाव-जीवनावर आधारित भ्रमंती, किलियन ह्यूजेस आणि कॅट्रिना फर्नांडिस यांच्यासोबत चोडण बेटावरील खाजन भ्रमंती (ज्यात ऊद आणि खारफूटी जैवविविधतेचे निरीक्षण केले जाईल), सिरिल फर्नांडिस यांच्यासोबत चिखलीमधील प्राचीन गुहा अभ्यासणे आणि प्रीथा सरदेसाईसोबत पणजीतील नाईट वॉक असे रोचक कार्यक्रम असतील.
भ्रमंती व्यतिरिक्त कला आणि वारशाशी संबंधित कार्यशाळांमधून सहभागीना गोव्याच्या परंपरेचा अधिक जवळून अनुभव घेता येईल.
यात दर्पणा आठले सोबत कावी आर्टचे प्रशिक्षण, महालक्ष्मी भोबे यांच्यासोबत कुणबी साडीच्या विणकामाचे प्रात्यक्षिक, मीरा गणपती सोबत पर्राच्या शेतांमधील कविता भ्रमंती सत्र, डॉ. आंतोनिओ मास्करेन्हास आणि गॅब्रिएला डिक्रूझ यांच्यासोबत मिरामार समुद्रकिनार्यावरील वाळू टेकडी बांधणी, अमरीन शेख यांच्या चोडण बेटावरील ‘कम्युनिटी किचन’मध्ये गोमंतकीय खाद्यसंस्कृतीचा अनुभव अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.
हेरिटेज फर्स्ट गोवा’च्या हेता पंडित सांगतात, “गोव्यात वारशाचा आणि संस्कृतीचा अपार साठा आहे पण अनेकांना त्यांच्या स्वतःच्या परिसरापलीकडील गोष्टी माहित नाहीत. या फेस्टिव्हलच्या दुसऱ्या आवृत्तीत आम्ही या अनोख्या वारशावर प्रकाश टाकणार आहोत. विशेषतः तरुण पिढीपर्यंत हा वारसा पोहोचावा आणि त्यातून ते त्याच्याशी जुळले जावेत हेच आमचे उद्दिष्ट आहे.”
या महोत्सवातील प्रत्येक कार्यक्रमासाठी नोंदणी आवश्यक आहे. मर्यादित जागा असल्याने इच्छुकांनी कार्यक्रमाचे आगावू बुकिंग करणे अपेक्षित आहे. प्रत्येक इव्हेंटसाठी अल्प शुल्क आहे.
अधिक माहितीसाठी heritagefirstgoa.com
या वेबसाइटला किंवा @heritagefirstgoa
इंस्टाग्रामला अवश्य भेट द्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.