

महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या कुशीत वसलेले गोवा हे निसर्गसुंदर राज्य, गेल्या काही वर्षांपासून अनियंत्रित विकासाच्या विळख्यात असल्याकारणाने इथले स्थानिक भयग्रस्त झालेले आहेत. त्यांना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा विचार देणाऱ्या धर्मगुरूंची नितांत गरज आहे. ते ओळखून ही धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या काही मोजक्याच धर्मगुरूंमध्ये फादर बिस्मार्क, फादर बोलमॅक्स अशा नावांचा प्रामुख्याने समावेश करावा लागतो.
फादर बोलमॅक्स यांचा जन्म जरी केपे तालुक्यात झाला असला, तरीही ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मगुरू झाल्यानंतर त्यांनी ज्या ज्या ठिकाणी पाय रोवले त्या त्या ठिकाणी ख्रिस्ती धर्म परंपरांच्या विचारांच्या शिकवणीला प्राधान्य दिले. त्याबरोबरच आजच्या काळातील महत्त्वाची पर्यावरण निसर्ग शिक्षणाची गरजही त्यांनी महत्त्वपूर्ण मानली. त्यासाठी त्यांनी केवळ वर्गात उभे राहून वर्णन केले नाही तर शास्त्रशुद्ध आणि त्याचप्रमाणे स्थानिक गरजांनुसार कृती आराखडा निर्माण केला.
गोव्यातल्या खारफुटींची वने, इथल्या पाणथळीच्याच्या जागा, इथले समुद्रकिनारे, इथल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा, इथल्या नद्या यांचे अस्तित्व राहिले पाहिजे, यासाठी लोकसहभागातून त्यांनी जनमानसाला जागृत करण्याचा प्रयत्न केला होता. पणजी आणि मडगाव मार्गावरती असलेल्या कुठ्ठाळी येथील सेंट जोसेप महाविद्यालयात वनस्पतिशास्त्राचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी केवळ विद्यापीठीय स्तरावरचा अभ्यासक्रम मुलांना शिकवला नाही, तर त्या अभ्यासक्रमाबरोबरच कुठ्ठाळी परिसरातील खारफुटीच्या वनस्पती, परिसरातील खाजनशेती, तिथली मत्स्यसंपदा, त्यांचे पर्यावरणीय महत्त्व विशद करून सांगितले.
तिथे निर्माण झालेल्या समस्या आणि त्याचे निराकरण करण्यासाठी तरुणाई म्हणून आपण काय करू शकतो, यासाठी कृती कार्यक्रम आरंभला. त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या मुलांना पश्चिम किनारपट्टीवरच्या जैवविविधतेचे महत्त्व पटवून सांगितले त्याचप्रमाणे गोव्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले. ‘जर सह्याद्रीचे अस्तित्व राहिले नाही, तिथले पट्टेरी वाघ सुरक्षित राहिले नाहीत, तर कसं होणार?’ असा प्रश्न ते विचारत. आगशी येथील एका कार्यक्रमात ‘किड्स फॉर टायगर’ या उपक्रमामध्ये बोलताना त्यांनी प्रामुख्याने हाच मुद्दा मांडला होता.
वाघ अन्नसाखळीतील शिखरावरचा प्राणी आहे. त्याचं संवर्धन झालं तरच जंगलांचे अस्तित्व टिकेल. जंगले सुरक्षित राहिली तरच तिथली माती सुरक्षित राहील आणि माती सुरक्षित राहिली तर नदीमध्ये गाळ वाहून येणं थांबेल. त्यामुळे ती पात्र उथळवून दगड गोटे यांचे अस्तित्व सुरक्षित राहील. आणि ही सगळी साखळी सुरक्षित राहिली तरच मत्स्यबीज, पेयजल-सिंचन यासाठी जल आणि परिसंस्थेसाठी आवश्यक असणारे पाणी याची प्राप्ती होणार. म्हणून विद्यार्थ्यांना त्यांनी कधी म्हादईचा अभ्यासदौऱ्यावर पाठवलं, तर कधी आपणच प्रत्यक्ष तेथील संशोधकांकडून माहिती घेण्यासाठी प्रयत्न केले.
शैक्षणिक सिद्धांत चार भिंतीच्या आत, वर्गात मुलांना समजावून देण्याऐवजी, जर ते चांगल्या प्रकारे मुलांना सांगायचे असतील ते प्रत्यक्षात प्राध्यापकांनी, त्या स्थळी जाऊन स्पष्ट करण्याचे प्रयत्न करायला हवेत, तरच मुलांना त्याचे अवलोकन प्रभावीपणे होऊ शकते, असे त्यांचे मत होते. त्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ खारफुटीच्या जंगलातून भ्रमंती करण्यासाठी प्रवृत्त केले नाही, तर त्या ठिकाणचा प्लास्टिक आणि तत्सम घातक कचरा गोळा करण्यासाठीची शिकवण दिली. ज्या ज्या ठिकाणी जायचे त्या त्या ठिकाणी समाजाला केवळ रस्त्यावर येण्याऐवजी पहिल्यांदा त्या समस्यांच्या समग्र अंगाना भिडून अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करायचे.
तेथील जैवसंपदा, तेथील निसर्ग, तेथील पर्यावरण यांचे रक्षण करण्यासाठी आपण त्या परिसरात कोणते योगदान करू शकतो? ते केल्यानंतरही जेव्हा एखादी समस्या गंभीर बनली तर त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे, हे त्यांनी निर्भयतेने मांडले. ते समस्येला, संघर्षाना निर्भयपणे भिडत असत. त्यासाठी कोणत्याही पक्ष प्रलोभनाची, कोणत्याही धमक्यांची त्यांना भीती नसायची. म्हणूनच निश्चितपणे असे म्हणता येईल की, निर्भयता म्हणजेच फादर बोलमॅक्स!
म्हादई पात्रात जेव्हा त्यांनी सफर केली होती त्या सफरीमध्ये खळखळत्या त्या पाण्यामध्ये पाय घातले, त्यावेळी आपण एक धर्मगुरू आहे आणि कार्यक्रमाचा वेळ संपत आलेला आहे, सूर्य मावळतीला पोहोचला आहे याचे भानही त्यांना राहिले नाही. आपण एका मातेच्या हृदयमंदिरी प्रवेश केला आहे, तिचे अंतरंग आपण जाणून घेतले पाहिजे यासाठी ते त्या ठिकाणी काही क्षण आपले अस्तित्व हरवून उभे राहिले. आपली गोमंतकाची एकमेव प्राणदायिनी मांडवी म्हणजेच म्हादई! तिचे अस्तित्व कर्नाटकाच्या पाशातून, वेगवेगळ्या समस्यांतून मुक्त करण्याची आपली सगळ्यांची जबाबदारी आहे.
म्हादई वाचवायची असेल तर गोवा व्याघ्र राखीव क्षेत्र हा एक समर्थ पर्याय होऊ शकतो, हे त्यांना कळले, तेव्हा त्यांनी हिरिरीने त्याचे समर्थन करण्यासाठी आपले बरेच दिवस खर्ची घातले. हिरवळीच्या विचाराने, कृतीने झपाटलेले धर्मगुरू, हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच गोव्याला लाभले. त्यातले तिसवाडीतील सांतइस्तेव्ह बेटावरचे फादर बिस्मार्क, केपे तालुक्यातील परंतु चिखली या ठिकाणी धर्मगुरू म्हणून कार्यरत असणारे फादर बोलमॅक्स आणि यापूर्वी फादर पिलार सोसायटीच्या भिरोंडा येथील फार्ममध्ये कार्यरत असणारे फादर ईनासिओ अल्मेदा..
आज तिन्ही धर्मगुरू ईशचरणी लीन झालेले आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहायची असेल तर त्यांनी ज्या पर्यावरण संरक्षणाच्या विचारांसाठी, ज्या कृतीसाठी आपले उभे आयुष्य वेचले, त्या विचारांना पुढे घेऊन जाणारे युवक व कृतिशील युवापिढी आपल्याला घडवावी लागेल. या त्रयीसारखे धर्मगुरू, विचारवंत, युवक, विद्यार्थी, राजकीय नेते यांची फळी गोव्यामध्ये तयार झाली पाहिजे. त्यांनी स्वयंपूर्ण गोवा उभारण्याचा संकल्प केला तरच निश्चितपणे आपल्या हरित गोव्याचे स्वप्न साकार होईल. आगामी पर्यावरणीय समस्यांतून गोव्याच्या अस्तित्व टिकवणे शक्य होईल. तीच खरी फादर बोलमॅक्स या हरित धर्मगुरूंना श्रद्धांजली ठरेल!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.