Goa Opinion: राज्यात मुली, महिला सुरक्षित आहेत का?

Women safety in goa: सोहम नाईक लैंगिक शोषण प्रकरण आणखी काही दिवसांनी असेच पडद्याआड जाईल. प्रश्‍न उरेल तो मुलींच्या, महिलांच्या सुरक्षिततेचा.
Women safety in goa
Women safety in goaDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

सध्या कुडचड्याचे सोहम नाईक लैंगिक शोषण प्रकरण गाजते आहे. पैसा व सत्तेच्या जोरावर आज काहीही होऊ शकते हे सिद्ध करणारे हे प्रकरण. मात्र अशा प्रकारचे हे पहिलेच प्रकरण नव्हे आणि शेवटचे तर नव्हेच नव्हे.

हे प्रकरण गाजत असताना एका शॉपिंग सेंटरमध्ये कोणा एका ६२ वर्षीय इसमाने दोन चिमुरड्या मुलींसमोर केलेले अश्लील चाळे उघडकीला आले आहेत. असे कितीतरी सोहम आज गावागावांत सापडतील. आपल्या पैशाचा, पोझिशनचा वापर करून मुलींना जाळ्यात पकडणाऱ्यांची आज कमी नाही.

मात्र सगळ्याच मुली अशा धनदांडग्याची तक्रार करायला पुढे येतात असेही नाही. आपली अब्रू जाईल, पुढे आपले लग्न होणार नाही हा विचार करून त्या मुली व त्यांचे पालक पुढे सरायला धजावत नाहीत. आणि याचाच फायदा हे शोषण करणारे लोक घेत असतात.

काही प्रकरणे पैशाने मिटवली जातात, तर काही राजकीय दबाव आणून तडीस लावली जातात. ही एक प्रकारची विकृती असून ती सध्या पैसेवाल्यांच्या संततीत फोफावताना दिसत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे अर्थातच पैशांचा प्रभाव, ‘पैसा फेको तमाशा देखो’ ही वृत्ती.

हाही एक गुन्हेगारीचाच प्रकार. पण ही गुन्हेगारी ’छुपी’ असते. या सोहम प्रकरणासारखी क्वचितच ही गुन्हेगारी प्रकाशात येत असते. शंभरातले एखादे प्रकरण चव्हाट्यावर येणे आणि उरलेली ९९ प्रकरणे अंधारात लुप्त होणे हा या गुन्हेगारीचा खाक्या.

अशी प्रकरणे शोधायला गेल्यास शेकड्यांनी सापडतील. अशा प्रकरणात त्या युवकाचे पोझिशन म्हणा वा सांपत्तिक स्थिती म्हणा बघून मुली भुलत असतात. तेव्हा त्यांना धोक्याचा खड्डा दिसत नसतो. मग या आकर्षणापोटी त्या आपले सर्वस्व गमावून बसतात. आणि नंतर जेव्हा खऱ्या परिस्थितीची जाणीव होते तेव्हा फार उशीर झालेला असतो.

पालकांना तर बऱ्याच वेळा आपला पाल्य काय करतो किंवा करते हेसुद्धा माहीत नसते. नंतर प्रकरण गळ्याशी आल्यावर त्यांना जाग येत असते. नंतर मग अब्रू, लोकलज्जा, समाज अशी अनेक कुंपणे त्यांना दिसायला लागतात.

आणि ही कुंपणे ओलांडण्याची शक्ती नसल्यामुळे अशी प्रकरणे पडद्याआडच राहतात. मग अशा गुन्हेगारीचा फैलाव व्हायला लागतो. यामुळेच मग या प्रकरणाला जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित व्हायला लागतो.. जाळे टाकणारा का जाळ्यात सापडणारा हाही प्रश्न निर्माण होतो. या प्रकरणात अल्पवयीन मुली असल्यामुळे तर हा प्रश्न अधिकच गंभीर होतो.

अल्पवयीन मुलींची जबाबदारी पालकांवर असते. त्यामुळे अशा प्रकरणाला अप्रत्यक्षरीत्या तेही जबाबदार ठरू शकतात. असे अनेक कंगोरे या प्रकरणाला प्राप्त झाले आहेत. त्याचबरोबर आणखी एक प्रश्न उपस्थित होतो आणि तो म्हणजे राज्यात महिला सुरक्षित आहे की नाही हा!

एक युवक गेली तीन वर्षे अल्पवयीन मुलींचे शोषण करतो पण त्याच्यावर कारवाई होत नाही, मुख्य म्हणजे त्याच्याविरुद्ध इतके दिवस तक्रारही केली जात नाही. याचा अर्थ जनतेचा पोलिसांवर विश्वास राहिला नाही असाही होऊ शकतो. अब्रू हा एक मुद्दा झालाच पण त्याचबरोबर मोठ्या वजनदार माणसांच्या मुलांवर कारवाई करायला पोलीस कचरतात ही समजूतही महत्त्वाचा मुद्दा ठरू शकते. आणि ते काही अंशी खरेही आहे.

मागे बाणस्तारी इथे झालेला अपघातात वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे तीन निरपराध माणसांचा बळी गेला होता. त्यावेळी हे प्रकरण फार गाजले होते. पण आज हे प्रकरण विस्मृतीच्या पडद्याआड गेले आहे.

म्हणजे ‘शेळी जाते जिवानीशी खाणारा म्हणतो वातड’ तशातला हा प्रकार. पूजा नाईक नोकरभरती प्रकरण, हल्लीच प्रकाशात आलेले कला अकादमीचे परीक्षक लाच प्रकरण अशी राज्यातली अनेक प्रकरणे तेवढ्यापुरती गाजली आणि नंतर पडद्याआड गेली किंवा जात आहेत.

आता हे सोहम नाईक लैंगिक शोषण प्रकरण आणखी काही दिवसांनी असेच पडद्याआड जाईल आणि लोक विसरूनही जातील. ‘पीपल हॅव शॉर्ट मेमरीज’ ही इंग्रजी उक्ती हेच सांगते. लोक काय चार दिवस बोलतील आणि नंतर विसरून जातील हे माहीत असल्यामुळेच असल्या प्रकारचे गुन्हे घडत असतात.

Women safety in goa
अग्रलेख: पीडितांच्या पालकांची काय स्थिती झाली असेल, याची त्यांना कणव का येऊ नये? 'आपला तो बाब्या?'

अशा गुन्हेगारांचे हात वरपर्यंत असल्यामुळे त्यांना पोलीस, शासन यांना कसे मॅनेज करायचे हे चांगले ठाऊक असते. पण यात सर्वात जास्त अधोरेखित होतो तो म्हणजे मुलींच्या, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न.

गेल्या तीन महिन्यांत मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या ३४ घटना घडल्याची नोंद झाली आहे. त्याशिवाय नोंद न झालेली आणखी अशा प्रकारची किती तरी प्रकरणे असू शकतात. आणि शासन जोपर्यंत डोळ्यावर कातडे ओढून बसणार आहे तोपर्यंत अशी प्रकरणे मागच्या पानावरून पुढे चालूच राहणार आहेत.

Women safety in goa
Goa Politics: खरी कुजबुज; आधी घ्यायचा फायदा; नंतर...!

सोहम नाईक प्रकरण हे हिमनगाचे एक टोक आहे. आता यातून मुली, त्यांचे पालक व शासन काय धडा घेते यावरच अशा प्रकारच्या ’शोषणा’चे भवितव्य अवलंबून असणार आहे हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com