

सध्या ‘जेन झी’ हा शब्द सर्वत्र गाजतो आहे. हा शब्द असाच अचानक रूढ झालेला नाही. त्यामागे एक इतिहास आहे. परदेशात विशिष्ट काळात जन्मलेल्या पिढ्यांना काही नावे देण्यात आली आहेत. पहिले आणि दुसरे महायुद्ध यांच्या दरम्यान, म्हणजे १९२८ ते १९४५ या काळात जन्मलेल्या पिढीला ‘सायलेंट जनरेशन’ असे नाव देण्यात आले. या पिढीला ‘प्रगल्भ पिढी’ किंवा ‘परंपरावादी पिढी’ असेही म्हटले जाते.
दुसऱ्या महायुद्धानंतर, म्हणजे १९४६ पासून जगात शांतता आणि स्थैर्य निर्माण होऊ लागले. दोन्ही महायुद्धांमध्ये झालेल्या नुकसानीतून जग सावरू लागले. लोक घरे बांधू लागले. विवाह होऊ लागले. सर्व काही स्थिरस्थावर होऊ लागले. जीवनाला एक गती मिळाली. जीवनाला लय आणि दिशा प्राप्त झाली. अशा काळात मुलांच्या जन्माचे प्रमाण अचानक वाढले. प्रामुख्याने युरोपीय देशांमध्ये आणि अमेरिकेत (America) ही घटना घडू लागली. त्यामुळे १९४६ ते १९६४ या काळात जन्मलेल्या पिढीला ‘बेबी बूमर्स’असे नाव पडले.
१९६५ ते १९८० या काळात जन्मलेली पिढी म्हणजे ‘जनरेशन एक्स’. १९८१ ते १९९६ या काळात जन्मलेली पिढी म्हणजे ‘जनरेशन वाय’. आणि आज सर्वत्र गाजत असलेली ‘जेन झी’ म्हणजे १९९७ ते २०१२ या काळात जन्मलेली पिढी. आज या पिढीतील व्यक्तींचे वय साधारणतः १४ ते २९ वर्षे आहे. २०१३ ते २०२४ या काळात जन्मलेल्या पिढीला ‘जनरेशन अल्फा’ असे म्हणतात. २०२५ नंतर जन्मलेल्या पिढीला ‘जनरेशन बीटा’ असे नाव देण्यात आले आहे.
‘जेन झी’ हा शब्द आपल्या शेजारच्या नेपाळ देशात अचानक आणि नाट्यमयरीत्या प्रसिद्ध झाला. ८ सप्टेंबर २०२५ रोजी नेपाळमधील तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. त्यामागचे तात्कालिक कारण होते सरकारने घातलेली समाजमाध्यमांवरील बंदी. मात्र, लवकरच या आंदोलनाचे स्वरूप बदलले. सरकारमधील भ्रष्टाचार, जबाबदारी न स्वीकारणारे सरकार आणि बेरोजगारी अशा मुद्द्यांविरोधात आंदोलन सुरू झाले.
या आंदोलनाने पुढे उग्र स्वरूप धारण केले आणि हिंसाचार सुरू झाला. त्या वेळच्या सरकारने आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. तोडफोड, जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्यात ७२ नागरिकांचा मृत्यू झाला आणि दोन हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने के. पी. शर्मा ओली यांच्या सरकारला अखेर पायउतार व्हावे लागले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत २७ मार्च २०२६ रोजी ३६ वर्षीय बालेन शाह पंतप्रधान झाले. अशा प्रकारे ‘जनरेशन झी’ची चर्चा जगभर झाली.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशातील विरोधी पक्षांनाही उत्साह आला. केवळ मतपेटीतून आपण सरकारला सत्तेवरून खाली खेचू शकत नाही, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे त्यांनी भारतातील ‘जेन झी’ला आवाहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. तरीही प्रयत्न सुरूच होते. आणि अचानक एक ठिणगी पडली.
१५ मे २०२६ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी एका खटल्याच्या संदर्भात तरुणांविषयी एक टिप्पणी केली. रोजगार मिळत नसलेले किंवा व्यवसायात संधी न मिळालेले काही तरुण समाजमाध्यमे आणि माहिती अधिकारासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होतात, असे त्यांनी म्हटले. या तरुणांची तुलना त्यांनी झुरळांशी केली, असा अर्थ घेतला गेला. त्यानंतर प्रतिक्रियांचा भडका उडाला. उच्च पदावरील मान्यवर व्यक्तींनी अशा प्रकारची विशेषणे वापरणे योग्य नाही, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
या विधानामुळे तरुणवर्ग दुखावला गेला. १६ मे २०२६ रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आपले विधान मागे घेतले आणि आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगितले. पुढे जे घडायचे ते घडलेच! आम आदमी पक्षाचे माजी सदस्य अभिजित दीपके, जे अमेरिकेतील बोस्टन येथे शिक्षण घेत होते, त्यांनी तातडीने समाजमाध्यमांवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या पक्षाची घोषणा केली. एका तासाच्या आत या घोषणेला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले.
त्याच वेळी नीट परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना घडली आणि सरकारसमोरील अडचणी आणखी वाढल्या. ६ जून २०२६ रोजी या ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या सदस्यांनी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलन केले. या आंदोलकांची प्रमुख मागणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही होती.
समाजमाध्यमांवरून व्यक्त होणाऱ्या तीव्र प्रतिक्रिया, टीका आणि उपरोधिक भाषेमुळे दिल्लीत मोठी खळबळ उडाली. अखेर २५ जुलै २०२६ रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि हे आंदोलन संपुष्टात आले. या दरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. मारामाऱ्या झाल्या. संसदेवर मोर्चा नेण्यात आला. सरकारच्या प्रतिमेला काही प्रमाणात धक्का बसला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात फारसे कामकाज होऊ शकले नाही. विरोधकांचा गोंधळ वाढला. या ‘जनरेशन झी’ आंदोलनानंतर देशभरातील तरुणांना नवी ऊर्जा मिळाली. शिक्षणक्षेत्रातील अनागोंदी कारभाराविरोधात त्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली. सरकारलाही काही प्रमाणात नमते घ्यावे लागले. आता तर मुख्य निर्वाचन आयुक्त ज्ञानेशकुमार आणि ‘एसआयआर’ विरोधात आंदोलन उभे झाले आहे. पुढचा काळ हा अश्या आंदोलनाच असणार यात शंका नाही.
‘बेबी बूमर्स’ म्हणजे १९४६ ते १९६४ या काळात जन्मलेली पिढी. आज या पिढीतील व्यक्तींचे वय साधारणतः ६२ ते ८० वर्षे आहे. ही माझी पिढी आहे. माझ्या मते, सर्व पिढ्यांमध्ये माझी पिढी सर्वांत भाग्यवान आहे. या पिढीने पेट्रोलच्या दिव्यापासून आजच्या एलईडी दिव्यांपर्यंतचा प्रवास पाहिला. कृष्णधवल दूरचित्रवाणी पाहिली, नंतर रंगीत टीव्ही पाहिला आणि त्यानंतर एलईडी टीव्हीही अनुभवला. नाणी टाकून चालणारे टेलिफोन पाहिले. पेजर पाहिले. नोकियाचे वितभर लांबीचे मोबाइल पाहिले आणि आता फोल्डेबल मोबाइलही पाहत आहोत..
या पिढीने रेडिओ पाहिला, कॅसेट प्लेयर पाहिला, सीडी पाहिली. संगणक पाहिले, लॅपटॉप पाहिले आणि टॅबलेटही पाहिले. कोळशावर चालणाऱ्या रेल्वेपासून मेट्रोपर्यंतचा प्रवास आम्ही अनुभवला. आमच्या पिढीने गरिबी पाहिली आणि त्यानंतर आलेली समृद्धीही अनुभवली. सुरुवातीला मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषा शिकल्या. त्यानंतर इंग्रजीचे शिक्षण घेतले. अशा प्रकारे वेगवेगळ्या शैक्षणिक जगांचा समतोल अनुभवला.
आम्ही आल्फियादही (शिंपी) पाहिले. ऑनलाइन पँट, शर्ट, कुर्ते आणि सदरे मागवण्यापूर्वीचा काळही अनुभवला. कित्येक किलोमीटर चालत जाऊन भाजीपाला आणि मासे खरेदी करून आणले. आता मात्र मोबाइलवरील एक बटण दाबले की दहा मिनिटांत सर्व सामान घरापर्यंत पोहोचते! त्यानंतर फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टाग्राम आले. व्हॉट्सॲपवर आमच्या वयाचे लाखो लोक आपला वेळ घालवू लागले. यूट्यूबमुळे संगीत, चित्रपट आणि मालिकांचे जग हाताच्या मुठीत आले. खरोखरच, ‘कर दो दुनिया मुट्ठी में’ ही जाहिरातीतील कल्पना प्रत्यक्षात उतरली! आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय आणि चॅटजीपीटीची क्रांती सुरू झाली आहे. यापुढे आणखी काय काय पाहायला मिळणार, हे त्या परमेश्वरालाच माहीत!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.