Gen Z Protests India: जेन झी... नेमके कोण?

Indian Youth Achievements: भारताला तरुणांची कोणतीही समस्या नाही, समाज गोंधळाकडेच जास्त आकर्षित होतो.
Indian Youth Achievements
Gen Z Protests IndiaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

कविता आमोणकर

भारताला तरुणांची कोणतीही समस्या नाही, समाज गोंधळाकडेच जास्त आकर्षित होतो. तो वादांना प्रसिद्धी देतो, तर त्याच वेळी दुसरीकडे संपूर्ण एक पिढी देशसेवेसाठी, विज्ञानासाठी आणि खेळांसाठी आकाशाला गवसणी घालण्याची तयारी करत असते, ज्याकडे दुर्लक्ष होते. म्हणून, या मोजक्या लोकांच्या वागण्याला विरोध करा, त्यांच्या द्वेषाच्या राजकारणाला नकार द्या आणि खऱ्या तरुणांच्या पाठीशी उभे राहा.

​आजकाल सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर नजर टाकल्यास एक अत्यंत चुकीचा संदेश वारंवार दिला जातो.. तो असा, की आजची तरुण पिढी म्हणजे केवळ निदर्शने, घोषणाबाजी, तोडफोड, अर्वाच्य अशी शिवीगाळ आणि अराजकता... गेल्या काही दिवसांत देशात घडलेल्या काही घटनांच्या आधारे संपूर्ण Gen Z पिढीला एकाच पारड्यात मोजले जात आहे. मात्र, वास्तव पूर्णपणे वेगळे आहे. जंतरमंतरवर किंवा इतरत्र काही मोजक्या लोकांनी केलेल्या अयोग्य वर्तनावरून संपूर्ण तरुण पिढीला दोष देणे अत्यंत चुकीचे ठरेल. काही उपद्रवी घटकांमुळे देशाचे भवितव्य ठरवणाऱ्या कोट्यवधी होतकरू तरुणांकडे दुर्लक्ष करता कामा नये.

Indian Youth Achievements
Goa Politics: राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिथून, तिथेच मिकी पाशेको यांची वापसी; 2027 ची निवडणूक बाणावलीतून लढवणार!

गेल्या काही दिवसांत काही लोकांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले, हुल्लडबाजी केली, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व त्यांच्या मानसिकतेचा परिचय दिला. त्यांना ‘Gen Z चा आवाज’ म्हणून प्रोजेक्ट केले गेले. पण प्रश्न हा पडतो की, अतिशय घाणेरड्या आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणारे, बॅरिकेड्स तोडणारे हे लोक खरोखरच भारताच्या कोट्यवधी तरुणांचे प्रतिनिधित्व करतात का? याचे उत्तर स्पष्टपणे ‘नाही’ असे आहे. कारण एका बाजूला हा गदारोळ सुरू असताना, दुसरीकडे भारताचे खरे Gen Z तरुण आपल्या कर्तृत्वाने जगावर भारताचा झेंडा रोवत होते!..

​कॅमेऱ्याच्या पलिकडचे खरे विश्व आणि कर्तृत्व सांगायचे तर, ग्लास्गो येथील स्पर्धेत भारताच्या युवा खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकांची लयलूट केली. शर्मिला धनकर, दिलीप महादू गावित, ज्ञानेश्वरी यादव, गुलवीर सिंग, मुरली श्रीशंकर यांसारख्या खेळाडूंनी भारताचा तिरंगा जगात उंच फडकवला. त्यांच्या या यशात कोणताही गोंधळ नव्हता, तर घाम गाळत मिळवलेली जिद्द होती आणि डोळ्यांत आनंदाचे अश्रू होते. यानंतर आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये अबेल जॉर्ज, आरव गुप्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुवर्ण व रौप्य पदके जिंकून भारताची बुद्धिमत्ता सिद्ध केली.

खेळांच्या आणि शिक्षणाच्या क्षेत्रापलीकडे जाऊन पाहिले, तर बुद्धिबळात डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद, दिव्या देशमुख, आणि इतर क्रीडा प्रकारांत नीरज चोप्रा, अंतिम पंघाल यांसारखे तरुण जागतिक पातळीवर भारताचे नाव उज्ज्वल करत आहेत. इतकेच नव्हे, तर तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रातही ही पिढी क्रांती घडवत आहे. भारतातील तरुण आज स्वतःचे उपग्रह बनवत आहेत, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित करत आहेत, सेमिकंडक्टर निर्मितीमध्ये हातभार लावत आहेत आणि अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्स उभारत आहेत. ज्या जटिल समस्या समजून घेणेही अनेकांसाठी कठीण असते, त्या समस्या हे तरुण लिलया सोडवत आहेत.

Indian Youth Achievements
Goa Politics: पार्सेकरांची भाजपमध्ये लवकरच घरवापसी? उत्पल पर्रीकरही पुनर्प्रवेशाच्या विचारात; मांद्रे-पणजीच्या राजकीय समीकरणांची चर्चा

आजचा खरा तरुण आळशी नाही, आपली संस्कृती विसरलेला नाही किंवा विनाकारण रागावून शिवीगाळ, हाणामारी ही करत नाही. एकमेकांवर घाणेरडे, बिनबुडाचे आरोप करत नाही. तो सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करून देशाची संपत्ती नष्ट करत नाही, अतिशय घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत नाही, किंवा हाणामारी करून आपल्याच देशाचे नुकसान ही करत नाही. आजचा खरा तरुण हा तंत्रज्ञानात पारंगत आहे, जागतिक स्पर्धेत टिकणारा आहे आणि मोठी स्वप्ने पाहणारा आहे.

जे लोक हातात फलक घेऊन फक्त गोंधळ घालतात आणि काही लाइक्स किंवा फॉलोअर्ससाठी देशाचा अपमान करतात, ते Gen Z नसून ‘Generation Zombie’ आहेत, असे म्हटले तर ते काही वावगे ठरणार नाही. ते केवळ प्रसिद्धीच्या भुकेले आहेत. जे देशाच्या संपत्तीची, मालमत्तेची नासधूस करतात, संस्कृतीची जाण न ठेवता तोडफोड करत हिडीस-फिडीस हावभाव करत शिव्या घालतात, ते देशाचे रक्षक कसे होऊ शकतात?

​आज आपल्या देशात खऱ्या अर्थाने समस्येची दिशा चुकलेली आहे. भारताला तरुणांची कोणतीही समस्या नाही, समाज गोंधळाकडेच जास्त आकर्षित होतो. तो वादांना प्रसिद्धी देतो, तर त्याच वेळी दुसरीकडे संपूर्ण एक पिढी देशसेवेसाठी, विज्ञानासाठी आणि खेळांसाठी आकाशाला गवसणी घालण्याची तयारी करत असते, ज्याकडे दुर्लक्ष होते. म्हणून, या मोजक्या लोकांच्या वागण्याला विरोध करा, त्यांच्या द्वेषाच्या राजकारणाला नकार द्या आणि खऱ्या तरुणांच्या पाठीशी उभे राहा. कारण भारताचे भविष्य हे रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्यांमध्ये नाही, तर विज्ञानाची कास धरून, क्रीडांगणावर घाम गाळत तिरंगा फडकवणाऱ्या या तरुण पिढीत दडलेले आहे!‘

Indian Youth Achievements
Leopard Cat Goa: छोट्याशा तळ्याने जंगलातील दुर्मीळ पाहुण्याला आणले कॅमेऱ्यासमोर; गोव्यात बिबटमांजराचे प्रथमच चित्रीकरण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com