

काणकोण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (28 नोव्हेंबर) गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या 550व्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात बोलताना गोव्याच्या भूमीचे आणि मठाच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. गोव्याची भूमी आणि येथील अध्यात्मिक संस्था विकसित भारताच्या दिशेने देशाला पुढे नेण्यास मदत करत आहेत, असे गौरवपूर्ण उद्गार त्यांनी काढले.
पंतप्रधान मोदी यांनी गोव्याच्या भूमीचा आपल्या वैयक्तिक जीवनातील आणि राष्ट्रीय कार्यात असलेल्या योगदानाबद्दल भावनिक उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले, "स्वामीजींनी माझे कौतुक केले आणि अनेक गोष्टींचे श्रेय मला दिले, पण हे माझ्यामुळे नाही तर 140 कोटी भारतीयांमुळे आहे." परंतु, त्याचवेळी त्यांनी गोव्याच्या भूमीचे विशेष महत्त्व सांगितले. पंतप्रधान म्हणाले, "माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या (Goa) या भूमीनेच मला मार्गदर्शन केले."
पंतप्रधान मोदींच्या मते, श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठासारख्या संस्था केवळ धार्मिक कार्य करत नाहीत, तर त्या राष्ट्र उभारणीमध्ये सक्रिय भूमिका निभावतात. "गोव्याची भूमी आणि हा मठ भारताला (India) विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने पुढे नेण्यास मदत करत आहेत," असे पंतप्रधान म्हणाले. याचा अर्थ असा की, मठाची अध्यात्मिक परंपरा आणि सांस्कृतिक मूल्ये देशाला एकत्र आणून प्रगतीसाठी ऊर्जा देत आहेत. मठांनी 550 वर्षांच्या परंपरेत समाजाला एकसंध ठेवले ही एकताच राष्ट्राच्या समृद्धीसाठी गरजेची आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यामुळे गोव्यातील धार्मिक आणि सांस्कृतिक संस्थांचे महत्त्व राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.