

पणजी: वन्य जीवांसाठी पाण्याची सोय करण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या छोट्याशा कृत्रिम तळ्यामुळे गोव्यातील वन्यजीव संशोधनात महत्त्वाची भर पडली आहे. भगवान महावीर वन्यजीव अभयारण्याजवळील जंगलात उभारलेल्या या तळ्याजवळ लावलेल्या स्वयंचलित कॅमेऱ्यात प्रथमच बिबटमांजराचे छायाचित्रात्मक दस्तऐवजीकरण झाले. अक्शिता पुंगालिया आणि अतुल बोरकर या दोन संशोधकांनी केलेल्या प्रयोगातून ही महत्त्वपूर्ण नोंद समोर आली आहे.
‘द बेटर इंडिया’ संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मध्यरात्री १२ वाजून ५४ मिनिटांनी हे बिबटमांजर पाणी पिण्यासाठी तळ्याजवळ आले. त्यावेळी तेथे बसविलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये त्याच्या हालचाली टिपल्या गेल्या. कॅमेऱ्यात या प्राण्याच्या पाच छोट्या व्हिडिओ चित्रफिती नोंदल्या गेल्या. गोव्यात या प्रजातीच्या अस्तित्वाची ही पहिली छायाचित्रात्मक नोंद असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष ‘कॅट न्यूज’ या आययूसीएनच्या प्रजाती संवर्धन आयोगाशी संबंधित प्रकाशनात प्रसिद्ध झाले होते.
भगवान महावीर अभयारण्याला लागून असलेल्या खासगी वनक्षेत्रातून वाहणारा एक नैसर्गिक झरा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात आटत असे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला वन्य प्राण्यांसाठी पाण्याचे स्रोत कमी होत होते. या समस्येवर उपाय शोधतानाच संशोधकांनी कृत्रिम तळे तयार करून त्याचा वन्यजीवांना कितपत उपयोग होतो, याचा अभ्यास करण्याचे ठरवले. अक्शिता पुंगालिया आणि अतुल बोरकर यांनी ‘वनसा कन्झर्वेशन फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करून या कामास सुरवात केली.
अनेक वन्यप्राण्यांची नोंद
कृत्रिम तळ्याजवळ बसविलेल्या कॅमेऱ्याद्वारे वर्षभर वन्यजीवांच्या हालचालींचे निरीक्षण करण्यात आले. या अभ्यासात पक्षी, मुंगूस, खारी, गवे, बिबटे आणि इतर वन्यप्राणी तळ्यावर येत असल्याचे आढळले. काही प्राणी वारंवार तिथे येत असल्याने या पाणवठ्याचा त्यांना उपयोग होत असल्याचे संकेत मिळाले. या निरीक्षणातून बिबटमांजराची नोंद होणे हा संशोधनातील अनपेक्षित आणि महत्त्वाचा टप्पा ठरला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.