

Ajit Pawar Political Journey Maharashtra
प्रस्थापित राजकारणी पोटात एक दडवतात आणि तोंडावाटे दुसरेच बोलतात, हा जनतेचा अनुभव. अजितदादा या अनुभवाला छेद देणारे राजकारणी होते. जे पोटात तेच बोलून रिकामे होणारे. नुसते बोलून न थांबता आवश्यक तिथे कृती करणारे. कृतीसाठी सारे प्रशासन कामाला जुंपणारे. त्यामुळेच, सरकारवर आणि प्रशासनावर पकड असणारा नेता, असे त्यांच्याबद्दल बोलले जायचे. अशी पद्धत अंगी रुजवण्यासाठी लागणारा सर्व प्रकारचा अनुभव त्यांनी चार दशकांच्या प्रवासात जमा केला होता. गेल्या अडीच दशकांतील अजित पवार विशिष्ट पद्धतीने घडत गेले होते.
ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पंखाखाली सुरू झालेला अजितदादांचा प्रवास गेल्या दीड दशकांत टप्प्याटप्प्यांनी स्वतंत्र नेतृत्वाकडे होत गेला. राजकारणात ग्रामपंचायत अथवा पालिका- महापालिका ते संसद असा प्रवास करण्याकडे बहुतांश; नव्हे साऱ्याच नेत्यांचा कल असतो. अजित पवार त्याला अपवाद होते. खासदारकीचा प्रवास १९९१मध्ये वयाच्या ३२व्या वर्षीच केला आणि त्यानंतरच्या काही महिन्यांत ते महाराष्ट्रात परतले आणि महाराष्ट्रातच रमले. १९९० ते २००४ या कालखंडात शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेत्यांची एक अख्खी पिढी तयार झाली. अजितदादा या पिढीचे प्रतिनिधी होते.
महाराष्ट्रात १९९५ मध्ये पहिल्यांदाच सत्तारूढ झालेल्या काँग्रेसेतर युती सरकारच्या काळात विधिमंडळात विरोधी पक्षाची खिंड लढवणाऱ्यांमध्ये आर. आर. पाटील, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील अशी आघाडीची नावे होती. हे सारे नेते तेव्हा वयाच्या चाळीशीच्या आत-बाहेर होते. पुढच्या तीन दशकांतही याच नेत्यांची नावे चमकत राहिली, हे विशेष. अजित पवारांनी राज्याचे अर्थमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद प्रदीर्घकाळ सांभाळले. चारवेळा उपमुख्यमंत्रीपदापर्यंतच घोडे अडले, आता मुख्यमंत्री केव्हा होणार हा प्रश्न अजितदादांना अनेकांनी अनेकदा विचारला आणि त्यांनीही यावर ‘मला मुख्यमंत्री व्हायचंय की’ असे मोकळेढाकळे उत्तर दिले. प्रश्न विचारण्याचा भले खोचक भाव असेल, पण उत्तर देताना राजकीय मर्यादांची पुरेशी जाणीव त्यांना असे, हे त्यांच्या मिश्किलपणातूनही सहज समजून यायचे.
कोणत्याही प्रश्नापासून न पळणारा हा नेता होता. शरद पवारांपासून फारकत घेऊन आणि पुढे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच ताब्यात घेऊन भाजपसोबत सत्तेत बसण्याची त्यांची २०२३ ची खेळी राजकारणाचा चेहरामोहरा बदलणारी ठरली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा धुव्वा उडाला. मात्र, २०२३ ते २०२४ या काळात अजित पवार त्यांच्या नव्या भूमिकेशी ठाम राहिले. ही भूमिका कुणाला आवडो ना आवडो, त्यांनी माघार घेतली नाही. ते जमिनीवर घट्ट पाय रोवून उभे राहिले. आपलीच भूमिका योग्य होती, हे विधानसभा निवडणुकीच्या निकालातून त्यांनी पटवून दिले. अजित पवारांनी केलेली ही काही पहिली राजकीय बंडखोरी नव्हती. त्याआधीही दोनदा अजितदादांनी स्वतंत्र भूमिका घेऊन पाहिली होती.
तत्कालिन परिस्थितीच्या रेट्यापुढे त्यांनी स्वतःच्या महत्त्वाकांक्षांना आवर घातला. भारतीय राजकारणात वरच्या पायऱ्या वयाच्या पन्नाशीनंतर सुरू होतात, वयाच्या सत्तरीपर्यंत या पायऱ्या आणखी उंची गाठतात असे इतिहास सांगतो. अजितदादांनी वयाच्या चाळीशीत वरच्या पायऱ्यांवरून राजकारण सुरू केले. या दृष्टिकोनातून त्यांची महत्वाकांक्षा तपासली, तर ती गैर नाही. वाद उद्भवले, तर माफी मागून विषयावर पडदा टाकून पुन्हा अजित पवार आपल्याच मार्गाने चालू लागत आणि पुन्हा नवे वादविवाद तितक्याच तडफेने अंगावर घेत. वर्तमान राजकीय कसोट्यांवर अनेकदा ते अव्यवहार्य भासत; मात्र त्यांच्या दीर्घकाळच्या राजकारणाकडे पाहिल्यास, ते स्वतःच्या मर्जीने राजकारण करत राहिले, हे लक्षात येते.
ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही राजकारणाचे धागे अजित पवार जुळवू पाहात. बारामती असो किंवा पिंपरी चिंचवड असो, त्यांनी नियोजित नागरीकरणाचे उत्तम धडे महाराष्ट्राला घालून दिले. त्याचवेळी ग्रामीण महाराष्ट्राशी, विशेषतः शेतीशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. कर्जमाफी करू; मात्र कर्जमाफीने शेतीचा प्रश्न सुटणारा नाही, असे सांगण्याचे धाडस राज्यकर्त्यांमध्ये नसते. ते अजितदादांमध्ये होते. शेतीचा प्रश्न सुटायचा असेल, तर बदलते हवामान आणि तंत्रज्ञान वापरून पीक व्यवस्थापन केले पाहिजे याची त्यांना जाणीव होती. शेतीबद्दल जितकी आस्था होती, तितकेच त्यांना पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत जगात सुरू असलेल्या प्रयोगांचे कुतूहल होते. असे प्रयोग काटेकोरपणे राबवण्यावर त्यांचा कटाक्ष असे.
सरकारी इमारतींच्या बांधकामांपासून ते खासगी आस्थापनांच्या प्रकल्पांपर्यंत कुठेही अजित पवार नैसर्गिक कुतूहलाने प्रश्न विचारत आणि प्रसंगी दटावतही. त्यांच्या दटावण्यात आणि आणि उत्तम कामाबद्दल पाठ थोपटण्यातही ‘दादा’पण असायचे. गेल्या पाच वर्षांतील राजकारणात अजित पवार अधिक आक्रमकतेने पुढे येताना दिसले. काँग्रेस ते भाजप अशी सहकारी पक्षांसोबतची बदलती संगत हा त्या आक्रमतेचाच भाग. राजकीय वैचारिकतेशी तडजोडीच्या आरोपांवर उत्तर म्हणूनही अजितदादांनी ही आक्रमकता वापरली. नेतृत्व घडण्यासाठी दशके जावी लागतात. त्यामुळेच अशा नेतृत्वाचे अकाली निधन समाजासाठी मोठी हानी असते. महाराष्ट्राची अशी फार मोठी हानी झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.