दीपमाळ ही गोमंतकातल्या वैविध्यपूर्ण आणि समृद्ध मंदिरांच्या वारशाला लाभलेली विलोभनीय शिल्पकृती आहे. पेडणे ते काणकोणपर्यंत गोव्यात आढळणाऱ्या मंदिरांचा ‘दीपमाळ’ हा अविभाज्य घटक ठरलेला आहे. कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला ही मंदिरांसमोरची दीपमाळ असंख्य दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघते आणि तिचे दर्शन भाविकांना यावेळी लक्षवेधक ठरलेले असते.
आकाशात पौर्णिमेचा चंद्र आपल्या समस्त कलांनी प्रकाशतो आणि त्याचवेळी समोर उभी असलेली दीपमाळ, भाविकांनी लावलेल्या असंख्य मिणमिणत्या पणत्यांनी भाविकांना तेजाचे दर्शन घडवते. मंदिरासमोर दिवे लावण्यासाठी भाविक दगडी स्तंभ उभारत आणि त्यावर जे कोनाडे निर्माण केलेले असत, त्यात उत्सवाच्या प्रसंगी पेटत्या पणत्या ठेवण्याची परंपरा त्यांनी पिढ्यान्पिढ्या श्रद्धापूर्वक जपलेली आहे.
दहा फुटांपेक्षा अधिक उंच असलेली दीपमाळ कधी गोल, कधी षट्कोनी तर कधी अष्टकोनी आकारात निर्माण केली जायची. मंदिरासमोर दीपमाळ उभारण्याची परंपरा कधी निर्माण झाली हे निश्चित सांगता येत नाही. परंतु यादव काळापर्यंतच्या मंदिर शिल्पांत दीपमाळ आढळत नाही. ही परंपरा इसवी सनाच्या तेराव्या शतकानंतर प्रामुख्याने आढळत असल्याचे संशोधकांचे मत आहे.
भारतात इस्लामच्या आक्रमणानंतर जेव्हा मस्जिदींची उभारणी झाली तेव्हा मस्जिदींसमोर मिनारांची उभारणी केली जायची. मिनार शिल्पकृतीच्या अनुकरणातून मंदिरासमोर दीपस्तंभ किंवा दीपमाळ उभारण्याची परंपरा प्रचलित झाली असल्याचे मानले जाते.
महाराष्ट्रात पेशवेपूर्वकाळातल्या मंदिरासमोर ज्या दीपमाळा उभारल्या होत्या, त्या प्रामुख्याने दगडी होत्या आणि विटांचा वापर करूनही दीपमाळा निर्माण केल्या होत्या. काही दीपमाळांची निर्मिती मिनारांसारखी करून, त्या आतून पोकळ असत. त्या पोकळीत वर जाण्यासाठी नागमोडी, जिन्याची उभारणी केली जायची. अशा दीपमाळा मंदिरासमोर बांधण्याचा नवस भाविक करत आणि नवसफेडीसाठी कालांतराने सुबक शिल्पकामाने दीपमाळेची उभारणी करत.
आपल्या आराध्य दैवताच्या कृपेने आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर भाविकांद्वारे कुशल अशा कारागिरांमार्फत दीपमाळेची उभारणी केली जायची. सण-उत्सवप्रसंगी त्या दीपमाळेस दिव्यांची आरास करून सुशोभित केले जात असे. दिवा हा अग्नीचे किंवा तेजाचेच एक रूप असल्याने पूजन परंपरेत दिव्याने स्थान पटकावले. दिव्यात जी वात पेटलेली असते, त्यासाठी प्रारंभी दीपपात्र केले जायचे. अशा पणत्यांना कालांतराने कलाकुसरीद्वारे निरनिराळे आकार देण्यात आले आणि त्यातून आराध्य देवतांच्या मंदिरासमोर दीपमाळेसाठी लाकडी किंवा दगडी स्तंभ तयार करण्यात येऊ लागले. शाखांनी युक्त अशा वृक्षातूनच मंदिरासमोर दीपमाळ उभारण्याची संकल्पना निर्माण आली असावी.
महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही दगडाच्या दीपमाळा निर्माण होऊ लागल्या. ज्या प्रदेशात विपुल प्रमाणात दगड उपलब्ध आहेत, त्यांचा कल्पकतेने उपयोग करून कारागिरांनी अशा सुबक दीपमाळा निर्माण केल्या होत्या, ज्यांचा आकार भाविकांसाठी नित्य प्रेरणादायी ठरला होता. सांगे, धारबांदोडा, सत्तरी येथील जी अत्यंत जुनी मंदिरे जंगलात आढळलेली आहे, त्या मंदिरांसमोर प्रामुख्याने जांभ्या दगडात कोरीव काम करून ज्या दीपमाळा निर्माण केल्या होत्या, त्यांचे जीर्णावशेष खूप कमी ठिकाणी आज पाहायला मिळतात.
सासष्टीतील केळशी, कुठ्ठाळी, लोटली, वेर्णा आदी मंदिरांचे पोर्तुगीज मूर्तिभंजकांकडून विध्वंसाचे सूत्र सुरू होताच भाविकांनी आपल्या आराध्य दैवतांच्या मूर्तींचे स्थलांतर जुवारी नदीपल्याड वसलेल्या आणि हिरव्यागार कुळागरांचे वैभव लाभलेल्या अंत्रुज महालात केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर मराठ्यांचे मांडलिक असणाऱ्या सौंदेकरांनी शांतादुर्गा, म्हाळसा, रामनाथ, मंगेश या देवतांना राजाश्रय दिला. नव्या जागेत भाविकांनी मंदिरांची उभारणी करतानाच तेथे भव्य अशा दीपमाळेची उभारणी केली.
दीपमाळेच्या शिल्पाची उभारणी करणाऱ्या कलावंतांनी अंत्रुज महालातल्या देवभूमीच्या लौकिकाला सार्थ ठरणारी शिल्पकला समूर्त केल्याकारणाने या मंदिरांच्या देखणेपणाला आगळीवेगळी लाभलेली किनार पाहायला मिळते. प्रत्येक मंदिराच्या वास्तुकलेला साजेल अशा दीपमाळा निर्माण करताना कारागिरांनी भूमितीशास्त्राचा कल्पकतेने वापर केल्याचे त्यांच्या षट्कोनी, अष्टकोनी आकाराकडे पाहताना लक्षांत येते. उत्सव प्रसंगी दीपवृक्ष प्रज्वलित केल्याचे उल्लेख आपल्या धार्मिक ग्रंथांत मिळतात. कुठे मंदिरासमोर दगडाच्या तर कुठे पंचधातूच्या दीपलक्ष्मी व दीपवृक्ष, दीपमाळेच्या पूर्वी उभारले असल्याचे संदर्भ आढळतात.
गोव्यातल्या प्रत्येक मंदिरासमोर दीपमाळ उभारण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून प्रचलित आहे. दीपमाळेची निर्मिती करणाऱ्या इथल्या कारागिरांनी सर्वत्र एकच नमुना स्वीकारला नाही. प्रत्येक मंदिराला साजेल आणि त्याच्या एकंदर सौंदर्यात भर पडेल, अशी त्यांची निर्मिती केल्याचे स्पष्ट झालेले आहे. म्हार्दोळ येथील महालसा नारायणीचे मंदिर आज गेल्या चार शतकांपासून प्रियोळ गावाच्या दिव्यत्वात भर घालत आहे.
भाविकांनी मंदिरासमोर जी दीपमाळ निर्माण केलेली आहे ती निश्चित वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे. या देखण्या दीपमाळेच्या शेजारी देवीच्या भाविकांनी अर्पण केलेल्या महाकाय आणि कारागिराच्या कला कौशल्याचे दर्शन घडवणाऱ्या धातूच्या समया या मंदिराच्या सौंदर्यात आणखीन भर घालत आलेल्या आहेत. महालसा नारायणी देवीची कृपा आपल्या कुटुंबावर आहे आणि आपल्या मदतीला ती धावून येते, अशी भावना असणाऱ्या भाविकांकडून उभारलेल्या समया आणि दीपमाळ संपूर्ण गोव्यात ललामभूत ठरल्या आहेत.
प्रत्येक मंदिरासमोर उभी असलेली दीपमाळ अधिकाधिक आकर्षक व्हावी, ती भाविकाच्या अंतःकरणात धर्म, संस्कृती यांचे संस्कार करणारी शिल्पकृती व्हावी म्हणून कारागिरांनी आपल्या प्रतिभेच्या सामर्थ्याचे दर्शन तिच्या निर्मितीत दाखवलेले आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री काणकोण येथील श्रीस्थळी मल्लिकार्जुन मंदिरासमोरची दीपमाळ प्रज्वलित केली जाते तेव्हा भाविकांच्या आनंदाला उधाण येते. कार्तिक पौर्णिमेच्या या रात्री केप्यातील सबदुळें, गोकुळडे, बार्से त्याचप्रमाणे श्रीस्थळ काणकोण येथील आसाळीत कार्तिक पौर्णिमेच्या रात्री मंदिरासमोर जो पवित्र खांब ओटम वृक्षापासून तयार केलेला असतो, त्याला दिव्यांनी प्रज्वलित केला जातो.
आसाळीतल्या आदिनाथ आदिपुरुष कारे पाईकाचे देवस्थान असून, तेथील ओटम वृक्षाचा खांब मौसमी फुलांनी सजवून तो दिव्यांच्या उजेडात प्रकाशमान केला जातो. हा रात्री होणारा सोहळा दीपमाळेच्या आगळ्यावेगळ्या परंपरेचे दर्शन घडवतो. कार्तिक पौर्णिमेच्या चांदण्या आणि गुलाबी थंडीच्या रात्री प्रज्वलित होणारी सिमेंटने बांधलेली उंच दीपमाळ असो, अथवा ओटम वृक्षाचा ‘कात्या खांब’, आम्हांला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश नित्य देत असतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.