Goa Election: मुरगाव तालुक्यात कोणता पक्ष मारणार बाजी?

दाबोळी, कुठ्ठाळी मतदार संघामध्ये 'आप'ला संधी असल्याचा 'आप'च्या नेत्यांचा दावा आहे.
Digambar Kamat and Pramod Sawant
Digambar Kamat and Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: मुरगाव तालुक्यातील मुरगाव, वास्को, दाबोळी, कुठ्ठाळी या चार मतदार संघामध्ये आमच्या पक्षाचे वारे वाहत असल्याने आमचे चारही उमेदवार विजयी होतील, असा दावा काँग्रेस व भाजपाने केला आहे. तर दाबोळी, कुठ्ठाळी मतदार संघामध्ये 'आप'ला संधी असल्याचा 'आप'च्या नेत्यांचा दावा आहे. तृणमूल काँग्रेस हा वास्को, कुठ्ठाळी येथे चमत्कार घडविणार असल्याचे तृणमूल काँग्रेसचे समर्थक सांगतात. मात्र कुठ्ठाळी मतदार संघामध्ये यावेळेस अपक्ष उमेदवार अँथोनी वास बाजी मारणार असल्याचे बरेचजण छातीठोकपणे सांगत आहेत. (Goa Election News)

Digambar Kamat and Pramod Sawant
गोव्यातील पोलिस मतदान कधी करणार?

यावेळेस मुरगाव मतदार संघ बराच गाजला.भाजपाचे उमेदवार मिलिंद नाईक यांच्यावरील कथित सेक्स स्कँडल प्रकरण व काँग्रेसचे उमेदवार संकल्प आमोणकर यांच्यासंबंधीची हिंदी खबर वृत्त वाहिनीने जारी केलेला व्हिडियो यामुळे नाईक व आमोणकर चर्चेत आले होते. नाईक व आमोणकर यांनी आपल्यापरिने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला.मात्र या दोन्ही प्रकरणामुळे कोणाला लाभ झाला व कोणाचे नुकसान झाले हे निकालानंतरच स्पष्ट होईल. या मतदार संघात 81.28 टक्के मतदान झाले. त्यामुळे नाईक व आमोणकर हे दोघेही सुखावले आहेत. या मतदानाचा लाभ आमच्या पक्षाला होणार असल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात आला आहे. या मतदार संघामध्ये आपचे परशुराम सोनुर्लेकर, तृणमूळ काँग्रेसचे जयेश शेटगावकर, अपक्ष उमेदवार नीलेश नावेलकर, आरजी चे परेश तोरस्कर, राष्ट्रवादीचे महंमद शेख तसेच दोन अपक्ष उमेदवार उभे होते. मात्र त्यांचा म्हणावा तसा आवाज ऐकू आला नाही.तृणमूलचे जयेश शेटगावकर, अपक्ष उमेदवार नीलेश नावेलकर यांनी काही प्रमाणात प्रयत्न केले.त्या प्रयत्नाचे मतामध्ये किती रुपांतर होते हे निकालानंतर कळेल. नीलेश नावेलकर, जयेश शेटगावकर हे गत विधानसभा निवडणुकीत आमोणकर यांच्या बाजूने होते. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमुळे आमोणकर यांची किती मते वजा झाली आहे हे निकालानंतर कळेल. या मतदार संघामध्ये खरी लढत काँग्रेस व भाजपामध्येच झाली आहे. 2007 पासून या मतदार संघातून मिलिंद नाईक निवडून येत आहेत.मात्र यावेळेस सुरवातीला त्यांना त्या प्रकरणामुळे काहीशी अडचण आली. मात्र त्यानंतर त्यांनी नियोजनबद्धरित्या प्रचाराला वेग दिला होता.आमोणकर यांनीही यावेळेस बदल होणार असून मतदारांचा कौल मला मिळणार असल्याचा दावा केला.

मुरगाव मतदार संघात एकूण 20 हजार 412 मतदार यात 10 हजार 160 पुरुष व 10 हजार 252 महिला मतदारांचा समावेश आहे. पैकी 8 हजार 234 पुरुष व 8 हजार 356 महिला मिळून 16 हजार 590 मतदारांनी मतदान केले. एकूण टक्केवारी 81.28 एवढी झाली.

वास्को मतदार संघामध्ये काँग्रेसचे कार्लुस आल्मेदा व भाजपाचे कृष्णा साळकर यांच्यामध्येच खरी लढत आहे. आल्मेदा व साळकर यांच्या समर्थकांनी विजयाचा दावा केला. मतदान संपल्यावर चौकाचौकात फटाके उडवून आनंद व्यक्त करण्यात आला होता.आल्मेदा हे दोनवेळा भाजपाच्या तिकीटावर विजयी झाले होते.मात्र आता ते काँग्रेसतर्फे लढत होते.साळकर यांनी गत निवडणुक अपक्ष म्हणून लढविली होती. त्यांनी आल्मेदा यांनी त्यावेळी चांगली टक्कर दिली होती. मात्र यावेळेस ते कोणता चमत्कार घडवितात. याकडे वास्कोवासियांचे लक्ष लागले आहे. हि जागा भाजपा राखतो की 33 वर्षांनी काँग्रेस पुन्हा हस्तगत करतो हे निकालानंतर स्पष्ट होईल. आल्मेदा यांनी कोणताही गाजावाजा न करता आपल्या प्रचाराचे आयोजन केले होते. त्यामुळे त्यांचा आवाज ऐकू येत नव्हता. तर साळकर यांनीही आपल्या प्रचाराला धार आणली होती.काही ठराविक भागांमध्ये दोघांनाही चांगला पाठिंबा मिळाल्याचे दिसून आले. तृणमूल काँग्रेसचे सैफुल्ला खान, शिवसेनेचे मारूती शिरगावकर यांनीही आपला प्रचार नेटाने केला.ते कोणांच्या विजयाआड येतात हे नंतर कळेल. आरजी तर्फे आंद्रे व्हिएगस, आपचे सुनील लोरान, जय महा भारत पार्टीचे संदीप शेट्ये, नीज गोंयकार रेव्होल्युशनरी फ्रंटचे चंद्रशेखऱ वस्त, अपक्ष उमेदवार अँड्रयू डिकुन्हा यांनी आपापल्या परिने प्रचार केला.

Digambar Kamat and Pramod Sawant
गोव्यात उमेदवारांचे लक्ष पोस्टल बॅलेटवर

वास्को मतदारसंघात एकूण 35 हजार 552 मतदार यात 18 हजार 201 पुरुष व 17 हजार 348 महिला व इतर 3 मतदारांचा समावेश आहे. पैकी 12 हजार 589 पुरुष व 12 हजार 478 महिला व 3 इतर मिळून 25 हजार 70 मतदारांनी मतदान केले. एकूण मतदान टक्केवारी 70.52 एवढी झाली.या मतदार संघात जास्त मतदार संख्या असूनही कमी मतदान झाले.

दाबोळी मतदार संघामध्ये भाजपाचे उमेदवार व मंत्री मॉवीन गुदिन्हो हे एकतर्फी विजय मिळवतील असे चित्र आरंभी दिसत होते. परंतू काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियतो फर्नांडिस व आपचे प्रेमानंद नाणोस्कर यांनी गुदिन्होसमोर आव्हान उभे केल्याने त्यांना प्रचाराला वेग देण्याची गरज भासली. या मतदार संघामध्ये गुदिन्हो, फर्नांडिस, नाणोस्कर यांच्यामधील वाक् युध्द बरेच गाजले.आरोप प्रत्यारोपांमुळे लोकांना काही गोष्टी समजल्या. दाबोळी मतदार संघामध्ये जो विकास झाला तसा विकास गोव्यात कोठेच झाला नसल्याचा दावा गुदिन्हो वारंवार करीत होते.परंतू लोकांच्या पाणी, वीज, भूगटार, रस्ते या मूलभूत गरजांकडे लक्ष देण्यास गुदिन्हो कमी पडल्याचा मुद्दा कॅप्टन फर्नांडिस व नाणोस्कर यांनी प्रखरपणे मांडला.या मतदार संघातून माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जुझे फिलिप डिसौझा यांनीही आपला प्रचार कोणताही गाजावाजा न करता केला. त्यामुळे ते काय चमत्कार करतात याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

दाबोळी मतदार संघात 12 हजार 271 पुरुष व 13 हजार 352 महिला मतदार मिळून 24 हजार 623 मतदार संख्या आहे. यात 9 हजार 92 पुरुष व 9 हजार 388 महिला मिळून 18 हजार 440 मतदारांनी मतदान केले. एकूण मतदान टक्केवारी 74.89 एवढी झाली.

Digambar Kamat and Pramod Sawant
कळंगुट शेतकऱ्यांचा पेट्रोलपंप बांधणीला विरोध; शेतीचे नुकसान होण्याची भीती

कुठ्ठाळी मतदार संघातून अपक्ष उमेदवार अँथोनी वास यांचे नाव बरेच चर्चेत होते. परंतू ते कोणता चमत्कार करतात हे निकालानंतरच स्पष्ट होईल. वास यांनी आपच्या व भाजपाच्या माजी आमदार श्रीमती एलिना साल्ढाणा, भाजपाचे नारायण नाईक,काँग्रेसचे ओलंसियो सिमाईस, तृणमूळ काँग्रेसचे मारियान रॉड्रिग्ज यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. गत विधानसभा निवडणुकीत दुसरया क्रमांकाची मते घेताना वास अवघ्या 550 मतांनी पराभूत झाले होते. सांकवाळचे सरपंच व अपक्ष उमेदवार गिरिष पिल्ले यांनी या मतदार संघामध्ये आरंभीच्या काळात आपली हवा तयार केली होती. त्यांना भाजपाची उमेदवारी मिळावी असे मंत्री मॉवीन गुदिन्हो यांनी मत व्यक्त केले होते. त्या गुदिन्हो यांच्या मताचा कितपत परिणाम होतो हे निकालानंतर कळेल.

कुठ्ठाळी मतदार संघात 39 हजार 773 मतदार संख्या असून यात 15 हजार 206 पुरुष व 15 हजार 567 महिला मतदारांचा समावेश आहे. पैकी 11 हजार 277 पुरुष व 12 हजार 150 महिला मिळून 23 हजार 427 मतदारांनी मतदान केले. एकूण टक्केवारी 76.13 एवढी झाली.

मुरगाव तालुक्यात चारही मतदारसंघात मिळून 1 लाख 11 हजार 360 मतदार संख्या आहे. यात 55 हजार 838 पुरुष व 55 हजार 519 महिला व इतर 3 मतदारांचा समावेश आहे. पैकी 41 हजार 152 पुरुष व 42 हजार 372 महिला मिळून 83 हजार 527 मतदारांनी मतदान केले. एकूण 75.01 मतदान मुरगाव मतदार संघात झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com