Goa Politics: आमदार रवी नाईक (Ravi Naik) यांनी काँग्रेसची (Congress) आमदारकी त्यागून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यामुळे काँग्रेसजवळ आता फक्त तीनच आमदार (MLA) राहिले आहेत. रवी भाजपमध्ये जाणार याचे संकेत दीडवर्षांपासूनच मिळत होते. रवी पुत्र रितेश व रॉय यांचा भाजपमधला प्रवेश ही रवींच्या प्रवेशाची नांदी होती.
त्यामुळे त्यांचा हा भाजपप्रवेश अनपेक्षित नव्हता. त्यामुळेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी रवींना या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न का केला नाही, हा प्रश्न अधोरेखित होतो. दीडवर्षांपासून आम्ही रवींशी संपर्क सोडला होता. हे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांचे (Girish Chodankar) म्हणणे कोणालाही पटण्यासारखे नाही. रवी हे राज्यातील बहुजन समाजाचे एक प्रमुख नेते म्हणून गणले जात असल्यामुळे त्यांचे पक्षाला सोडून जाण्याच्या वाटेवर असणे, हे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गंभीरपणे घेऊ नये, याचे खरोखर आश्चर्य वाटते. त्यांना हा निर्णय घ्यावा का लागला? याचे विश्लेषण करण्याची तसदी त्यांनी घेऊ नये. याचाही विषाद वाटतो. ही बेपर्वा वृत्तीच काँग्रेसला महागात पडते आहे. म्हणून तर आज ज्या जागी १८ आमदार असायला हवे होते तिथे फक्त तीनच आमदार दिसतात.
२०१७ साली काँग्रेसचे १७ आमदार निवडून आले होते. पर्रीकरांच्या निधनानंतर झालेल्या पणजीच्या पोटनिवडणूकीत निवडून आलेल्या बाबूश यांना धरले, तर ती संख्या अठराकडे जायला पाहिजे होती. पण आता इमारत कोसळून भग्न अवशेष शिल्लक राहिल्यासारखी काँग्रेसची अवस्था झाली आहे. खरे तर या निवडणुकीत काँग्रेसला चांगलीच संधी आहे. लोक भाजपला कंटाळलेले स्पष्टपणे दिसत आहे. पण त्यांचा काँग्रेसवरही विश्वास राहिलेला दिसत नाही. मागच्यावेळी जनमत असून सुध्दा काँग्रेसने सरकारने बनवू नये, याची सल अनेकांना बोचते आहे. आमदारांचा सुध्दा पक्षांवर विश्वास राहिला आहे, असे वाटत नाही. पर्वरीचे आमदार रोहन खंवटे हे काँग्रेसच्या वाटेवर होते. पण आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यामुळे ते काँग्रेसपासून दूर राहणार हे स्पष्ट झाले आहे. भाजपचे मंत्री मायकल लोबो हे ही भाजपवर नाखूश असल्यामुळे काँग्रेसशी संधान साधण्याच्या वाटेवर होते. तेही आता परतीच्या वाटेवर लागले आहेत. माजी मुख्यमंत्री लुईझिन यांनी तृणमुलशी तर रवींनी भाजपशी संधान साधले आहे. पण एवढी पडझड होऊनही गिरीश मात्र हवेतच तीर मारत आहेत. त्यामुळे त्यांचे हे भाजपला सत्तेवर आणण्याचे प्रयत्न तर नाही ना? असेच वाटायला लागले आहे.
‘रेडिमेड’ सत्ता हवी!
२००२ मध्ये भाजपचे (BJP) सतरा व काँग्रेसचे सोळा आमदार निवडून आले होते. भाजपने मगो व इतरांना हाताशी धरून सरकार स्थापन केले होते. पण सत्तेपासून दूर असूनसुध्दा त्यावेळी काँग्रेसमधील सोळा आमदारांपैकीच एकही आमदार भाजपच्या गोटात गेला नव्हता. ते सत्ताबदलाची वाट पाहत राहिले. आणि त्याचे फळ त्यांना २००५ साली मिळालेही, पण आजच्या आमदारांकडे ही सहनशीलता दिसत नाही. त्यांना ‘रेडिमेड’ सत्ता हवी असते. त्यामुळे पक्षाची तत्वे, आपण का निवडून आलो याची कारणे याकडे दुर्लक्ष करून ते सरळ सत्तेकरिता भाजपासारख्या पक्षात उडी मारताना दिसतात. त्याचकरिता लोकांचा काँग्रेसवरचा विश्वास कमी होत चालला आहे. हा नकारात्मक दृष्टिकोन झाला, तरी याला काँग्रेसचे नेतेच कारणीभूत आहेत.
सर्वमान्य नेत्याचा अभाव
काँग्रेस -गोवाफॉवर्डची (Goa Forward) युती अशीच भिजत पडली आहे. फॉरवर्डची शक्ती आता क्षीण झाली असल्यासारखे वाटत असली, तरी सुद्धा काही मतदारसंघात त्यांची अजूनही शक्ती शिल्लक आहे. या शक्तीचा काँग्रेसला फायदा होऊ शकतो. पण प्रदेशाध्यक्ष या युतीबाबत विशेष गंभीर आहेत, असे वाटतच नाही. काँग्रेसची दुरवस्था होण्याचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे काँग्रेसला आज सर्वमान्य असा नेताच नाही. दिगंबर कामत यांना सर्वमान्य नेता म्हणता येत नाही. गिरीश तर मतदारसंघात फिरण्याऐवजी पत्रकार परिषदेतच आपले दर्शन घडवीत असतात. अजूनही ‘सेक्स स्कॅंडल’ला जबाबदार असलेल्या मंत्र्याचे नावही त्यांनी जाहीर केलेले नाही. पंधरा दिवसांची मुदत देणे, हे तर हास्यास्पदच वाटते.
आप, तृणमूलवर विश्वास
आज सासष्टी सारख्या अल्पसंख्याकाच्या बाले किल्ल्यात सुध्दा यामुळेच काँग्रेसपेक्षा लोकांचा नवोदित आप (AAP), तृणमुल काँग्रेस (TMC) सारख्या पक्षांवर जास्त विश्वास दिसायला लागला आहे आणि याचकरिता काँग्रेसच्या नेत्यांनी चिंतन करून त्याप्रमाणे ठोस रणनीती आखणे जरूरीचे वाटते आणि असे झाले नाही तर काँग्रेसच्या बाबतीत २०१७ सालची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही हेच खरे.
‘ना घर का, ना घाट का’ काँग्रेसला चिंतनाची आवश्यकता
फोंडा, मडगावसारखे मतदारसंघ आजही काँग्रेसचे बालेकिल्ले म्हणून गणले जात आहेत. पण काँग्रेसला नेताच नसल्यामुळे राज्यातील काँग्रेसची अवस्था ‘ना घर का, ना घाटका’ अशी झाल्याची दिसते. यावेळी युवा चेहऱ्यांना उमेदवारी देणार असे चोडणकरांनी जाहीर केले आहे. या घोषणेचे स्वागत करत असताना निवडून आल्यावर भाजपात तर आमदार जाणार नाहीत, ना याची काळजी घ्यावी, असा सल्ला द्यावासा वाटतो. मागच्या वेळी सतरा आमदार निवडून येऊनसुध्दा काँग्रेसची काय अवस्था झाली, हे आज दिसते आहेच. सध्या भाजपला सत्ता फटकावण्याचा सोपा ‘फार्मुला’ प्राप्त झाला आहे. त्यामुळे आमदार कमी निवडून आले तरी दुसऱ्या पक्षातील आमदार आयात करून ते सत्ता स्थापन करू लागले आहेत. याचकरिता आपले किती आमदार निवडून येणार हे बघण्यापेक्षा ते खरेच पक्षात राहणार काय? हे बघणे आवश्यक वाटते. काँग्रेसला तर त्याची सक्त जरूरी आहे. याचे कारण म्हणजे ती पूर्वीची काँग्रेस आता राहिलेली नाही.
- मिलिंद म्हाडगुत
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.