राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ममता सरकारवर जाहीर संताप, प्रोटोकॉल पायदळी तुडवल्याचा केंद्राचा आरोप; संथाल संमेलनातील गैरसोयीवरुन राजकीय रणकंदन VIDEO

President Droupadi Murmu Bengal Visit: आदिवासी संस्कृतीचा उत्सव साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रत्यक्ष संथाल समाजातील लोकच पोहोचू शकले नाहीत.
President Droupadi Murmu & mamata banerjee
President Droupadi Murmu & mamata banerjeeDainik Gomantak
Published on
Updated on

President Droupadi Murmu Bengal Visit: पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या 'आंतरराष्ट्रीय संथाल संमेलना'वरुन आता केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील तृणमूल काँग्रेस (TMC) यांच्यात मोठ्या राजकीय वादाची ठिणगी पडली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या संमेलनाच्या नियोजनाबाबत जाहीरपणे तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वतः आदिवासी समाजातून आलेल्या राष्ट्रपतींनी दार्जिलिंगमधील गैरसोयींवरुन राज्य प्रशासनाला खडे बोल सुनावले.

आदिवासी संस्कृतीचा उत्सव साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रत्यक्ष संथाल समाजातील लोकच पोहोचू शकले नाहीत, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. राष्ट्रपतींच्या या विधानाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले असून केंद्र सरकारने आता याप्रकरणी कडक पावले उचलली आहेत.

President Droupadi Murmu & mamata banerjee
Mamata Banerjee: सर्वोच्च न्यायालयाची ममतांना नोटीस, 'ईडी'च्या कारवाईत अडथळ्याचा आरोप गंभीर असल्याचा शेरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. "हे लज्जास्पद आणि अभूतपूर्व आहे," अशा शब्दांत मोदींनी 'X' वर आपली प्रतिक्रिया दिली. लोकशाही आणि आदिवासी सक्षमीकरणावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी ही खेदजनक बाब असल्याचे त्यांनी म्हटले. एका आदिवासी कन्येचा आणि देशाच्या राष्ट्रपतींचा हा अपमान असल्याची भावना मोदींनी व्यक्त केली. टीएमसी सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या असून घटनात्मक पदाचा मान राखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रपतींचे पद राजकारणाच्या पलीकडे असते आणि त्यांचा सन्मान राखणे हे राज्याचे कर्तव्य असल्याचेही मोदींनी निक्षून सांगितले.

President Droupadi Murmu & mamata banerjee
Mamata Banerjee: राम, वाम आणि श्याम एकत्र आले… ममता बॅनर्जी पुन्हा बरसल्या

या वादाचे मुख्य कारण म्हणजे कार्यक्रमाच्या ठिकाणात शेवटच्या क्षणी केलेला बदल. पश्चिम बंगाल सरकारने हे संमेलन दार्जिलिंगमधील विधाननगरऐवजी सिलीगुडीच्या बाहेरील गोसाईनपूर येथे हलवले होते. राष्ट्रपतींच्या मते, हे ठिकाण अत्यंत गैरसोयीचे होते, ज्यामुळे हजारो संथाल बांधव तिथे पोहोचू शकले नाहीत. राष्ट्रपतींनी कार्यक्रमादरम्यान सांगितले की, आसपास मोकळी मैदाने उपलब्ध असताना तिथे 5 लाख लोक सहज जमू शकले असते, मात्र चुकीच्या नियोजनामुळे लोक वंचित राहिले.

एवढेच नाही तर, प्रोटोकॉलनुसार राष्ट्रपतींच्या दौऱ्यात मुख्यमंत्री किंवा वरिष्ठ मंत्र्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य असते, मात्र विमानतळावर केवळ सिलीगुडीचे महापौर गौतम देब उपस्थित होते. यावर भाष्य करताना राष्ट्रपती भावूक झाल्या आणि म्हणाल्या, "मी स्वतःला बंगालची कन्या मानते आणि ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या आहेत, पण त्या माझ्यावर का रागावल्या आहेत हे मला समजत नाही."

President Droupadi Murmu & mamata banerjee
Mamata Banerjee: ''...अटकेच्या बदल्यात अटक होणार''; ममता यांची भाजपला खुली धमकी!

दुसरीकडे, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी प्रोटोकॉलच्या उल्लंघनाचे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रपतींच्या सचिवालयाने दिलेल्या अधिकृत यादीनुसारच त्यांचे स्वागत आणि निरोप देण्यात आला. जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही चूक झाली नसल्याचा दावा त्यांनी केला असून भाजप या प्रकरणाचे राजकारण करत असल्याचा उलट आरोप केला. मात्र, हा वाद आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना रविवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

President Droupadi Murmu & mamata banerjee
Murshidabad Violence: 'मुर्शिदाबाद हिंसाचारास ममता सरकारच जबाबदार' भाजपचा घणाघात

केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रामुख्याने प्रोटोकॉलचे पालन न होणे, कार्यक्रमाच्या ठिकाणातील बदल आणि मुख्यमंत्री, मुख्य सचिव तसेच पोलीस महासंचालक (DGP) यांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, दार्जिलिंगचे जिल्हा दंडाधिकारी आणि सिलीगुडीचे पोलीस आयुक्त यांच्यावर काय कारवाई करण्यात आली, याचीही विचारणा केंद्राने केली. एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे रुपांतर आता मोठ्या राजकीय युद्धात झाले असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक तापण्याची चिन्हे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com