
West Bengal Riots: वक्फ कायद्याच्या विरोधात विरोधकांनी देशभरात रान उठवून दिले आहे. विरोधी पक्षांच्या राज्यात या कायद्याच्या विरोधात मोठ्याप्रमाणावर निदर्शने होत आहेत. यातच, ममता बॅनर्जी शासित पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये निदर्शने होत असताना हिंसाचार उसळला. यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. मुर्शिदाबाद हिंसाचारासाठी ममता सरकारच जबाबदार असल्याचा घणाघात भाजपकडून करण्यात आला. भाजपने ममता बॅनर्जी सरकारचा या हिंसाचावरुन चांगलाच समाचार घेतला. मुर्शिदाबादमधील हिंसाचारात तीन लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला.
भाजपने दावा केला की, 'हिंसाचारादरम्यान हिंदू कुटुंबांना लक्ष्य करुन त्यांची दुकाने लुटण्यात आली. एवढंच नाहीतर त्यांना मुर्शिदाबादमधून पळवून लावण्यात आले.' दुसरीकडे, सुवेंदू अधिकारी, सुकांता मजुमदार, दिलीप घोष आणि खासदार अभिजित गंगोपाध्याय यांसारख्या वरिष्ठ भाजप नेत्यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या मौनावर देखील सडकून टीका केली. हिंदूंना त्यांच्या घरातून हाकलून लावले जात असताना तृणमूल काँग्रेसच्या या नेत्यांनी डोळेझाक केल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला.
'धार्मिकदृष्ट्या प्रेरित कट्टरपंथींच्या भीतीने धुलियान, मुर्शिदाबाद येथील 400 हून अधिक हिंदूंना नदी ओलांडून पळून जाण्यास भाग पाडले गेले. या लोकांना लालपूर हायस्कूल, देवनापूर-सोवापूर जीपी, बैष्णवनगर, मालदा येथे आश्रय घ्यावा लागला,’ असे भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी एक्सवरील त्यांच्या एका पोस्टमध्ये म्हटले.
दुसरीकडे, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकारवर हल्लाबोल केला.
''आज बंगाल जळत असून यासाठी ममता बॅनर्जी यांचे सरकारच पूर्णपणे जबाबदार आहे. हा हिंदूंविरुद्ध राज्य-पुरस्कृत, राज्य-संरक्षित, राज्य-प्रोत्साहित हिंसाचार आहे. हिंदूंना स्थलांतर करण्यास भाग पाडले जात आहे. एवढंच नाहीतर त्यांच्या मंदिरांमधील मूर्ती फोडल्या जात आहेत. मंदिरांवरील भगवा ध्वज कसा उतरवला गेला हे देखील आम्ही पाहिले. दुर्दैवाने स्वामी विवेकानंदांच्या भूमीत हे सगळं घडत आहे. लक्ष्य करुन हिंदूंची घरे, दुकाने जाळली जात आहेत. ज्या प्रकारे हिंदूंना त्रास दिला जात आहे, ममता बॅनर्जी यांना लाज वाटली पाहिजे की त्या अजूनही तुष्टीकरणात गुंतल्या आहेत...,” असे म्हणत शहजाद पूनावाला यांनी ममता सरकारचा चांगलाच समाचार घेतला.
दुसरीकडे, वक्फ निदर्शनांदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बीएसएफने राज्य पोलिसांच्या कारवाईत मदत करण्यासाठी पाच तुकड्या तैनात केल्या आहेत. तर उच्च न्यायालयाने ममता सरकार आणि केंद्र दोघांनाही परिस्थितीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी आज म्हणजेच गुरुवारी (17 एप्रिल) होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.