

Lucknow Scooty Stunt Viral Video: रस्त्यावरुन प्रवास करताना अनेकदा आपल्याला असे काही लोक पाहायला मिळतात, जे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळत अतरंगी स्टंट करत असतात. अशा लोकांना स्टंटबाजी करण्यात नक्की काय आनंद मिळतो हे देवच जाणे, पण त्यांच्या या थक्क करणाऱ्या आणि तितक्याच संतापजनक कृत्यांमुळे निष्पाप लोकांचा जीव मात्र धोक्यात येतो. काही जण दुचाकीचा हँडल सोडून बाईक चालवतात, तर काही जण कारच्या खिडकीबाहेर बघून चित्रविचित्र चाळे करतात.
जर तुम्ही रस्त्यावर अशा स्टंटबाजांना पाहिले नसेल, तर सोशल मीडियावर नक्कीच पाहिले असेल; कारण तिथे अशा व्हिडिओंची सध्या मोठी लाट आली. असाच एक थरारक आणि डोक्याला हात लावायला लावणारा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे, जो उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील (Lucknow) असल्याचे सांगितले जात आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावरुन स्कूटी घेऊन जाताना दिसत आहे. सामान्यतः कोणतीही व्यक्ती जेव्हा दुचाकी चालवते, तेव्हा ती हँडल व्यवस्थित पकडून आणि समोर लक्ष देऊन गाडी चालवते. मात्र, या व्हिडिओमधील नजारा अगदीच उलटा आणि धक्कादायक आहे. हा माणूस चालत्या स्कूटीवर चक्क मांडी घालून आरामात बसलेला दिसत आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, स्कूटी भरधाव वेगात पुढे जात आहे आणि या व्यक्तीच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही दिसत नाही. अशा परिस्थितीत गाडीचे संतुलन थोडेजरी बिघडले किंवा समोरुन एखादे वाहन आले, तर त्याचा थेट जीव जाऊ शकतो, याचे भानही या महाशयांना राहिलेले दिसत नाही.
हा धक्कादायक व्हिडिओ 'एक्स'वर @khurpenchh नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला. बातमी लिहिपर्यंत हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला असून नेटकऱ्यांनी या स्टंटबाजाचा चांगलाच समाचार घेतला. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी कमेंट्समध्ये आपला तीव्र संताप व्यक्त केला. एका युजरने लिहिले की, 'हा जेव्हा पडेल आणि मरेल, तेव्हा याचा सगळा आळ एखाद्या निष्पाप कार किंवा ट्रक चालकावर येईल.'
दुसऱ्या एका युजरने टोमणा मारताना लिहिले, 'आमच्या देशात अशा नमुन्यांची कमतरता कधीच भासणार नाही.' तर तिसऱ्या युजरने लिहिले, 'काका स्वतःच्या फॅशनच्या नादात रस्त्यावरील इतर अनेक लोकांचे आयुष्य धोक्यात घालत आहेत.' वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली करणाऱ्या या काकांवर लखनौ पोलीस आता काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.