

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) च्या चालू हंगामात मैदानातील खेळासोबतच खेळाडूंच्या वेगवेगळ्या सेलिब्रेशनची शैलीही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या सोशल मीडियावर 'चिट सेलिब्रेशन'ची (खिशातून चिठ्ठी काढून वाचणे) जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने या ट्रेंडला अतिशय मजेशीर आणि उपरोधिक पद्धतीने सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोलकाता नाइट राइडर्स (KKR) विरुद्धच्या सामन्यात चहरने केकेआरचा सलामीवीर फिन एलनचा त्रिफळा उडवल्यानंतर केलेल्या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२६ मधील ६५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सला विजयासाठी १४८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरला स्फोटक सुरुवात करून देण्याची जबाबदारी फिन एलनवर होती. एलनने सुरुवातीला काही सुरेख फटके मारत दोन चौकार ठोकले आणि तो चांगल्या लयीत दिसत होता. मात्र, मुंबईचा हुकमी एक्का दीपक चहरने त्याला फार काळ खेळू दिले नाही. चहरने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेल्या 'बैक ऑफ लेंथ' चेंडूवर एलनने कट मारण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडूने बॅटची आतली कडा घेतली आणि तो थेट स्टंप्सवर जाऊन आदळला. चांगल्या सुरुवातीनंतरही एलनला मोठी खेळी करता आली नाही.
फिन एलन बाद झाल्यानंतर दीपक चहरने मैदानावर जे काही केले, ते पाहून प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. चाहरने सध्याच्या 'चिट सेलिब्रेशन'ची खिल्ली उडवत आपल्या पँटच्या खिशातून एक काल्पनिक चिठ्ठी बाहेर काढण्याचे नाटक केले आणि ती वाचल्याचा अभिनय केला. खरं तर, गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या अभिषेक शर्माने या सेलिब्रेशनची सुरुवात केली होती. त्यानंतर रघु शर्मा, उर्विल पटेल आणि नुकतेच आकाश सिंग या खेळाडूंनी हा ट्रेंड फॉलो केला होता.
नुकतेच आकाश सिंगच्या अशाच एका सेलिब्रेशनवर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज डेल स्टेन याने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हा ट्रेंड आता जुना आणि कंटाळवाणा झाला असून खेळाडूंनी तो बंद करावा, असे स्टेनने म्हटले होते. स्टेनच्या याच विधानाचा संदर्भ जोडत चाहरने हे काल्पनिक सेलिब्रेशन करून या ट्रेंडची मजा घेतल्याचे बोलले जात आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, केकेआरच्या गोलंदाजांनी सुरुवातीला उत्कृष्ट कामगिरी करत मुंबई इंडियन्सला अवघ्या १४७ धावांवर रोखले होते. कॅमेरॉन ग्रीन आणि सौरभ दुबे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तसेच सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांनी मधल्या ओव्हर्समध्ये धावांच्या गतीवर पूर्णपणे अंकुश ठेवला. शेवटी कॉर्बिन बाशच्या नाबाद ३२ धावांच्या खेळीमुळे मुंबईला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.