

India Women's World Cup Win: भारतीय महिला संघाने इतिहास रचला. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 52 धावांनी पराभवाची धूळ चारुन पहिले विश्वविजेतेपद पटकावले. 2 नोव्हेंबर (रविवार) रोजी नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीवर झालेल्या या रोमहर्षक सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 45.3 षटकांत 246 धावांवरच बाद झाला.
या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच महिला विश्वचषकाचा किताब जिंकला, तर दक्षिण आफ्रिकेचे विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहिले. हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखालील या संघाने केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे त्यांच्यावर आता पैशांची मोठी बरसात झाली.
महिला वनडे वर्ल्ड कपच्या विजेती ठरलेल्या भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) विक्रमी 4.48 मिलियन डॉलर (जवळपास 40 कोटी रुपये) इतकी मोठी बक्षीस रक्कम (Prize Money) मिळाली. या रकमेचे वैशिष्ट्य म्हणजे, ही रक्कम 2022 च्या वर्ल्ड कपमध्ये विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला मिळालेल्या 1.32 मिलियन डॉलरपेक्षा तब्बल 239 टक्के जास्त आहे. आयसीसीने महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसाची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढवली आहे, हे या आकडेवारीवरुन स्पष्ट होते.
केवळ विजेत्या संघावरच नव्हे, तर उपविजेता (Runner-up) राहिलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघालाही मोठी रक्कम मिळाली. लॉरा वुल्फर्टच्या (Laura Wolvaardt) नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 2.24 मिलियन डॉलर (जवळपास 20 कोटी रुपये) मिळाले. ही रक्कम 2022 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये उपविजेत्या इंग्लंडला मिळालेल्या 6,00,000 डॉलरपेक्षा 273 टक्के जास्त आहे.
उपांत्य फेरीत (Semi-Final) पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांनाही चांगली रक्कम मिळाली. दोन्ही संघांना समान 1.12 मिलियन डॉलर (जवळपास 9.3 कोटी रुपये) मिळाले. वनडे वर्ल्ड कपच्या मागील आवृत्तीत उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांसाठी ही रक्कम केवळ 3,00,000 डॉलर होती.
गुणांकात 5व्या आणि 6व्या स्थानावर राहिलेल्या श्रीलंका आणि न्यूझीलंड या संघांनाही समान 7,00,000 डॉलर (जवळपास 5.8 कोटी रुपये) प्रदान करण्यात आले आहेत. याशिवाय, 7व्या आणि 8व्या स्थानावर असलेल्या बांगलादेश आणि पाकिस्तान या संघांनाही प्रत्येकी 2,80,000 डॉलर (जवळपास 2.3 कोटी रुपये) इतकी रक्कम मिळाली.
या व्यतिरिक्त, महिला क्रिकेट विश्वचषक 20025 मध्ये भाग घेण्यासाठी आयसीसीकडून प्रत्येक टीमला 2,50,000 डॉलर (जवळपास 2 कोटी रुपये) 'गॅरंटी मनी' (Guarantee Money) म्हणून दिली गेली. तसेच, प्रत्येक सामन्यातील विजयासाठी संघांना 34,314 डॉलर (जवळपास 28 लाख रुपये) अतिरिक्त रक्कम मिळाली. आयसीसीने महिला क्रिकेटमध्ये बक्षिसाच्या रकमेत केलेली ही मोठी वाढ महिला खेळाडूंसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.