Madan Lal urged BCCI to take strict action against Harmanpreet Kaur: शनिवारी (22 जुलै) भारतीय महिला आणि बांगलादेश महिला संघातील वनडे मालिकेचा तिसरा आणि अखेरचा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे तीन सामन्यांची मालिकाही 1-1 अशी बरोबरीत राहिली. पण या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने ज्याप्रकारे राग व्यक्त केला, त्यामुळे ती बरीच चर्चेत राहिली.
दरम्यान, तिने या सामन्यादरम्यान केलेल्या कृत्यावर 1983 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचा भाग असलेले क्रिकेटपटू मदन लाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी तिच्यावर कडक कारवाई व्हावी अशीही मागणी केली आहे.
मदन लाल यांनी ट्वीट केले आहे की 'बांगलादेश महिला संघाविरुद्ध हरमनप्रीत कौरची वागणूक चांगली नव्हती. ती खेळापेक्षा मोठी नाही. तिचे नाव भारतीय क्रिकेटमध्ये बदनाम झाले आहे. बीसीसीआयने तिच्यावर कडक कारवाई केली पाहिजे.'
या सामन्यात बांगलादेशने दिलेल्या 226 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाकडून खेळत असताना हरमनप्रीतला 14 धावांवर असताना पंचांनी नाहिदा अख्तरच्या गोलंदाजीवर बाद दिले. यानंतर पंचांच्या निर्णयावर चिडून हरमनप्रीतने बॅट जोरात स्टंपवर मारली होती आणि पंचांवरही राग व्यक्त केला होता.
त्यावेळी झाले असे होते की नाहिदाने टाकलेल्या चेंडूवर हरमनप्रीत कौरने स्विप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चेंडू तिच्या पॅडला लागून स्लीपमध्ये गेला, त्यावेळी फाहिमा खातूननेही तिचा झेल घेतला होता. पण चेंडू तिच्या पॅडला लागण्यापूर्वी ग्लव्ह्जला लागला असल्याची शक्यताही होती. दरम्यान रिप्लेमध्येही याबद्दल अंदाज लावता आला नाही.
त्यावेळी तिला पायचीत बाद दिल्याचे समजून तिने राग व्यक्त केला. कारण तिच्यामते चेंडू पॅडला लागण्यापूर्वी ग्लव्ह्जला लागला होता. पण पंचांनी फाहिमा खातूनने झेल घेतल्यानंतर निर्णय दिला होता.
या घटनेनंतर सामना बरोबरी सुटल्यावरही हरमनप्रीतचा पंचाविरुद्ध नाराजीचा सूर कायम होता. तिने म्हटले होते की 'पुढच्यावेळी आम्ही जेव्हा बांगलादेशला येऊ, तेव्हा आम्ही नक्कीच अशाप्रकारच्या अंपायरिंगचा सामना करण्याच्या तयारीने येऊ. आम्ही स्वत:ला तयार ठेवू.'
तसेच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात दिसते की बांगलादेशची कर्णधार निगर सुलताना जोती हिच्याशी ट्रॉफी शेअर करताना हरमनप्रीत चिडून बोलत आहे.
तसेच दोन्ही संघांच्या फोटोवेळी ती म्हणत आहे की 'पंचांनाही बोलवा, फक्त तुम्हीच इथे का आलाय, तुम्ही सामना बरोबरीत सोडवला नाही, तर पंचांनी तुमच्यासाठी हे केले आहे. आपण त्यांच्याबरोबरही फोटो घ्यायला हवा.' तिचे हे बोलणे ऐकून निगर सुलतानाने संघाला घेऊन वॉकआऊट करण्याचा निर्णय घेतला होता.
सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास बांगलादेश महिलांनी प्रथम फलंदाजी करताना भारताविरुद्ध वनडेतील सर्वोच्च 225 धावसंख्या उभारली होती. त्यानंतर 226 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतालाही 49.3 सर्वबाद 225 धावाच करता आल्या.
दरम्यान या सामन्यात बरोबरी झाल्याने ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. पहिला सामना बांगलादेशने जिंकला होता, तर दुसरा सामना भारताने जिंकला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.