

BCCI secretary Jay Shah on Harmanpreet Kaur: भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर मागील काही काळापासून चर्चेत आहे. पण तिची चर्चा तिच्या कामगिरीमुळे नाही, तर मैदानावरील वागणूकीमुळे होत आहे. आता याबद्दल बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
22 जुलै रोजी भारतीय महिला आणि बांगलादेश महिला संघातील वनडे मालिकेचा तिसरा आणि अखेरचा सामना बरोबरीत सुटला. पण या सामन्यात हरमनप्रीत कौरला राग अनावर झाला होता. ती बाद झाल्यानंतर तिने बॅट स्टंपवर मारली होती, तसेच पंचांवरही राग व्यक्त केला होता.
याशिवाय मैदानातून बाहेर जाताना हात उंचावून अंगठा दाखवला होता. इतकेच नाही, तर तिने सामन्यानंतर प्रेझेंटेशनमध्येही पंचाविरुद्ध भाष्य केले होते. त्याचबरोबर ट्रॉफी स्विकारतानाही तिचा पंचांविरुद्धचा नाराजीचा सूर कायम होता. तिने व्यक्त केलेल्या या रागाबद्दल तिला आयसीसीच्या कडक कारवाईलाही सामोरे जावे लागले होते.
आता बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण प्रश्न विचारतील, असे जय शाह यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून बीसीसीआयने आयसीसीच्या कारवाईविरुद्ध अपील केले नसल्याचे स्पष्ट होत आहे.
बीसीसीआयच्या बैठकीनंतर जय शाह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की 'आमचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि व्हीव्हीएस लक्ष्मण तिला तिच्या रागाबद्दल प्रश्न विचारतील. आयसीसीने आधीच तिच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे आणि त्या कारवाईच्या विरुद्ध अपील करण्याची वेळ निघून गेली आहे.'
हरमनप्रीतवर आयसीसीने दंडाची आणि निलंबनाची कारवाई केली आहे. तिने स्टंपवर बॅट आपटल्याबद्दल 50 टक्के दंड आणि ३ डिमिरिट पाँइंट मिळाले आहेत. तसेच प्रेझेंटेशनमध्येही पंचांविरुद्ध केलेल्या भाष्याबद्दल २५ टक्के दंड आणि १ डिमिरिट पाँइंट मिळाले आहेत.
दरम्यान, २४ महिन्यांच्या अंतरात ४ डिमिरिट पाँइंट्स झाल्याने हरमनप्रीत कौरला निलंबनाला सामोरे जावे लागणार आहे. ज्यावेळी खेळाडूला २४ महिन्यांच्या आत ४ डिमिरिट पाँइंट्स मिळतात तेव्हा त्याच्यावर एका कसोटी सामन्याची किंवा २ वनडे किंवा २ टी२० सामन्यांची बंदी घातली जाते.
त्यामुळे आता हरमनप्रीत कौरला आगामी चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्स स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांना मुकावे लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.