Blog: बुद्धी नसलेले ‘स्मार्ट’ बुद्धिवंत

Blog: गोव्यात आजकाल एक शब्द सर्वत्र व्यापून राहिला आहे, तो म्हणजे ‘स्मार्ट’.
Goa News | Smart City
Goa News | Smart City Dainik Gomantak

गोव्यातील बुद्धिहीन स्मार्ट राजकारणी आपल्याला हरवतात. कारण, आपण ज्या मतदानाच्या दिवशी आपला स्मार्टपणा दाखवला पाहिजे, त्या दिवशी व तिथे तो दाखवत नाही. गोव्यात आजकाल एक शब्द सर्वत्र व्यापून राहिला आहे, तो म्हणजे ‘स्मार्ट’. धावणाऱ्या शहरांत आणि गोंधळलेल्या गावांत, मोकळ्या माळरानावरील कुरणावर निर्धास्तपणे ताव मारणारी, वासरात शहाणी असलेली लंगडी गाय म्हणजे भाजप.

भाजपकडून मिळालेल्या पोटगीवर चातुर्याने समाधान मानून घेत असलेली परित्यक्त घटस्फोटिता म्हणजे काँग्रेस. निम्म्यावरच खूश होऊन आपल्या हुशारीतच स्वमग्न असलेला अर्धा शहाणा म्हणजे आप. असे हे स्मार्ट ‘साडेतीन शहाणे’ सध्या गोव्याच्या राजकारणात अक्षरश: धुमाकूळ घालत आहेत.

Goa News | Smart City
Break Up : ब्रेकअप के बाद! नातं तुटल्यावर होऊ नका निराश; अशी करा जीवनाची नवी सुरुवात

आपल्या डोक्यावर डोक्याहीपेक्षा प्रचंड मोठी टोपी, खाली धरलेल्या हातातून थेट तोंडात पोहोचतील एवढ्या मोठ्या स्ट्रॉ आणि ‘खबरदार जर टाच मारुनी...’च्या म्हणत पाहणाऱ्याच्या डोळ्यांच्या व काळजाच्या राई राईएवढ्या चिंधड्या करीत, उंच टाचेच्या चपला घालून समुद्रकिनारी व रस्त्यातून फिरणारे ‘स्मार्ट’ पर्यटक.

कुठलीच उंची गाठत नसलेल्या अर्थव्यवस्थेला टांग मारून पुढे कसे जावे या गर्तेत रुतलेले स्मार्ट सरकार आणि स्मार्ट उद्योगपती. ही सगळी मंडळी बुद्धिमत्तेच्या प्रांगणात स्वत:च्या न पडलेल्या उजेडात दिवसाढवळ्या चाचपत असलेली पाहून, मी निर्बुद्ध असल्याच्या सार्थ अभिमानाने माझा ऊर भरून आला आहे. त्यामुळेच, गोव्यात सध्या सुरू असलेल्या अनेक ‘स्मार्ट’ उपक्रमांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याच मोह मला आवरत नाही.

Goa News | Smart City
Goa Tourism : आंतरराष्ट्रीय पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी 'मिशन युरोप'

स्मार्ट शहरे

‘शोधा म्हणजे सापडेल’ या उक्तीला अनुसरून आजकाल पणजी शहरात एक मोठे ‘पुरातत्त्व खोदकाम’ सार्वजनिक बांधकाम खाते करत आहे. काही निद्रिस्त अभियंते आणि अनेक बिनचेहऱ्याचे मजूर हातात फावडे घेऊन दिसेल तो रस्ता खोदत आहेत. खोदकामातील पुरातत्त्वीय खजिना फुटपाथवर टाकत आहेत आणि लगेच पुन्हा खोदत आहेत. ‘हे सर्व कशासाठी केले जात आहे?’, या प्रश्नाचे उत्तर कुणाजवळही नाही.

बहुधा, कदंब महामंडळाच्या दुरवस्थेची कारणे कदंबकाळत कुठे दडली आहेत का? किंवा बहा‘मनी’ काळातील अर्थव्यवस्था कशी होती? किंवा ‘शाही’ आदेशांचे पालन कसे करावे, याचे आदिलशाहीच्या काळातील धागेदोरे यांचा शोध हे सर्वजण सम्राट मोन्सेरात यांच्या अध्यक्षतेखाली घेत असावेत.

स्मार्ट शहरांसाठी राखून ठेवलेला निधी वापरण्याची कुठलीही चतुर, कल्पक योजना नसल्यामुळे ‘२३ एप्रिलपर्यंत केंद्राकडे निधी परत पाठवून द्या’, असा ‘निर्मल’ आदेश दिल्लीवरून आला. त्यामुळे उर्वरित सहा महिन्यांत तो निधी वापरायचा कसा, याविषयी प्राचीन संदर्भांचे शोधकाम करण्यासाठी हे खोदकाम सुरू आहे.

Goa News | Smart City
Goa Mega Job Fair: ''रोजगार मेळाव्यात 18 हजार युवक भविष्य आजमावतील''

या खोदकामामुळे पुढील सहा महिन्यांत इफ्फी, ख्रिसमस आणि नवीन वर्ष यांचा आनंद कदाचित अडखळत घ्यावा लागेल, पण त्याची चिंता अजिबात करण्याचे कारण नाही. लंगड्या गायीची ‘भाजप आयटी सेल’ नामक हुशार वासरे आपल्याला, ‘शोध (खोद)कामाच्या या राष्ट्रीय विकासकार्यांत विनाकारण अडथळे आणू नका.

सहन करून या राष्ट्रकार्यास पाठिंबा द्या’, असे बौद्धिक सोशल मीडियातून देतील. ‘माझे कुणा म्हणू मी?‘ हे गीत काँग्रेस गाईल. उत्तर भारतामुळे पंजाबात आणि पंजाबातून दिल्लीत प्रदूषण होत असल्याने ‘आप’ण अजिबात जबाबदार नाही.

त्यामुळे, अजिबात चिंता न करता सर्व गोमंतकीयांना फुकट दिल्लीला नेण्याची सोय केल्याचे ‘आप आयटी सेल’ सांगेल. बाकी इथे गर्दीत घुस्मटून किंवा खड्ड्यात पडून मरायचे की, दिल्लीत श्वासाने गुदमरून मरायचे, याचा ‘स्मार्ट’निर्णय गोमंतकीयांनीच घ्यावा!

Goa News | Smart City
Free LPG Cylinder in Goa : आता गोव्यात मिळणार तीन सिलिंडर मोफत; कुणाला मिळणार फायदा? जाणून घ्या एका क्लिकवर

मोपाचे स्मार्ट ‘मार्ग’दर्शन

विमानतळ तयार, टॉवर तयार, विमानसेवा तयार, मुख्यमंत्रीही तयार. फक्त या सर्व स्मार्ट तयारीला जोडणारा ‘मार्ग’ तेवढा व्हायचा बाकी आहे. तो एकदाचा झाला की....जाऊ द्या! तयार असलेल्या मार्गाबद्दल बोलू. पणजी-पर्वरी-म्हापसा हा रस्ता म्हणजे, कुणाला जर मरण पावण्याची स्वप्ने पडत असतील, तर ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा खवट राजमार्गच आहे! आता कुणी कुणी त्याला चिकट घामाने भिजवणारा ‘रोहन खवटे मार्ग’ म्हणतात, म्हणू देत

Goa News | Smart City
Mopa Airport: ‘मोपा’ला भाऊसाहेब बांदोडकरांचे नाव मिळावे

बापड्यांना!!

पेडण्यातील विशाल रस्ते इतके अरुंद आहेत की, चोर्ला घाटातील रस्त्यांच्याही थोबाडीत मारतील. त्यात खाजगी वाहनांचा ढीग, अनुशासनहीन बेपर्वा कॅब ड्रायव्हर्स आणि मोपापर्यंत प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या मोठ्या टूर बसेस. त्यामुळे, आपणास उद्या पोहोचायचे असेल तर आत्ताच निघा. कुणी तरी म्हटलेलं वाक्य कधी तरी मुख्यमंत्री म्हणाले होते की, ‘कल करे सो आज कर’. सावंत म्हणजे सूचकपणा, यात अजिबातच वाद नाही.

चला तर मग पावनं, मोप मार्गाने जायचे आहे तर मोप तयारीस्नी लागा. दोन दिवसांची शिदोरी, हाथरून, पांगरून काय आसल ते घेऊनशान मंगच भाईर पडा. पण, आज जरी आपणास थांबत थांबत, निसर्गसौंदर्य व चालती बोलती प्रेक्षणीय स्थळे पाहत जाण्याचा आनंद लाभत असला, तरी तो फार काळ टिकणार नाही याची व्यवस्था मायबाप सरकारने केली आहे.

मडगाव ते मोपा व्हाया पणजी असा ‘रोप वे’ अशी बातमी अविश्वसनीय सूत्रांकडून आमच्या कानी आली आहे. आता जमिनीवरून दिसत असलेलं निसर्गसौंदर्य, वरून चालत जात आपण पाहू शकू. पाहा पाहा, सरकारकडे ‘करून’ दाखवायची तयारी नसली, तरी ‘वरून’ दाखवायची तयारी आहे, हेही नसे थोडके!

Goa News | Smart City
Goa News: झाडावरून पडल्‍याने केरीत एकाचा मृत्‍यू

दोरीवरच्या स्मार्ट उड्या

पर्यटकांसाठी, रेईश मागूश ते पणजीपर्यंत एक ‘रोप-वे’ कुणीही न मागता बांधण्याचा प्रस्ताव आहे. या ‘रोप वे’चा शेवट चकचकीत मॉल-कम-एंटरटेनमेंट सेंटर इनडोअर स्टेडियमजवळील मोकळ्या जागेवर केला जाईल. मोकळ्या जागा नागरिकांनी दोरीवरच्या उड्या माराव्यात, यासाठी थोड्याच आहेत. त्या सरकारने उड्या माराव्यात यासाठी राखीव आहेत.

सरकारलाही आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यावीच लागते. सरकारी ती घेत आहे, त्यामुळे ‘भिवपाची गरज ना!’ गुजरातमधील मोरबी पूल तुटला, लोक मेले, घाबरू नका. आता तसे पाहू जाता, नाही म्हटले तरी मांडवीवरून प्रचंड प्रमाणात वाहणाऱ्या वाऱ्याचा धोका आहेच. पण, त्याचे फारसे काही नाही. वरून पडलातच खाली तर, कॅसिनोंनी मांडवीत सोडलेल्या सांडपाण्याचा सुगंध अनुभवता येईल.

‘हवाई सुगंध यात्रा’ नावाचा एक साहसी क्रीडाप्रकारही त्यातून जगप्रसिद्ध होईल. एरव्ही तरी अटल सेतूवर दुचाकी चालवण्यास परवानगी नाहीच. त्यामुळे या रोपवे वरून बाईक चालवून उंच उडी मारावी आणि मांडवीच्या तळाशी पोहोचत सांडपाण्याचा सुगंधही घ्यावा, यासारखे दुसरे साहसी सुख नाही. ‘रोपवे’वर आपण मांडवीत गळ टाकूनही बसू शकता.

पडलाच समजा वरून तर लगेच गाळात जाण्याची व्यवस्था आधीच तयार आहे. ‘गळातून गाळात’ असे त्याचे नामकरणही करता येईल. आपण प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातूनच पाहिले पाहिजे. ‘हो की, नाही रे रोहनबाळ? आता मार पाहू दोरीवरच्या उड्या’, असे लंगडी गाय म्हणाल्याचे एका बहिऱ्या व्यक्तीने ऐकल्याचे कुणीतरी काल ‘कुजबुज’त होते. बाकी खरे खोटे देवास ठावूक!

Goa News | Smart City
Khandola Temple Theft : खांडोळा गणेश मंदिरातील चोरीचा तब्बल तीन महिन्यांनी लागला छडा

स्मार्ट जेटी योजना

खेडी आणि नदी एकमेकांना जोडणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय जलचरांच्या अधिवासाचे आणि मानवी निवासाचे भांडण होणार नाही. लोक आंदोलनात गुंतून राहणार नाहीत. त्यासाठीच सरकारची ही स्मार्ट योजना प्रत्यक्षात उतरली पाहिजे. आरपार जाणारे लोक स्मार्ट नसले तरी चालतील, जेटी स्मार्ट पाहिजे.

मोपाला नाव काय द्यावे, यावरून जसे वितंडवाद सुरू आहेत, तसेच पुढे जेटीला नाव देण्यावरूनही वाद होऊ शकतात. गोव्याचे प्रती नेल्सन मंडेला असलेल्या बांदोडकरांचे नाव द्यावे, असे काही अती नेल्सन मंडेलांना वाटते. त्यात काही गैर नाही. आद्य मुख्यमंत्री की, स्मार्ट मुख्यमंत्री? हा वाद लोकांना घालायला लावल्याशिवाय सरकार शांततेत चालू शकणार नाही.

या स्मार्ट लेखाचे स्मार्ट तात्पर्य;

स्मार्ट व्हा, जागृत व्हा, सतर्क राहा, सावध राहा.

इतके करूनही आपण मूर्ख बनवले जाणारच आहात. कारण, आपली हुशारी तिथे दाखवत नाही, जिथे ती दाखवणे खरोखरच गरजेचे आहे, ती म्हणजे मतदान! मतदान हे असे एकच रणांगण आहे, जिथे मतदाराचा विजय निश्‍चित आहे. एका दिवसाचे राजा असलो तरी उरलेल्या दिवसांत भिकारी नव्हे. आपण ‘स्मार्ट’ आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com