Politics: एक डाव माघारीचा!

Politics: मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंधेरी येथे होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीकडे सारेच जण या सत्तांतरास जनता काय कौल देते, या एकाच नजरेतून बघत होते.
Politics
PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

Politics: शिवसेनेत मोठी फूट पाडून, महाराष्ट्रात घडवून आणलेल्या सत्तांतरानंतर मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंधेरी येथे होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीकडे सारेच जण या सत्तांतरास जनता काय कौल देते, या एकाच नजरेतून बघत होते. त्यातही ही निवडणूक शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या मुंबईत होत होती आणि त्यात सामना होणार होता तो उद्धव ठाकरे विरुद्ध भारतीय जनता पक्ष असाच.

दरम्यान, त्यामुळे या दोन्ही पक्षांबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासाठीही ही निवडणूक तितकीच प्रतिष्ठेची होती; कारण आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असली, तरी रस्त्यावरचा शिवसैनिक नेमका कोणाबरोबर आहे, याचाही फैसला यानिमित्ताने होणार होता.

Politics
Goa: गोव्याची माहिती-तंत्रज्ञान उद्योगासाठी निवड होऊ शकते का?

शिवसेना (ShivSena) आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे होत असलेल्या या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांची तांत्रिक, प्रशासकीय मुद्यांवर अडवणूक करण्याचे जे काही प्रयत्न झाले, त्यामुळे भाजप तसेच त्यांना साथ देणारा शिंदे गट हा मैदानातील लढतीस कचरला तर नाही ना, अशी शंका घ्यायला जागा निर्माण झाली होती. ऋतुजा यांना उमेदवारी मिळू नये म्हणून डाव टाकले गेले होते.

मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तेे हाणून पाडले गेले. अखेर भाजपने या निवडणुकीतून सपशेल माघार घेतली आहे! ‘कहानी मे ट्विस्ट’ म्हणतात, तशा पद्धतीने अवघ्या 24 तासांत घडवून आणलेल्या या माघारी नाट्यामुळे सारे विस्मयचकित तर झाले आहेतच; शिवाय त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या अगदी प्राथमिक स्वरूपाचे प्रश्नही उभे राहिले आहेत.

Politics
Life: ''एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे''

या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न आता भाजप तसेच शिदे गट यांचे प्रवक्ते हिरीरीने करतीलच; पण जनतेला ते उत्तर आधीच मिळून गेले आहे आणि ते म्हणजे या निवडणुकीत भाजप उमेदवार मुरजी पटेल यांचा पराभव दिसू लागल्यानेच हा माघारीचा निर्णय झाला असणार. एक मात्र खरे की भाजपच्या या माघारीमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिकांना मोठाच ‘बूस्टर डोस’ मिळाला आहे!

या माघारीनाट्याची नांदी रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून केली. महाराष्ट्राची संस्कृती, सभ्यता आदींचे दाखले देत त्यांनी भाजपला आपला उमेदवार मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र, त्या आधीच्या 24-48 तासांत एकनाथ शिंदे तसेच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या भेटी घेतल्या होत्या.

त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात या नाट्याची संहिता तेथेच तर लिहिली गेली नाही ना, असा प्रश्न उभा राहिला. त्याचे उत्तर मिळणे, अर्थातच अवघड आहे! या नांदीनंतरचा प्रवेश रंगवला तो महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी. त्यांनीही याच महाराष्ट्र संस्कृतीचे गोडवे गात भाजपला माघारीचे आवाहन केले. मात्र, त्यानंतरही शेलार हे निवडणूक लढवावी, असेच मत ठामपणाने बोलून दाखवत होते.

Politics
Environment: भारतात आधुनिक पर्यावरणपूरक वास्तू

अखेरीस भाजपच्या खलबतखान्याने माघारीचा निर्णय घेतला खरा; पण तो जाहीर करण्यास या पक्षाने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पुढे केले. राज ठाकरे यांनी पत्र लिहिले होते ते फडणवीस यांना. मात्र, राज्यातील सर्व निर्णय तेच घेत आहेत, हे गेल्या काही दिवसांत स्पष्ट झालेले असतानाही, त्यांनी यावेळी जाणीवपूर्वक पत्रकारांपुढे येण्याचे टाळले, ही बाब लपून राहिली नाही.

दरम्यान, पवार यांच्या निवेदनानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही एक निवेदन प्रसृत करून त्यात यशवंतराव चव्हाणांपासून अनेक नेत्यांचा उल्लेख करत गोपीनाथ मुंडे यांच्या तसेच आर. आर. पाटील यांच्या निधनानंतरच्या निवडणुकांत कसे सामंजस्य दिसले होते, याचे दाखले दिले होते. तसेच त्यात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्याही सुसंस्कृतपणाचे दाखले दिले होते.

त्यामुळे झालेल्या पंचायतीनंतर अखेर या माघारीनाट्याचे भरतवाक्य बावनकुळे यांनी म्हटले. मात्र, तरीही या माघारीशी संस्कृती वगैरेंचा काहीही संबंध जोडण्याचे कारण नाही. हे निव्वळ सोयीचे राजकारण आहे. मध्यंतरी कोल्हापुरात झालेल्या पोटनिवडणुकीत दिवंगत आमदाराच्या पत्नीसच शिवसेनेने उमेदवारी दिल्यानंतरही तेथे भाजपने केवळ उमेदवार दिला असे नव्हे, तर त्याच्या विजयासाठी राज्यभरातून कुमक तसेच शिबंदीही धाडली होती.

Politics
Flood in Sattari : सत्तरी पुराच्या छायेत जाण्यामागची नेमकी कारणं काय?

त्यानंतरही भाजपच्या पदरी पराभवच आला होता. आता त्याच पराभवाची अंधेरीत पुनरावृत्ती होऊ शकते, हेही या माघारीचे एक कारण असणार. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजप (BJP) उमेदवार यांच्यावर होत असलेले विविध आरोप. त्यामुळे कदाचित त्यांची निवडणूक रद्दबातलही ठरू शकेल की काय, या शंकेपोटीही हा निर्णय झालेला असू शकतो.

शिवाय, या निवडणुकीत पदरी पराभव आला असता, तर राज्यभरात वेगळा संदेश तर गेला असताच आणि मुख्य म्हणजे मुंबई महापालिकेच्या अवघ्या प्रचारमोहिमेत उद्धव ठाकरे यांनी त्याचे भांडवल केले असते. त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वगैरे बोलायला गोड दिसत असली तरी प्रत्यक्षात सोय पाहूनच भूमिका घेतल्या जात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com