National Education Policy : शिक्षणाची नवी पहाट ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
सुमन शेट वेरेकर
National Education Policy : मुलांना सुजाण नागरिक बनवून राष्ट्र उभारणीचे महत्कार्य शिक्षकांना करावे लागणार आहे. त्यामुळे नवे शिक्षण धोरण हे शिक्षकवर्गासमोर मोठे आव्हान आहे. शासनातर्फे वेळोवेळी प्रशिक्षण शिक्षकांना दिले जाईल आणि हे आव्हान शिक्षकवर्ग आत्मविश्वास आणि सुलभतेने स्वीकारेल अशी आशा आहे. काळ सतत बदलत असतो. निसर्गनियमानुसार बदलत्या काळासोबत माणूस, समाज सगळे बदलत जाते. काळाच्या ओघात काही जुनी तत्त्वे कालबाह्य होतात आणि नवीन उदयास येतात. होणारा बदल हा स्वीकारार्ह हवा.
आपल्याला जर निकोप आणि सर्वदृष्टीने परिपूर्ण आदर्श स्ययंपूर्ण समाज घडवायचा असेल तर समाजातील प्रत्येक घटक शारीरिक, भावनिक, व बौद्धिकदृष्ट्या सक्षम असावा लागतो. तसेच तो संस्कारक्षम व संस्कृती टिकवणारा असावा लागतो. विज्ञानाने सिद्ध केले आहे की मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची सुरुवात ही मूल मातेच्या गर्भात असतानाच होत असते. प्रत्येक मूल आपापल्या परीने वेगळे असते. ते फक्त शारीरिकदृष्ट्या सुदृढ, निरोगी असून चालत नाही. तशी ती असावीत; त्याचबरोबर त्यांच्या मनोमय कोशासही जपावे लागते. त्यांच्या भावभावनांची कदर करून त्यांचा सर्वांगीण विकास साधावा लागतो.
त्यांचे एक वेगळे भावविश्व असते. केवळ धाकदपटशा दाखवून, त्यांच्या मनात दहशत निर्माण करून त्यांना आज्ञाधारक बनविले की आपले काम संपले, असे पालकांनी आणि शिक्षकांनी गृहीत धरू नये. आजचे मूल हे उद्याचे भविष्य आहे. भविष्यात ते देशाचे एक जबाबदार नागरिक बनायला हवे. त्या दृष्टीने त्यांचे संगोपन करावे लागते. भविष्यात येऊ शकणाऱ्या अडीअडचणी, उभी राहणारी संकटे यांना सामोरे जाऊन, त्यांच्यावर मात करून, दुसऱ्यांच्या भावनांचा गळा न घोटता शहाणपणाने आयुष्यात वाटचाल करायला लावणारे, संस्काराचे, आत्मनिर्भर होणारे शिक्षण जर त्यांना बाल्यावस्थेपासून दिले तरच ते राष्ट्राचे भरवशाचे नागरिक बनू शकतील.
शासनाने यावर सखोल अभ्यास केल्याने तब्बल ३४ वर्षांनी नव्या शैक्षणिक धोरणाची पहाट उगवली आहे. याची अंमलबजावणी या वर्षापासून होत आहे ही कौतुकास्पद गोष्ट आहे. प्रत्येक भारतीयाने या नव्या धोरणाची सहर्ष स्वागत करणे ही काळाची गरज आहे. नवी शिक्षणपद्धत मूल्यनिष्ठा, समाजनिष्ठा, सेवाभावी आणि स्वार्थनिरक्षेप वृत्ती याच्या पायावर उभी राहणार आहे. नवे शैक्षणिक धोरण समाजापुढील फार मोठे आव्हान आहे. आज भारत देश आत्मनिर्भर आणि विश्वगुरू बनण्याच्या मार्गावर आहे.
आपण विश्वाचे नागरिक आहोत. अशा वेळी पूर्वापार चालत आलेली शिक्षण पद्धती पर्याप्त नाही. त्यामुळे शिक्षणामध्ये मूलभूत क्रांती होणे ही काळाची गरज आहे. मातृभाषेतून शिक्षण देऊन मुलांना राष्ट्र उभारणीस समर्थ आणि सुसज्ज बनविणे हे या नव्या धोरणाचे उद्दिष्ट आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली या नव्या धोरणाचा मसुदा तयार झाला. या नव्या शिक्षणपद्धतीमुळे शैक्षणिक कॅलेन्डरमध्ये आमूलाग्र बदल अपेक्षित आहे. नव्या धोरणानुसार पूर्व प्राथमिक: तीन वर्षे, पहिला टप्पा: दोन वर्षे (इयत्ता पहिली व दुसरी), दुसरा टप्पा: तीन वर्षे (तिसरी ते पाचवी) आणि चौथा टप्पा: चार वर्षे (नववी ते बारावी) असा बदल असेल.
मुलांना वयाच्या तिसऱ्या वर्षी शाळेत प्रवेश मिळेल. पूर्व प्राथमिक स्तरावर त्यांना विविध खेळाद्वारे शिक्षण देण्यात येईल. त्यांच्या खांद्यावर पुस्तकांचा बोजा असणार नाही. खेळीमेळीच्या वातावरणात मुले शिकत असल्याने त्यांच्या मनात शाळेबद्दल आवड आणि आस्था निर्माण होईल. या वयात मुलांची आकलनशक्ती बरीच तीव्र असते. त्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात मिळणारे ज्ञान ते चटकन आत्मसात करेल. तिसरीपर्यंत मुलांना वाचता येईल यावर भर दिला जाईल. संख्या व अक्षर हे मूलभूत शिक्षण मानले जाणार आहे.
सहावीपासून कौशल्य शिक्षणाची सुरुवात होणार आहे. त्यानुसार त्यांना हवा असलेला व्यावसायिक अभ्यासक्रम निवडता येईल.त्यांना आवडणारे विषय निवडता येतील. त्यामुळे मुलांची अभ्यासातील रुची वाढेल आणि टिकूनही राहील. गुणप्रक्रिया हद्दपार होईल आणि श्रेयांकनपद्धती अवलंबिली जाईल. पहिलीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण एका छताखाली येणार. विद्यार्थी कौशल्य मिळवून पुढे स्वत: अर्थार्जन करण्याची व्यवस्था करू शकतील.
नव्या शैक्षणिक धोरणाचा अत्यंत महत्त्वाचा घटक शिक्षक असेल. कारण ते यशस्वी करण्याची धुरा त्यांना सांभाळावी लागेल. त्यामुळे शिक्षकांची नियुक्ती करतानादेखील संस्थाचालकांना विशेष दृष्टिकोन ठेवावा लागेल. शाळा माणसे घडविण्याचे माध्यम आहे. ओघानेच ते राष्ट्र घडवण्याचे महत्त्वाचे कार्य करीत असते. त्यामुळे शिक्षकवर्गसुद्धा त्याच तोलामोलाचा असायला हवा. तो शिल्पकार आणि कलाकार वृत्तीचा असायला हवा. मुलांच्या अंगातील सुप्त गुणाचा शोध घेऊन त्या कलागुणांची जोपासना करणारा हवा.
नवी शिक्षण पद्धती ही मुलांची शारीरिक, भावनिक आणि बौद्धिक विकास साधणारी आहे. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी अनेक पटीने वाढलेली आहे. योग्य अयोग्य यातील भेद, हक्क-कर्तव्ये, संस्कृती, सामाजिक बांधीलकी हे सगळे मुलांच्या ठायी, खेळीमेळीच्या वातावरणात उतरविण्याचे काम शिक्षकांना करावे लागेल. एकंदरीत मुलांना सुजाण नागरिक बनवून राष्ट्र उभारणीचे महत्कार्य शिक्षकांना करावे लागणार आहे. त्यामुळे नवे शिक्षण धोरण हे शिक्षकवर्गासमोर मोठे आव्हान आहे. शासनातर्फे वेळोवेळी प्रशिक्षण शिक्षकांना दिले जाईल आणि हे आव्हान शिक्षकवर्ग आत्मविश्वास आणि सुलभतेने स्वीकारेल अशी आशा आहे.
शासनाने शिक्षणासंबंधी जे नवे धोरण (एन.ई.पी. २०२० म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०) अवलंबिलेले आहे त्या शैक्षणिक धोरणाला पूरक ठरणारे शिक्षण मराठी माध्यमातून देण्याचे आव्हान जुन्या, जाणत्या, सत्त्याऐंशी वर्षांची दीर्घ परंपरा असलेल्या, अनेक नामवंत विद्यार्थी निर्माण करणाऱ्या मडगाव शिक्षण संस्थेच्या ‘न्यू इरा हायस्कूल’ने स्वीकारलेले आहे.
न्यू इरा हायस्कूलची स्थापना १९३६ साली श्रीयुत प्रभाकर गायतोंडे, श्रीयुत रामनाथ नायक, ऍड. व्यंकटेश आळवेकर आणि श्रीयुत माधव अग्नी यांनी केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी ही शैक्षणिक धुरा पुढे नेली आणि यथावकाश संस्था प्रगतिपथावर आणली. विद्यार्थिवर्गाच्या सुप्त गुणांना चालना देण्याचे काम संस्थाचालक आणि शिक्षकवर्गाने सातत्याने केले. संस्थेने अनेक नामवंत विद्यार्थी निर्माण केले. पुढे हेच विद्यार्थी डॉक्टर, अभियंते, वकील, नाट्यकर्मी, गायक, वादक, साहित्यिक म्हणून नावारूपास आले. तसे पाहू गेल्यास या संस्थेने अपुऱ्या सुविधांतून, अनेक अडीअडचणींवर मात करून भाडेतत्त्वावरील इमारतीत हे शैक्षणिक कार्य अखंडपणे चालविले. आज संस्था आपली स्वत:ची इमारत बांधण्याच्या तयारीत आहे.
मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की मी न्यू इरा हायस्कूलमध्ये तेहतीस वर्षे पवित्र अशा विद्यादानाचे काम केलेले आहे. अखेर मुख्याध्यापिकेच्या पदाने माझी सेवानिवृत्ती झाली. माझी नियुक्ती संस्थेचे संस्थापक सन्माननीय श्री. प्रभाकर गायतोंडे आणि त्यावेळचे मुख्याध्यापक श्री. विश्वामित्र तारी यांच्या उपस्थितीत झाली. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करून त्यांच्या सुप्त गुणांना चालना देणाऱ्या अनेक शिक्षकांनी इथे विद्यादानाचे कार्य केले आहे. आजही या लोकप्रिय विद्यालयात सर्व स्तरावरील विद्यार्थी एकाच छताखाली गुण्यागोविंदाने शिकतात. मला या विख्यात विद्यालयात विद्यादानाचे कार्य करण्याची संधी दिल्याबद्दल मी संस्थेची आजही ऋणी, कृतज्ञ आहे.
आपल्या वडिलांनंतर मडगाव शिक्षण संस्था आणि पर्यायाने न्यू इरा हायस्कूलची धुरा त्यांचे सुपुत्र श्री. व्यंकटेश उल्हासचंद्र प्रभाकर गायतोंडे यांनी सांभाळलेली आहे. ते स्वत: गोवा सरकारच्या जलस्रोत विभागाचे अतिरिक्त प्रमुख अभियंते म्हणून निवृत्त झालेले आहेत; पण शिक्षणाच्या प्रत्येक क्षेत्रात ते आजही कार्य करतात. हसतमुख, बुद्धिमान मार्गदर्शक, ध्येयशाली, लहानथोरांना बरोबर घेऊन चालणारे, आबालवृद्धांमध्ये रमणारे, सांस्कृतिक कार्यक्रमात रस घेणारे, समाजभान राखणारे, शिक्षकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे, वाचनालयाच्या माध्यमातून सरस्वतीची सेवा करणारे, कोणत्याही परिस्थितीत हार न मानता अनेकांना मदतीचा हात देणारे असे हे चतुरंग व्यक्तिमत्त्व आहे.
शासनाने जे नवे धोरण अवलंबिलेले आहे त्या धोरणाला पूरक ठरणारे शिक्षण मराठी माध्यमातून देण्याचे दुष्कर आव्हान मडगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. गायतोंडे आणि त्यांचे अन्य सहकारी यांनी स्वीकारलेले आहे. प्रारंभी मराठी माध्यमातून तीन पायाभूत वर्ग चालविण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार प्रवेश प्रक्रियासुद्धा चालू झालेली आहे. मडगाव शहरात राष्ट्राच्या शैक्षणिक क्रांतीतील पहिले पाऊल त्यांनी उचललेले आहे ही कौतुकास्पद आणि अभिमानास्पद अशी बाब आहे. त्यांच्या या कार्यास माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा!
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.