Mayanka Pereira INsta/ @mayankapereira
मनोरंजन

वर्षा उसगावकर नंतर गोव्यातून मयांका परेरा करतेय स्वप्नांचा पाठलाग

अभिनय पूर्णवेळ स्वीकारून त्यात करिअर करणारे गोव्यात हातांच्या बोटांवर मोजावे इतकेही नसतील 35 वर्षांपूर्वी वर्षा उसगावकर हिने तसे धाडस केले आणि ती यशस्वीही झाली. त्यानंतर मात्र कुणी तसा प्रयत्न केला नाही.

दैनिक गोमन्तक

नाटक-तियात्रात काम करणे, जमले तर एखाद्या सिनेमात वेळ मिळेल तेव्हा आपल्या सोयीने काम करणे हे गोव्यातल्या अभिनेत्यांच्या अगदी अंगवळणी झाले आहे. अभिनय पूर्णवेळ स्वीकारून त्यात करिअर करणारे गोव्यात हातांच्या बोटांवर मोजावे इतके जणही नसतील. त्यात मुलींची गोष्ट सोडाच. ‘अभिनय’ करिअर म्हणून स्वीकारून त्यातून नाव-पैसा दोन्ही मिळवता येतील इतक्या संधी आज उपलब्ध आहेत. गोव्यात कमी असतील कदाचित पण अगदी शेजारी असलेल्या मुंबईत तर आज वेगवेगळ्या वाहिनीची इतकी भरमार आहे की ठरवून प्रयत्न केल्यास चांगल्या अभिनेत्यास काम मिळणे दुरापास्त होऊ नये. गोमंतकीय कलाकार हिंदी, मराठी भाषा थोड्याशा प्रयत्नानेही चांगल्या बोलू शकतो. स्वतःवर विश्वास असल्यास आणि परिश्रम घेण्याची तयारी ठेवल्यास अभिनेता म्हणून नाव काढणे आज कठीण नाही. जवळजवळ 35 वर्षांपूर्वी वर्षा उसगावकर हिने तसे धाडस केले आणि ती यशस्वीही झाली. त्यानंतर मात्र कुणी तसा प्रयत्न केला नाही.

दक्षिण गोव्यातल्या ओर्ली या लहानशा गावातून येणाऱ्या मयांका परेराने (mayankapereira) मात्र ते धाडस पुन्हा दाखवले आहे. तीने नेहमीच स्टार होण्याचे स्वप्न बाळगले होते. लहानपणापासूनच तिला सिनेमा आवडायचे. ग्लॅमरचे जग तिला खुणवायचेपण ते सारे आपसूकच मिळेल अशा भाबड्या आशेवर ती कधीच नव्हती. तिने गोव्यात तियात्रातून अभिनय केला आहे. (फ्रान्सिस दी तुये यांच्या तियात्रामधून तिने सुमारे शंभर प्रयोगात काम केले आहे) तिने मॉडेल म्हणूनही काम केले आहे. फॅशन शो जिंकले आहेत (२०१४ सालच्या मेगा मॉडेल स्पर्धेत ती उपविजेती ठरली होती). मयांकाच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती स्वावलंबी आहे. आपल्या वयाच्या सोळाव्या वर्षापासून, स्वतः शिकत असताना ती मुलांना ट्युशन द्यायची. कॉलेज पूर्ण केल्यावर तिने लगेच नोकरीही पत्करली. मुंबईला जाणे हे ध्येय तर ती पूर्वीपासून मनात बाळगून होती. या ध्येयाच्या पाठलागावर राहूनच ती मुंबईला आली होती.

तिला नोकरी लगेच मिळाली, पण ही नोकरी त्यावेळच्या स्थैर्यासाठी आणि तात्पुरत्या काळासाठी आहे याची जाणीव तिने नेहमीच मनात जागृत ठेवली. त्यानंतर मिळालेली सिंगापूर एअरलाईन्समधील नोकरी तिला तिच्या स्वप्नातल्या ग्लॅमरच्या जगाकडे घेऊन जात होती म्हणून तिने स्वीकारली. मात्र अभिनेत्री बनण्याचे स्वप्न उरात जिवंत ठेवून! जेव्हा सिंगापूर एअरलाइन्स मधील नोकरी सोडून आपल्या उत्कट स्वप्नांना पुरे करण्यासाठी तिने मुंबईत परतण्याचे परतण्याचे ठरवले तेव्हा लोकांनी तिला वेड्यात काढले. ती जगभर फिरत होती, भरघोस पगार मिळत होता. लोकांच्या दृष्टीने आणखी काय हवे होते? मयंकाला आपले स्वप्न हवे होते.

मुंबईला परतल्यावर तिने ऑडिशन देणे सुरू केले. काही वेब मालिका, म्युझिक व्हिडिओ आणि लघुपटात काम केले. गायक हर्षित तोमरच्या तिने काम केलेल्या म्युझिक व्हिडिओला १० दशलक्ष पेक्षाही अधिक दर्शक लाभले. हे सर्व होत असताना ‘अभिनय’ ही गंभीर बाब आहे याचा विसर मयांकाने होऊ दिला नाही. अभिनेता असरानी चालवत असलेल्या एक्टिंग इन्स्टिट्यूटमध्ये तीन महिन्यांचा अभिनयाचा कोर्सही तिने पूर्ण केला. स्वतःच्या हिंदीवर खूप मेहनत घेतली. मयंका सांगत होती, पूर्वी आपली हिंदी गोमंतकीय वळणाची होती. ‘भाई’चा उच्चार ‘बाई’ होत होता आणि आपल्याला त्यातला फरकही कळत नव्हता. पण आता मयंका ज्याप्रकारे हिंदी बोलते त्याप्रकारे ती एखाद्या हिंदी पट्ट्यातील अभिनेत्री असावी असेच वाटते. कष्टाला पर्याय नाही याबद्दल मयंका अगदी ठाम आहे. मुंबईत जर स्वतःला अभिनेत्री म्हणून सिद्ध करायचे असेल तर ‘भाषा’ हा मुद्दा महत्त्वाचा आहे हे तिने ताडले व लागलीच त्यावर काम करण्यासही सुरुवात केली.

आता तिचा ‘सफाईबाज- दी स्कॅवेंजर’ हा हिंदी चित्रपट ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात उत्तर प्रदेश आणि दिल्ली शहरात रिलीज झाला आहे. चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत ती नसली तरी फार महत्त्वाची भूमिका तिच्या वाट्याला आली आहे. ही भूमिकासुद्धा तिला ऑडिशन देऊनच मिळाली. तिच्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट ही आहे की ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने या चित्रपटाला पाचपैकी चार स्टार्स दिलेले आहेत. आयएमबीडीने पाच पैकी साडेतीन स्टार्स दिलेले आहेत. चित्रपटात रवीकिशन, राजपाल यादव, जॉनी लिव्हर यासारखी सिनेमातली दिग्गज मंडळी आहेत. या महिन्यातच हा चित्रपट मुंबई आणि गुजरातमध्ये रिलीज व्हायचा आहे मयंकाला ठाऊक आहे की हा चित्रपट म्हणजे एक सुरुवात आहे. तिला अजून दूरचा पल्ला गाठायचा आहे. चित्रपट क्षेत्रात प्रियांका चोप्रा ही मयंकाची आदर्श आहे. मयांका म्हणते, प्रियांकानेही परिस्थितीशी झुंज घेऊन आपल्या यशाला आकार दिलेला आहे. नवाजुद्दीन सिद्दिकी तिचा आवडता अभिनेता आहे. कुठलीही पार्श्वभूमी नसताना मयांका ‘चित्रपट’ हे आपले क्षेत्र म्हणून निवडते आणि त्या दिशेने पुढे जाण्यासाठी योजनाबद्धतऱ्हेने काम करते हे कौतुकाचे आहे. आमच्या शुभेच्छा तिच्या पाठीशी असायलाच हव्यात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT