आर्यन खान आणि आमची पोरं

फरक असेलच ना आमच्या आणि शाहरुख खानच्या मुलात?
Aryan Khan
Aryan KhanDainik Gomantak

आम्हाला वाटत असतो तसा फरक असेलच ना आमच्या आणि शाहरुख खानच्या मुलात? तो बडे बाप का बेटा. ग्लॅमरचे जग त्याच्यासमोर हात जोडून उभे आहे. अफाट संपत्ती आहे बापाकडे. मग तो बिघडणारच आणि मग असं पोलिसांचे प्रकरण झालं की आमच्या नैतिकतेचा फणा अगदी फुत्कार सोडून ताठ उभा राहणार. डोक्यात पैसा आणि ग्लॅमर कसे बिघडवते? मुलांना याच्या तात्पर्य कहाण्या तत्परतेने पसरवून नीतिमत्तेच्या आरडाओरड्यात आपण छाती ताठ करत जाणार.

‘पण ही गुंतागुंतीची समस्या आहे’, आरेश नाईक सांगत होते. आरेश नाईक हे मडगावच्या चौगुले कॉलेजमध्ये मानसशास्त्र विषयाचे सहाय्यक प्रध्यापक आहेत. त्यांचं म्हणणं होतं, ‘आर्यन खानचा बाप शाहरुख खान असणं आणि आर्यनच अंमली पदार्थांचं सेवन करणं यात संबंध असावाच असे नाही. (तसं तर आर्यन खानकडे (Aryan Khan) अंमली पदार्थ सापडल्याचा किंवा तो अंमली पदार्थांचे सेवन करतो याचाही पुरावा मिळालेला नाही) मग हे तरुण पिढीचं अंमली पदार्थांच्या आहारी जाणं हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? आरेश नाईक यांच उत्तर होतं, ‘कोणत्याही अतिरिक्त हव्यासाच्या आहारी जाणं याची संभावना तरुण काळात अधिक असते. युवा अवस्थेत असताना ते आपली आयडेंटिटी बनवायच्या प्रयत्नात असतात. आपल्या मित्रांशी किंवा जगाशी त्यांचे नातेसंबंध अजून स्पष्ट झालेले नसतात आणि मुख्य म्हणजे त्या काळात कोवळ्या मनाची अवस्था ‘वल्नरेबल’, कचकडी, अशीच असते. जर त्यांचे मित्र एखादे साहस करत असल्यास त्या साहसात सहभागी होण्याची आणि मित्रांबरोबर बॉण्डिंग स्थापित करण्याची प्रेरणा प्रबळ असते.’

Aryan Khan
आर्यन खान बाबत नवीन खुलासा! ड्रग्ससाठी वापरले जात होते बिटकॉइन आणि डार्कनेट

पण आमच्या काळी आम्ही तरुण वयात असताना आमचे परस्परांशी बॉण्डिंग खेळातून होत होते. फार तर एखादी सिगारेट किंवा चोरून सिनेमाला जाणे..... साहस या मर्यादेतच होते. मग आताच हे असे काय? ‘आज अंमली पदार्थ मिळणे फार सोपे झाले आहे. मुले एकमेकांशी किंवा कुणाशीही लगेच संपर्क साधू शकतात, सोशल मीडिया आहे, हातात मोबाईल आहे. पूर्वी ही स्थिती अशी नव्हती. संपर्क साधण्यात अडचणी होत्या आणि त्यामुळे एक प्रकारची भीतीही होती. शिवाय आज न्यूज मीडियाही फार वायब्रंट आहे. लागलीच गोष्टी कर्णोपकर्णी होतात त्यामुळे ड्र्गबिगच्या गोष्टी लागलीच कळतात. अंमली पदार्थांच्या केसेस पूर्वीही होत्या. अर्थात प्रमाण कमी होते.’

हो म्हणजे ‘अ‍ॅब्स्टेकल टू एक्सेस’ कमी झाल्यामुळे सहजपणे उपलब्ध होत आहेत तर? ‘त्याशिवाय अंमली पदार्थ हे काही जणांचे बिझनेस करिअर बनले आहे जरी हा बिझनेस बेकायदेशीर असला तरी. माल खपवण्यासाठी जागा आणि गिऱ्हाईक अगदी व्यावसायिक पातळीवर हेरल्या जात आहेत.’ मग आमची सुरक्षा यंत्रणा काय करते आहे? पोलिस काय करत आहेत? ‘पोलिस सर्व वेळी सर्व जागी पोचू शकतील याची शक्यताच नाही. ही समस्या आधीही होती आणि पुढेही असेल. मग आपण मुख्यतः अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्याला गुन्हेगार न समजता त्याला एक ‘बळी’ असे समजले पाहिजे. आज होतेय काय तर जो व्यसन सोडायच्या प्रयत्नात आहे त्यालाही समाजाचा आधार मागायची भीती वाटते. समाज आपल्याला विक्टिमायज करेल अशी आशंका त्याच्या मनात असते त्यामुळे त्यांच्याबद्दलचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. केवळ पैसा आहे म्हणून एखादा व्यसनाधीन होतो असे नाही. एखाद्या सामान्य कुटुंबातला पोरही अंमली पदार्थांच्या आहारी जाऊ शकतो.’

Aryan Khan
आर्यन खानच्या प्रकरणात किंग खानने शेवटच्या क्षणी रद्द केले जाहिरातीचे शूटिंग

पैसा नव्हे, प्रसिद्धी वलय नव्हे, मग या महागड्या व्यसनाची सुरुवात होते कशी? ‘सुरवात सौम्य मादक पदार्थांपासून होऊन नंतर अधिक धोकादायक ड्रग असाच प्रवास असतो. या व्यसनाच्या आहारी जाणे हे अनेकदा आपल्या जनुकांवरसुद्धा अवलंबून असते. काहीजण स्वतःवर ताबा मिळवू शकतात, काहीजण नाही.’ पण मग जे या व्यसनात अडकून राहतात त्यांचं काय? त्यांनी तसंच राहावं? ‘त्यांना सर्वात आधी आधार मिळायला हवा तो आपल्या कुटुंबाचा. व्यसन सुटायला पर्यायी आधार मिळायलाच हवा आणि व्यसनातून पूर्ण मुक्त होणे ही आयुष्यभराची लढाई असते. ती रक्ताची चव असते. व्यसन पुन्हा उसळी मारून येऊ शकते म्हणून काळजी घ्यावी लागते. काउन्सिलिंग, निरीक्षण चालू ठेवायचे असते. ‘विथ्ड्रॉवल सिम्प्टम्स’ काळजीपूर्वक हाताळाव्या लागतात. म्हणून मी म्हणालो की ही गुंतागुंतीची समस्या आहे. यात शाहरुख खान किंवा आर्यन खान या नावाचा काहीच संबंध नाही. तुमची मुले असतील किंवा तुमच्या शेजाऱ्यांची असतील. काळजी तुम्हालाच घ्यायला हवी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com