लता आणि आशा नाहीत, अशा जगात जगण्याची सवय आपल्याला आता करून घ्यावी लागणार आहे. अवघड काम आहे; पण काळापुढे कोणाचाच इलाज नाही. तीन वर्षांपूर्वी सहा फेब्रुवारीला लतादीदींनी हे जग सोडले, पाठोपाठ त्यांची बहीण आशा भोसले यांनी रविवारी तीच वाट धरली. एक पोरकेपणाची विव्हळ भावना रसिकांना बराच काळ सोसावी लागणार आहे. भारतीय सुगम संगीताच्या क्षेत्रातले एक युग संपले. लता मंगेशकर ही प्रत्यक्ष भगवंताची बासरी होती, तर आशाताई साक्षात राधेच्या मनातला घन:श्यामाचा स्वर होत्या.
आज या दोघीही नाहीत. देहाने लतादीदी आणि आशाताई या दोघीही आता नसल्या तरी त्यांची हजारो मुद्रित गीते आजही विश्वाच्या अवकाशात चिरंतन राहतील. देह निमाला, तरी सूर अमर असतात. त्या अर्थी या दोघी बहिणी अमर झाल्या आहेत. गेल्या शतकातल्या चाळीशीच्या शतकात या स्वरतारका नभांगणात उगवल्या. चित्रपट बोलू लागला होता आणि गाणीदेखील म्हणू लागला होता. त्या नवलाईच्या काळात ही नक्षत्रे उगवली, आणि अशी उगवली, की जणू सारी गगनेच त्यांच्या मालकीची झाली.
घर सावरण्यासाठी लतादीदींनी १९४२मध्ये दादा चांदेकरांचे संगीत असलेल्या ‘पहिली मंगळागौर’मधले नटली चैत्राची नवलाई’हे गाणे म्हटले, आणि पुढल्याच वर्षी वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षी आशाताईंनी ‘माझा बाळ’ या चित्रपटात ‘चला चला नव बाळा’ हे दत्ता डावजेकरांचा स्वरसाज असलेले गीत गाईले.
इथून पुढे सुरांच्या दुनियेत जे काही घडले, त्याला चमत्कारापेक्षा वेगळे काही म्हणणे कठीण जाईल. आशाताईंच्या गळ्याला झेपत नाही, अशी कुठली स्वररचनाच नाही, असे म्हटले जायचे. त्यांच्या अष्टपैलू कंठातून दीनानाथांचे पल्लेदार सूरही सहज निघाले. अभिजात हिंदुस्थानी गायकीचे अनेक थाट आणि रंग त्या लीलया पेलत. त्याच गळ्यातून अवखळ, मदमस्त गाण्यांची बरसातही होई.
‘यूं सजा चांद के छलका तेरे अंदाज का रंग’ सारखी अवघड गुलाम अली थाटाची अनवट गजल असो किंवा ‘ये मेरा दिल प्यार का दीवाना’सारखे उडत्या चालीचे नशीले गीत असो, ‘सपने में मिलता है, मुंडा मेरा सपने में मिलता है... ’ असली धमाल गाणी असोत, किंवा थेट रॉक! आशाताईंच्या गळ्याला रुकावटच मंजूर नव्हती. त्यांच्या गळ्यात निव्वळ सात सूर नव्हे, तर सहा ऋतूदेखील मुक्कामाला होते. इतका बारमाही, प्रवाही कंठ शतशतकांतून एखादा निर्माण होतो.
त्यांचा मराठी सांस्कृतिक क्षेत्रातला वावरही एखाद्या कलावंताला हेवा वाटावा, असा ग्रेसफुल असे. विशाल वृक्षाच्या सावलीत अन्य रोपट्यांची वाढ खुंटते, असे म्हणतात. पण लतादिदींच्या मोठ्या सावलीत आशाताईंनी आपला स्वरफुलांचा मांडव असा काही फुलवला की तो वेल गगनावेरीच गेला. जेवढे मानमरातब आणि खिताब शक्य होते, ते सगळेच आशाताईंच्या कपाटात सहज जाऊन बसले. भावगीते गावीत तर ती आशाताईंनीच.
किंबहुना फिल्मीगीते गातानाही त्या चित्रदृश्य कुठले, नायिका कोण आहे, याची माहिती घेऊन त्या ढंगाने गीत गात असत. असे अनेक पार्श्वगायक किंवा गायिका करतात, पण आशाताईंनी ही सुरवात करुन दिली. पार्श्वगायनाचे व्याकरण भारताला शिकवणाऱ्या या दोन बहिणी होत्या. सूर निर्विकार असतो, श्रोत्याच्या मनातला भाव त्यावर झिलईसारखा चढतो, तेव्हाच त्याचे भावगीत होते, असे पं. वसंतराव देशपांडे म्हणत असत.
या दृष्टीने आशाताईंची गायकी अभ्यासण्याजोगी आहे. ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख..’ हे गीत आजवर अनेक गायिकांनी म्हटले असेल. पण आशाताईंनी म्हटलेले मूळ गीत ऐकताना जी कातरता अनुभवाला येते, तशी क्वचितच पुन्हा भेटीस येते. ‘छोड दो आंचल जमाना क्या कहेगा’ या गाण्यातले आशाताईंने दाखवलेले सुरीले वेडावलेपण खरोखर पागल करणारे! वयाच्या नव्वदीत लफ्फेदार साडी आणि रत्नहार परिधान करून मंचावरुन आशाताईंनी ‘ ओ मेरे सोना रे सोना रे…’ सुरू केले की प्रेक्षकांच्या दिवानगीला पारावार राहात नसे.
एकाच कंठात हे किती दागिने? आशाताईंनीही हयगय न करता ते रसिकांमध्ये मुक्त हस्ते फेकले. आशाताईंनी आपल्या अस्तित्वाने मराठी रसिकांना केवळ गाण्यावर नव्हे, तर या जन्मावर शतदा प्रेम करण्याचे धडे दिले. वास्तविक खासगी आयुष्यात त्यांनी असंख्य टक्केटोणपे खाल्लेले. मोडक्या संसाराची लाज टाकून त्यांनी हिंदी चित्रपटगीतांच्या दुनियेत स्वत:चा शिक्का उमटवला. स्वत:चे जणू घराणेच निर्माण केले, असे म्हटले तरी चालेल.
उडत्या चालीची कॅबरेगीते नशील्या आवाजात गाण्यात त्यांना जुन्या काळातही काही वाटले नाही, आता तर त्यापेक्षाही उटपटांग गाणी येऊ लागली आहेत. आशाताईंनी गायिलेली उडती गाणी कितीही ‘उडती’ असली तरी एक आब राखून होती. आजही टीव्ही वाहिन्यांवर होणाऱ्या सांगीतिक ‘रिॲलिटी शो’मधली बव्हंशी गाणी आशाताईंनीच गायिलेली असतात, कारण त्यांनीच ही गाणी अजरामर करुन ठेवली आहेत. मंचावरचा त्यांचा बिनधास्त वावर ‘वय हा निव्वळ आकडा आहे’ याची पदोपदी जाणीव करुन देणारा असे.
त्यांनी बारा हजारांच्या वर गाणी गायिली. विक्रमांच्या खतावणीत त्याची नोंद झाली, तरी त्यांना त्याचे कवतिक नव्हते. आणखी बारा हजार गाणी गाण्याचा हुरुप मात्र अखेरपर्यंत बर्करार होता. त्यांचा तो अवखळ निर्झरासारखा उत्साह म्हणजे मूर्तिमंत चैतन्याचा स्वर होता. त्यांची जीवनासक्ती त्यांच्या गाण्यातून पुरेपूर उमटलेली दिसते. ‘भोगले जे दु:ख ज्याला सुख म्हणावे लागले…’ ही आशाताईंची गजल ऐकली की पाणी किती खोल होते, याचे प्रत्यंतर येते. ‘जीवलगा, राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले…’ ही विराणी आशाताईंनीच गावी. त्यातल्या ‘ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे…जीवलगा, राहिले रे दूर घर माझे..’ या ओळीतच आशाताईंच्या जाण्याचा अर्थ सामावला आहे.
आशाताई स्वरकुशल होत्याच, पण त्या तितक्याच पाककुशलही होत्या. त्या पाकनैपुण्याच्या जोरावरच त्यांनी परदेशी उपाहारगृहे सुरु केली, आणि यशस्वीही केली. त्यांच्या स्पष्टोक्तीमुळे काहीवेळा वादंगही ओढवत असे. पण त्यांनी त्याची पर्वा केली नाही. लतादिदी आणि आशाताई यांच्यात सुप्त ‘स्पर्धा’ लावण्याचा प्रकारही चित्रसृष्टीतल्या काहींनी करून पाहिला. पण आशाताईंनी कधीही लतादिदींशी स्वत:ची तुलना करू दिली नाही. त्यांच्या लेखी दिदी हाच गाण्यातला ‘अखेरचा स्वर’ होता. आशाताईंच्या वाढदिवशी कविवर्य सुरेश भटांनी एक कविता त्यांना पाठवली होती.
आता न तुझे कुठल्याही जखमेशी देणे घेणे
पाऊस तुझ्यावर साऱ्या सौख्यांचा बरसत राहो
हा कंठ तुझा अलबेला, हा रंग तुझा मतवाला,
तलवार तुझ्या गाण्याची बिजलीसम चमकत राहो
तू सरगम सुख दुःखाचा…जपलास कसा उमजेना
हा कैफ तुझा ...माझ्याही धमन्यांतुन उसळत राहो
…आशाताई आपल्यात नाहीत, पण या ओळींमधल्या आशाताई आपल्यासोबत राहतील. असल्या स्वरस्वप्नांना जाग नसते, आणि नसावी. या स्वरसम्राज्ञीच्या साम्राज्यात स्वर चिरंतन आहे. त्याला मरण नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.