Tourist deaths in Goa: राज्यात पर्यटकांच्या मृत्यूंनी वाढली चिंता, सव्वातीन महिन्यांत 29 प्रकरणे समोर; ड्रग्स, अपघातांसह गुन्ह्यांचे सावट

Tourist deaths in Goa 2026: १ जानेवारी ते १० एप्रिल या कालावधीत गोव्‍यात आलेल्‍या तब्‍बल २९ पर्यटकांना वेगवेगळ्‍या कारणांमुळे मृत्‍यू आला.
Tourist deaths in Goa
Tourist deaths in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: जीवाचा गाेवा करण्‍यासाठी इंदूर (मध्‍यप्रदेश) येथून आलेल्‍या एका पर्यटकांच्‍या जथ्‍यातील इशान बेडगुजर या २१ वर्षीय पर्यटकाला मागच्‍या आठवड्यात ड्रग्‍स ओव्‍हरडोसमुळे हणजूण येथे मृत्‍यू आल्‍याने गोवा पर्यटकांसाठी आता खरेच नंदनवन राहिले आहे का, हा प्रश्‍न चर्चेत आलेला आहे. १ जानेवारी ते १० एप्रिल या कालावधीत गोव्‍यात आलेल्‍या तब्‍बल २९ पर्यटकांना वेगवेगळ्‍या कारणांमुळे मृत्‍यू आला असून त्‍यातील २ मृत्‍यू ड्रग्‍सशी संबंधित असल्‍याचा संशय व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.

गोवा सध्‍या ड्रग्‍स डेस्टिनेशन बनू लागला असून इशानच्‍या मृत्‍यूने या चर्चेला पुन्‍हा एकदा ऊत आला आहे. या मृत्‍यूमुळे गोवा राष्‍ट्रीय स्‍तरावर पुन्‍हा एकदा बदनाम झाला आहे. सध्‍या या प्रकरणात पोलिस चौकशी सुरू असून त्‍या दिवशी इशानबरोबर आणखी कोण कोण हाेते, त्‍या सर्वांची चौकशी आता पोलिस करू लागले आहेत.

‘गोमन्‍तक’ने मिळविलेल्‍या माहितीप्रमाणे यंदाच्‍या पहिल्‍या सव्‍वातीन महिन्‍यांत गोव्‍यात आलेल्‍या ज्‍या २९ पर्यटकांना मृत्‍यू आला आहे त्‍यापैकी १५ पर्यटक देशी असून १४ पर्यटक विदेशी आहेत. या १४ विदेशी पर्यटकांपैकी तीन विदेशी पर्यटकांची अद्याप ओळख पटलेली नसून या तिन्‍ही विदेशी पर्यटकांना नशेच्‍या अवस्‍थेत असताना मृत्‍यू आल्‍याचे प्राथमिक तपासातून दिसून आले आहे.

Tourist deaths in Goa
Goa Cyber Crime: 'डिजिटल अरेस्ट'चा सापळा भेदला, मॅजिस्ट्रेटचे खोटे सोंग उघड; साताऱ्यात संशयित जेरबंद

ज्‍या २९ पर्यटकांना मृत्‍यू आला आहे, त्‍यातील १७ प्रकरणांची नोंद अनैसर्गिक मृत्‍यू अशी नाेंद झाली असली तरी त्‍यातील काही प्रकरणे ड्रग्‍सशी संबंधित असू शकतात, असे सांगितले जाते. आतापर्यंत फक्‍त दोन मृत्‍यूच ड्रग्‍सशी संबंधित असून हे दोन्‍ही मृत्‍यू नाईट पार्टी करून आल्‍यानंतर झालेले आहेत.

हे दोन्‍ही मृत्‍यू हणजूण भागात झाले असून त्‍यातील एक मृत्‍यू ९ फेब्रुवारी रोजी झाला होता. त्‍यात सातारा (महाराष्‍ट्र) येथील विक्रम बारकोडे या ३२ वर्षीय युवकाचा मृत्‍यू झाला होता. दुसरी घटना ३ एप्रिल रोजी घडली असून या घटनेत इशान बेडगुजर या २१ वर्षीय इंदूर येथील युवकाच्‍या मृत्‍यूचा समावेश आहे.

अन्‍य मृत्‍यूमध्‍ये पाचजणांचे मृत्‍यू बुडून मरण आल्‍यामुळे झाले असून दोन रशियन तरुणींचा एका रशियन माथेफिरूकडूनच उत्तर गोव्‍यात खून करण्‍यात आला हाेता. दोघांना रस्‍ता अपघातात मृत्‍यू आला असून एकाने आत्‍महत्‍या करण्‍याच्‍या प्रकाराची नोंद झाली आहे.

Tourist deaths in Goa
Goa Politics: आपल्याकडून विश्वासघात होणार नाही! काँग्रेस प्रवेशावेळी अमित पालेकरांनी नेत्यांना दिली ग्वाही

सर्वाधिक मृत्यू रशियनांचे

विदेशी पर्यटकांमध्‍ये सर्वांत जास्‍त मृत्‍यू रशियन नागरिकांचे झाले असून त्‍यांची संख्‍या चार आहे. युके येथील दोन पर्यटकांना गोव्‍यात मृत्‍यू आला. तर डेन्‍मार्क, फ्रान्‍स, स्‍वीडन, बेलारुस आणि माॅरिशियस या देशांतील प्रत्‍येकी एका पर्यटकाला मागच्‍या सव्‍वातीन महिन्‍यांत गोव्‍यात मृत्‍यू आला असून अन्‍य तीन मृत विदेशी हे कुठल्‍या देशाचे नागरिक हे अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही.

- सुशांत कुंकळयेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com