Cancer Linked Toxic Chemical Found In Nashik Drinking Water: नाशिकमधील भूगर्भातील पाण्यात कर्करोगास कारणीभूत ठरु शकणारे घातक रासायनिक घटक अत्यंत धोकादायक पातळीवर आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली. प्रयोगशाळेतील तपासणीत या पाण्यात पिण्याच्या पाण्याच्या निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा 1000 पटीपेक्षा जास्त प्रमाणात 'हेक्झाव्हॅलेंट क्रोमियम' हे विषारी रसायन आढळले. नाशिकच्या अंबड भागातील भूगर्भातील पाण्याच्या नमुन्यांमध्ये हा धोकादायक प्रकार उघडकीस आला असून, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली.
'साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल' या पर्यावरण संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, अंबड एमआयडीसी परिसरातील औद्योगिक सांडपाण्यामुळे भूगर्भातील पाणी दूषित झाले असण्याची दाट शक्यता आहे. हेक्झाव्हॅलेंट क्रोमियम हे रसायन सहसा मेटल फिनिशिंग, इलेक्ट्रोप्लाटिंग, पेंट निर्मिती करणाऱ्या उद्योगांमधून बाहेर पडते. भारतीय मानकांनुसार पिण्याच्या पाण्यात (Water) याचे प्रमाण 0.05 मिग्रॅ/लिटर असावे, परंतु अंबड येथील नमुन्यात ते तब्बल 50.3 मिग्रॅ/लिटर आढळले. या दूषित पाण्याशी दीर्घकाळ संपर्क आल्यास त्वचाविकार, फोड येणे, किडनी आणि लिव्हर खराब होणे, तसेच कर्करोग होण्याचा मोठा धोका असतो.
महापालिकेकडून वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने स्थानिक नागरिक या दूषित भूजल वापरावर अवलंबून आहेत. यामुळे तेथील महिला, मुले आणि नागरिकांमध्ये त्वचेचे आजार, सुजलेल्या लिम्फ नोड्स आणि इतर गंभीर आजार दिसून आले आहेत. हे दूषित पाणी स्थानिक नाल्यांद्वारे गोदावरी नदीत मिसळत असून, कुंभमेळ्यादरम्यान गोदावरीच्या घाटावर येणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्यासाठी हा मोठा धोका ठरु शकतो.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संथ कारभारावरही या संस्थेने ताशेरे ओढले आहेत. तक्रारींनंतरही केवळ एका कंपनीला नोटीस बजावण्यात आली असून, पाण्याच्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर न करुन नागरिकांना अंधारात ठेवल्याचा आरोप करण्यात आला. कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी नदी आणि भूजलाची तातडीने योग्य तपासणी करुन कडक उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.